पंतप्रधान कार्यालय

'इंडिया ग्लोबल विक'च्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित


जागतिक पुनरुत्थानात भारत अग्रणी भूमिका बजावत आहे: पंतप्रधान

Posted On: 09 JUL 2020 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'इंडिया ग्लोबल विक'च्या उद्घाटन सत्राला संबोधित केले.

सध्याच्या संकटाच्या काळाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, जागतिक पुनरुत्थानात भारत अग्रगण्य भूमिका बजावेल. ते म्हणाले की, दोन घटकांशी याचा निकटचा संबंध आहे. पहिले म्हणजे - भारतीय प्रतिभा आणि दुसरी म्हणजे सुधारणा तसेच पुनरुज्जीवन करण्याची भारताची क्षमता. त्यांनी हे स्पष्ट केले की, जगभरात भारताच्या कौशल्य-शक्तीचे विशेषतः भारतीय तंत्रज्ञान उद्योग आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या योगदानाला मान्यता प्राप्त झाली आहे.

योगदान देण्यास उत्सुक असणारा प्रतिभेचा खजिना, असे त्यांनी भारताचे वर्णन केले. ते पुढे म्हणाले की, भारतीय निसर्गतः सुधारक आहेत आणि इतिहासाने हे दाखवून दिले आहे की, सामाजिक असो किंवा मग आर्थिक, भारताने प्रत्येक आव्हानावर मात करून विजय संपादन केला आहे.

ते म्हणाले की, "जेव्हा भारत पुनरुज्जीवनाची चर्चा करतो तेव्हा, ते पुनरुज्जीवन म्हणजे: काळजीपूर्वक केलेले पुनरुज्जीवन, करुणेसह केलेले पुनरुज्जीवन, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या दोन्ही गोष्टींसाठी शाश्वत असे ते आहे."

याप्रसंगी पंतप्रधानांनी गेल्या सहा वर्षात झालेल्या लाभांची यादी मांडली: एकूण वित्तीय समावेशन, विक्रमी गृह आणि पायाभूत सुविधा उभारणी, व्यवसाय सुलभीकरण, जीएसटीसह धाडसी कर सुधारणा.

पंतप्रधान म्हणाले की, दुर्दम्य भारतीय भावनेमुळे आर्थिक पुनर्प्राप्ती आधीपासूनच दिसून येत आहे.

ते म्हणाले की, मोफत स्वयंपाक गॅस, बँक खात्यात रोख रक्कम जमा करणे, लाखो लोकांना मोफत अन्नधान्य आणि इतर अनेक गोष्टी यासह प्रत्येक लाभ थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञान सरकारला मदत करत आहे.

पंतप्रधान म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था आहे आणि सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांचा व्यवसाय भारतात स्थापन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. भारत हा अनेक शक्यता आणि संधींचा देश आहे, असे वर्णन पंतप्रधानांनी केले.

त्यांनी कृषी क्षेत्रात सुरू केलेल्या विविध सुधारणा उपक्रमांचे वर्णन करत सांगितले की, यामुळे जागतिक उद्योगासाठी गुंतवणूकीची अतिशय आकर्षक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, नवीनतम सुधारणांमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना मिळेल आणि ते मोठ्या उद्योगांना पूरक ठरतील.

ते म्हणाले की, संरक्षण क्षेत्र आणि अवकाश क्षेत्रात गुंतवणूकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, साथीच्या रोगाने हे पुन्हा एकदा दाखवून दिले की, भारताचा औषध निर्मिती उद्योग फक्त भारतासाठीच नाही तर, संपूर्ण जगासाठी एक संपत्ती आहे. विशेषत: विकसनशील देशांसाठी औषधांच्या किंमती कमी करण्यात भारताने महत्वाची भूमिका बजावली आहे.

ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वयंपूर्ण किंवा जगाची द्वारे बंद करणे नसून स्वयं पोषक व स्वयं उत्पादक बनणे, हे आहे.

हा भारत आहे, जो सुधारत आहे, कामगिरी करीत आहे आणि ज्याचा कायापालट होत आहे. हा असा भारत आहे, जो विकासासाठी मानव-केंद्रित आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारत आहे. ते म्हणाले, भारत तुम्हा सर्वांची वाट पाहत आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताचे सौंदर्य संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणाऱ्या पंडित रविशंकर यांची 100वी जयंती या मंचाच्या वतीने देखील साजरी करण्यात येत आहे, हे पाहून पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. एकमेकाला अभिवादन करण्यासाठी भारताचा ‘नमस्कार' आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, जगाच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी भारत सर्वकाही करण्यास तयार आहे.

 

* * *

S.Pophale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637562) Visitor Counter : 249