PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 24 JUN 2020 7:50PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

दिल्‍ली-मुंबई, 24 जून 2020

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, “दिल्ली मधील राधा स्वामी ब्यास मध्ये 10,000 खाटांच्या कोविड दक्षता केंद्राचे परिचालन 26 जून पासून सुरु होईल. याचे काम जोरात सुरु असून या सुविधा केंद्राचा एक खूप मोठा भाग शुक्रवारपर्यंत कार्यान्वित होईल”. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “कोविड रुग्णांसाठी 250 आयसीयू खाटांच्या सुविधेसह 1,000 खाटांचे सुसज्ज रुग्णालय पुढील आठवड्यात तयार होईल”. “केंद्र सरकारच्या सहकार्याने डीआरडीओ आणि टाटा ट्रस्ट हे सुविधा केंद्र उभारत आहेत. या केंद्रात सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांना तैनात केले जाईल. हे कोविड दक्षता केंद्र पुढील 10 दिवसांमध्ये तयार होईल,” असे अमित शहा म्हणाले.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

देशभरात चाचणी सुविधांच्या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे गेल्या 24 तासांत 2 लाखाहून अधिक नमुने तपासण्यात आले जो आजवरचा उच्चांक आहे.

काल 2,15,195 नमुने तपासण्यात आले होते, त्यातील 1,71,587 नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यात आले तर खाजगी प्रयोगशाळेत 43,608 नमुने तपासले गेले.  आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 73,52,911 वर पोहोचली आहे.  यामुळे खाजगी प्रयोगशाळांनीही प्रति दिन सर्वाधिक नमुने तपासण्याचा उच्चांक नोंदवला आहे.

कोविड -19 चाचणी करण्यासाठी निदान प्रयोगशाळांच्या वाढत्या प्रमाणाचे द्योतक म्हणजे भारतात आता  1000 प्रयोगशाळा आहेत. यात शासकीय क्षेत्रात 730 आणि 270 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा:  557 (शासकीय: 359 + खाजगी: 198)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 363 (शासकीय: 343 + खाजगी: 20)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 80 (शासकीय: 28 + खाजगी: 52)

कोविड -19 चे रुग्ण बरे होण्याचा दरही दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासात कोविड -19 चे 10,495 रुग्ण बरे झाले. आत्तापर्यंत एकूण 2,58,684 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड -19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 56.71% वर पोहोचला आहे. सध्या 1,83,022 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज खालील निर्णय घेण्यात आले.

 

इतर

  • जवाहरलाल नेहरू आधुनिक वैज्ञानिक संशोधन केंद्र, (JNCASR) ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखालील स्वायत्त संशोधन संस्था आहे. कोविड-19 महामारीशी दोन हात करत असणाऱ्या आपल्या देशाला सक्षम करण्यासाठी संस्थेने जाकूर येथे कोविड निदान प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.
  • सीएसआयआर-नीरी (वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद-राष्ट्रीय पर्यावरण तंत्रज्ञान संशोधन संस्था) येथे एप्रिल 2020 पासून कोविड-19चे नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत त्यांनी कोविड-19च्या अशा 3000 पेक्षा जास्त तपासणी चाचण्या केल्या आहेत. सीएसआयआर-नीरी येथे दिवसाला 50 नमुने तपासण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत. चाचण्या करण्यापूर्वी जैवसंरक्षण व जैवसुरक्षिततेची योग्य ती  खबरदारी  येथे घेतली जाते. या चाचण्या उपलब्ध करण्यापूर्वी कायद्याने बंधनकारक असलेल्या आवश्यक त्या सर्व मान्यता प्राप्त केल्या गेल्या, असे सीएसएसआर - नीरीचे संचालक डॉ राकेशकुमार म्हणाले.
  • केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेचे (SEPC) पदाधिकारी आणि विविध सेवा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भागधारकांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. कोविड-19 महामारी, त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेली टाळेंबदी आणि त्यानंतर सध्याच्या अनलॉकींगच्या पार्श्वभूमीवर भागधारकांनी अनेक सूचना केल्या आणि मागण्याही मांडल्या. भारताच्या परकीय व्यापारासाठी सेवा क्षेत्र महत्वाचे असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार एप्रिल 2020 मधे सेवा निर्यात 1,25,409 कोटी रुपये तर आयात 70,907 कोटी रुपये राहिली आहे. सेवा क्षेत्राने कोविड संकटाकडे आव्हान नाही तर संधी म्हणून पाहावे असे आवाहन त्यांनी केले. कोविडमुळे कार्य, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य इत्यादी क्षेत्रात नवे निकष निर्माण होत असल्याने जगात कोविड पश्चात परिस्थिती वेगळी असेल.
  • केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, कोविड महामारीने एकात्मिक वैद्यकीय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये पुनरुज्जीवित केली आहेत. ते म्हणाले कि पुढील काळात अधिक प्रभावी वैद्यकीय रोगप्रतिबंध आणि रोग निवारणासाठी यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. विवेकानंद केंद्र बेंगळुरू चे प्रमुख डॉ. नागेंद्र आचार्य, कोचीनच्या त्रिसूर येथील सीताराम आयुर्वेदिक रुग्णालयातील डॉ. रामनाथन, युनानी वैद्यकीय विज्ञान अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे  सल्लागार डॉ. जमीर अहमद, होमिओपॅथिक सल्लागार डॉ. अशोक शर्मा, नवी दिल्लीतील मानव व्यवहार आणि संबंधित विज्ञान यांच्यासह आयुषच्या देशभरातील आघाडीच्या तज्ज्ञांच्या आभासी बैठकीला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी आठवण करून दिली की, मधुमेहासारख्या संक्रामक नसलेल्या रोगांच्या बाबतीतही एकात्मिक किंवा समग्र व्यवस्थापनाच्या गरजेची जाणीव झाली असली तरी या बाबींवर म्हणावा तितका भर देण्यात आलेला नाही.
  • भारतीय नौदलाद्वारेऑपरेशन समुद्र सेतूसाठी तैनात आयएनएस ऐरावत 198 भारतीय नागरिकांना माले, मालदीववरून घेऊन आज 23 जून 2020 रोजी पहाटे तुतीकोरीन येथे पोहोचले. आतापर्यंत भारतीय नौदलाने मालदीवमधील 2386 भारतीय नागरिकांना भारतात परत आणले आहे. मालदीवमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतीय नागरिकांचे नौकारोहण शक्य झाले. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जहाजात बसविण्यात आले. सागरी प्रवासादरम्यान कोविड सुरक्षा शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
  • गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जीपीआरएतील(GPRA) रहिवासींना शासकीय निवासस्थान रिकामे करण्यासाठी आणखी 15 दिवसांची म्हणजेच 15 जुलै 2020 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मंत्रालयाने यापूर्वी 5 मे 2020 रोजी सम क्रमांकाच्या नोटीसी द्वारे 30 जून 2020 पर्यंत मुदत वाढ दिली होती. कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे संबंधित रहिवासींना पर्यायी घर भाड्याने मिळण्यात आणि सामानाची ने-आण करण्यासाठी कामगारांची व्यवस्था करण्यात येत असणाऱ्या अडचणींबाबत अनेक निवेदने प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
  • ज्या लोकांनी भारतीय रेल्वेच्या नियमित वेळापत्रकाच्या आधारे दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत किंवा त्यापूर्वी तिकिटांचे आरक्षण केलेल्या आणि रद्द झालेल्या गाड्यांच्या सर्व तिकिटांच्या पूर्ण रकमेचा परतावा रेल्वे प्रवाशांना देण्यात येणार आहे. यासंबंधी रेल्वे मंत्रालयाने नियमांनुसार निर्णय घेतला आहे.

 

महाराष्ट्र अपडेट्स

बुधवारी महाराष्ट्राने कोविड-19 केसेसमध्ये किरकोळ घट पहिली. गेल्या चोवीस तासांत राज्यात 3,214 नवीन केसेस नोंद झाल्या आणि एकूण केसेस ची संख्या 1,39,010 वर पोहोचली. मंगळवारी नोंद झालेल्या 75 केसेस नंतर मृत्युदर 4.70 वर पोहोचला.  बऱ्याच आठवड्यानंतर मुंबईने 1000 पेक्षा कमी केसेस पाहिल्या. केसेस ची संख्या 824 होती. शहरातील एकूण रुग्ण आता 68,481 आहेत. मुंबई महानगरपालिकेने आता मिशन वैश्विक चाचणी सुरू केले आहे त्यानुसार आयसीएमआर ने परवानगी दिलेले अँटिजेन टेस्टिंग किट वापरले जाईल जे पंधरा ते तीस मिनिटात चाचणीचा निकाल दाखवेल. महानगरपालिकेने 1 लाख अँटिजेन टेस्टिंग किट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे ज्याद्वारे जलद चाचणी होऊ शकेल. यांचा उपयोग सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आणि आणि कोविड-19 च्या चाचणी केंद्रांमध्ये संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठी आणि वेळेवर उपचार देण्यासाठी करण्यात येईल

FACTCHECK

 

* * *

RT/MC/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634051) Visitor Counter : 256