पंतप्रधान कार्यालय

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशाला केले संबोधित


योग दिन एकजुटता आणि वैश्विक बंधुत्वाचा दिवस आहे- पंतप्रधान

योग कौटुंबिक बंध वृद्धिंगत करायला प्रोत्साहन देते : पंतप्रधान

योग कोविड-19 विषाणूविरूद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो : पंतप्रधान

Posted On: 21 JUN 2020 1:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जून 2020

                                 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिन हा एकजुटतेचा दिवस आहे. हा वैश्विक बंधुत्वाचा दिवस आहे. कोविड-19 या जागतिक आरोग्य आणीबाणीमुळे, यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मंचाच्या माध्यमातून पाळला जात आहे.

पंतप्रधान म्हणाले, आज सर्वजण आपापल्या संपूर्ण कुटुंबासमवेत आपापल्या घरी योगाभ्यास करत आहेत.

ते म्हणाले, योगाने आपणा सर्वाना एकत्र आणले आहे.

जगभरातून ‘माय लाइफ - माय योगा’ व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेत लोकांचा मोठा सहभाग योगाची वाढती लोकप्रियता प्रतिबिंबित करतो, असे ते म्हणाले.

आज आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर जमण्यापासून दूर रहावे आणि आपल्या कुटूंबियांसह घरीच योगाभ्यास करावा. 'घरीच कुटुंबासमवेत योग' ही या वर्षाची संकल्पना आहे. योग कौटुंबिक बंध वृद्धिंगत व्हायला उत्तेजन देते कारण लहान मुले, तरुण, कुटुंबातील वडीलधारी मंडळी योगाभ्यासासाठी एकत्र येतात, घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, योगामुळे भावनिक स्थैर्याला, स्थिरतेलाही प्रोत्साहन मिळते, असे पंतप्रधान म्हणाले.

“योगामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्राणायामाचा समावेश केला पाहिजे. प्राणायाम, योग किंवा श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे आपली श्वसन प्रणाली मजबूत होते. सध्याच्या काळात हे अधिक प्रासंगिक आहे कारण कोविड-19 विषाणूमुळे शरीराच्या श्वसन यंत्रणेवर प्रतिकूल परिणाम झालेला असतो' असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, योग एकतेची शक्ती म्हणून उदयाला आला आहे. तो मानवतेचे बंध अधिक खोलवर रुजवतो कारण तो भेदभाव करत नाही. योग हा वंश, रंग, लिंग, विश्वास आणि राष्ट्रांच्या पलीकडे आहे. कोणीही योगासने करू शकतो. जर आपण आरोग्य आणि आशा विषयक जाणीवा यांची सांगड घातली तर तो दिवस फार दूर नाही जेव्हा जग निरोगी आणि आनंदी मानवतेच्या यशाचे  साक्षीदार असेल. योग निश्चितपणे हे घडण्यासाठी आपल्याला मदत करू शकेल.

“जागरूक नागरिक म्हणून आपण एक कुटुंब आणि समाज  म्हणून एकजुटीने पुढे जाऊ. ‘घरी आणि कुटुंबासमवेत योग’ हा आपल्या आयुष्याचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करू. आपण नक्कीच यशस्वी होऊ, आपण नक्कीच विजयी होऊ”, असे पंतप्रधान म्हणाले.

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1633124) Visitor Counter : 229