माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आकाशवाणीच्या 90 व्या वर्धापनदिन सोहळ्याचा भाग म्हणून ‘स्वर प्रेरणा वीथिका’ उपक्रमाचा शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2026 8:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2026
आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या निमित्ताने आणि 2027 मध्ये भारतातील रेडिओ प्रसारणाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, आज आकाशवाणीने ‘स्वर प्रेरणा वीथिका’ या विशेष छायाचित्र दालनाचे उद्घाटन केले. देशातले दिग्गज संगीतकार आणि आकाशवाणी यांच्यातील अतूट, पिढ्यानपिढ्यांचे नाते अधोरेखित करणारा हा एक अनोखा उपक्रम आहे. नवी दिल्लीतील आकाशवाणी भवनाच्या 'आकाशवाणी रंग भवन' सभागृहात, पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते या दालनाचे दिमाखात उद्घाटन झाले.

भारताचा हा समृद्ध सांगीतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशातून हे दालन उभारण्यात आले आहे. ज्या नामवंत कलाकारांचे आकाशवाणीशी अत्यंत जवळचे नाते राहिले आणि ज्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, अशा प्रतिभावान कलावंतांच्या अमूल्य योगदानाचा गौरव 'स्वर प्रेरणा वीथिका'च्या माध्यमातून करण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात संगीत क्षेत्रातील 20 दिग्गज कलाकारांच्या छायाचित्रांचे अनावरण करण्यात आले. या दालनात 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित विदुषी एम. एस. सुब्बलक्ष्मी (कर्नाटक गायन), पं. रविशंकर (सतार), विदुषी लता मंगेशकर (पार्श्वगायन), उस्ताद बिस्मिल्ला खान (शहनाई), पं. भीमसेन जोशी (हिंदुस्तानी शास्त्रीय गायन) आणि डॉ. भूपेन हजारिका (लोकसंगीत) यांच्या छायाचित्रांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच, 'पद्मविभूषण' सन्मानप्राप्त पं. हरिप्रसाद चौरसिया (बासरी), उस्ताद अमजद अली खान (सरोद) आणि उस्ताद अलाउद्दीन खान (सरोद) यांच्यासह 'पद्मभूषण' पुरस्कार प्राप्त कलावंतांचाही यात यथोचित गौरव करण्यात आला आहे.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ज्या कलाकारांच्या योगदानामुळे आकाशवाणीला देशातील एक अग्रगण्य सांस्कृतिक संस्था म्हणून नावलौकिक मिळवता आला, अशा दिग्गजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या आकाशवाणीच्या प्रयत्नांचा 'स्वर प्रेरणा वीथिका' हा पहिला टप्पा आहे, असे ते म्हणाले. पुढील टप्प्यांमध्ये आणखी नामवंत कलाकारांची छायाचित्रे या दालनात पाहायला मिळतील, तसेच, देशभरातील आकाशवाणी केंद्रांवर तेथील प्रसिद्ध स्थानिक संगीतकारांना समर्पित अशीच छायाचित्र दालने विकसित केली जातील, असे त्यांनी सांगितले.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतासाठी ‘रागम’ आणि भक्ती संगीतासाठी ‘आराधना’ या आकाशवाणीच्या समर्पित डिजिटल वाहिन्या युट्यूब, 'न्यूज-ऑन-एअर' ॲप आणि 'वेव्हज' ओटीटी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास उपलब्ध आहेत. भारताचा हा समृद्ध सांगीतिक वारसा देशभरातील आणि जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचवण्यात आकाशवाणीच्या कलाकारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे द्विवेदी यांनी नमूद केले.
* * *
सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2280105)
आगंतुक पटल : 13