PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
08 JUL 2020 7:33PM by PIB Mumbai
Delhi-Mumbai, July 8, 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदी दरम्यान,वाराणसीतील रहिवासी आणि सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी स्वत:च्या प्रयत्नांद्वारे तसेच जिल्हा प्रशासनाला मदत देऊन गरजूना वेळेवर अन्न उपलब्ध होईल हे सुनिश्चित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या त्यांच्या अनुभवाविषयी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे प्रयत्न जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील.
केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय
- पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY) मुदतवाढ देण्यात आली. कोविड-19 च्या परिस्थितीचा आर्थिक पातळीवर सामना करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आणखी पाच महिने म्हणजे जुलै ते नोव्हेंबर 2020 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 9.7 मेट्रिक टन हरभरे वितरित केले जातील. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा(NFSA), 2013 अंतर्गत पुढील पाच महिने म्हणजे जुलै ते नोव्हेंबर 2020 पर्यंत सर्व लाभार्थ्यांना राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रतिमहिना 1 किलो हरभरे विनामुल्य वाटप करतील. याचा एकूण अंदाजित खर्च रु.6,849.24 कोटी एवढा आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज नव्या अखिल भारतीय केंद्रीय क्षेत्र योजना-कृषी पायाभूत सुविधा निधीला मंजुरी देण्यात आली. ही योजना कापणीच्या हंगामानंतर व्यवस्थापन, पायाभूत सोयी-सुविधा आणि सामुदायिक शेती मालमत्तांसाठी व्यवहार्य प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी व्याज अनुदान आणि आर्थिक सहाय्याद्वारे मध्यम-दीर्घ मुदतीसाठी कर्जपुरवठा सुविधा उपलब्ध करुन देईल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरी स्थलांतरित आणि गरीब लोकांसाठी वाजवी दरात भाडेतत्वावर घर उपलब्ध होण्यासाठीच्या गृहसंकुल विकास योजनेला (ARHCs) मंजुरी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना-नागरी ची उपयोजना म्हणून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल.सध्या रिक्त असलेल्या सरकारी निधीपुरवठा होणारया गृहसंकुलांचे रुपांतर ARHCs अंतर्गत स्वस्त घरांमध्ये केले जाईल. त्यासाठी 25 वर्षांच्या कालावधीसाठी एक सवलत करार केला जाईल. या करारान्वये, या जुन्या गृहसंकुलांमध्ये दुरुस्ती/डागडुजी करून तसेच, पाणी, सांडपाणी व्यवस्था, रस्ते इत्यादीची सोय करून दिली जाईल.
- उज्ज्वला लाभार्थ्यांना "प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने" चा लाभ घेण्यासाठी कालमर्यादेत 01.07.2020 पासून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली.
- पीएमजीकेवाय / आत्मनिर्भर भारत अंतर्गत ईपीएफ योगदान 24% (12% कर्मचारी हिस्सा आणि 12% नियोक्त्यांचा हिस्सा) आणखी तीन महिन्यांसाठी, जून ते ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
कोविड-19 साठी नमुन्यांची तपासणी करण्याच्या संख्येत दर दिवशी भरीव वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 2,62,679 नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 53,000 नमुने खाजगी प्रयोगशाळात तपासण्यात आले. आतापर्यंत 1,04,73,771 नमुने तपासण्यात आले. परिणामी एक दशलक्ष लोकसंख्ये मागे 7180 चाचण्या सध्या होत आहेत. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने तपासणी, शोध आणि उपचार या त्रिसूत्री धोरणाचा अवलंब केल्याने हे शक्य झाले आहे.
कोविड-19 चाचणी संख्येतली प्रशंसनीय वाढ होण्यातला महत्वाचा घटक म्हणजे देशभरात निदान करणाऱ्या प्रयोगशाळांच्या संख्येत झालेली वाढ. सरकारी क्षेत्रात 795 प्रयोगशाळा तर खाजगी 324 प्रयोगशाळा मिळून देशात 1119 प्रयोगशाळा आहेत.
यामध्ये समावेश आहे -
- रियल-टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 600 (सरकारी: 372 + खाजगी: 228 )
- TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 426 (सरकारी: 390 + खाजगी: 36 )
- CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 93 (सरकारी: 33 + खाजगी:60)
आयसीयू आणि ऑक्सिजन सुविधा युक्त खाटा, व्हेंटीलेटर आणि इतर साधने यासह वाढत्या आरोग्य पायाभूत विविध प्रकारच्या कोविड सुविधा यामुळे कोविड-19 बाधितांचे वेळेवर निदान आणि प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन सुनिश्चित झाले आहे. कोविड-19 रुग्ण अधिक संख्येने बरे होत असल्यामुळे कोविड मधून बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यामधले अंतर 1,91,886 झाले आहे.
गेल्या 24 तासात 16,883 रुग्ण कोविड मधून बरे झाले आहेत, यामुळे बरे झालेल्यांची संख्या आता 4,56,830 झाली आहे.
कोविड-19 मधून रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून हा दर आज 61.53% झाला.
सध्या 2,64,944 सक्रीय रुग्ण असून हे सर्व वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
कोविड-19 च्या लढ्यात सर्वसमावेशक प्रतिसाद आणि व्यवस्थापन धोरण म्हणून, केंद्र सरकार, कोविडमुळे होणारे मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी कोविडच्या सर्व रुग्णांवर प्रभावी उपचार होणे गरजेचे आहे. यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या तज्ञ डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे डॉक्टर्स राज्यातल्या अतिदक्षता विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना टेली-कम्युनीकेशनच्या माध्यमातून तज्ञ सल्ला आणि मार्गदर्शन देणार आहेत.
कोविड-19 च्या रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्याबाबतच्या प्रोटोकॉलमध्ये टेली-सल्ला/मार्गदर्शन हा महत्वाचा घटक आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या तज्ञ डॉक्टरांची टीम विविध राज्यातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात कार्यरत डॉक्टरांना कोविड उपचारांबाबत मार्गदर्शन करेल. कोविडच्या रुग्णांचे मृत्यू कमी करण्यासाठी गंभीर स्थितीतील रुग्णांवर उपचारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
डॉक्टरांना वेळेत तज्ञांचा सल्ला मिळावा, यासाठी सर आठवड्यात, मंगळवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस ही सत्रे होणार आहेत.
पहिले सत्र, आज सुरु झाले ज्यात दहा रुग्णालयांची निवड करण्यात आली. यात नऊ रुग्णालये मुंबईतील तर एक गोव्याचे होते
इतर
- कोविड-19 रुग्णाच्या आरोग्यविषयक नोंदी करताना रक्तात विरघळलेल्या ऑक्सिजनच्या प्रमाणाचे मापन हा एक महत्वाचा मापदंड आहे. संरक्षण मंत्रालय, माजी सैनिक कल्याण विभाग (DSEW) यांनी माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेच्या (ECHS) लाभार्थ्यांनी विकत घेतलेल्या पल्स ऑक्सिमीटरच्या किंमतीचा परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेले खादीचे फेस मास्क आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. देशात दूरवर राहणाऱ्या लोकांसाठी, खास करून निर्बंधामुळे जे लोक खादी इंडियाच्या दुकानांना भेट देऊ शकत नाही किंवा जे लोक घराबाहेर पडू शकत नाही अशा लोकांना या ऑनलाईन विक्रीचा फायदा होणार आहे. खादी मास्कसाठी : http://www.kviconline.gov.in/khadimask. इथे आपली मागणी नोंदवता येणार आहे.
- भारतात, कोविड -19 रुग्ण मोठ्या संख्येने असलेली राज्ये / केंद्रशासित प्रदेश बाधित रुग्णांची लवकर ओळख पटवणे आणि प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनावर आपले लक्ष केंद्रित करत आहेत जेणेकरून प्रति दहा लाख सक्रिय रुग्णांपेक्षा प्रति दहा लाख बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त असेल. यावरून असे दिसून येते कि एकूण कोविड बाधित रुग्णांची संख्या जास्त असेलही मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जलद गतीने वाढत आहे, त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी आहे. यामुळे हे देखील सुनिश्चित केले आहे की कोविड आरोग्य सेवांवर ताण येणार नाही.
- संपूर्ण जगभरामध्ये आणि देशातही कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला 2020-2021च्या शैक्षणिक सत्रासाठी अभ्यासक्रम थोडा कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी सीबीएसईचा इयत्ता 9 वी ते 12 वी चा सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला.
- केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली की, टाळेबंदी उठविण्याच्या टप्प्यात चित्रपट निर्मिती पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार लवकरच मानक प्रचालन प्रक्रिया अर्थात एसओपी जारी करणार आहे. कोविडमुळे पूर्णतः ठप्प झालेल्या चित्रपटसृष्टीला पुन्हा गती प्रदान करण्यासाठी, आम्ही टीव्ही मालिका, चित्रपट-निर्मिती, सह-निर्मिती, अॅनिमेशन, गेमिंग यासह सर्व क्षेत्रातील निर्मितीला प्रोत्साहन देत आहोत. आम्ही लवकरच यासाठीच्या उपायांची घोषणा करणार आहोत”, असे जावडेकर यांनी नमूद केले. फिक्की फ्रेम्सच्या 21 व्या भागाला संबोधित करताना जावडेकर बोलत होते.
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, सीमा भागात सुरु असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.सीमा भागात दळणवळण सुविधा वाढवण्याबाबतच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आणि सध्या काम सुरु असलेल्या प्रकल्पांना सातत्याने चालना देण्याची गरज, सीमा भागात मोक्याचे रस्ते, पूल आणि बोगदे बांधकामाला वेग या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
- केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, ऊर्जा, कोळसा, खाण मंत्रालय तसेच अणु उर्जा विभागाचे सचिव आणि या मंत्रालयाशी संबंधित केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील 23 उद्यमांचे (सीपीएसई) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत बैठक घेतली. आर्थिक विकासाला गती प्रदान करण्यासाठी अर्थमंत्री विविध भागधारकांसोबत घेत असलेल्या बैठकीच्या शृंखलेचा एक भाग म्हणून ही बैठक आयोजित केली होती.
महाराष्ट्र अपडेट्स
गेल्या 24 तासात 5,134 नवीन केसेसची नोंद झाल्यानंतर महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 2,17,121 झाली आहे. मुंबईत सापडणार्या केसेसच्या संख्येत घट दिसून आली आणि 806 केसेसची नोंद झालेली आहे राज्यात आजपर्यंत 1,18,558 बरे झाले आहेत तर सक्रीय रुग्णांची संख्या 89,294 आहे. महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार मुंबईमध्ये एक तृतीयांश ग्राहक संख्येसह हॉटेल सुरू झाली आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने तसेच व्यापारी आस्थापनांना संध्याकाळी सात पर्यंत काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे या अगोदर परवानगी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत होती.
***
MC/SP/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1637342)
Visitor Counter : 322
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam