आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती

Posted On: 06 APR 2020 5:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

देशामध्ये कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव थांबवण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना केल्या आहेत.त्यावर अतिशय उच्च स्तरावरून देखरेख केली जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव विविध जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने चर्चा करून राज्यांच्या सर्व भागात सुरू असलेल्या उपाययोजना समान पद्धतीने सुरू राहाव्यात याची दक्षता घेत आहेत. सर्व जिल्ह्यांना कोविड-19 संदर्भात जिल्हास्तरीय व्यवस्थापन योजना सज्ज ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

कोविड-19च्या प्रतिबंधासाठी विलगीकरण सुविधा उभारण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सविस्तर मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. विलगीकरण केलेल्या इतर व्यक्तींमधून संशयित आणि जास्त धोका असलेल्या संपर्कांना( संपर्कात आलेल्यांना) लवकरात लवकर वेगळे करण्यावर या मार्गदर्शक तत्वांचा भर आहे. या मार्गदर्शक तत्वांची माहिती https://www.mohfw.gov.in/pdf/90542653311584546120quartineguidelines.pdf येथे उपलब्ध आहे.

कोविड-19 रुग्णांच्या उपचारांच्या/ निदानाच्या/ विलगीकरणाच्या वेळी निर्माण झालेल्या कचऱ्याची हाताळणी, प्रक्रिया आणि विल्हेवाट यासंदर्भात देखील मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे

 https://www.mohfw.gov.in/pdf/63948609501585568987wastesguidelines.pdf येथे उपलब्ध आहेत. त्याशिवाय कोविड-19च्या प्रादुर्भावाच्या काळात मनावर आलेला ताण आणि निर्माण झालेली अस्वस्थता कमी करण्यासाठी काही माहितीपूर्ण व्हिडिओ देखील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर पोस्ट करण्यात आले आहेत.

राज्यांना यापूर्वीच राष्ट्रीय आरोग्य मोहीम(एनएचएस) आणि राज्य आपत्ती मदतनिधी( एसडीआरएफ) यांचा वापर करावा आणि कोविड-19 प्रादुर्भावाच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्व उपाययोजना करण्यासाठी म्हणजे विलगीकरण केंद्रांची, केवळ कोविड-19 वर उपचार देणाऱ्या रुग्णालयांची निर्मिती आणि वैद्यकीय सामग्रीचे उत्पादन, रुग्णांवर उपचार आणि इतर उपाययोजना कराव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त एनएचएमने यापूर्वीच सर्व राज्यांसाठी 1100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि आज 3000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला आहे. तसेच एन-95 मास्क, व्हेंटिलेटर्स आणि पीपीई अर्थात वैयक्तिक संरक्षण सामग्री यांची खरेदी केंद्रीय निधीमधून करण्यात येत आहे आणि देशभरातील सर्व राज्यांना त्यांचे वितरण केले जात आहे.

आतापर्यंत देशभरात कोविड-19 च्या संसर्गाची पुष्टी झालेले 4067 रुग्ण आढळले आहेत आणि 109 जणांचा मृत्यू झाला आहे. 291 रुग्ण उपचारांनंतर बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार पुष्टी झालेल्या एकूण रुग्णांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहेः

•          लिंगानुसार वर्गवारी:

o          76% पुरुष आहेत 

o          24% स्त्रिया आहेत

•          वयोमानानुसार वर्गवारी:

o          47% लोक – 40 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत

o          34% लोक – 40 ते 60 या वयोगटातील आहेत

o          19% लोक – 60 आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील आहेत.

कोविड-19 मुळे दगावलेल्या 109 रुग्णांच्या अहवालांचे विश्लेषण केल्यावर खालील निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेतः

•          लिंगनिहाय वर्गवारी:

o          73% पुरुष आहेत

o          27% महिला आहेत

•          वयोमानाची वर्गवारी:

o          63% मृत्यू जास्त वयोमानाच्या म्हणजे (60 वर्षे आणि त्यावरील) व्यक्तींचे आहेत.

o          30% मृत्यू 40 ते 60 या वयोगटातील आहेत.

o          7% मृत्यू 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचे आहेत.

आतापर्यंत दगावलेल्यांमध्ये 86% व्यक्तींना मुख्यत्वे मधुमेह, मूत्रपिंडाचे जुनाट आजार, रक्तदाब आणि हृदयरोग असे आजार असल्याचे दिसून आले आहे. मात्र, पुष्टी झालेल्या रुग्णांमध्ये जास्त वयोमान असलेल्या रुग्णांचे प्रमाण 19% होते आणि त्या वयोगटातील 63% रुग्ण दगावले असल्याने जास्त वयाच्या व्यक्तींना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे. तसेच 60 वर्षांखालील व्यक्तींमध्ये 37 टक्के मृत्यूची नोंद झाली आहे तर सुमारे 86% मृत्यू विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे असल्यामुळे तरुण वर्ग आणि इतर आजारांच्या समस्या असलेल्यांना देखील या आजाराचा जास्त धोका आहे.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि नियमावली संदर्भात अधिकृत आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे पुढील संकेतस्थळाला भेट द्या. https://www.mohfw.gov.in/.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक प्रश्न  technicalquery.covid19[at]gov[dot]in या ईमेलवर आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in या ईमेलवर पाठवता येतील.

कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला फोन करा. हेल्पलाईन क्रमांक: +91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री). राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 (Release ID: 1611752) Visitor Counter : 183