PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


लॉकडाऊनमुळे सुमारे 14 ते 29 लाख कोविड-19 रुग्णांची भर टाळता आली. आपण अगदी योग्य मार्गावर वाटचाल करत असल्याचा आम्हाला विश्वास आहे: भारत सरकार

Posted On: 22 MAY 2020 8:27PM by PIB Mumbai

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

दिल्ली-मुंबई, 22 मे 2020

 

अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरच्या परिस्थिती संदर्भात केलेल्या संबोधनात पंतप्रधान म्हणाले, "चक्रीवादळाने पुन्हा एकदा भारताच्या किनारी भागाला, विशेष करून पुर्वेकडच्या भागाला ग्रस्त केले, त्यातही सर्वात जास्त दुष्परिणाम पश्चिम बंगालच्या आपल्या बंधू-भगिनींना, पश्चिम बंगालच्या नागरिकांना झेलावा लागला, इथे संपत्तीचेही मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळ येण्याच्या शक्यतेपासून मी सातत्याने सर्व संबंधिताच्या संपर्कात होतो. भारत सरकारही राज्य सरकारच्या सतत संपर्कात होते. चक्रीवादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी आवश्यक पाऊले उचलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित सर्वतोपरी प्रयत्न केले”.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर व्हिसा आणि प्रवासाबाबत लावलेले निर्बंध केन्द्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने शिथील केले आहेत. यानुसार, ओसीआय कार्डधारक म्हणजेच परदेशात राहाणाऱ्या भारतीय नागरिकांची वर्गवारी केली आहे. त्यातल्या काहींना भारतात परत आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.परदेशात अडकलेल्या ओसीआय कार्डधारक भारतीयांचा मायदेशी परतण्याचा मार्ग यामुळे सुकर झाला आहे:

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, ICMR चे रमण गंगाखेडकर, सचिव, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय श्री प्रवीण श्रीवास्तव यांनी माहिती दिली तर अधिकारप्राप्त गट 1 चे अध्यक्ष व्ही के पॉल यांनी भारताचा कोविड19 विरुद्धचा लढा आणि त्यापुढचे मार्गक्रमण, याबाबतचे समग्र चित्र, याबाबत सादरीकरण केले.

  • आतापर्यंत कोविड-19  चे 48,534 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून 66,330 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत 3,234 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे  41% पर्यंत वाढला आहे.  तर मृत्यूदर देखील 3.02 टक्यांपर्यंत कमी झाला आहे.- आरोग्य मंत्रालय
  • आज दुपारी एक वाजेपर्यंत कोविड-19 च्या 27,55,714 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज चौथ्यांदा एकाच दिवशी एक लाखापेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत – ICMR
  • भारताचा कोविड19 विरुद्धचा लढा आणि त्यापुढचे मार्गक्रमण, याबाबतचे समग्र चित्र, अधिकारप्राप्त गट 1 च्या अध्यक्षांनी सादर केले.
  • आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 1 कोटी भारतीयांना उपचार देण्याचा मैलाचा टप्पा गाठल्याबद्दल सरकारच्या वतीने,आम्ही संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो. ही एक खूप मोठी, अभूतपूर्व कामगिरी आहे.'सर्वांसाठी आरोग्य' हे उद्दिष्ट गाठण्याचा देशाचा निश्चय या कामगिरीतून प्रतीत होतो-अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 1
  • कोविड19 च्या रुग्णवाढीच्या दरात 3 एप्रिल 2020 पासून, म्हणजे लॉकडाऊन मुळे संक्रमण नियंत्रणात आल्यापासून,  सातत्याने घट होत आहे. जर लॉकडाऊन लागू केला नसता, तर आज रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त राहिली असती. रुग्णांच्या संख्येप्रमाणेच, लॉकडाऊनमुळे रुग्णांच्या मृत्यूदरातही लक्षणीय घट झाली आहे.  लॉकडाऊनच्या आधीच्या आणि नंतरच्या परिस्थितीतील आकडेवारीतला फरक लक्षणीय आहे. - अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट
  • कोविड-19 बाबत, एक निश्चित मॉडेल तयार करण्यात आव्हान हे आहे की कोविड-19 सारखे जागतिक आजाराचे दुसरे उदाहरण नव्हते. त्यामुळे जसजसे अनुभव येत आहेत, तसतसे आपण त्यातून शिकून नवनव्या उपाययोजना करत आहोत – सचिव
  • बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुपच्या मॉडेल नुसार, लॉकडाऊनमुळे 1.2 ते 2.1 लाख लोकांचा जीव वाचला आहे, 36 ते 70 लाख लोकांना कोविड-19  संसर्ग होण्यापासून वाचवण्यात आले आहे. पब्लिक हेअल्थ फौंडेशन ऑफ इंडियानुसार सुमारे 78,000 लोकांचे जीव लॉकडाऊनमुळे वाचले आहेत. आणखी दोन स्वतंत्र अर्थतज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनमुळे कोविडचे सुमारे 23 लाख रुग्ण आणि 68,000 मृत्यू टाळता आले आहेत. निवृत्त शास्त्रज्ञांसह काही स्वतंत्र तज्ञांनी केलेल्या गणनेनुसार लॉकडाऊनमुळे सुमारे 15.9 लाख रुग्णांची भर आणि 51,000 मृ्त्यू रोखता आले आहेत – सचिव
  • सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि भारतीय सांख्यिकी संस्थेने केलेल्या संयुक्त अध्ययनानुसार, आम्हाला असे आढळले की लॉकडाऊन मुळे सुमारे 20 लाख रुग्णसंख्या आणि 54,000 मृत्यू टाळणे शक्य झाले आहे
  • लॉकडाऊनमुळे सुमारे 14 ते 29 लाख  कोविड-19 रुग्णांची भर टाळता आली. 37,000 ते 78,000 लोकांचे जीव वाचले. लोकांच्या सहकार्यामुळे लॉकडाऊनचा खूपच चांगल्या प्रकारे फायदा झाला असल्याचा आम्हाला विश्वास आहे. विरोधातील संघर्षामध्ये लॉकडाऊनचा उपाय अतिशय फायदेशीर ठरला आहे, आम्ही अगदी योग्य मार्गावर वाटचाल करत असल्याचा आम्हाला विश्वास आहे - श्री प्रवीण श्रीवास्तव
  • लॉकडाऊनमुळे काय साध्य झाले? मोठ्या संख्येने लोकांचे जीव वाचले. कोविड-19 ची रुग्णसंख्या वाढणे टाळता आले.  कोविड19 चे संक्रमण नियंत्रणात ठेवता आले. भारत एवढा विशाल देश असूनही, लॉकडाऊन केल्यामुळे कोविड19 चा उद्रेक केवळ काही भागांपुरताच मर्यादित राहिला. - अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट, 1
  • कोविड19 च्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण केवळ 5 राज्यांमधे आहेत, 60 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण केवळ 5 शहरांमधे आहेत. कोविड चा संसर्ग केवळ काही भागांपुरता मर्यादित आहे, हे छोटे यश  नाही. यामुळेच आपल्याला इतर भागांमध्ये मोकळीक देण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. काही विशिष्ट भागांमध्ये कोविड-19 ला झालेला प्रतिबंध, लॉकडाऊनच्या काळात केलेल्या उपाययोजनांमुळे शक्य झाला, यामुळे आपल्याला भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे सज्ज राहता येईल.
  • दोन महिन्यांपेक्षा कमी काळात आपण आपल्या आरोग्य पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे. आपल्याकडे आता 1,093 कोविड सुविधा आहेत.  रुग्णालयात 3.24 लाख खाटा कोविड रुग्णांसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. कोविड केअर सेंटर्समध्ये 6.5 लाख खाटा सज्ज आहेत- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट, 1
  • कोविड योद्ध्यांसाठी 56 लाख प्रशिक्षण अभ्यास घेण्यात आले आहेत. आज आपल्याकडे दररोज एक लाख चाचण्या करण्याची क्षमता आहे. राज्यांना 30 लाख PPE देण्यात आले आहेत, दररोज 3 लाख PPE तयार करु शकतील एवढ्या क्षमतेच्या 109 देशी उत्पादकांची नोंदणी करण्यात आली आहे. - अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट, 1
  • कोविड-19 व्यवस्थापनाबाबतच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शक नियमावली शास्त्रीय पद्धतीने अतिशय जलदगतीने तयार करण्यात आली आहे. 7 कंपन्यांकडून चाचण्यांचे किट्स तयार करण्यात येत आहेत, ICMR कडून विषाणू कल्चर प्रक्रियेनंतर लस बनवली जात आहे, मोठा प्रतिसाद मिळत आहे
  • कोविड19 शी लढा देण्यासाठी आपल्या हातात आरोग्यसेतू हे अतुलनीय शस्त्र आहे, हे ॲप वापरणाऱ्यांची संख्या आता 10 कोटी झाली आहे. टेलीमेडीसीन चा वापर अधिक लोकप्रिय झाला आहे. त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सुयोग्यपणे आखण्यात आल्या आहेत -अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट -1
  • देशाला कोविड19 चा सामना करण्यासाठी तयार होण्याचा जो वेळ लॉकडाऊन मुळे मिळाला, त्याचा अत्यंत उत्तम वापर करण्यात आला आहे.  आता आपण हे आत्मविश्वासाने म्हणू शकतो, की आपण आव्हानांचा सामना करण्यास आणि त्यावर मात करण्यास सज्ज आहोत- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट,1
  • हे एक युद्ध नाही तर चळवळ आहे, एक जनआंदोलन आहे, केवळ जागरुकता पुरेशी नसून वर्तनातील बदल आवश्यक आहे. पुढे वाटचाल करण्यासाठी आमचा संकल्प हेच आमचे सामर्थ्य आहे. याचे रुपांतर सिद्धीमध्ये करणे गरजेचे आहे. आपल्याला अत्यंत सावध राहावे लागणार आहे. आपण जरा जरी निवांत झालो, तरी विषाणू पसरेल. आता यापुढे आपल्याला मास्क घालणे, 'दोन हात लांब' अंतर राखणे, इतरांचे संरक्षण, आपली प्रतिकारशक्ती वाढवणे, हे सगळे उपाय जीवनशैलीचा भाग बनवायचे आहेत जेणेकरुन ह्या विषाणूचा फैलाव रोखता येईल – अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट, 1
  • आपल्याला एका प्रदीर्घ वाटचालीसाठी सज्ज राहायचे आहे.  आधीपासूनच काळजी घेणे गरजेचे आहे. या आजाराबाबत असलेली लांच्छनाची भावना दूर केली पाहिजे. आरोग्यसेतू ॲप चा वापर करा. जीव वाचवणे, संसर्ग कमीतकमी राखणे हे आपले उद्दिष्ट आहे. लॉकडाऊनचे उद्दिष्ट बऱ्याच प्रमाणात गाठले गेले आहे, मात्र तो अनिश्चितकाळ ठेवला जाऊ शकत नाही. आपल्याला यापुढे अशाच प्रकारे वागायचे आहे की कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही. हाच आपला यापुढचा मार्ग असेल. -  अधिकारप्राप्त गट, 1 च्या अध्यक्षांची माहिती
  • कोविड19 विषाणूच्या वाढीचा दर  संसर्गाच्या प्रसाराच्या गणितावर अवलंबून असतो, तसाच तो समुदाय आणि समाजाच्या वर्तनावर पण अवलंबून असतो. आपण कसा प्रतिसाद देतो ,याचे एक निश्चित मॉडेल बांधणे अवघड आहे. आपण केवळ अंदाज बंधू शकतो. आताच भविष्याबद्दल काही सांगणं कठीण आहे. काही संसर्गरोगशास्त्रज्ञांनी मात्र, जास्त संख्येचा अंदाज वर्तवला आहे, आम्ही कोणतेही अंदाज वर्तवलेले नाहीत. आम्ही आवश्यक ती पावले उचलू आणि शक्य तितक्या जास्त प्रमाणात संसर्ग नियंत्रण करू, असे आम्हाला सांगायचे आहे- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट, 1

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इतर अपडेट्स:

  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) ने एक एप्रिल ते 21 मे 2020 या कालावधीत, 16,84,298  करपात्र व्यक्तींचे 26,242 कोटी रुपयांचे करपरतावे दिले आहेत. या कालावधीत, 15,81,906 करपात्र व्यक्तींचे 14,632 कोटी रुपयांचे प्राप्तिकर परतावे देण्यात आले आहेत तर, 1,02,392 करपात्र व्यक्तींचे 11,610 कोटी रुपयांचे कॉर्पोरेट करपरतावे देण्यात आले आहेत.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पैकेजची घोषणा केल्यानंतर, कर परतावे देण्याच्या प्रक्रियेला आणखी गती देण्यात आली.
  • केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी इंधन कंपन्यांकडून उभारल्या जात असलेल्या सुमारे 8 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध पाईपलाईन प्रकल्पांचा आढावा घेतला. आत्मनिर्भर भारत अभियानाचा पुरस्कार करत, या प्रकल्पांची उभारणी संपूर्णपणे स्वदेशी पद्धतीने केली जावी असे आवाहन प्रधान यांनी केले.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर हर्षवर्धन यांची नियुक्ती झाली आहे. सार्वजनिक आरोग्य दायित्वे कार्यक्षम, प्रभावी आणि जबाबदार पद्धतीने पार पाडण्यासाठी मी वचनबद्ध आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाशी  संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्‍यांना यूजीसीच्या ‘स्वयम’ या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेवून शिकता येईल आणि ‘पतगुणांकन’ मिळवता येईल, असं सांगितलं. विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पदवी अभ्यासक्रमाची आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सूची सामायिक केली आहे. या अभ्यासक्रमामध्ये अभियांत्रिकीचे विषय, शिक्षण यांचा समावेश नाही, असही पोखरियाल यांनी स्पष्ट केलं. जुलै 2020 च्या शैक्षणिक सत्रापासून मोठ्या प्रमाणावर मुक्तपणाने सर्वांना ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करता यावा, यासाठी ‘स्वयम’ने पूर्ण तयारी केली आहे.
  • भारतीय रेल्वे, तिकिटे आरक्षित करण्यासाठीच्या आरक्षण खिडक्या येणाऱ्या काळात टप्याटप्याने सुरु करणार आहे. आरक्षण सुविधा सुरु करणे, हे रेल्वे प्रवासी सेवा श्रेणीबद्ध रीतीने पूर्ववत करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल असून आरक्षित गाड्यात भारताच्या सर्व भागातून संभाव्य प्रवाश्यांना, तिकीट आरक्षित करणे सुलभ होणार आहे.
  • वस्त्रोद्योग समिती, मुंबई देखील आता आरोग्यसेवा कर्मचारी आणि इतर कोविड-19 योद्धयांना आवश्यक असणाऱ्या पीपीई बॉडी कव्हरची चाचणी करून प्रमाणपत्र देणार आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने काल संध्याकाळी नववी मान्यताप्राप्त प्रयोगशाळा म्हणून वस्त्रोद्योग समितीचा समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला. 

 

महाराष्ट्र अपडेट्स

2,345 नव्या केसेसच्या नोंदणीनंतर महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 41,642 झाली आहे. राज्यामध्ये 28,454 सक्रिय केसेस आहेत तर 11,726 बरे झाले आहेत. मुंबई या हॉटस्पॉट मध्ये 1,382 नव्या केसेस नोंद झाल्या. शहरातली रुग्णसंख्या 25,500 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र सरकारने खाजगी रुग्णालयांसाठी त्रिस्तरीय शुल्क रचना ठरवली आहे. ज्यामध्ये खाजगी आणि आणि धर्मादाय रुग्णालयांच्या सेवेचा समावेश होईल याद्वारे या रुग्णालयांमधील 80 टक्के खाटांची  शुल्कनिश्चिती करण्यात आली आहे. नवीन जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की ही शुल्क रचना विलगीकरण आणि विलगीकरण नसलेल्या खाटा दोन्ही ला लागू होईल

 

PIB FACTCHECK

* * *

DJM/RT/MC/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626201) Visitor Counter : 275