PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
21 JUN 2020 7:33PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
दिल्ली-मुंबई, 21 जून 2020
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यात योग अभ्यासाचा समावेश करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शिक्षण संस्थाना केले आहे. शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचा हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले. कोविड-19 महामारीच्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा उल्लेख करत जग एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात असल्याचे ते म्हणाले. यावर मात करण्यासाठी आपण एकत्रित लढा द्यायला हवा आणि त्याच बरोबर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही निरोगी राहायला हवे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकजुटतेचा दिवस आहे. हा वैश्विक बंधुत्वाचा दिवस आहे. कोविड-19 या जागतिक आरोग्य आणीबाणीमुळे, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मंचाच्या माध्यमातून पाळला जात आहे. “योगामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्राणायामाचा समावेश केला पाहिजे. प्राणायाम, योग किंवा श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे आपली श्वसन प्रणाली मजबूत होते. सध्याच्या काळात हे अधिक प्रासंगिक आहे कारण कोविड-19 विषाणूमुळे शरीराच्या श्वसन यंत्रणेवर प्रतिकूल परिणाम झालेला असतो' असे पंतप्रधान म्हणाले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
कोविड-19 ला प्रतिबंध,त्याचा प्रसार रोखणे आणि व्यवस्थापन यासाठी राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने केंद्रसरकार, तत्पर आणि श्रेणीबद्ध धोरणाद्वारे अनेक उपाययोजना करत आहे. या प्रयत्नात कोविड-19 विरोधात एकत्रित प्रतिसाद दृढ करण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचना, मार्गदर्शक तत्वे आणि उपचार विषयक सूचनावली विकसित करण्यात आल्या असून त्या राज्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत.
अनेक राज्यांनी या प्रतिबंधात्मक धोरणाची अंमलबजावणी केल्याने त्याचा प्रभावी परिणाम झाला आहे. महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्या प्रयत्नाचा प्रोत्साहनदायी परिणाम दिसुन आला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी चेस द व्हायरस म्हणजेच विषाणूचा मागोवा आणि कोविड संशयितांचा शोध घेण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली.
अतिशय दाट लोकवस्तीच्या धारावीत ( 2,27,136 व्यक्ती/स्क्वेअर.किमी) एप्रिल 2020 मधे 491 रुग्ण होते आणि वाढीचा दर होता 12 % तर रुग्ण दुपटीचा काळ होता 18 दिवस. महानगर पालिकने राबवलेल्या तत्पर उपायांमुळे कोविड-19 रुग्ण वाढीचा दर मे 2020 मधे 4.3 % वर आला तर जून मधे हा दर आणखी कमी होऊन 1.02 % झाला. या उपायांमुळे रुग्ण दुपटीचा काळ वाढून मे 2020 मधे 43 दिवस तर जून 2020 मधे 78 दिवस झाला.
80% लोकसंख्या सार्वजनिक शौचालयावर अवलंबून असणाऱ्या धारावीत महानगर पालिकेसमोर अनेक आव्हाने होती.10 बाय 10 फुटाच्या घरात किंवा झोपडीत 8 ते 10 माणसे राहतात शिवाय या छोट्या घरांना दोन किंवा तीन मजले त्यात बरेचदा तळ मजल्यावर घर आणि वरच्या मजल्यावर कारखाना आणि अरुंद गल्ल्या असलेला हा परिसर. त्यामुळे शारीरिक अंतर राखण्यात मोठ्या मर्यादा आणि प्रभावी गृह अलगीकरणाची शक्यताच नाही.
बृहन्मुंबई महानगर पालिकेने चार टी म्हणजे ट्रेसिंग अर्थात रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, ट्राकिंग मागोवा,टेस्टिंग म्हणजे तपासणी आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार या चार बाबींचे पालन केले. यामध्ये तत्पर तपासणीसारख्या बाबींचा समावेश राहिला. 47,500 लोकांची डॉक्टर आणि खाजगी दवाखान्याद्वारे घरोघरी तपासणी तर 14,970 लोकांची फिरत्या व्हॅनमार्फत तपासणी आणि 4,76,775 जणांचे महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. वृध्द व्यक्तीप्रमाणे जास्त धोका असलेल्या वर्गातल्या लोकांसाठी फिवर क्लिनिक उभारण्यात आली. यामुळे 3.6 लाख लोकांची तपासणी करण्यासाठी मदत झाली. 8246 जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि वेळेवर विलगीकरण या धोरणाला अनुसरून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांना इतरांपासून विलग ठेवण्यात आले. धारावीत एकूण 5,48,270 जणांची तपासणी करण्यात आली. संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटर मधेआणि विलगीकरण केंद्रात हलवण्यात आले.
देशात कोविड-19 मधून बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत 2,27,755 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 13,925 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 55.49% पर्यंत वाढला आहे.
सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,69,451असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
आज कोविड-19 मधून बरे झालेल्यांची संख्या ही सक्रीय रुग्णांपेक्षा 58,305 ने जास्त आहे.
चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणि पायाभूत सुविधा वाढविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयन्तांमुळे शासकीय प्रयोगशाळांची संख्या 722 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 259 पर्यंत वाढली आहे (एकूण 981 प्रयोगशाळा).
वर्गवारी खालीलप्रमाणे:
जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 547 (शासकीय: 354 + खाजगी: 193)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 358 (शासकीय: 341 + खाजगी: 17)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 76 (शासकीय: 27 + खाजगी: 49)
दररोज चाचणी करण्यात येणाऱ्या नमुन्यांच्या संख्येतही वृद्धी झाली आहे. गेल्या 24 तासात 1,90,730 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 68,07,226 नमुने तपासण्यात आले.
इतर अपडेट्स:
- आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश : मित्रांनो, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे "घरात कुटुंबाबरोबर योगसाधना करणे". आज आपण सामूहिक कार्यक्रमांपासून लांब रहात घरीच आपल्या कुटुंबियांसमवेत योग करत आहोत. घरातील मुले असतील, तरुण मंडळी असतील, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक असतील, हे सगळे योगाच्या माध्यमातून एकत्र येतात तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होतो. म्हणूनच यावर्षी योगदिन जर मी दुसऱ्या शब्दांमध्ये सांगितले तर एक भावनात्मक योगाचा दिवस आहे. आपले कौटुंबिक बंध वृद्धिंगत करण्याचा दिवस आहे.कोरोना महामारीमुळे आज जग योगाकडे पूर्वीपेक्षा अधिक गंभीरतेने पाहत आहे. जर आपली प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर या रोगावर मात करायला आपल्याला खूप मदत होते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगाच्या अनेक पद्धती आहेत. अनेक प्रकारची आसने आहेत, जी आपल्या शरीराची ताकद वाढवतात, चयापचय क्रिया ताकदवान बनवतात.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अमित शाह यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की ‘योग हा तंदुरुस्त राहण्याचा केवळ एक मार्ग नाही तर शरीर आणि मन, कार्य व विचार आणि मनुष्य आणि निसर्ग यांच्यात संतुलन राखण्याचे एक माध्यम आहे’. केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले की, ‘योग ही संपूर्ण मानवतेला भारतीय संस्कृतीने प्रदान केलेली एक अनोखी भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे जगाने आता योगचा अवलंब केला असून त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे.
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी आज जाहीर केले की राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) राष्ट्रीय परीक्षा अभ्यास मोबाईल अॅपवर हिंदी चाचणी फीचर सुरू केले आहे. ते म्हणाले की, हिंदी भाषेला प्राधान्य देणारे स्पर्धा परीक्षार्थी आता एनटीएमार्फत राष्ट्रीय चाचणी अभ्यासाच्या स्मार्टफोन अॅपवर जारी केलेल्या हिंदी चाचणी सराव सुविधेचा वापर करून त्यांच्या मोबाइलवरून सराव करू शकतात
- भारतीय रेल्वेने आपल्या सर्व कार्यात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि व्यवसाय सुलभता वृद्धींगत करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या सध्याच्या खरेदी नियमांनूसार, अंकीत सुरक्षा तथा महत्वपूर्ण बाबी, जिथे गुणवत्ता महत्वपूर्ण असते, ती खरेदी अशा पुरवठादारांकडून केली जाते, ज्यांना त्या विशिष्ट घटकांसाठी पुरवठादार संस्थेने परवाना दिलेला असतो. नुकत्याच घेतलेल्या निर्णयात भारतीय रेल्वेच्या कोणत्याही पुरवठादाराला विशिष्ट बाबींसाठी पुरवठादार संस्थेची मान्यता मिळाल्यास त्या पुरवठादाराला देशभरातील सर्व रेल्वे मंडळांच्या त्यासंबंधीच्या सेवांसाठी परवानगी मिळेल.
- केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या निवासस्थानी विविध समाजाच्या निवडक लोकांबरोबर योगासने करून सहावा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक लक्षात घेवून मोठ्या संख्येने एकत्रित जमून कोणताही कार्यक्रम साजरा करण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे यंदा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यासाठी आपआपल्या घरामध्येच ‘योग विथ फॅमिली’ अशी संकल्पना निश्चित करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांव्दारे संपूर्ण देशभर अतिशय उत्साहामध्ये योगदिन आज साजरा करण्यात आला. अनेक लोकांना योग कार्यक्रमांमध्ये ‘ऑनलाईन’ सहभागी होण्यासाठी सुविधा केली गेली होती. सरकारने सामजिक आणि डिजिटल माध्यमांचा योगदिवसाच्या कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त उपयोग केला.
महाराष्ट्र अपडेट्स
शनिवारी नोंद झालेल्या आजवरच्या सर्वाधिक 3,874 केसेस सहित महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 1,28,205 वर पोहोचली आहे. राज्यामध्ये 160 मृत्यू नोंदले गेले जी आजवरची दुसरी सर्वाधिक संख्या आहे. एकूण मृत्यूसंख्या 5,984 आहे. महाराष्ट्रातील 51 टक्के केसेस आणि 59 टक्के मृत्यू हे मुंबईत नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्र सरकारने व्हेंटिलेटर्सचा जाणवणारा तुटवडा पाहता सर्व रुग्णालयांना कोविड-19 रुग्णांसाठी ऑक्सीजन सिलेंडर वापरण्याचे निर्देश दिले आहेत महाराष्ट्रामध्ये 3028 व्हेंटिलेटर्स आहेत. जे वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येसाठी अपुरे पडत आहेत.
* * *
RT/MC/SP/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633226)
Visitor Counter : 309
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam