पंतप्रधान कार्यालय
कोविड-19 संदर्भात मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेच्या आरंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
Posted On:
16 JUN 2020 8:40PM by PIB Mumbai
नमस्कार मित्रांनो,
अनलॉक-एक चे दोन आठवडे पूर्ण होत आहेत. या दरम्यान आपल्याला जे अनुभव आले, त्यांची समीक्षा, त्यांच्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. आजच्या या चर्चेत मला आपल्याकडून देखील बरेच काही ऐकण्याची संधी मिळू शकेल, काही समजून घेता येईल. आजच्या चर्चेतून निघालेले मुद्दे, आपल्या सूचना, देशाला पुढे जाण्याची रणनीती तयार करण्यात मदत मिळेल.
मित्रांनो,
कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी ‘अचूक वेळ साधणे’, अत्यंत महत्वाचे असते. योग्य वेळी घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे देशात कोरोनाचे संक्रमण नियंत्रित ठेवण्यात खूप मदत झाली आहे.
भविष्यात जेव्हा केव्हा भारताच्या कोविडविरुद्धच्या लढ्याचा अभ्यास केला जाईल, तेव्हा हा काळ यासाठीही आठवला जाईल, की या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले होते. सहकार्यात्मक संघराज्याचे एक सर्वोत्तम उदाहरण आपण जगासमोर ठेवले.
मित्रांनो,
जेव्हा कोरोना जगातल्या अनेक देशात चर्चेचा विषयही झाला नव्हता, तेव्हाच भारताने त्याचा सामना करण्याची तयारी सुरु केली होती. निर्णय घ्यायला सुरुवात केली होती. आम्ही प्रत्येक भारतीयाचे आयुष्य वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे
गेल्या काही आठवड्यात, हजारोंच्या संख्येने भारतीय नागरिक, परदेशातून मायदेशी आले आहेत.गेल्या काही आठवड्यात, लाखो स्थलांतरित मजूर आपल्या गावात पोहोचले आहेत. रेल्वे-रस्ते, हवाई- सागरी, असे सगळे मार्ग आता सुरु झाले आहेत. मात्र असे असले तरीही, आपली एवढी मोठी लोकसंख्या असूनही, भारतात कोरोना संक्रमणाचा त्या प्रमाणात विनाशकारी प्रभाव दिसला नाही, जेवढा इतर देशांमध्ये दिसला आहे. जगातील मोठमोठे तज्ञ, आरोग्याचे जाणकार, सध्या लॉकडाऊन आणि या काळात भारतात लोकांनी पाळलेल्या स्वयंशिस्तीची चर्चा करत आहेत.
आज भारतात, रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. असे देश, जिथे कोरोना संक्रमित रूग्णांचे आयुष्य वाचवले जात आहे, त्या देशांच्या यादीत भारत आघाडीवर आहे. कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू होणे दुःखद आहे. आमच्यासाठी एकाही भारतीयाचा मृत्यू ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. मात्र, सत्य हे आहे की आज भारत अशा देशांमध्ये एक आहे, जिथे कोरोनमुळे सर्वात कमी मृत्यू होत आहेत.
आज अनेक राज्यांचे अनुभव, आपल्याला हा आत्मविश्वास देतात, की कोरोनाच्या या संकटकाळात, भारत आपले नुकसान कमीतकमी ठेवून, पुढे वाटचाल करु शकतो, आपली अर्थव्यवस्था जलद गतीने पुन्हा रुळावर आणू शकतो.
मित्रांनो,
गेल्या दोन आठवड्यांत अनलॉक-वन ने आम्हाला एक मोठा धडा दिला आहे की आपण नियमांचे पालन केले, सर्व मागर्दर्शक सूचना पाळल्या, तर कोरोना संकटामुळे भारताचे कमीतकमी नुकसान होऊ शकेल.
म्हणूनच, मास्कचा वापर किंवा चेहरा झाकणे यावर भर दिला जाणे आवश्यक आहे. मास्क न घालता किंवा चेहरा न झाकता, घरातून बाहेर पडण्याची कल्पना करणे आता तरी योग्य ठरणार नाही. हे जेवढे त्या व्यक्तीसाठी धोकादायक आहे, तेवढेच, त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठीही धोकादायक आहे.
त्यामुळेच, “दो गज दूरी” चा आपला मंत्र असेल, किंवा दिवसातून अनेकवेळा 20-20 सेकंदांसाठी साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, हे सगळे अजूनही अत्यंत गांभीर्याने करायला हवे. स्वतःच्या रक्षणासाठी, कुटुंबाच्या, विशेषतः घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या रक्षणासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.
आता जवळपास, सर्वच कार्यालये सुरु झाली आहेत. खाजगी क्षेत्रातही लोकांचे आता कार्यालयात जाणे सुरु झाले आहे. बाजारात, रस्त्यांवर देखील गर्दी होऊ लागली आहे. अशावेळी या सर्व उपाययोजना आणि दक्षता घेऊनच आपण कोरोनाचा संक्रमण आटोक्यात ठेवू शकतो. जरासा निष्काळजीपणा,ढिलेपणा, नियमांत शिथिलता यात कुचराई केली, तर कोरोनाविरुद्धचा आपला सर्वांचा लढा दुर्बल होऊ शकतो.
आपल्याला हे नेहमीच लक्षात ठेवायचे आहे, की आपण कोरोनाला जितके रोखू शकू, त्याचे संक्रमण जितके आटोक्यात ठेवू शकू, तेवढीच आपली अर्थव्यवस्था लवकरात लवकर सुरु होऊ शकेल. आपली कार्यालये सुरु होतील, बाजारपेठा सुरु होती, वाहतूक सुरु होईल आणि तेवढ्याच रोजगाराच्या अनेक संधीही उपलब्ध होतील.
मित्रांनो,
येत्या काही काळात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आर्थिक व्यवहार जसजसे वाढतील, तसतसे त्यातून मिळणारे अनुभव इतर राज्यांनाही खूप लाभदायक ठरतील. गेल्या काही आठवड्यांच्या प्रयत्नांनंतर आपल्या अर्थव्यवस्थेला हळूहळू पालवी फुटू लागली आहे. उर्जा वापर आधी कमी झाला होता, तो आता वाढू लागला आहे. या वर्षी मे महिन्यात खताची विक्री गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत दुप्पट झाली आहे.
यावर्षी, खरीपाच्या पेरण्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत, जवळपास 12 ते 13 टक्के अधिक झाल्या आहेत. दुचाकी गाड्यांची मागणी आणि उत्पादन , लॉकडाऊनच्या आधीच्या पातळीच्या सुमारे 70 टक्यांपर्यंत पोहचले आहे. किरकोळ क्षेत्रातही डिजिटल पेमेंट देखील लॉकडाऊन आधीच्या स्थितीत पोहोचले आहे.
एवढेच नाही तर, मे महिन्यात, टोल संकलन मध्ये झालेली वाढ आर्थिक व्यवहारांमध्ये होत असलेल्या वाढीचेच निदर्शक आहे. सलग तीन महिन्यांपर्यंत, निर्यातीत घट होऊनही, जून महिन्यात निर्यातीने पुन्हा उसळी घेत, गेल्या वर्षीच्या कोविड पूर्वीचा दर गाठला आहे. हे सर्व संकेत, आपल्याला प्रोत्साहन देत आहेत, पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत.
मित्रांनो,
आपल्यापैकी, जास्तीत जास्त राज्यांमध्ये, कृषी,फळबागा, मत्स्यव्यवसाय आणि एमएसएमई, या क्षेत्रांचा मोठा वाटा आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत गेल्या काही दिवसांत, या सर्वच क्षेत्रांसाठी काही न काही तरतूद करण्यात आली आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आधार देण्यासाठी अलीकडेच अनेक निर्णय घेतले गेले आहेत. कालबद्ध पद्धतीने एमएसएमई क्षेत्राला बँकाकडून पतपुरवठा केला जावा याचे प्रयत्न सुरु आहेत. 100 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या उद्योगांना 20 टक्के अतिरिक्त पतपुरवठ्याच्या आपोआप वाढीचा लाभ दिला जातो आहे.
जर, बँकर्स समितीच्या माध्यमातून आपण हे निश्चित केले की उद्योगांना जलदगतीने पतपुरवठा होईल, तर उद्योगक्षेत्र लवकरात लवकर काम सुरु करू शकतील, लोकांना रोजगार देऊ शकतील.
मित्रांनो,
आपल्याकडे जे छोटे कारखाने आहेत, त्यांना मार्गदर्शनाची, मदतीचा हात देण्याची जास्त गरज आहे. आपल्या नेतृत्वाखाली याच दिशेने खूप काम होत आहे, याची मला कल्पना आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्राला आपली जुनी गती परत मिळवता यावी, त्यासाठी आम्हाला मूल्यसाखळीवरही एकत्र येऊन काम करावे लागणार आहे.
राज्यांत जिथे जिथे विशेष वित्तीय व्यवहाराचे बिंदू आहेत, तिथे चोवीस तास काम सुरु व्हावे, माल चढवणे-उतरवणे जलद गतीने व्हावे, एका शहरातून दुसऱ्या शहरापर्यंत माल घेऊन जाण्यात काही अडचणी आल्या नाहीत तर हे आर्थिक व्यवहार आणखी गतीने होऊ शकतील.
मित्रांनो,
शेतकऱ्यांच्या उत्पादनांच्या विपणन क्षेत्रात, अलीकडेच ज्या सुधारणा केल्या गेल्या, त्यातून शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ होणार आहे. यातून शेतकऱ्यांना आपले पिक विकण्यासाठी नवे पर्याय उपलब्ध होतील, त्यांचे उत्पन्न वाढेल आणि खराब हवामानामुळे, साठवणूकीची सोय नसल्यामुळे जे नुकसान होणार आहे, ते ही आपण कमी करु शकू.
जेव्हा शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल, तेव्हा साहजिकच मागणीतही वाढ होईल आणि राज्याची अर्थव्यवस्था देखील गतिमान होईल. विशेषतः ईशान्य भारत आणि आमच्या आदिवासी भागात, शेती तसेच फळबागांची लागवड यासाठी विपुल प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. सेंद्रिय उत्पादने असोत, बांबूची उत्पादने असो किंवा मग इतर आदिवासी वस्तू, त्या सर्वांसाठी संधीची नवी कवाडे उघडणार आहेत. स्थानिक उत्पादनांसाठी ज्या समूह-आधारित व्यवस्थेची घोषणा केली आहे, त्याचा लाभही प्रत्येक राज्याला होणार आहे. त्यासाठी आवश्यक आहे की आपण प्रत्येक तालुका, जिल्ह्यातील अशा उत्पादनांचा शोध घ्यायला हवा, ज्यांच्यावर प्रक्रिया किंवा त्यांचे विपणन करुन, एक उत्तम उत्पादन आपण देश आणि जगाच्या बाजारपेठेत नेऊ शकू.
मित्रांनो,
गेल्या काही दिवसात, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत, ज्या प्रकारच्या घोषणा केल्या गेल्या आहेत, त्यांची कालबद्ध स्वरूपात अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपल्याला एकत्र येऊन, एकजुटीने काम करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, कोरोनाविरुद्धचा लढा आणि अर्थव्यवहार यासंदर्भात आपल्या ज्या सूचना आहेत, आपण जी तयारी केली आहे, ती जाणून घेण्यासाठी देखील मी उत्सुक आहे. माझी आता गृहमंत्र्यांना विनंती आहे कि त्यांनी यापुढच्या चर्चेचे संचालन करावे.
***
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631965)
Visitor Counter : 281
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam