पंतप्रधान कार्यालय

19 जून 2020 रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीसंदर्भातील निवेदन

Posted On: 20 JUN 2020 3:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या वक्त्यव्याचा चुकीचा अन्वयार्थ काढण्याचा प्रयत्न, समाजातील काही घटकांकडून केला जात असल्याचे आढळले आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मर्यादेचे उल्लंघन करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास, त्याला चोख प्रत्युतर दिले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले होते. किंबहुना, याआधी, अशा आव्हानांचा सामना करतांना झालेल्या निष्काळजीपणाच्या तुलनेत, आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास, भारतीय फौजा अधिक निर्णायकपणे त्याला प्रत्युत्तर देतात, यावर पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात विशेष भर दिला होता.(उन्हे रोकते हैं, उन्हें टोकते हैं)

यावेळी चीनी फौजा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिक संख्येने आणि ताकदीने आल्याचेही या सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आले होते. भारतीय फौजांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याची माहितीही देण्यात आली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या उल्लंघनाच्या मुद्यावर, हे ही स्पष्टपणे सांगण्यात आले होते, की गलवान येथे 15 जून रोजी जी हिंसा झाली, त्याला कारण म्हणजे चीनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत काही  बांधकाम करण्याचा प्रयत्न केला आणि इशारा देऊनही, हे काम थांबवले नाही.

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांच्या संपूर्ण निवेदनाचा भर, 15 जून रोजी गलवान येथे घडलेल्या घटना, ज्यात 20 जवान शहीद झाले, त्याविषयी माहिती देण्याचा होता.चीनी सैन्याचे मनसुबे यशस्वी होऊ न देण्यासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्य आणि देशभक्तीला पंतप्रधानांनी यावेळी अभिवादन केले. या जवानांच्या शौर्यामुळेच आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या बाजूने चीनचे काहीही अस्तित्व नाही, आपल्या भूभागावर कोणीही नाही, असा पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा अर्थ होता. 16 बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळेच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बांधकाम उभे करण्याचा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर या ठिकाणाहून, उल्लंघन करण्याचा, चीनचा डाव त्यादिवशी  फसला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द, ज्यांनी आपल्या मायभूमीत घुसण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपल्या सैनिकांनी चांगला धडा शिकवला, हे आपल्या सैन्यदलाचा पराक्रम आणि मूल्ये यांचे संक्षिप्त वर्णन करणारेच आहेत. पुढे, पंतप्रधान मोदी यांनी असेही अधोरेखित केले होते की, मला तुम्हा सर्वाना आश्वस्त करायचे आहे की आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात भारतीय सैन्यदले कोणतीही कसूर करणार नाहीत

भारताचा प्रदेश कोणता आहे, हे देशाच्या नकाशावर स्पष्टपणे दिसते. हे सरकार या सीमा अबाधित ठेवण्यास कटिबद्ध असून देशाच्या नकाशात दिसणाऱ्या सीमांवर ठाम आहे. जोवर, काही बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रश्न आहे, तर गेल्या 60 वर्षात, सुमारे 43,000  चौरस किलोमीटर्सचा भारताचा भूभाग कसा बेकायदेशीरपणे बळकावण्यात आला, त्यावेळी काय परिस्थिती होती, याची सविस्तर माहिती कालच्या सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आली. संपूर्ण देशालाही त्याची पुरेशी कल्पना आहे. हे विद्यमान सरकार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकतर्फी पद्धतीने केलेले कोणतेही बदल खपवून घेणार नाही, हे ही कालच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते.

आज जेव्हा आपले शूर जवान आपल्या सीमांचे रक्षण करण्यात गुंतले आहेत, अशा वेळी असे निरर्थक वादग्रस्त मुद्दे काढून, त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कालच्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वसाधारण सूर आणि भावना, अशा संकटकाळात भारतीय सैन्यदले आणि सरकारला सर्वतोपरी पाठींबा देण्याचीच होती. काही अपप्रचारामुळे भारतीय जनतेची एकता दुबळी पडणार नाही, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

 

R.Tidke/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1632875) Visitor Counter : 359