पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद


20 मार्च 2020 पासून मुख्यमंत्र्यांसमवेत अशा प्रकारची 5 वी बैठक

ग्रामीण भागांमध्ये कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी आता प्रयत्न करायला हवेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोविड नंतरच्या काळात उद्‌भवणाऱ्या संधींचा भारताने लाभ उठवावा : पंतप्रधान

आपण सर्वांनी जगाच्या नवीन वास्तवाचे नियोजन केले पाहिजे: पंतप्रधान

Posted On: 11 MAY 2020 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  11  मे 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोविड -19 च्या विरोधात भारताच्या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चा केली.

आपल्या प्रारंभिक संबोधनात पंतप्रधान म्हणाले की, भारतात सर्वात जास्त बाधित क्षेत्रांसह कोणकोणत्या भौगोलिक भागात महामारी पसरली आहे याचे स्पष्ट संकेत आता आपल्याकडे आहेत.  तसेच गेल्या काही आठवड्यात अशा प्रकारची परिस्थिती , अगदी जिल्हा पातळीपर्यंत कशी हाताळायची याबाबतच्या परिचालन प्रक्रिया अधिकाऱ्यांनी व्यवस्थित समजून घेतल्या आहेत. "

 

पंतप्रधान म्हणाले की कोविड-19 च्या प्रसाराबाबत ही माहिती देशाला याविरोधात अधिक लक्षपूर्वक लढा देण्यात उपयुक्त ठरेल.

ते म्हणाले,म्हणूनच आता आपण कोरोना विषाणूविरोधातील या लढाईत वर्तमान  आवश्यकतेनुसार  आपल्या रणनीतिवर लक्ष केंद्रित करू शकतो, आपल्यासमोर दुहेरी आव्हान आहेत  - जसे की रोग फैलावण्याचा दर कमी करणे आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत सार्वजनिक घडामोडी हळूहळू वाढवणे आणि ही दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दिशेने आपल्याला काम करावे लागेल.

पंतप्रधान पुढे म्हणाले की आता ग्रामीण भागांमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

अर्थव्यवस्थेबाबत रूपरेषा तयार करण्यासाठी राज्यांनी केलेल्या सूचना विचारात घेण्यात आल्या आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

कोविड-19 विरोधात देशाच्या लढाईत पंतप्रधानांच्या नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि देशात वैद्यकीय आणि आरोग्यविषयक  पायाभूत सुविधा मजबूत करण्याची गरज अधोरेखित केली. अनेक स्थलांतरित मजूर परत येत असल्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात नव्या संसर्गाच्या माध्यमातून महामारीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सामाजिक अंतराचे  निकष, मास्कचा वापर आणि स्वच्छतेची कठोर अंमलबजावणी करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याकडे अनेक मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

परदेशात अडकलेले भारतीय मायदेशी परत आल्यावर त्यांचे अनिवार्य विलगीकरण आवश्यक असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. अर्थव्यवस्थेबाबत आपल्या सूचनांमध्ये मुख्यमंत्र्यांनी एमएसएमई आणि वीज यांसारख्या पायाभूत प्रकल्पांना सहाय्य , कर्जावरील व्याजदर कमी करणे आणि शेतमालाला बाजारात सुलभ प्रवेश सुनिश्चित करण्यावर भर दिला.

कोविड -19 च्या विरोधात देशाच्या लढाईत सक्रिय भूमिकेबद्दल आणि तळागाळातील अनुभवातून केलेल्या  बहुमूल्य सूचनांसाठी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

पंतप्रधान म्हणाले की कोविड -19 नंतरच्या काळात जग मूलभूतपणे बदलले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. आता जागतिक महायुद्धाप्रमाणे कोरोना पूर्व आणि कोरोना नंतरचे असे जग असणार आहे. आणि यामुळे आपल्या कामकाजात  महत्त्वपूर्ण बदल घडून येतील.

ते म्हणाले की, नवीन जीवनशैली ही एक व्यक्ती ते संपूर्ण मानवता  जन से लेकर जग तक या तत्त्वावर आधारित असेल.

ते म्हणाले की आपण सर्वांनी नवीन वास्तवाचे नियोजन केले पाहिजे.

लॉकडाऊन हळूहळू मागे  घेण्याबाबत आपण विचार करत असताना आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे की जोपर्यंत आपल्याला लस किंवा उपाय सापडत नाही तोपर्यंत विषाणूशी लढा देण्याचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे सामाजिक अंतर हे आहे असे ही पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी 'दो गज की दूरीचेमहत्त्व पटवून देण्यास  सांगितले.तसेच अनेक मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या रात्रीच्या संचारबंदीच्या सूचनेमुळे लोकांमधील सावधगिरीची भावना अधिक बळकट  होईल असे ते म्हणाले.

त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनबाबत विशिष्ट अभिप्राय कळवण्याची विनंती केली.

ते म्हणाले, मी आपणा सर्वांना विनंती करतो की, तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या विशिष्ट राज्यातील लॉकडाऊन राजवटीला कसे सामोरे जावे असे तुम्हाला वाटते हे मला 15 मे पर्यंत कळवावे . राज्यांनी लॉकडाऊन हळू हळू मागे घेताना आणि त्यानंतरच्या काळात विविध बारकावे कसे हाताळावेत यावर ब्लू प्रिंट बनवावी अशी  माझी इच्छा आहे.असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, आपल्यासमोर येणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला  सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक आहे. मान्सूनच्या प्रारंभासह, अनेक बिगर-कोविड आजारांचा प्रसार होईल, ज्यासाठी आपण आपली वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली पाहिजे आणि अधिक बळकट केली पाहिजे.

शिक्षण क्षेत्रात अध्यापन आणि शिकण्याबाबत नवीन मॉडेल्स कसे समाविष्ट करता येतील याकडे धोरणकर्त्यानी लक्ष द्यावे अशी सूचनाही त्यांनी केली. 

 

पर्यटनासंदर्भात बोलताना  पंतप्रधान म्हणाले की त्यांना देशांतर्गत पर्यटनात अनेक संधी आढळल्या आहेत परंतु त्याच्या रुपरेखेबाबत आपण विचार केला पाहिजे.

ते म्हणाले, "माझे ठाम मत आहे की लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात आवश्यक असलेले उपाय दुसऱ्या टप्प्यात आवश्यक नव्हते आणि त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातल्या उपायांची गरज नाही."

रेल्वे सेवा पुन्हा सुरू केल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, आर्थिक घडामोडींना गती देण्यासाठी हे आवश्यक होते. मात्र सर्व मार्गांवर रेल्वे सेवा सुरु केल्या जाणार नाहीत, मर्यादित संख्येने गाड्या चालतील असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की मी अजूनही आशावादी आहेएकाही राज्याने निराशा असल्याचे दाखवले नाही आणि हा सामूहिक दृढनिश्चय कोविड-19 विरुद्धच्या लढाईत भारताला विजय मिळवून देईल.

पंतप्रधान म्हणाले की, कोविडनंतरचे युग देखील भारताला संधी उपलब्ध करून देईल , त्याचा भारताने लाभ उठवावा.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623208) Visitor Counter : 259