57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

उद्याचे चित्रपट निर्माते घडवण्याचा उपक्रम: भावी सर्जनशील प्रतिभावंत ( सीएमओटी) उपक्रमाद्वारे 100 तरुण सर्जक प्रतिभावंतांचा 57 व्या इफ्फी मध्ये समावेश


चित्रपट उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी या उपक्रमाच्या सहाव्या वर्षीच्या कार्यक्रमात 13 चित्रपटनिर्मिती कौशल्यांवर अधिक प्रकाश टाकत 48-तासांचे आव्हान आणि प्रतिभा शिबीर यांचे आयोजन

Posted On: 19 NOV 2026 11:29AMby PIB MumbaiRelease ID: 2338366Views: 32

गोवा, 19 नोव्‍हेंबर 2026

 

प्रदर्शनाच्या टप्प्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या मागे त्याची कथा, आवाज तसेच दृश्यमय  ओळखीमध्ये योगदान देणाऱ्या सर्जनशील प्रतिभावंतांचा एक संघ असतो. या सामुहिक प्रतिभेचे महत्त्व ओळखून, गोव्यात उद्या पासून होऊ घातलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे (एनएफडीसी) राबवण्यात येणाऱ्या, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भावी सर्जनशील प्रतिभावंत (क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो - सीएमओटी) या उपक्रमाच्या सहाव्या वर्षीच्या कार्यक्रमाद्वारे देशभरातील 100 तरुण प्रतिभावंत एकत्र येत आहेत.  

यावर्षीच्या महोत्सवामध्ये दिग्दर्शन, अभिनय,छायाचित्रण, संकलन आणि उपशीर्षके, पटकथा लेखन, पार्श्वगायन, संगीत संयोजन, ध्वनिमुद्रण, वेशभूषा, केशरचना तसेच मेकअप, कला दिग्दर्शन, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स), वर्धित वास्तव (ऑगमेंटेड रिअॅलिटी -एआर), आभासी वास्तव(व्हर्च्युअल रिअॅलिटी - व्हीआर), आणि व्हॉईस ओव्हर आणि डबिंग इत्यादी चित्रपटनिर्मितीशी संबंधित 13 कौशल्य क्षेत्रातील होतकरु व्यावसायिक एकत्र येणार आहेत. चित्रपट विषयक सर्जनाच्या विविध शाखांतील सहभागींना एकत्र आणून हा उपक्रम परस्पर सहयोगाला चित्रपट निर्मितीविषयक अनुभवांच्या केंद्रस्थानी ठेवतो.

या उपक्रमातील सहभागींच्या निवडीची प्रक्रियेत चित्रपट क्षेत्रातील शिक्षण आणि उद्योगातील सराव यांच्या दृष्टीकोनांचा मेळ घातला गेला आहे. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) शिक्षकांचा समावेश असलेली 13 सदस्यांची निवड समिती संबंधित कौशल्यांच्या क्षेत्रांतून आलेल्या अर्जांचे मूल्यमापन करते. चित्रपट उद्योग क्षेत्रातील प्रस्थापित व्यावसायिकांची 12 सदस्यीय ग्रँड ज्युरी निवड प्रक्रियेचा पुढचा टप्पा हाती घेते. चित्रपटनिर्मिती आव्हान आणि त्याची अंतिम पारितोषिकांचा निर्णय सुप्रसिद्ध चित्रपट व्यावसायिकांचा समावेश असलेल्या 5 सदस्यांच्या ग्रेट ग्रँड ज्युरीतर्फे घेतला जातो. 

पुण्याच्या एफटीआयआयने एनएफडीसीच्या सहयोगातून आयोजित केलेले '48 तासांत चित्रपट निर्मितीचे आव्हान' हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा घटक आहे. विविध कौशल्ये असलेले सहभागी 48 तासांच्या निर्मिती अवधीमध्ये लघुपटांची संकल्पना निश्चित करून त्याची निर्मिती करण्यासाठी एकत्र येऊन काम करतात. तज्ञांचे पाठबळ आणि संस्थात्मक मार्गदर्शन यांच्या मदतीने, सदर आव्हान व्यावसायिक निर्मितीच्या मर्यादांच्या कक्षेत राहून सहभागींना चित्रपट निर्मितीचा संघ म्हणून काम करण्याचा सखोल व्यावहारिक अनुभव मिळवून देते. या प्रक्रियेतून तयार झालेल्या चित्रपटांचे इफ्फीमध्ये विशेषरित्या सादरीकरण केले जाते आणि चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांची प्रतिष्ठित परीक्षक समिती या चित्रपटांचे मूल्यमापन करून विविध श्रेणींमधील उत्कृष्टतेला पारितोषिकांनी गौरवते. 

सीएमओटी प्रतिभा शिबीर सहभागींना अधिक विस्तृत माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाशी जोडते आणि निर्मिती संस्था, स्टुडीओज, संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या, ओटीटी मंच, प्रसारणकर्ते तसेच चित्रपट उद्योगातील इतर भागधारकांशी त्यांचा संपर्क प्रस्थापित करून देईल. यामुळे तरुण निर्मात्यांना त्यांची स्वतःची कलाकृती सादर करणे, या उद्योगातील प्रतिनिधींशी संवाद साधणे आणि व्यावसायिक संधींचा शोध घेणे शक्य होईल.

वर्ष 2021 मध्ये सीएमओटी उपक्रमाची सुरुवात झाल्यापासून हा उपक्रम उदयोन्मुख सर्जनशील व्यावसायिकांना माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाशी जोडणारा मंच म्हणून विकसित झाला आहे. येथील माजी सहभागींनी आंतरराष्ट्रीय उत्पादन संस्थांमध्ये काम करू लागले आहेत आणि त्यांनी कान्स,बर्लिन ,टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच आंतरराष्ट्रीय एमी पारितोषिके यांसारखे प्रतिष्ठित मंच आणि महोत्सवांमध्ये गौरव प्राप्त केला आहे.

भारताची सर्जक अर्थव्यवस्था सतत विकसित होत असताना, चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या शाखांमधील कुशल आणि नवोन्मेषी व्यावसायिकांची जोपासना करणे अधिकाधिक महत्त्वाचे होऊ लागले आहे. शिक्षण, व्यावहारिक सहयोग आणि उद्योगांचा सहभाग यांचा मेळ घालून सीएमओटी हा उपक्रम उदयोन्मुख प्रतिभावंतांसाठी सर्जनशीलतेची क्षमता व्यावसायिक संधींमध्ये रुपांतरीत करण्याचे मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. 

गोव्यात आयोजित इफ्फीसाठी 100 हून अधिक सहभागी प्रतिभावंत येऊ घातलेले असताना, हा महोत्सव जागतिक चित्रपटांच्या प्रदर्शनापलीकडे बरेच काही देऊ करेल, हे पुन्हा एकदा सिद्ध करतो.  या सहभागींसाठी ही सहयोगाची, शिकण्याची आणि भारतीय चित्रपटनिर्मितीचे भविष्य घडवण्याच्या दिशेने त्यांचे पहिले पाऊल उचलण्याची संधी ठरेल.

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/संजना चिटणीस/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2338366
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026