माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डॉ. एल. मुरुगन यांनी युट्यूब इम्पॅक्ट समिट 2026 या शिखर परिषदेला केले संबोधित, विकसित भारताच्या जडणघडणीत आशय निर्मिती क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका महत्त्वाची असल्याची बाब केली अधोरेखित
तंत्रज्ञान वेगाने बदलू शकते, पण घटनात्मक मूल्ये चिरंतन राहिली पाहिजेत : युट्यूब इम्पॅक्ट समिट 2026 या शिखर परिषदेत डॉ. एल. मुरुगन यांचा युवा आशय निर्मात्यांना संदेश
18,000 पेक्षा जास्त भारतीय युट्यूब वाहिन्यांनी ओलांडला 10 लाख सदस्यांचा टप्पा, या कामगिरीतून उमटले विस्तारत्या आशय निर्मिती क्षेत्राचे प्रतिबिंब
Posted On:
29 SEP 2026 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2026
युवा आशय निर्मात्यांनी नवोन्मेष आणि सक्षमीकरणाचे साधन म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा असे आवाहन केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी केले आहे. भविष्यातील परिस्थिती कृत्रिम बुद्धिमत्ता विरुद्ध आशय निर्माते न राहता, कृत्रिम बुद्धिमत्ता आशय निर्मात्यांच्या सक्षमीकरणाचा घटक बनायला हवी असे त्यांनी सांगितले. या आशय निर्मात्यांनी धाडसाने आणि तितक्याच जबाबदारीने, तसेच काही एका उद्देशाने आशय निर्मिती करावी असा सल्लाही त्यांनी दिला. तंत्रज्ञान वेगाने बदलते, पण घटनात्मक मूल्ये चिरंतन असतात असे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली इथे आयोजित युट्यूब इम्पॅक्ट समिट 2026 या शिखर परिषदेला डॉ. एल. मुरुगन यांनी आज संबोधित केले. सह-निर्मितीतून प्रभाव : भारताचे डिजिटल नेतृत्व आणि ऑरेंज इकॉनॉमी अर्थात संस्कृती, कला आणि कौशल्यावर आधारित अर्थव्यवस्था (Co-Creating Impact: Indias Digital Leadership and the Orange Economy) ही या शिखर परिषदेची संकल्पना होती. आपल्या संबोधनातून देशाच्या आर्थिक विकासाला, रोजगाराला आणि जागतिक पातळीवरील सांस्कृतिक प्रचार प्रसाराला चालना देण्यात देशाची डिजिटल तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेची वाढती भूमिका त्यांनी अधोरेखित केली. या शिखर परिषदेच्या निमित्ताने धोरणकर्ते, तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे, आशय निर्माते, उद्योजक आणि नवोन्मेषक एकत्र आले होते. डॉ. एल. मुरुगन यांनी या परिषदेत बीजभाषण केले.
विकास आणि रोजगाराचे कारक घटक बनलेले आशय निर्मिती क्षेत्र
या शिखर परिषदेत युट्यूब इम्पॅक्ट या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. युट्यूबच्या सर्जनशील परिसंस्थेने 2025 मध्ये भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले आहे, तसेच देशभरात 9.6 लाखांपेक्षा जास्त पूर्णवेळ रोजगारांना पाठबळ दिले असल्याचे निरीक्षण या अहवालात मांडले आहे.
भारतात निर्मित होणाऱ्या आशय पाहिला जाण्याच्या एकूण कालावधीपैकी 15 टक्क्यांपेक्षा जास्त कालावधी हा भारतातील बाहेरील प्रेक्षकांचा असतो असे या अहवालात म्हटले आहे. यासोबतच 18,000 पेक्षा जास्त भारतीय युट्यूब वाहिन्यांनी 10 लाख सदस्यांचा टप्पा ओलांडला असल्याची दखलही या अहवालात घेतली असल्याचे डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले.

डिजिटल इंडिया ते सर्जनशील इंडिया
देशात डिजिटल व्यवहार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, परवडणाऱ्या दरातील संपर्क जोडणी आणि डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल परिवर्तन घडून येत असल्याचे डॉ. मुरुगन म्हणाले. या वाटचालीत आपण केवळ ग्राहक बनून न राहता निर्माते म्हणून ओळख निर्माण करायला हवी, केवळ वापरकर्ते न होता नवोन्मेषक बनायला हवे आणि केवळ आशय पाहण्याऐवजी बौद्धिक मालमत्तेची निर्मिती करण्याच्या दिशेने वळायला हवे अशी गरज त्यांनी व्यक्त केली.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे संधींशी संबंधित भौगोलिक नकाशा बदलला आहे, या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक जिल्ह्यातील, भाषेतील आणि समाजातील गुणवत्तेला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे ही बाब त्यांनी नमूद केली.
ऑरेंज इकॉनॉमी अर्थात संस्कृती, कला आणि कौशल्यावर आधारित अर्थव्यवस्थेला बळकटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या भारतात निर्मिती करा, जगासाठी निर्मिती करा या संकल्पनेचा संदर्भही त्यांनी दिला. आशय, सर्जनशीलता आणि संस्कृती हे ऑरेंज इकॉनॉमी अर्थात संस्कृती, कला आणि कौशल्यावर आधारित अर्थव्यवस्थेचे तीन स्तंभ असल्याचे ते म्हणाले.
सर्जनशीलता ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते, व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकता, बौद्धिक मालमत्तेची उभारणी होऊ शकते, निर्यातीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात तसेच सांस्कृतिक प्रभाव विस्तारू शकतो असे ते म्हणाले.

एआय निर्मात्यांची जागा घेणार नाही तर त्यांचे सक्षमीकरण करेल
मानवी कल्पकता हीच सर्जनशीलतेचा मुख्य गाभा आहे, हे स्पष्ट करत डॉ. मुरुगन यांनी, लेखन, भाषांतर, संपादन, ॲनिमेशन, संगीत रचना, डिझाइन आणि वितरणात एआय निर्मात्यांना सहाय्य करू शकते, असे सांगितले. उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर सर्वांसाठी सुलभ, जबाबदार आणि नैतिक असावा यावर भर देतानाच, एआयने निर्मात्यांना पर्याय म्हणून उभे न राहता त्यांचे सक्षमीकरण केले पाहिजे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
या परिषदेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (IICT) च्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या “क्रिएट विथ एआय” या चित्रपटांचे अनावरणही करण्यात आले.
सर्जनशील गुणवत्तेसाठी सरकारी उपक्रम
सर्जनशील प्रतिभा शोधणे, तिचा विकास करणे आणि तिला थेट बाजारपेठेशी जोडण्याचे मार्ग अधिक मजबूत करण्यासाठी WAVES, IICT, 'क्रिएट इन इंडिया' चॅलेंजेस, 'जेम्स ऑफ इंडिया', WAVES बाजार, MyWAVES आणि 'क्रिएटर्स कॉर्नर' यांसारख्या उपक्रमांचा मंत्र्यांनी उल्लेख केला.
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये AVGC (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) कंटेंट-क्रिएटर प्रयोगशाळांची तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या क्षेत्राला 2030 पर्यंत जवळपास 20 लाख कुशल व्यावसायिकांची गरज भासेल असा अंदाज त्यांनी वर्तवला.
डिजिटल युगातील संवैधानिक मूल्ये
"तंत्रज्ञान झपाट्याने बदलते, मात्र संवैधानिक मूल्ये चिरंतन टिकून राहतात," यावर भर देत डॉ. मुरुगन यांनी भारताच्या डिजिटल क्रांतीमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
घटनेतील कलम 19 आणि त्याअंतर्गत मिळणाऱ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उल्लेख करताना, त्यांनी स्पष्ट केले की या स्वातंत्र्यावर संविधानाने घालून दिलेल्या रास्त मर्यादा लागू होतात. त्यामुळे डिजिटल विश्वात निर्मिती करण्याच्या स्वातंत्र्यासोबतच उत्तरदायित्वाची जाणीव असणेही तितकेच गरजेचे आहे.
तसेच, कलम 51 (अ) अंतर्गत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांचा संदर्भ देत, त्यांनी डिजिटल युगात माहितीची निर्मिती, तिची देवाण-घेवाण, सत्यता पडताळणी आणि नवनवीन प्रयोग करताना सर्वांनी जबाबदारीने पावले उचलण्याचे आवाहन केले.
भारताच्या कथा जगासमोर नेणे
चित्रपट, संगीत, गेमिंग, ॲनिमेशन, डिजिटल कथाकथन, डिझाइन, हस्तकला आणि साहित्याच्या माध्यमातून भारताचा सांस्कृतिक वारसा जगभरातील नव्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचू शकतो, यावर डॉ. मुरुगन यांनी भर दिला.
तरुण निर्मात्यांची भाषा, संस्कृती आणि कथा जागतिक पटलावर ठसा उमटवू शकतात; त्यामुळे त्यांनी भारताच्या विविधतेवर पूर्ण विश्वास ठेवून नवनिर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे भविष्य आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काय घडवतो यावर अवलंबून असेल, असे सांगून मंत्र्यांनी 'विकसित भारत 2047' चे ध्येय गाठण्यासाठी रोजगारनिर्मिती, बौद्धिक संपदा, जागतिक संधी आणि सर्वसमावेशक विकास या घटकांचे महत्त्व अधोरेखित केले.
'विकसित भारत 2047' ची उद्दिष्टे साध्य करण्यात भारताच्या डिजिटल आणि सर्जनशील उद्योगांची वाढती भूमिका या परिषदेतून स्पष्ट झाली. याच धर्तीवर, सर्वसमावेशक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सर्जनशील परिसंस्था (क्रिएटिव्ह इकोसिस्टम) उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री मुरुगन यांनी केले.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2316746)
अभ्यागत कक्ष : 12