पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी आचार्य श्री महाप्रज्ञ जी यांना वाहिली श्रद्धांजली


“समृद्ध राष्ट्रासाठी आनंदी कुटुंब उभारा” हा मंत्र अवलंबण्याचे लोकांना केले आवाहन

Posted On: 19 JUN 2020 4:36PM by PIB Mumbai

 

संत प्रवर आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री महाप्रज्ञ जी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आचार्य श्री महाप्रज्ञ जी यांनी आपले संपूर्ण जीवन मानवजातीच्या आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले होते.

पंतप्रधानांनी थोर संतांसोबत केलेल्या अनेक संवादांचे स्मरण करत सांगितले की, आचार्य यांच्यासोबत  अनेकदा संवाद साधण्याचे सौभाग्य प्राप्त झाले होते आणि संतांच्या या जीवन प्रवासातून ते अनेक चांगल्या गोष्टी शिकले आहेत.

मोदी म्हणाले की, त्यांना संतांच्या अहिंसा यात्रा आणि मानवतेच्या सेवेमध्ये भाग घेण्याची संधी देखील प्राप्त झाली होती.

ते म्हणाले, आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्यासारखे युग ऋषी त्यांच्या शारीरिक स्वार्थासाठी काही मिळवत नाहीत परंतु त्यांचे जीवन, विचार आणि कृती मानवजातीच्या सेवेसाठी समर्पित आहेत.

पंतप्रधानांनी आचार्य जी यांचे एक वाक्य सांगितले, “जर तुम्ही तुमच्या जीवनातून ‘मी आणि माझे’ काढून टाकले तर संपूर्ण जग तुमचे होईल”

मोदी म्हणाले की, संतांनी यालाच आपल्या जीवनाचा मंत्र आणि तत्त्वज्ञान बनवले होते आणि आपल्या प्रत्येक कृतीत आणि कामात ते अंमलात आणले.

पंतप्रधान म्हणाले की, संतांच्या आयुष्यात कोणत्याही वस्तूची मालकी (परिग्रह) नव्हती परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेम होते.

राष्ट्रकवि रामाधारी सिंग दिनकर हे आधुनिक काळातील विवेकानंद म्हणून आचार्य महाप्रज्ञ जी यांचा उल्लेख कसा करतात हे पंतप्रधानांना आठवले. ”

पंतप्रधान म्हणाले की, त्याचप्रमाणे दिगंबर परंपरेचे महान संत आचार्य विद्यानंद यांनी आचार्य महाप्रज्ञ यांनी लिहिलेले आश्चर्यकारक साहित्य रचनेमुळे त्यांची तुलना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी केली आहे.

पंतप्रधानांनी अटलबिहारी वाजपेयीजींचा उल्लेख केला आणि स्वत: साहित्य आणि व्यासंग यात पारंगत असणारे अटलजी म्हणायचे की, -“मी आचार्य महाप्रज्ञ जी यांच्या साहित्याचा,   सखोलपणाचा, त्यांचे ज्ञान आणि शब्दांचा एक महान प्रेमी आहे".

पंतप्रधानांनी आचार्य श्रीं यांचे वर्णन करताना सांगितले की त्यांना उत्तम भाषण, मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि उत्तम शब्दसंग्रह यांचे दैवी वरदान प्राप्त होते.

पंतप्रधान म्हणाले की आचार्य श्री यांनी अध्यात्म, तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांवर संस्कृत, हिंदी, गुजराती, इंग्रजी भाषेतील 300 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

पंतप्रधानांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जी यांच्यासमवेत महाप्रज्ञ जी यांनी लिहिलेल्या “द फॅमिली अँड द नेशन” या त्यांच्या एका पुस्तकाचा उल्लेख केला.

ते म्हणाले, "एक कुटुंब कसे एक सुखी कुटुंब बनू शकते, एक सुखी कुटुंब कसे एक समृद्ध राष्ट्र निर्माण करू शकते" हा दृष्टीकोन या दोन महान व्यक्तींनी मांडला आहे.

दोन महान व्यक्तींच्या जीवनाची तुलना करताना पंतप्रधान म्हणाले की आपण दोघांकडून कसे शिकलो. "आध्यात्मिक गुरूला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा समजतो आणि एक वैज्ञानिक अध्यात्म कसे स्पष्ट करतो याचे ज्ञान मी त्यांच्याकडून घेऊ शकलो."

ते म्हणाले की, त्यांच्याशी एकत्र संवाद साधण्याचे सौभाग्य मला मिळाले होते.

ते पुढे म्हणाले की, डॉ कलाम महाप्रज्ञ जी बद्दल म्हणायचे की, त्यांच्या जीवनाचा एकच उद्देश आहे - चाला, अधिग्रहण करा आणि द्या. म्हणजेच सतत प्रवास करा, ज्ञान मिळवा आणि जीवनात जे काही आहे ते समाजाला द्या.

पंतप्रधान म्हणाले की महाप्रज्ञजींनी आपल्या हयातीत हजारो किलोमीटरचा प्रवास केला. मृत्यू होण्यापूर्वी देखील ते अहिंसेच्या यात्रेवर निघाले होते. 'आत्मा माझा देव आहे, त्याग ही माझी प्रार्थना आहे, मैत्री ही माझी भक्ती आहे, संयम ही माझी शक्ती आहे आणि अहिंसा हा माझा धर्म आहे' पंतप्रधान त्यांच्या या व्याक्याचे स्मरण करत म्हणाले की त्यांनी ही जीवनशैली जगली, आणि कोट्यावधी लोकांना हेच शिकवले. ते म्हणाले की योगच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी लोकांना नैराश्यमुक्त आयुष्याची कला शिकविली. ते म्हणाले की, “परवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे हा देखील एक योगायोग आहे. 'सुखी कुटुंब आणि समृद्ध राष्ट्र' या महाप्रज्ञ जी यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी, समाजापर्यंत त्यांचे विचार पोहचविण्यासाठी आपल्या सर्वांनी योगदान देण्याची ही एक संधी असेल.”

"निरोगी व्यक्ती, निरोगी समाज, निरोगी अर्थव्यवस्था" - आचार्य महाप्रज्ञ जींच्या आणखी एका मंत्राचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांचा मंत्र आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणास्थान आहे.

आज हाच मंत्र घेऊन देश आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकारण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

ते म्हणाले, "माझा विश्वास आहे, ज्या समाज आणि देशाचे आदर्श, आपले ऋषी-संत यांनी आपल्यासमोर ठेवले आहे, आपला देश लवकरच तो संकल्प सिद्ध करेल. तुम्ही सर्व एकत्र येऊन हे स्वप्न साकार कराल.”

*****

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1632612) Visitor Counter : 234