उपराष्ट्रपती कार्यालय

महामारीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन आरोग्य प्रणालीची पुनर्रचना करण्याची गरज व्यक्त

ज्येष्ठ नागरिकांना बँका, सार्वजनिक कार्यालये आणि प्रवासाच्या वेळी बराच वेळ उभे राहायला लागणे आपल्या नागरी मूल्यांच्या विपरित- उपराष्ट्रपती

Posted On: 30 AUG 2020 8:14PM by PIB Mumbai

 

सध्या देशात सुरू असलेल्या कोविड-19च्या महामारीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आणि त्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी केले आहे. सध्याच्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या काळात ज्येष्ठांना असलेला सर्वात मोठा धोका लक्षात घेऊन, जर आपल्या कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असतील तर त्या कुटुंबातील तरुणांनी आणि इतर सदस्यांनी कोविड-19 शी संबंधित अतिरिक्त खबरदारी घ्यावी असा सल्ला नायडू यांनी आज आपल्या फेसबुक पोस्टमधून भारतातील ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन करताना दिला आहे.

जिल्हा रुग्णालयांमध्ये वृद्धापकाळातील आरोग्य विषयक समस्यांची हाताळणी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा वेगळा कक्ष असल्याचे आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्येष्ठांना सातत्याने उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी, तसेच त्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण पुरवण्यासाठी आपल्या आरोग्य प्रणालीची पुनर्रचना करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. सार्वजनिक स्थानांवर ज्येष्ठांना विनाअडथळा आणि सहजगत्या संचार सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.

आपली शहरे आणि त्यामधील विविध प्रकारच्या सुविधा यांचा वापर ज्येष्ठ नागरिकांना करता आला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकारच्या विविध योजना आणि कार्यक्रम असूनही ज्येष्ठ नागरिकांना या सेवांचा लाभ घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते अशी खंत त्यांनी विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेख करत व्यक्त केली. बऱ्याच वेळा बँकांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये, प्रवास करताना बस आणि रेल्वेगाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप वेळ उभे राहावे लागते. प्रभू रामचंद्र आणि श्रावण कुमार यांच्यासारखे आदर्श असलेल्या  आपल्या 5000 वर्षे जुन्या नागरी संस्कृतीच्या शिकवणीच्या विपरित हे सर्व चित्र आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

या संदर्भात सरकारी अधिकारी आणि जनतेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि त्यांना आवश्यक असलेली मदत याबाबत जागरुकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यावर भर देण्याची गरज वेंकैया नायडू यांनी व्यक्त केली. ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी एक भक्कम यंत्रणा उभारण्याचे त्यांनी आवाहन केले. ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे स्रोत असल्याचे सांगत, त्यांना त्यानुसार आदर, सन्मान आणि प्रेम मिळाले पाहिजे आणि त्यांच्या आयुष्याच्या संधीकाळात त्यांची योग्य प्रकारे आणि आपुलकीने काळजी घेतली गेली पाहिजे, असे नायडू यांनी सांगितले.

ज्येष्ठांची काळजी घेण्याचे पवित्र कर्तव्य तरुणांसह आपल्यापैकी प्रत्येकाचेच आहे, असे ते म्हणाले. भारतीय संसद सदस्यांच्या संघटनेने तयार केलेल्या भारतातील ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्याया विषयावरील अहवालाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की सध्या देशात 60 पेक्षा जास्त वय असलेले 10 कोटी लोक असून लोकसंख्या वाढीपेक्षा त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या अहवालानुसार 2050 पर्यंत भारतीय लोकसंख्येच्या 20 टक्के लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची असेल. भारतात आपल्या अपत्यांवर अवलंबून असणाऱ्या किंवा एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यापैकी अनेकांना विशिष्ट प्रकारच्या अन्यायांना तोंड द्यावे लागते. या अहवालाने या वस्तुस्थितीकडे देखील लक्ष वेधले आहे की ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित समस्यांकडे जास्त लक्ष पुरवले जात नाही कारण वयोवृद्धांच्या समस्यांबाबत संसद सदस्यांकडून जास्त प्रश्न उपस्थित केले जात नाहीत.

यावेळी उपराष्ट्रपतींनी भगवान गणेशाने आपल्या पालकांची तुलना संपूर्ण विश्वाशी करत त्यांना प्रदक्षिणा घातल्याच्या पौराणिक कथेचा दाखला दिला आणि आपल्या पालकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आदर घेण्यासाठी आताच्या पिढीने गणेशाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, अशी सूचना केली. भारतीय संस्कृती आणि समाजात पालकांना असलेले महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की जेव्हा आपण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांच्या पावलांना स्पर्श करतो, त्यावेळी आपण त्यांचे ज्ञान, त्यांचा अनुभव  आणि त्यांनी दिलेले प्रेम यांचा आदर करत असतो.

 

M.Chopade/S.Patil /P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649874) Visitor Counter : 360