पंतप्रधान कार्यालय
पोषण महिन्याचे रुपांतर पोषक आहाराबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या लोकचळवळीत करण्याचे महत्त्व पंतप्रधानांकडून अधोरेखित
Posted On:
30 AUG 2020 6:39PM by PIB Mumbai
नुकत्याच झालेल्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी सप्टेबर महिना पोषण माह- पोषक आहाराचा महिना म्हणून पाळणार असल्याचे जाहीर केले. पोषण आणि राष्ट्र यांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. “यथा अन्नम तथा मनम” या वाक्प्रचाराची म्हणजे आपल्या मानसिक आणि बौद्धिक विकासाचा संबंध आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच्याशी असतो याची त्यांनी आठवण करून दिली. पोषक आहार आणि योग्य प्रकारचे पोषण यांची भूमिका बालकांच्या आणि विद्यार्थ्यांना त्यांची वास्तविक क्षमता प्राप्त करण्यामध्ये आणि त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यामध्ये महत्त्वाची ठरते, असे ते म्हणाले. बालकांचे पोषण चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्यांच्या मातांना योग्य प्रकारचा आहार मिळण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. पोटभर जेवणे म्हणजे पोषण होणे असा अर्थ नसून क्षार, व्हिटॅमिन्स इत्यादींसारखे पोषक घटक मिळणे देखील गरजेचे असते. गेल्या काही वर्षात देशात विशेषतः गावांमध्ये पोषण सप्ताह आणि पोषण महिन्यात सार्वजनिक सहभागाच्या माध्यमातून पोषणाबाबतच्या जनजागृतीचे रुपांतर एका लोकचळवळीत करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या लोकचळवळीत शाळांना सहभागी करण्यात आले आहे आणि पोषणाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
एखाद्या वर्गात ज्या प्रकारे वर्गाचा मॉनिटर असतो, तशाच प्रकारे एक पोषण मॉनिटर असला पाहिजे, असे पंतप्रधानांनी सुचवले. तशाच प्रकारे एका प्रगती पुस्तकासारखे एक पोषण पुस्तक देखील सुरू केले पाहिजे, असे ते म्हणाले. पोषण महिन्याच्या काळात माय जीओव्ही पोर्टलवर एका अन्न आणि पोषण आहार स्पर्धेचे त्याचबरोबर एका मेमे स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी श्रोत्यांना केले.
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात एक आगळे वेगळे न्यूट्रिशन पार्क उभारण्यात आले असून त्याठिकाणी मौजमजा करण्याबरोबरच पोषणाशी संबंधित ज्ञान देखील मिळवता येऊ शकेल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
भारतात अन्न आणि पेयपदार्थांची खूप मोठ्या प्रमाणावर विविधता असल्यावर त्यांनी भर दिला. एखाद्या विशिष्ट भागातील हंगामानुसार संतुलित आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेला आहार घेण्यासाठी एक आराखडा तयार करणे आणि त्यात त्या भागात पिकवली जाणारी स्थानिक अन्नधान्ये, फळे आणि भाज्या यांचा समावेश करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
एका भारतीय कृषी निधीची स्थापना करण्यात येणार असून त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात लागवड करण्यात येणारी पिके आणि त्यांच्यात असलेली पोषण मूल्ये यांची संपूर्ण माहिती समाविष्ट करण्यात येईल, असे पंतप्रधान म्हणाले. पोषण महिन्यात पोषक अन्नपदार्थ खाण्याचे आणि निरोगी राहाण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सर्व श्रोत्यांना केले.
***
B.Gokhale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649843)
Visitor Counter : 523
Read this release in:
Manipuri
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam