पंतप्रधान कार्यालय

तीन आयसीएमआर प्रयोगशाळांमधील मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणाऱ्या कोविड-19 चाचणी सुविधांचे लोकार्पण करताना पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 27 JUL 2020 8:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2020

 

नमस्कार!!

 देशातील कोट्यवधी नागरिक कोरोनाच्या जागतिक महामारीचा सामना धैर्याने करीत आहेत.

आज ज्या उच्च तंत्रज्ञानयुक्त चाचणी सुविधांचे लोकार्पण झाले आहे त्यामुळे पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला कोरोना विरुद्धच्या लढ्यात आणखी सहकार्य मिळणार आहे.

मित्रांनो,

दिल्ली- राष्ट्रीय राजधानी प्रदेश, मुंबई आणि कोलकाता ही आर्थिक घडामोडींची मोठी केंद्रे आहेत. या शहरांमध्ये देशातील लाखो युवक आपले भविष्य साकारण्यासाठी, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. आता या तिन्ही ठिकाणी ज्या चाचणी सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधांची क्षमता आता 10 हजारने वाढणार आहे.

आता या शहरांमध्ये चाचण्या अधिक शीघ्रतेने होऊ शकतील. यात आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे या उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रयोगशाळांचा उपयोग फक्त कोरोना चाचण्यांपुरता मर्यादित नसेल.

भविष्यात हिपॅटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, डेंग्यू सह विविध आजारांच्या तपासणीसाठीसुद्धा या प्रयोगशाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-आयसीएमआर  आणि अन्य संस्थांशी निगडित मित्रांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन.

मित्रांनो,

देशात ज्याप्रमाणे उचित प्रसंगी योग्य निर्णय घेतले गेले, त्याचीच परिणती म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारत खूपच सुस्थितीत आहे. प्रतिष्ठित देशांच्या तुलनेत आपल्या देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे; तर आपल्याकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत अधिक असून दिवसेंदिवस त्यात आणखी सुधारणा होत आहे. आज भारतात कोरोना संक्रमण झाल्यानंतर त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या जवळपास 10 लाखांवर पोहोचणार आहे.

मित्रांनो,

देशात कोरोना संबंधित आरोग्य पायाभूत सुविधांची निर्मिती होणे ही कोरोना विरुद्धच्या या मोठ्या आणि दीर्घकालीन लढ्यात सर्वात महत्वाची गोष्ट होती. याच कारणास्तव अगदी सुरवातीलाच केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.

विलगीकरण केंद्र, कोविड विशेष रुग्णालये, चाचणी, रुग्ण शोध आणि पाठपुरावा यासारख्या उपाययोजनांद्वारे भारताने अतिशय वेगाने आपल्या क्षमतांचा विस्तार केला. आज भारतात 11 हजार पेक्षा जास्त कोविड सुविधा आहेत तसेच 11 लाखाहून अधिक विलगीकरण खाटा आहेत.

मित्रांनो,

आपल्या देशात कोरोना चाचणीसाठी जानेवारी महिन्यात केवळ एक केंद्र होते मात्र आज देशभरात सुमारे 1300 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आज भारतात 5 लाखाहून अधिक चाचण्या दररोज होतात. येणाऱ्या आठवड्यांमध्ये त्या 10 लाख प्रतिदिन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मित्रांनो,

प्रत्येक भारतीयाचा जीव वाचविणे हाच कोरोना महामारीच्या काळात सर्वांचाच संकल्प आहे. या संकल्पामुळे भारतात अविश्वसनीय परिणाम दिसत आहेत. विशेषतः वैयक्तिक सुरक्षा उपकरणे-पीपीई, मास्क आणि चाचणी किट्स च्या अनुषंगाने भारताची वाटचाल म्हणजे महान यशोगाथा आहे. एक काळ असा होता जेव्हा भारतात एकही पीपीई किट बनत नव्हते. आज पीपीई किट निर्मितीत भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे.

अगदी 6 महिन्यांपूर्वी देशात एकही पीपीई किट उत्पादक नव्हता. आज 1200 पेक्षा जास्त उत्पादक दररोज 5 लाखाहून अधिक पीपीई किटची निर्मिती करीत आहेत. एक वेळ होती जेव्हा भारत N-95 मास्क सुद्धा आयात करीत होता. आज भारतात 3 लाखाहून जास्त N-95 मास्क दररोज तयार होत आहेत.

एक काळ असा होता जेव्हा भारत व्हेंटिलेटरसाठी सुद्धा इतर देशांवर अवलंबून होता. आज भारतात दरवर्षी तीन लाख व्हेंटिलेटर तयार करण्याची उत्पादन क्षमता विकसित झाली आहे. दरम्यानच्या काळात वैद्यकीय ऑक्सीजन सिलेंडरच्या उत्पादनातही चांगलीच वाढ झाली आहे.

सर्वांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळेच आज लोकांचे प्राण वाचत आहेत. इतकेच नाही, तर ज्या वस्तू आपण आयात करत होतो, आता आपला देश त्या वस्तूंचा निर्यातदार होणार आहे.

मित्रहो,

इतक्या कमी काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणे, हे किती मोठे आव्हान आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. एक आणखी मोठे आव्हान होते, कोरोना विरुद्धच्या युद्धासाठी देशात मनुष्यबळ तयार करणे. जितक्या कमी वेळात आपण पॅरामेडिक्स, आशा कार्यकर्त्या, एएनएम, अंगणवाडी आणि आरोग्य तसेच इतर कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे तयार केले, ते खरोखरच अभूतपूर्व असे आहे.

आज भारताचे कोरोना विरुद्धचे युद्ध पाहून अवघे जग स्तंभित झाले आहे, मोठमोठ्या शक्यता चुकीच्या ठरत आहेत, त्याला मोठ्या प्रमाणात आमचे हे योद्धे सुद्धा कारणीभूत आहेत.

मित्रहो,

कोरोना विरुद्धच्या युद्धात आज आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलो आहे, जिथे आपल्याकडे पुरेशी जनजागृती झालेली आहे, विज्ञानाधारित माहितीचा विस्तार होत आहेत आणि स्रोत सुद्धा वाढत आहेत.

आता आम्हाला राज्ये तसेच जिल्हा आणि गावांच्या स्तरावर मागणी आणि पुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करायचे आहे.

आम्हाला एकत्रितपणे आरोग्य विषयक पायाभूत सुविधा तयार करायच्या आहेत, त्याचबरोबर आमच्याकडे प्रत्येक गावात सरकारी आणि खाजगी दवाखाने आहेत, त्यांना सुद्धा जास्त सक्षम करायचे आहे. आमची गावे कोरोना विरुद्धच्या लढाईत कमकुवत ठरू नयेत, यासाठी हे करायचे आहे.  आतापर्यंत या बाबतीत गावांनी खूपच चांगली कामगिरी केली आहे.

आणि त्याचबरोबर आमचे कोरोना योद्धे थकून जाणार नाहीत, या गोष्टीची काळजीही आम्हाला घ्यायची आहे. नव्या तसेच सेवानिवृत्त व्यावसायिकांना आरोग्य यंत्रणेत सामावून घेण्यासाठी सुद्धा आम्हाला सातत्याने काम करावे लागेल.

मित्रहो,

आपले अनेक सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. आपले हे उत्सव आनंदाचे प्रसंग  व्हावेत, लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी आपल्याला पुरेशी खबरदारी घ्यायची आहे. उत्सवाच्या काळात गरीब कुटुंबे त्रासात राहणार नाहीत, याची खबरदारी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबाला वेळेत मिळावा, याची खातरजमा सुद्धा करायची आहे.

मित्रहो,

आपल्या देशातील बुद्धिमान वैज्ञानिक कोरोना वरील लस शोधण्यासाठी वेगाने काम करत आहेत. मात्र जोपर्यंत प्रभावी औषध किंवा लस तयार होत नाही, तोपर्यंत मास्क, किमान सहा फुटांचे अंतर, हातांची वारंवार स्वच्छता या बाबींना पर्याय नाही. आपल्याला स्वतःलाही वाचवायचे आहे आणि घरातील लहान-मोठ्या सर्व वयांच्या कुटुंबियांनासुद्धा वाचवायचे आहे.

कोरोना विरुद्धचे हे युद्ध आपण सर्व मिळून लढणार आणि जिंकणार, याची मला खात्री वाटते. या अत्याधुनिक सुविधांबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून अभिनंदन.

आपले अनेकानेक आभार.

 

 

* * *

M.Chopade/M.Pange/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641650) Visitor Counter : 194