उपराष्ट्रपती कार्यालय
राज्यसभा अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापतींनी कोविड महामारीमुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीत संसदीय समित्यांच्या बैठकांची शक्यता यावर केली चर्चा
Posted On:
07 MAY 2020 8:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2020
देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकैय्या नायडू यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची आज उपराष्ट्रपती निवासात भेट घेतली. कोविड महामारीमुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती, देशवासियांना धीर देण्यासाठी संसद सदस्य घेत असलेली भूमिका आणि या परिस्थितीत विविध संसदीय समित्यांच्या बैठकांची शक्यता यावर या दोघांनी चर्चा केली.
कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठीच्या लढ्यात सर्व संसद सदस्य सक्रीयपणे सहभागी होत आहेत, तसेच नागरिकांसाठी सरकार आणि सामाजिक संस्थांनी सुरु केलेल्या मदत कार्यात आणि विविध मानवतावादी उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होत आहेत याबद्दल दोन्ही पीठासीन अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. संसदेत हे खासदार ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतात त्या जनतेला सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत त्यांची खरी गरज असताना ते सर्व जण त्यांच्यासोबत, त्यांच्यात राहून कार्य करीत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सध्याच्या गंभीर वातावरणात सरकारने देशात प्रवास करण्यावर निर्बंध घातलेले असताना, विविध संसदीय समित्यांच्या बैठका घेणे कितपत शक्य आहे यावर एम. व्यंकैय्या नायडू आणि ओम बिर्ला यांनी चर्चा केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या भविष्यात जर या बैठका नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने घेणे शक्य नसेल तर त्यासाठी इतर पर्यायी पद्धतींचा विचार करायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यानुसार, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या परिचालनाचे नियम लक्षात घेऊन या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे फायदे, तोटे यांची तपशीलवार तपासणी करण्याचे आदेश त्यांनी आज दोन्ही सभागृहाच्या महासचिवांना दिले. जगातील विविध देशांमध्ये अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत काही पर्यायी पद्धतीने बैठका घेण्याच्या प्रक्रिया आणि त्याबाबतचे अनुभव तसेच अशा बैठकांसाठी आवश्यक यंत्रणा निर्माण करण्यासाठी सुरक्षित तंत्रज्ञान मंचांची उभारणी यांचा साकल्याने विचार व्हावा अशा सूचना त्यांनी केल्या. या सर्व मुद्यांबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर विचार विमर्श केल्यानंतर संसदीय समित्यांच्या बैठका घेण्याबाबत दोन्ही पीठासीन अधिकारी निश्चित निर्णय घेणार आहेत.
* * *
G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621915)
Visitor Counter : 198
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Kannada
,
Malayalam