गोवा, 21 नोव्हेंबर 2026
57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग म्हणून प्रसार भारतीने आज पणजी येथील कला अकादमीमध्ये ‘पेज से पिच तक’ या पहिल्या पटकथा सादरीकरण उपक्रमाचे उद्घाटन केले. प्रसार भारतीचे अध्यक्ष पद्मश्री प्रसून जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. देशभरातील नवोदित लेखकांना त्यांच्या पटकथा सादर करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये चित्रपट, माहितीपट आणि लघुपट या प्रकारांसाठी भारतातील 10 भाषांमध्ये पटकथा सादर करता येणार आहेत.
_20261121203817_8d21e3.jpeg)
या प्रसंगी बोलताना प्रसून जोशी यांनी वैयक्तिक अनुभव आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आलेल्या अस्सल कथांच्या महत्त्वावर भर दिला. देशाच्या विविध भागांतून पुढे येणाऱ्या कथा आणि वेगवेगळ्या शैलीतील लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रसार भारती कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील प्रत्येक प्रदेश आणि लोकपरंपरेत स्वतःची वेगळी कथा दडलेली आहे. तेथील स्थानिक संस्कृती समजून घेतल्यास या कथा खऱ्या अर्थाने मांडता येतात आणि समजून घेता येतात, असेही त्यांनी नमूद केले.

दूरदर्शनच्या महासंचालक रीना सोनवाल कौली यांनी स्वागतपर भाषण केले. भारतातील भाषिक आणि सर्जनशील विविधता अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत 10 स्पर्धक परीक्षक मंडळासमोर त्यांच्या मूळ पटकथा सादर करत आहेत. या परीक्षक मंडळात पद्मश्री तथा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त अभिनेते मनोज जोशी, भारतीय इतिहास, संस्कृती आणि साहित्याचे अभ्यासक, लेखक व संपादक संदीप बालकृष्ण, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि संकलक नारायण सिंह, तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते पत्रकार, लेखक आणि चित्रपट समीक्षक अनंत विजय यांचा समावेश आहे. अनंत विजय हे पुण्यातील एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत.

या उद्घाटन सोहळ्याला पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा, भारताचे प्रेस रजिस्ट्रार जनरल आणि प्रधान महासंचालक योगेश कुमार बावेजा, तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव (प्रसारण आणि प्रशासन) पृथुल कुमार उपस्थित होते. हा पटकथा सादरीकरण उपक्रम 21 ते 23 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होत आहे. या वार्षिक उपक्रमाच्या माध्यमातून नवोदित लेखकांना चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांशी जोडणे आणि त्यांच्या मूळ कल्पनांवर आधारित चित्रपट, माहितीपट आणि लघुपट तयार करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, हा प्रसार भारतीचा उद्देश आहे. पेज से पिच तक या उपक्रमातील विजेत्यांची घोषणा 24 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात येणार आहे.


Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे