उपराष्ट्रपती कार्यालय

लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक वर्ष सुरु राहील याची काळजी घेण्याचे उपराष्ट्रपतींचे विद्यापीठांना आवाहन


ऑनलाईन अध्ययनासाठी विद्यापीठांनी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करावा- उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींचा दिल्ली विद्यापीठ, पंजाब माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठाचे कुलगुरू आणि आयआयपीएच्या संचालकांशी संवाद

Posted On: 13 APR 2020 3:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020

 

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विविध विद्यापीठांचे कुलागुरु आणि इतर शिक्षणसंस्थांच्या संचालकांशी संवाद साधला. लॉकडाऊन च्या काळात शैक्षणिक वर्षात खंड पडू नये, याची व्यवस्था करावी, अशी सूचना नायडू यांनी यावेळी केली.

उपराष्ट्रपतींनी दिल्ली, पुद्दुचेरी, पंजाब, माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठाचे कुलगुरू आणि शिक्षणसंस्थांच्या संचालकांशी चर्चा केली. सगळी परिस्थिती सामान्य होण्यासाठी अजून बराच अवधी लागण्याची शक्यता आहे, मात्र या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

सध्या विद्यापीठांनी ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून सहकार्यातून शिक्षण आणि स्वयंशिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे नायडू म्हणाले. विद्यार्थ्यांना संवादात्मक शिक्षण देता यावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करा, अशी सूचना त्यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करातांनाच ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवल्याबद्दल त्यांनी विद्यापीठांचे कौतुक केले. 

सध्या वसतिगृहांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करावी असेही निर्देश नायडू यांनी दिले. विद्यार्थ्यांनी उत्तम सवयी लावाव्यात, रोज व्ययाम करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

सुट्टीच्या काळाचे नियोजन कसे करता येईल, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करावे, अशी सूचनाही यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांनी केली. तसेच, विद्यार्थ्यांनी या काळात जमेल तशी समाजसेवा करावी , असा सल्लाही त्यांनी दिला.

 

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1613928) Visitor Counter : 149