• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत हेल्थ केअर सेवांबाबत 10 हजार 815 उमेदवारांना प्रशिक्षण


कोवीड -19 शी देश लढा देत असताना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या विविध उपाययोजना

लॉक डाऊन काळात सर्व प्रशिक्षणार्थींना पूर्ण विद्यावेतन देण्याचे निर्देश

Posted On: 28 APR 2020 4:04PM by PIB Mumbai

मुंबई, 28 एप्रिल 2020

 

कोविड-19 विरोधात देश लढा देत असताना या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांची असलेली मोठी गरज लक्षात घेऊन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय विविध उपाययोजना राबवित आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत मेडीकल, नर्सिंग आणि हेल्थ केअर सेक्टरमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आतापर्यंत एकूण 10 हजार 815 युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात आले आहे. सध्या देशभरात होत असलेला कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणेवरिल ताण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता या उमेदवारांच्या सेवांचा उपयोग होऊ शकेल. त्यादृष्टीने या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत विचार व्हावा, अशी शिफारस सोसायटीमार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांची यादी पाठवून करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये या उमेदवारांची मदत घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. प्रशिक्षीतांपैकी 985 उमेदवारांनी नियुक्तीसाठी होकारही दिला असून विविध जिल्हे आणि महापालिकांमार्फत या उमेदवारांना नियुक्त्या देण्याचे विचाराधीन आहे. काही ठिकाणी त्याप्रमाणे कार्यवाही देखील करण्यात येत आहे. सोसायटीमार्फत प्रशिक्षण देण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये आरोग्य सेवा क्षेत्रातील बेडसाईड असिस्टंट, नर्सिंग एड, जनरल ड्युटी असिस्टंट, जनरल ड्युटी अटेंडंट, लॅबोरेटरी असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्निशियन, डायलेसीस असिस्टंट, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन तसेच फार्मसी असिस्टंट  यांचा समावेश आहे. 

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने विविध राज्यांमधील आरोग्य क्षेत्रातील 1,75,000 व्यावसायिकांचे संपर्क तपशील (मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ते) सर्व मुख्य सचिवांना पाठविले आहेत. कोशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या कौशल्य यंत्रणेंतर्गत या प्रशिक्षित व्यावसायिकांमध्ये आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ, जनरल ड्यूटी असिस्टंट्स, फ्लेबोटॉमी टेक्निशियन, होम हेल्थ एड टेक्निशियन इत्यादींचा समावेश आहे. कोविड -19 रूग्णांच्या अलगीकरण आणि विलगीकरणादरम्यान त्यांच्या सेवांचा लाभ घेणे शक्य आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. ते राज्य प्रशासनाच्या संपर्कात असून आवश्यकतेनुसार या कर्मचार्‍यांना तैनात करतात.

याशिवाय, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेसारख्या 33 क्षेत्रीय संस्थांचा वापर अलगीकरण/ विलगीकरण कक्ष तसेच तात्पुरती वैद्यकीय शिबिरे इत्यादीसाठी करता येईल, असे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे महासंचालक (प्रशिक्षण) यांनी आपल्या 31 मार्च 2020 रोजीच्या पत्रान्वये सर्व मुख्य सचिवांना कळविले आहे. त्याचबरोबर या कामी, आपापल्या राज्यातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुविधांचाही लाभ घ्यावा, असा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. एकूण 15,697 औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्यात सरकारी क्षेत्रातील 3,055 तर खाजगी क्षेत्रातील 12,642 संस्थांचा समावेश आहे. 

दरम्यान, एमएसडीईने एक आदेश जारी केला असून अधिसूचित आणि पर्यायी व्यवसायांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना, लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रशिक्षणार्थींना पूर्ण विद्यावेतन देण्यास सांगितले आहे. याशिवाय, मंत्रालय या आस्थापनांना मंजूर दरानुसार विद्यावेतनाचा परतावा सुद्धा देणार आहे.

मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही https://covidwarriors.gov.in/  या पोर्टलवर कोविड योद्धा म्हणून सहभागी होऊन देशसेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या द्वारे सामाजिक संघटनाचे स्वयंसेवक, समाजातले प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन परस्परांशी जोडले जात आहेत.अगदी कमी वेळेत यावर डॉक्टर, परिचारिका, आशा कार्यकर्त्या, एनसीसी, एनएसएस असे 1.25 कोटी लोक या पोर्टलचे भाग झाले आहेत. स्थानिक स्तरावर आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात या कोविड योध्यांची बहुमोल मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

* * *

 

R.Tidke/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1618932) Visitor Counter : 121

Read this release in: English

Link mygov.in