PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


डॉ हर्षवर्धन यांची महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा

Posted On: 06 MAY 2020 7:44PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, May 6, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

लसीचा विकास, औषध संशोधन, निदान आणि चाचणी या बाबतीत भारताच्या प्रयत्नांच्या सद्य स्थितीचा पंतप्रधानांनी सविस्तर आढावा घेतला. भारतीय लस कंपन्या दर्जा, उत्पादन क्षमता आणि जागतिक मान्यतेसाठी प्रसिध्द आहेत. याव्यतिरिक्त, ते लस विकास संशोधनाच्या प्रारंभिक टप्प्यात नवप्रवर्तक  म्हणून पुढे आले आहेत. त्याचप्रमाणे भारतीय शिक्षण आणि स्टार्ट अप्सही या क्षेत्रात अग्रेसर आहेत. 30 पेक्षा जास्त भारतीय लसी कोरोना लसीच्या विकासाच्या विविध टप्प्यात आहेत, त्यापैकी काही चाचणीच्या टप्प्यात आहेत.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकारच्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने वर्गीकृत, पूर्वदक्षता घेऊन सक्रीय उपाययोजना सुरु आहेत. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि  गुजरातचे आरोग्य आणि उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. दोन्ही राज्यांत कोविड-19 ची परिस्थिती, करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि व्यवस्थापन यावर या बैठकीत चर्चा झाली.

बिगर कोविड रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक आरोग्यसेवांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, यावर डॉ हर्षवर्धन यांनी भर दिला. तसेच SARI आणि ILI च्या सर्व संशयित रुग्णांचे स्क्रीनिंग आणि तपासणी केली जाईलच, याची विशेष दक्षता घ्यावी, जेणेकरुन काही नवे हॉटस्पॉट असतील, तर त्यांचा वेळेत शोध लागून निश्चित वेळेत धोरण आखता येईल आणि योग्य व्यवस्थापन करता येईल, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. कोविड-19 च्या रुग्णांबाबत असलेला भयगंड आणि त्यांना दिली जाणारी वेगळी वर्तणूक थांबवण्यासाठी आपल्याला संवादाच्या पद्धतीत महत्वाचे बदल करावे लागतील, असे ते म्हणाले. असे झाले तरच, रुग्णांचा तपास आणि नोंद योग्य वेळी होऊन वैद्यकीय व्यवस्थापनामुळे आजाराला बळी पडण्याचे प्रमाण कमी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आतापर्यंत देशभरातील 14,183 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात, 1,457 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर 28.72% टक्के इतका आहे. देशात कोरोनाच्या  एकूण रुग्णांची संख्या  49,391 वर पोहोचली आहे. कालपासून देशभरात 2,958 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

इतर अपडेट्स :

  • डिजिटल पेमेंटच्या सुविधांचा उपयोग करत, केंद्र सरकारने, प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेजअंतर्गत 5 मे 2020 पर्यंत सुमारे 39 कोटी गरजूंना 34,800 कोटी रुपयांची मदत केली आहे. कोविड-19 मुळे लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात, गरिबांना मदत व्हाही या हेतूने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 26 मार्च रोजी या पैकेजची घोषणा केली होती.
  • मालकवर्गाला डिजिटल अथवा आधार कार्डावरून ई-स्वाक्षरी घेण्यास कठीण जात असल्यामुळे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने टाळेबंदीच्या काळात मालक वर्गाला ईमेल पध्दतीने कर्मचाऱ्यांच्या ई -स्वाक्षऱ्या घेण्यास सुरुवात करायला परवानगी दिली आहे
  • केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील बस आणि कार चालकांना असे आश्वासन दिले आहे की सरकारला त्यांच्या समस्यांची पूर्णपणे जाणीव असून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार पूर्णपणे सहकार्य करेल. कोविड-19 महामारीच्या संकटकाळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पंतप्रधान आणि वित्तमंत्र्यांशी आपण  नियमित संपर्क साधत आहोत असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्रामध्ये 984 नव्या केसेससह एकूण रुग्णसंख्या 15,525 झाली आहे. आणखी 34  मृत्यूसह राज्यातील एकूण कोविड-19 मृत्यूसंख्या 617 झाली आहे. नवीन नोंद झालेल्या केसेसमध्ये 635 मुंबईतील आहेत मुंबईमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. मुंबईची एकूण रुग्णसंख्या 9,758 आहे. राज्यातील मृत्यूदर हा एक महिन्यापूर्वीच्या 7.2 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय मृत्युदर हा 3.2 टक्के आहे. महाराष्ट्र सरकारने लष्कर, नौदल, रेल्वे, बंदर विभाग आणि इतर केंद्रीय संस्थांना अतिदक्षता सेवेसाठी खाटा पुरवण्याची विनंती केली आहे. मुंबईच्या आयुक्तांनी शहरातील प्रभाग अधिकाऱ्यांना खाजगी रुग्णालयांमधील खाटा, वॉर्ड किंवा इतर सुविधा ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे.

 

***

RT/MC/SP/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621558) Visitor Counter : 254