Posted On:
14 APR 2020 6:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020
कोविड-19 ला आळा घालण्यासाठी तसेच प्रतिबंध आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने अनेक पावले उचलत आहे. या सर्व उपाययोजनांचा सर्वोच्च पातळीवरुन नियमितपणे आढावा घेतला जात असून देखरेख ठेवली जात आहे.
राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांकडून पुढील सात मुद्यांवर मदतीचे आवाहन केले.
1. तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, विशेषतः ज्यांना आधीपासून गंभीर आजार आहेत, त्यांची विशेष काळजी घेणे
2. लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या लक्ष्मणरेषेचे काटेकोर पालन करणे. घरी बनवलेल्या मास्कचा न चुकता वापर करणे
3. आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुचवलेल्या सूचनांचे पालन करणे, उदा. गरम पाणी, काढा पिणे
4. आरोग्यसेतू मोबाईल ऍप डाऊनलोड करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत करणे
5. गरीबांची काळजी घेणे, त्यांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करणे.
6. तुमच्या व्यवसाय किंवा उद्योगात काम करत असलेल्या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करा, त्यांच्या उपजीविकेची काळजी घ्या
7. आपल्या देशाचे कोरोना योद्धे - डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना सन्मान आणि आदर द्या
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय देशातील आरोग्य विषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह नियमितपणे आणि कठोरपणे काम करत आहे. आतापर्यंत 1,06,719 अलगीकरण खाटा आणि 12,024 आयसीयू खाटा असलेली एकूण 602 कोविड -19 समर्पित रुग्णालये विकसित करण्यात आली आहेत.
केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने दाट लोकवस्ती असलेल्या भागात कोविड -19 चा प्रसार नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. स्वच्छताविषयक सोपे उपाय आणि सामुदायिक वापर होणाऱ्या शौचालय, धुणे-भांडी किंवा आंघोळीच्या सुविधांवर लक्ष केंद्रित करुन उपाययोजना आखण्यावर या नियमावलीत भर देण्यात आला आहे.
कालपासून आतापर्यंत कोविड-19 चे 1211 नवे रुग्ण आढळले असून 31 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 1036 रुग्ण कोविड19 च्या आजारातून बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.
कोविड -19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे, तांत्रिक बाबी किंवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया पुढील संकेतस्थळाला नियमित भेट द्या : https://www.mohfw.gov.in/.
कोविड19 संदर्भात तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, पुढील ई -मेल आयडी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in.
कोविड19 संदर्भात इतर शंकांसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा हेल्पलाईन क्रमांक : +91-11-23978046 or 1075 (Toll-free)
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन क्रमांकांची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf वर उपलब्ध आहे.
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor