गोवा, 21 नोव्हेंबर 2026
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि स्पेन नव्या संधींचा शोध घेत आहेत. दोन्ही देशांमधील चित्रपटांच्या संयुक्त निर्मितीसंदर्भातील करारात सुधारणा करण्यासह जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेद्वारे सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे.
57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीत स्पेनला सन्माननीय देशाचा दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव (प्रसारण) पृथुल कुमार यांनी मंत्रालयाचे अधिकारी आणि इंडिया सिने हबच्या प्रतिनिधींसह गोवा येथे स्पेनच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. स्पेनच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या स्पॅनिश इन्स्टिट्यूट ऑफ सिनेमॅटोग्राफी अँड ऑडिओव्हिज्युअल आर्ट्सच्या महासंचालक मार्टा सेरानो यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीत भारत आणि स्पेन यांच्यात चित्रपट आणि दृकश्राव्य निर्मिती क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांतील चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील निर्मात्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संयुक्त चित्रपट निर्मिती करारात सुधारणा करण्याबाबतही विचारविनिमय झाला.

भारत आणि स्पेन यांच्यात दृकश्राव्य सहनिर्मितीसंदर्भातील करार 2012 मध्ये करण्यात आला होता. चित्रपट आणि दृकश्राव्य निर्मिती क्षेत्रातील दोन्ही देशांचे सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी या करारात सुधारणा करण्याबाबत चर्चा सुरू आहे. स्पेनने मांडलेल्या प्रस्तावानुसार, या सहकार्यामध्ये काल्पनिक कथांवर आधारित चित्रपट, ॲनिमेशन, माहितीपट, दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपट निर्मितीचा समावेश असेल.
57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पेनला सन्माननीय देशाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे स्पेनमधील समकालीन चित्रपटांची ओळख करून देण्याबरोबरच भारत आणि स्पेनमधील चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांना परस्परांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. हा महोत्सव गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होत आहे. दरम्यान, पणजी येथे 20 ते 24 नोव्हेंबरदरम्यान आयोजित व्हेव्स चित्रपट बझारच्या 20 व्या आवृत्तीतही दोन्ही देशांतील दृकश्राव्य क्षेत्रातील सहकार्याला चालना मिळणार आहे. या अंतर्गत 22 नोव्हेंबर रोजी विशेष स्पॅनिश दिन आयोजित करण्यात आला असून, त्यात चित्रपट उद्योगाशी संबंधित चर्चासत्र आणि दोन्ही देशांतील प्रतिनिधींना परस्परांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
दृकश्राव्य क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे, संयुक्त चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि सर्जनशील क्षेत्रातील परस्पर सहकार्य व व्यावसायिक देवाणघेवाण वाढवणे, याबाबत भारत आणि स्पेन यांच्यात एकमत असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे