PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
कोविड19 चे सर्वाधिक रुग्ण असणारे 20 देश यांची एकत्रित लोकसंख्या भारताएवढी, परंतु त्यांच्या तुलनेत भारतातील पेशंट 84 पट कमी तर मृत्यू 200 पट कमी: जागतिक आरोग्य संघटना
Posted On:
28 APR 2020 7:56PM by PIB Mumbai

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from field offices, and Fact checks undertaken by PIB)

दिल्ली-मुंबई, 28 एप्रिल 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्यात आज दूरध्वनीवरून संभाषण झाले. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या क्षेत्रात आणि जगात पसरलेल्या कोविड-19 साथीबद्दल चर्चा केली. इंडोनेशियाला औषध उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रशंसा केली. वैद्यकीय उत्पादने किंवा दोन्ही देशांमधील व्यापारातील इतर वस्तूंच्या पुरवठ्यात येणारी अडचण दूर करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी केले.
ICMR ने हे स्पष्ट केले आहे की कोविड-19 साठी प्लाज्माथेरपीसह, अद्याप कोणतीही मान्यताप्राप्त उपचारपद्धती नाही, सध्या आपण प्रयोगात्मक पातळीवर आहोत. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्याबाबत कोणताही पुरावा आपल्याकडे नाही. ICMR या थेरपीचा प्रभाव तपासत आहे. कोविड-19 वर उपचार करण्यासाठी प्लाज्मा उपचारपद्धती किती परिणामकारक आहे, हे अभ्यासण्यासाठी, ICMR म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, प्रयोगांद्वारे अभ्यास करत आहे. या अभ्यासाला मान्यता मिळेपर्यंत कोणीही त्याचा वापर करू नये, ते रुग्णासाठी घातक ठरू शकते, तसेच ते बेकायदेशीरही ठरेल असे संयुक्त सचिव, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी खालील माहिती दिली.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी कोविड-19 घडामोडींवरील माहिती दिली.
- केंद्रीय पथकाला असे आढळले की सुरत चे प्रशासन कोविड19 चे रुग्ण शोधण्यासाठी आणि ट्रॅकिंगसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. आरोग्य यंत्रणा, निरीक्षण यासाठी GIS मॅपिंगचा वापर करुन त्यानुसार विश्लेषण केले जात आहे.- गृह मंत्रालय
- सुरत नगरपरिषद वॉररूम आणि डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या मदतीने सुरत प्रशासन कोविड-19 चे वेळेवर निदान होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात तपासण्या करत आहे. देखरेखीसाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही वापरले जात आहेत. लॉकडाउनच्या नियमांचे बव्हंशी काटेकोर पालन केले जात आहे.- गृह मंत्रालय
- सुरतमधील प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि उद्योगक्षेत्र एकत्रितपणे स्थलांतरित मजुरांसाठी अन्नधान्याची पाकिटे तयार करत आहेत. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मातृभाषेत कोविड-19 ची माहिती देण्याची सूचना IMCT ने केली आहे.
- मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्या वस्त्र आणि हिरे उद्योग क्षेत्रातील भागधारकांशी आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाने चर्चा केली. बहुतांश कामगारांना गेल्या महिन्याचे वेतन मिळाले आहे. भविष्यकालीन नियोजनही करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने सुरत प्रशासनाला दिल्या आहेत.
- अहमदाबाद च्या केंद्रीय पथकाला असे आढळले की पोलीस आणि वैद्यकीय पथके मिळून विलगीकरण क्लस्टर्सच्या प्रवेशाच्या ठिकाणांवर संयुक्तरित्या निरीक्षणकार्य करत आहेत. रुग्णालयातल्या सुविधा समाधानकारक असल्याचे त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर समजले
- अहमदाबादला भेट देणाऱ्या केंद्रीय पथकाने असे निरीक्षण नोंदविले आहे की, रुग्णांना कोविड-19 च्या खास रुग्णालयांमध्ये हलविण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडे पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत. सुमारे 19-20 रुग्णांना अशा रुग्णालयांत हलविण्यात आले आहे.
- अहमदाबाद प्रशासनाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याबरोबरच अन्य अनेक मार्ग अवलंबले आहेत. यामध्ये, माहितीच्या विविध स्रोतांचा वापर जसे निवडणुक याद्या, प्रोजेक्ट लाइफलाईनसारखे प्रकल्प इ. कोविड19 ला बळी पडू शकणाऱ्या अधिकाधिक लोकांना हेरून त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत
- अहमदाबादच्या केंद्रीय पथकाने अशी सूचना केली आहे की केंद्र सरकारच्या मदतीने राज्यातल्या सरदार पटेल रुग्णालयात एक बहुशाखीय संशोधन विभाग सुरु केला जाऊ शकतो, जिथे कोविड-19 च्या चाचणी सुविधा सुरु केल्या जाऊ शकतील
- लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी समाधानकारकरित्या होत असल्याचे केंद्रीय पथकाला आढळले आहे. सामाजिक नियमांचे पालन होत असल्यावर देखरेख ठेवण्यासाठी अहमदाबाद पोलिस ड्रोनतंत्रज्ञानासारख्या अभिनव पद्धती वापरत आहे.
- कठवाडा आणि नरोडा निवाराकेंद्रांना केंद्रीय पथकाने भेट दिली. शारीरिक अंतर राखण्यासाठी, कामगारांची व्यवस्था 33 निवाराकेंद्रांमध्ये करण्यात यावी, असे या पथकाने सुचविले. सदर निवाराकेंद्रांमध्ये पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
- अहमदाबादच्या पथकाला असेही आढळले की प्रत्येक ग्रामपंचायतीने 'ग्राम योद्धा समिती' स्थापन केली असून लॉकडाऊनच्या नियमांंचे पालन आणि घरोघरी अत्यावश्यक वस्तू पोहचवण्याचे काम ही समिती करत आहे. ही व्यवस्था इतर राज्यातही निर्माण केली जावी, अशी शिफारस या पथकाने केली आहे.
- अहमदाबादला भेट देणाऱ्या केंद्रीय पथकाच्या निरीक्षणानुसार, साणंद औद्योगिक क्षेत्रात औषध कंपन्या सुरू आहेत. वाहन उद्योगही 50% क्षमतेवर सुरू आहे. 50,000 कामगारांपैकी सुमारे 30,000 जण परतले आहेत.
- भारतात आतापर्यंत कोविड-19 चे 29,435 रुग्ण आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या -21,632 गेल्या 24 तासांत 1543 नवे रुग्ण तर 684 रुग्ण बरे झाले. आतापर्यत 6868 रुग्ण बरे झाले, रुग्ण बरे होण्याचा दर 23.3 % असून यात सकारात्मक वाढ होत आहे.
- गेल्या 28 दिवसांत कोविड-19 चा एकही नवीन रुग्ण न सापडलेल्या जिल्ह्यांची संख्या आता 17 झाली आहे. (या यादीत 2 जिल्ह्यांची भर पडली, तर एक जिल्हा यातून वगळावा लागला आहे.)
- आरोग्य मंत्र्यांनी आज जैवतंत्रज्ञान विभाग आणि तिच्या 18 स्वायत्त संस्था तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्था यांच्यासोबत बैठक घेतली. मेक इन इंडिया अंतर्गत, अँटी बॉडी चाचण्यांच्या किट्स, RT-PCR चाचण्या आणि कोविड19 लस संशोधनाला गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
- दिल्लीचे नायब राज्यपाल, दिल्लीचे आरोग्यमंत्री, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस उपायुक्त तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्याबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बैठक घेतली. कोविड-19 वरच्या देखरेख आणि सर्वेक्षणाचा यावेळी आढावा घेण्यात आला.
- अत्यंत सौम्य/पूर्व लक्षणे आढळलेल्या रुग्णांच्या गृह अलगीकरणासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ज्यांच्या घरात अलगीकरणासाठीच्या पुरेशा सोयी आहेत, त्यांना घरातच स्वयं-अलगीकरणासाठी त्याचा वापर करता येईल
- प्लाज्मा उपचारपद्धती मार्गदर्शक सूचनांनुसार वापरली न गेल्यास, पेशंटच्या जीवाला धोकादायक असे गंभीर परिणाम होऊ शकतात. कोविड-19 वरील उपचारपद्धती म्हणून तिला मान्यता मिळेपर्यंत, या उपचारपद्धतीच्या परिणामकारकतेबद्दल कोणताही दावा करणे व त्याचा प्रसार करणे, योग्य ठरणार नाही.
- प्रत्येक आयुष्य आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक मृत्यू दुखदायक आहे परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार असे आढळून आले की ज्या देशांत कोविड-19 जे सर्वाधिक रुग्ण आहेत, अशा 20 देशांची एकत्रित लोकसंख्या, भारताच्या लोकसंख्येइतकी आहे. या एकत्रित लोकसंख्येचा विचार करता, भारताच्या तुलनेत तिथे कोरोनाचे 84 पट अधिक रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, ज्या 20 देशांमध्ये कोविड-19 ची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली आहे, त्या 20 देशांत कोविड-19 मुळे ओढवलेल्या एकूण मृत्युसंख्येच्या 1/200 इतके बळी भारतात गेले आहेत.- आरोग्य मंत्रालय
- जागतिक स्तरावर, कोविड-19 चा संसर्ग पुन्हा होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे, त्यामुळे ठोस पुरावा नसतांना, कोविड-19 ची आताची सर्वात प्रमाणित चाचणी RT-PCR ने बरे झाल्याचे प्रमाणित केलेल्या रुग्णांना सध्यातरी संपूर्ण निरोगी समजणेच योग्य ठरेल
- एखाद्या आरोग्यसेवा केंद्रात कोणी कोविड-19 रुग्ण आढळल्यास, योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण प्रक्रिया करून ते सेवाकेंद्र पुन्हा उपयोगात आणता येईल. तसेच, कामाच्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्यास, योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करून घेऊन पुन्हा कामासाठी वापर सुरू करता येईल.
- कोविड-19 ची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी लॉकडाऊनच्या आधी 3-3.25 दिवस इतका होता, आता तो 10.2 दिवस इतका झाला आहे. याचे मुख्य कारण, कंटेंनमेंट, शारीरिक अंतर आणि लॉकडाऊन च्या अंमलबजावणीकडे दिलेले लक्ष हेच आहे.
वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
इतर अपडेट्स :
- केंद्रीय नौवहन राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीया यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भारतीय बंदरातील कर्मचाऱ्यांच्या बदला संदर्भात मालवाहू जहाज कंपन्या, जहाज कंपन्या, सागरी संघटना आणि खलाशी कामगार संघटनांशी संवाद साधला आणि सध्या कार्यरत असलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय समुद्रात अडकलेल्या भारतीय खलाशांचा परिस्थितीचा आढावा घेतला.
- पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) फॅक्ट चेक युनिटने एका ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे की केंद्र सरकार, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात कोणतीही कपात करणार नाही. कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार अशा प्रकारच्या हालचालींची योजना आखत असल्याचा अंदाज वर्तविणाऱ्या माध्यमांच्या अहवालावरील तथ्य या ट्विटमध्ये उघड करण्यात आले आहे.
- कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि लॉकडाऊन नंतरच्या कार्य नियोजनात संरक्षण दलाच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम विभागाच्या आणि आयुध कारखाना मंडळाच्या सज्जतेविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्हिडीओ कॉफरन्सद्वारे आढावा घेतला. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात नवीन उत्पादनांच्या योजनाबद्ध निर्मितीत नाविन्यपूर्ण कौशल्य राबविल्याबद्दल आणि स्थानिक प्रशासनाला विविध प्रकारे मदत केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलाच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम विभागाचे कौतुक केले.
- कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावरील लॉकडाऊन दरम्यान, रसायने आणि खत मंत्रालयाच्या खत विभागाने, शेतकरी समुदायाला खतांची विक्रमी विक्री केली आहे. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावरील लॉकडाऊन दरम्यान बऱ्याच प्रमाणावरील निर्बंध असतानाही खते, रेल्वे, राज्ये आणि बंदर विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे देशात खतांचे उत्पादन व पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु आहे.
- ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या सोयीसाठी आधार म्हणजे UIDAI ने कॉमन सर्विस सेंटर्स (CSCs) उघडली आहेत. कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी घातलेल्या लॉकडाऊन निर्बंधातही CSC मधून आधार अद्ययावतीकरण होणे हा मोठा दिलासा आहे.
- संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यामुळे लॉकडाउन सुरू आहे. अशा काळातही देशाच्या सर्व भागांमध्ये गव्हाच्या कापणीचे काम जोरदार सुरू आहे. सध्या खरीपाच्या पिकांची कापणी, मळणी अशी कामे सुरू आहेत. हे काम करताना सर्व भागातले शेतकरी सामाजिक अंतर राखण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करीत कृषी कार्ये पार पाडत आहेत.
- नौवहन मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की कोविड -19 मुळे जीवितहानी झाल्यास बंदर कर्मचा-यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना / कायदेशीर वारसांना सर्व प्रमुख बंदरे पुढीलप्रमाणे भरपाई / सानुग्रह अनुदान देऊ शकतात
- देशातील सर्व प्रमुख धान्य खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये गहू खरेदी जलद गतीने सुरू आहे. 26.एप्रिल2020 पर्यंत केंद्रीय साठ्यासाठी 88.61 लाख मेट्रिक टन (एलएमटी) गहू यापूर्वीच खरेदी करण्यात आला आहे. सध्याचा खरेदीचा वेग पाहता चालू हंगामासाठी ठेवलेले 400 लाख मेट्रिक टनचे उद्दिष्ट गाठले जाण्याची शक्यता आहे. कोविड-19 विषाणूच्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, पुरेशी सावधानता बाळगून आणि बाजारपेठांमध्ये सामाजिक अंतर सुनिश्चित करून खरेदीचे काम सुरु आहे.
- रेल्वे प्रवासी तसेच सर्व व्यापारी ग्राहकांच्या हिताची काळजी घेत देशभर वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याची काळजी भारतीय रेल्वे घेत आहे. कोविड-19 च्या फैलावाला अटकाव घालण्यासाठी लॉकडाऊन-1 आणि 2 मध्ये भारतीय रेल्वेने प्रवासी रेल्वेगाड्या पूर्णपणे बंद ठेवल्या आहेत. लोकांच्या गरजा ऐकण्यासाठी आणि त्यांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित असण्याची गरज म्हणून कोविडसाठीचा रेल्वे आपत्कालीन कक्ष स्थापण्यात आला.
- भारतातील कोरोना विषाणू महामारीतील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पश्चिम रेवेच्या साधनसामग्री व्यवस्थापन विभागाने वैद्यकीय विभागाशी संपर्क साधून, कोविड-19 साथीच्या आजारा विरोधातील लढाईत डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि रुग्णांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा वेळेवर करण्यासाठी मुख्यालय, जिल्हा आणि विभागीय अधिकाऱ्यांचा एक समर्पित गट स्थापन केला आहे.
- नोवेल कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सर्व गरजा भागविण्यासाठी भारतीय वायुदल सज्ज झाले आहे. महामारीचा प्रादुर्भाव परिणामकारकरीत्या रोखण्यासाठी राज्य सरकार आणि सहाय्यक संस्थांना सुसज्ज ठेवण्याकरिता भारतीय वायुदल औषधे, शिधा यासारख्या जीवनावश्यक वस्तू तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वाहतूक करीत आहे.
- कोविड -19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी देशातल्या पालकांशी वेबिनारद्वारे संवाद साधला. मंत्रालयाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमाबाबत काळजी असल्यामुळे युद्धपातळीवर सध्याच्या योजना राबवल्या जात असून त्याचा देशातल्या 33 कोटी विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र अपडेट्स
- कोविड-19 विरोधात देश लढा देत असताना या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांची असलेली मोठी गरज लक्षात घेऊन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय विविध उपाययोजना राबवित आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत मेडीकल, नर्सिंग आणि हेल्थ केअर सेक्टरमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आतापर्यंत एकूण 10 हजार 815 युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात आले आहे. सध्या देशभरात होत असलेला कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणेवरिल ताण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता या उमेदवारांच्या सेवांचा उपयोग होऊ शकेल.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नविन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरणासाठी उद्या दि. 29 व 30 एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नविन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे काम 29 व 30 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
- राज्यात आज कोरोनाबाधीत 522 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 8590 झाली आहे. आज 94 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1282 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 6939 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
PIB FACTCHECK



***
DJM/RT/MC/SP/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1619060)
|