पंतप्रधान कार्यालय

वाराणसी येथील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

Posted On: 09 JUL 2020 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2020

 

हर-हर महादेव!

काशीच्या या पुण्यभूमीवरच्या तुम्हा सर्व पुण्यवान व्यक्तींना माझा प्रणाम! श्रावण महिना सुरु आहे. अशावेळी महादेवाचे दर्शन घेण्याची सर्वांचीच इच्छा असते. मात्र,जेव्हा या भोलेबाबाच्या नगरातील लोकांना बघण्याची, भेटण्याची संधी मिळते, तेव्हा असं वाटतं की आज मला एक दर्शन करण्याचेच सौभाग्य मिळाले. सर्वात आधी तर आपल्या सर्वांना भोलेनाथाच्या या प्रिय महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!

 भोलेनाथाच्याच आशीर्वादाने कोरोनाच्या या संकटकाळात देखील आपल्या काशी शहरात आशा-आकांक्षा, उत्साहाचे वारे कायम आहे. हे खरे आहे की सध्या भाविक बाबा विश्वनाथाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही, आणि ते ही श्रावण महिन्यात जाऊ न शकणे. तुमचे दुःख मी समजू शकतो. हे ही खरेच आहे की मानस मंदिर असो, दुर्गा कुंड असो, किंवा मग संकट मोचन मधली श्रावणातील यात्रा असो. सगळेच स्थगित झाले आहे, काहीही होऊ शकले नाही.

मात्र, हे ही खरेच आहे, की या अभूतपूर्व संकटाच्या काळात, माझ्या काशीने, आपल्या काशीने या अभूतपूर्व संकटाचा अत्यंत धैर्याने सामना केला आहे. आजचा हा कार्यक्रम देखील त्याच प्रयत्नांचा भाग आहे. कितीही मोठे संकट का असेना, पण कोणीही काशीच्या लोकांच्या चीवट वृत्तीची बरोबरी करु शकत नाही. जे शहर जगाला गती देते, त्याच्यासाठी कोरोनाची काय तमा? हे तुम्ही दाखवून दिले आहे.

मला असे सांगण्यात आले आहे की, काशीचे जे वैशिष्ट्य मानले जाते, ते म्हणजे चहाचे कट्टे, ते ही कोरोनामुळे सुने-सुने होऊन गेले. मात्र यावर उपाय शोधत आता डिजिटल कट्टे सुरु झाले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी या परंपरेला जिवंत केले आहे. इथली संगीताची परंपरा बिस्मिल्ला खां जी, गिरीजा देवी जी, हिरालाल यादव जी यांच्यासारख्या महान साधकांनी समृध्द केली. ती परंपरा आज काशीचे सन्मानित, सुप्रसिद्ध कलाकार पुढे नेत आहेत. अशाप्रकारची अनेक कामे गेल्या तीनचार महिन्यांपासून काशीमध्ये सातत्याने सुरु आहेत.

याच काळात, मी सातत्याने योगीजींच्या संपर्कात आहे. सरकारमधील वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आहे. काशीहून ज्या बातम्या माझ्यापर्यंत येत होत्या त्याद्वारे आणि यंत्रणेतील लोकांशी चर्चा करुन, काय करायचे काय नाही करायचे याबद्दल सर्वांशी सतत बोलत होतो.तुमच्यापैकी अनेक लोक देखील आहेत, ज्यांच्याशी, बनारसच्या इतर अनेक लोकांशी मी नियमितपणे फोनवर बोलत असतो, त्यांचे सुख-दुःख जाणून घेतो, अडचणी समजून घेतो, त्यांची मते जाणून घेतो. आणि त्यांच्यापेकी काही लोक आज या कार्यक्रमातही उपस्थित असतील, याची मला खात्री आहे.

संक्रमण रोखण्यासाठी कोण काय पावले उचलत आहेत, रुग्णालयांची स्थिती काय आहे, इथे काय व्यवस्था केल्या जात आहेत, विलगीकरणाच्या सुविधा कशा आहेत, बाहेरून येणाऱ्या श्रमिक बांधवांसाठी आपण काय काय व्यवस्था करु शकतो, या सगळ्याविषयीची माहिती मी वेळोवेळी घेत असतो.

मित्रांनो,आपल्या काशीमध्ये बाबा विश्वनाथ आणि मां अन्नपूर्णा, दोघांचाही वास आहे. आणि लोकांची एक जुनी श्रद्धा आहे की एक काळ असा होता जेव्हा महादेवाने स्वतः मां अन्नपूर्णेकडे भिक्षेचे दान मागितले होते. तेव्हापासून काशी शहराला एक विशेष आशीर्वाद मिळाला आहे की येथे कोणीच उपाशी झोपणार नाही.. मा अन्नपूर्णा आणि बाबा विश्वनाथ सर्वांच्या खाण्यापिण्याची सोय करतील. 

मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी, सर्व संस्थांसाठी आणि आपल्या सर्वांसाठीही ही अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे की यावेळी देवाने आपल्याला गरिबांची सेवा करण्याचे माध्यम बनवले आहे, विशेषतः तुम्हा सर्वांना बनवले आहे. एकप्रकारे, तुम्ही सगळे जण मां अन्नपूर्णा आणि बाबा विश्वनाथाचे दूत बनून गरजू लोकांपर्यंत पोहोचत आहात.

इतक्या कमी काळात, अन्नविषयक हेल्पलाइअन असो, समुदाय स्वयंपाकघराचे व्यापक  नेटवर्क तयार करणे, हेल्पलाईन विकसित करणे, डेटासायन्स या आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाची मदत घेणे, वाराणसी स्मार्ट सिटीच्या नियंत्रण आणि कमांड केंद्राच्या सेवेचा वापर करणे, म्हणजे प्रत्येक स्तरावर गरिबांना मदत करण्यासाठी सर्व सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर केला गेला. आणि इथे मी हे ही सांगतो, की आपल्या देशात ही सेवाभावना काही नवी नाही, ही आपल्या संस्कारांमध्येच आहे. मात्र, यावेळचे जे सेवा कार्य आहे, ते सर्वसामान्य कार्य नाही. इथे फक्त दुःखी लोकांचे अश्रू पुसणे, कोण्या गरिबाला खायला अन्न देणे एवढेच काम नव्हते.यावेळच्या सेवाकार्यात कोरोनासारख्या आजाराशी थेट संपर्क येण्याची संसर्ग होण्याची भीती होती. जर आपल्याला त्याची लागण झाली तर? आणि म्हणूनच सेवेसोबतच, त्याग आणि बलिदानाची तयारी देखील होती.

आणि म्हणूनच भारताच्या काना-कोपऱ्यात ज्या ज्या लोकांनी या कोरोनाच्या संकटकाळात सेवाकार्य केले आहे, ते काही सर्वसामान्य काम नाही. त्यांनी केवळ आपली जबाबदारी पार पाडली,असे नाही. एक भय होते, संकट समोर होते आणि तरीही पुढे जायचे होते, स्वेच्छेने जायचे होते, हे सेवेचे नवे रूप आहे. 

मला असे सांगण्यात आले होते, की जेव्हा जिल्हा प्रशासनाला अन्नवाटप करण्यासाठी  गाड्या कमी पडल्या तेव्हा टपाल खात्याने आपल्या रिकाम्या असलेल्या टपाल गाड्या या कामासाठी वापरायला दिल्या. विचार करा, सरकारची, प्रशासनाची प्रतिमा तर अशीच आहे, की आधी प्रत्येक कामाला नकारघंटा वाजवली जाते. हा तर माझा विभाग आहे, मी तुम्हाला का देऊ, मला तर हे करायचे आहे-तुम्ही कोण आहात मला सांगणारे... अशा चर्चा कानावर येत. मात्र इथे आपण पहिले की पुढाकार घेऊन एकमेकांना मदत केली गेली. याच सहकार्याने, याच सामूहिक भावनेने आपल्या काशी शहराला आणखी भव्य बनवले आहे. अशा मानवी व्यवस्थेसाठी, इथले प्रशासन असो, गायत्री परिवार रचनात्मक ट्रस्ट असो, राष्ट्रीय रोटी बँक असो, भारत सेवाश्रम संघ असो, आपल्या सिंधी समाजातील बंधू-भगिनी असो, भगवान अवधूत राम कुस्थ सेवा आश्रम सर्वेश्वरी समूह असो, बँकांशी संबंधित लोक

असो, आपली पांढरपेशी वस्त्रे बाजूला ठेवून, गल्लीबोळातल्या गरीबाच्या दाराशी पोचले. सगळ्या व्यापारी संघटना असोत. आता आपल्या अन्वर अहमद जी यांनी कितीचान शब्दांत सांगितले, असे कितीतरी असंख्य लोक आहेत, आणि मी तर आतापर्यंत अशा केवळ पाच-सात लोकांशीच चर्चा करु शकलो आहे. मात्र, अशा हजारो लोकांनी आपल्या सेवाकार्याने काशीचा सन्मान वाढवला आहे. शेकडो संस्थांनी स्वतःला या सेवाकार्यात झोकून दिले आहे. मी सर्वांशी चर्चा करु शकलो नाही, पण आज मी प्रत्येकाच्या कामाला नमन करतो. याच्याशी सबंधित प्रत्यक व्यक्तीला मी प्रणाम करतो. आणि जेव्हा आज मी इथे तुमच्याशी बोलतो आहे, तेव्हा केवळ याची मिती घेत नाही, तर तुमच्याकडून प्रेरणाही घेतो आहे. आणखी काम करण्यासाठी, तुमच्यासारख्या लोकांनी या संकटकाळात जे काम केले,अशा लोकांकडून मी आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आणि माझी प्रार्थना आहे की बाबा विश्वनाथ आणि मां अन्नपूर्णा आपल्याला या सेवाकार्यासाठी आणखी सामर्थ्य देवो, शक्ती देवो.

मित्रांनो, कोरोनाच्या या संकटकाळात, संपूर्ण जगाची विचार करण्याची, काम करण्याची पद्धती , खाण्या-पिण्याच्या पद्धती, सवयी सगळ्यांमध्ये मोठा बदल केला आहे. आणि ज्याप्रकारे आपण या काळात सेवा केली, त्या सेवेचा समाज जीवनावर मोठा प्रभाव पडतो. मी लहानपणी ऐकले होते की, एक सोनार, आपल्या घरी सोनाराकीची छोटी-मोठी कामे करत असे. आणि काही कुटुंबांसाठी सोन्याच्या वस्तू बनवणे वगैरे कामातून त्याचा चरितार्थ चालत असे. मात्र, या महोदयांना एक सवय होती. ते बाजारातून दात घासण्याच्या काड्या विकत घेत. आज दात घासायला आपण टूथब्रश वापरतो, मात्र पूर्वीच्या काळी अशा काड्या-दातून वापरले जात. तर हे महोदय, रुग्णालयात जाऊन, जे ही रुग्ण होते, त्यांचे जे नातेवाईक असायचे, त्यांची मोजदाद करत आणि रोज संध्याकाळी प्रत्येकाच्या नावाची एक काडी त्याना देऊन येत. हेच काम करत. आणि दिवसभर त्यांची सोनारकीची कामे सुरु असत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक सोनार म्हणून आपल्या कामासोबत, त्यांनी हे लोकांना रोज दात घासण्याच्या काड्या नेऊन देण्याचे जे व्रत सुरु केले होते, त्यामुळे त्या पूर्ण परिसरात ते प्रसिध्द झाले होते, त्या भागात त्यांच्या या सेवाकार्याची चर्चा इतकी झाली होती, की सोन्याचे काही काम करायचे असेल तर लोक म्हणत अरे, ते गृहस्थ सेवाभावी आहेत, आपण त्यांच्याकडेच हे काम करायला देऊया. म्हणजे, या सेवाकार्यामुळेच लोकांच्या मनात त्यांची एक विश्वासार्ह प्रतिमा तयार झाली होती. सोन्यासारख्या महत्वाच्या कामात ते लोकांचे विश्वस्त बनले होते. म्हणजे आपला समाज असा आहे, जो सेवाभावाकडे, केवळ काही मिळवले, काही गमावले एवढ्याच भावनेने नाही, तर, त्यापेक्षा कितीतरी अधिक आदराच्या भावनेने बघतो. आणि जो ही सेवा घेतो, तो हि त्याचवेळी निश्चय करतो, की जेव्हाही मला संधी मिळेल, मी ही कोणाची तरी मदत करेन, आणि सेवेचे चक्र पुढे सुरु राहते. हेच तर समाजाला प्रेरणा देणारे आहे.  

 आपण ऐकले असेल की शंभर वर्षापूर्वी अशी भयानक महामारी आली होती, आता शंभर वर्षांनी आली आहे. तेव्हा भारताची इतकी लोकसंख्या नव्हती, लोक कमी होते असे म्हणतात. मात्र त्या वेळी त्या महामारीमुळे जगात सर्वात जास्त लोक मृत्यूमुखी पडले त्यात आपला हिंदुस्थानही होता. कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडले होते.म्हणूनच यावेळी महामारी आली तेव्हा अवघे जग, भारताचे नाव घेताच त्यांना भीती वाटत होती. त्यांना वाटत होते, शंभर वर्षापूर्वी भारतात इतके जण मरण पावले होते, आज भारताची लोकसंख्या इतकी आहे, इतकी आव्हाने आहेत, मोठे-मोठे तज्ञ सांगत होते भारताबाबत प्रश्न चिन्ह  निर्माण करत होते, या वेळी भारतात परिस्थिती बिघडेल. मात्र स्थिती काय होती,आपण पाहिले असेल 23-24 कोटी लोकसंख्येचा आपला उत्तर प्रदेश, त्याच्या बाबत तर लोकांच्या मनात अनेक शंका-कुशंका होत्या की हा कसा बचावणार. कोणी म्हणत होते, उत्तर प्रदेशात गरिबी खूप आहे,काम करण्यासाठी बाहेर  गेलेले श्रमिक, कामगार अनेक आहेत. हे सर्वजण सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचे पालन कसे करतील,  हे कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण पावतील. मात्र आपल्या सहयोगाने, उत्तर प्रदेशाच्या लोकांच्या परिश्रमाने, पराक्रमाने साऱ्या शंका  नष्ट झाल्या.

मित्रहो, ब्राझील सारख्या देशात, जिथली लोकसंख्या सुमारे 24 कोटी आहे, तिथे कोरोनामुळे 65 हजार लोकांचा दुखःद मृत्यू झाला तर तितक्याच लोकसंख्येच्या आपल्या उत्तर प्रदेशात सुमारे 800 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. म्हणजे युपी मधे, मृत्यूमुखी पडतील अशी भीती व्यक्त केली जात होती अशी हजारो आयुष्य कोरोना पासून वाचवण्यात आली आहेत. आज परिस्थिती अशी आहे की उत्तर प्रदेशाने कोरोना संक्रमणाचा वेग आटोक्यात आणला असून, ज्यांना कोरोना झाला आहे त्यांची प्रकृतीही झपाट्याने सुधारत आहे. त्याचे मोठे कारण म्हणजे आपल्यासारख्या महान लोकांची जागरूकता, सेवाभाव आणि सक्रियता आहे. आपल्या सारख्या सामाजिक, धार्मिक आणि परोपकारी संघटनेचा हा जो सेवाभाव आहे, आपला संकल्प आहे, आपले संस्कार आहेत, ज्यांनी कठीणातल्या कठीण काळात, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना विरोधात लढा देण्याची ताकद दिली आहे, मोठी मदत केली आहे.

मित्रहो, आपण सर्व तर काशीवासीय आहोत, संत कबीर दास यांनी म्हटले आहे-   

   सेवक फल मांगे नहीं, सेब करे दिन रात

सेवा करणारा, त्याच्या फळाची अपेक्षा करत नाही, अहोरात्र निःस्वार्थ भावनेने सेवा करतो. दुसऱ्याची निःस्वार्थ भावनेने सेवा करण्याचे आपले जे हे संस्कार आहेत ते या कठीण काळात देशवासीयांसाठी उपयोगी ठरत आहेत. याच भावनेने केंद्र सरकारनेही अखंड प्रयत्न केले की कोरोना काळात लोकांना झेलावे लागणारे हाल कमी व्हावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. गरिबांना अन्नधान्य मिळावे, त्यांच्याकडे काही पैसे राहावे, त्यांच्याकडे रोजगार राहावा, आपल्या कामासाठी त्यांना कर्ज घेता यावे या सर्व बाबींकडे लक्ष पुरवण्यात आले.

मित्रहो, आज भारतात 80 कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत अन्नधान्य पुरवले जात आहे. याचा मोठा लाभ बनारसच्या गरिबांना, श्रमिकांनाही होत आहे. आपण कल्पना करू शकता, भारत, अमेरिकेहून दुप्पट लोकसंख्या असूनही, कोणता पैसाही न घेता या सर्वांचे भरण पोषण करत आहे. आता तर ही योजना  नोव्हेंबर अखेरपर्यंत म्हणजे दिवाळी आणि छठ पूजेपर्यंत म्हणजे  30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.  कोणत्याही गरिबाला सणासुदीच्या दिवसात अन्नधान्याची ददात राहू नये हाच आमचा प्रयत्न राहिला आहे. लॉक डाऊन मुळे गरिबाला, अन्नाबरोबरच स्वयंपाकासाठी इंधनाची समस्या येऊ नये यासाठी उज्वला योजनेच्या लाभार्थींना गेले तीन महिने मोफत गॅस सिलेंडर देण्यात येत आहे.

मित्रहो, गरिबांच्या जनधन खात्यात हजारो कोटी रुपये जमा करणे असो किंवा श्रमिकांच्या रोजगाराची चिंता, छोटे उद्योग,फेरीवाले यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे असो किंवा शेती, पशुपालन मत्स्यपालन आणि इतर कामांसाठी ऐतिहासिक निर्णय, सरकारने अखंड काम केले आहे.

काही दिवसांपूर्वीच 20 हजार कोटी रुपयांच्या मत्स्य संपदा योजनेलाही मंजुरी देण्यात आली. त्याचा लाभही या क्षेत्रातल्या मत्स्यपालकाना होईल. याशिवाय उत्तर प्रदेशात नुकतेच रोजगार आणि स्वयं रोजगार यासाठी एक अभियान सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत आपले हस्त कारागीर, विणकर, दुसरे कारागीर आहेत किंवा दुसऱ्या राज्यातून आपल्या गावी  परतलेले  श्रमिक अशा लाखो कामगारांच्या रोजगाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

मित्रहो, कोरोनाचे हे संकट इतके मोठे आहे की त्यातून बाहेर पडण्यासाठी अखंड काम करावेच लागेल. आपण समाधान मानून बसू शकत नाही. आपले विणकर बंधू-भगिनी असोत, नावाडी असोत, व्यापारी-व्यावसायक असोत सर्वाना मी आश्वस्त करू इच्छितो की सर्वाचा त्रास कमीत कमी राहावा, बनारसची वाटचाल सुरूच राहावी यासाठी आमचा अखंड प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वीच मी बनारसच्या विकास कार्याबाबत प्रशासनाशी, शहरातल्या आमदारांशी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदीर्घ बातचीत केली होती, तपशीलवार चर्चा केली, एक एक बाबीचे मी तंत्रज्ञान आणि ड्रॉन पद्धतीने निरीक्षण केले.   

यामध्ये रस्ते, वीज, पाणी यासारख्या प्रकल्पांबरोबरच बाबा विश्वनाथ धाम प्रकल्पाच्या  स्थितीबाबतही मला विस्तृत माहिती देण्यात आली. आवश्यक सूचनाही मी केल्या. काही अडचणी असतात त्या दूर करण्यासाठीही सांगितले.

सध्या काशी मधे सुमारे 8 हजार कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर वेगाने काम सुरु आहे. 8 हजार कोटी रुपयांचे काम म्हणजे अनेकांना रोजी-रोटी मिळत आहे. परिस्थिती पूर्ववत झाली की काशीची आधीची झळाळीही पुन्हा वेगाने प्राप्त होईल.

यासाठीआपल्याला आतापासूनच तयारी करायची आहे म्हणूनच प्रयत्नांशी संबंधी सर्व प्रकल्प, क्रुझ पर्यटन, ध्वनी प्रकाश शो, दशाश्वमेध घाट पुनरुद्धार, गंगा आरतीसाठी ध्वनी चित्र पडदा लावण्याचे काम, घाटावर आणखी व्यवस्था करण्याबाबतचे काम, अशा सर्व प्रकल्पांवर वेगाने पूर्ण करण्यासाठी लक्ष पुरवण्यात येत आहे.

मित्रहो, येत्या काळात,आत्मनिर्भर भारताचे एक मोठे केंद्र म्हणून काशी उदयाला यावे अशी आपण सर्वांची इच्छा आहे आणि आपण सर्वांची ही जबाबदारीही आहे. सरकारच्या नुकत्याच झालेल्या निर्णयानंतर इथल्या साड्या, दुग्ध, मत्स्य पालन, मधुमक्षिका पालन व्यवसाय यासाठी संधीची नवी कवाडे खुली होतील. मधमाश्यानी केलेल्या मेणालाही जगात मोठी मागणी आहे. या मागणीची पूर्तता करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो.

शेतकरी, युवा वर्गाने या व्यवसायात चढाओढीने भागीदारी करावी असे मी आग्रहपूर्वक सांगतो. आपण सर्वांच्या प्रयत्नाने आपली काशी नगरी भारताचे मोठे निर्यात केंद्र म्हणून विकसित होऊ शकते आणि आपण हे करायला हवे. आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रेरक स्थान म्हणून काशीचा आपण विकास करू.

मित्रहो, आपण सर्वांचे दर्शन करण्याची संधी मला मिळाली, श्रावण महिन्यात काशीवासियांचे दर्शन होणे ही भाग्याची गोष्ट आहे. आपण ज्या सेवाभावाने काम केले आहे, ज्या निष्ठेने आपण काम करत आहात, मी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप-खूप आभार मानतो.

परोपकार, सेवाभावनेने आपण केलेल्या कार्याने आपण, सर्वाना प्रेरणा दिली आहे. मात्र एक गोष्ट आपल्याला वारंवार करायची आहे, प्रत्येकाला करायची आहे, स्वतःला करायची आहे, आपल्याला एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त व्हायचे आहे. रस्त्यावर थुंकणे आणि त्यातही आपले बनारसी पान, ही सवय मोडायची आहे. दुसरे म्हणजे सुरक्षित अंतर, फेस मास्क आणि वारंवार हात धुण्याची सवय आपल्याला सोडायची नाही आणि दुसऱ्याला ही सवय सोडू द्यायचीही नाही. आता आपल्याला संस्कार म्हणून स्वभाव म्हणून या सवयी स्वीकारायच्या आहेत.

बाबा विश्वनाथ आणि गंगा मातेचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव कायम राहू दे, ही सदिच्छा ठेवून इथे थांबतो आणि आपल्या या महान कार्याला पुन्हा एकदा प्रणाम करतो.

खूप-खूप धन्यवाद ! हर हर महादेव !!!

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637594) Visitor Counter : 204