अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तीन जनसुरक्षा योजना - प्रधानमंत्री सुरक्षा बिमा  योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा  योजना  आणि अटल पेन्शन योजना यांनी सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्याची 11  वर्षे पूर्ण केली

Posted On: 09 MAY 2026 9:07AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आलेल्या जनसुरक्षा योजना - प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा  योजना (पीएमजेजेबीवाय) , प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (पीएमएमएसबीवाय)  आणि अटल पेन्शन योजना (एपीवाय) सर्वांना, विशेषतः समाजातील वंचित आणि दुर्बल  घटकांना, किफायतशीर वित्तीय सुरक्षा प्रदान  करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आल्या होत्या. जीवनातील अनिश्चिततेपासून नागरिकांचे संरक्षण करून  आणि दीर्घकालीन वित्तीय स्थिरता  वाढवून विमा आणि पेन्शन क्षेत्राला व्यापक बनवणे हा या  प्रमुख योजनांचा उद्देश आहे.

या तिन्ही जन सुरक्षा योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपले विचार मांडताना,  केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमी खर्चात विमा आणि निवृत्तीवेतनाचे लाभ देण्यासाठी पीएम जीवन ज्योती बिमा योजना, पीएम सुरक्षा बिमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांचा समावेश असलेल्या जन सुरक्षा योजना सुरू केल्या.”

जन सुरक्षा योजनांच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आकडेवारी सादर करताना  सीतारामन म्हणाल्या की पीएमजेजेबीवाय, पीएमएमएसबीवाय आणि एपीवाय अंतर्गत अनुक्रमे 27 कोटी , 58 कोटी आणि 9 कोटीहून अधिक नावनोंदणी झाल्या आहेत.

पीएमजेजेबीवाय योजनेबद्दल बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की या योजनेअंतर्गत 10.7  लाखांहून अधिक कुटुंबांचे 21,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दावे निकाली काढण्यात आले आहेत.

पीएमएसबीवाय योजनेअंतर्गत 1.84 लाखांहून अधिक कुटुंबांचे जवळपास 3,660 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दावे निकाली काढण्यात आले आहेत, असे सीतारामन म्हणाल्या.

“जन सुरक्षा योजनांच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त, बँका आणि विमा कंपन्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांचे मनःपूर्वक कौतुक, ज्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे या योजना प्रचंड यशस्वी झाल्या आहेत,” असे, सीतारामन यांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले.

या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले, “गरीबातील  गरीब लोकांना विमा संरक्षण आणि निवृत्तीवेतन सहाय्य प्रदान करणे हा या योजनांचा उद्देश आहे. नावनोंदणी आणि दाव्यांच्या प्रक्रियेचे डिजिटायझेशन व सुलभता यावर या योजनांमध्ये प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. ऑनलाइन जन सुरक्षा पोर्टल सुरू झाल्यामुळे नागरिकांना बँकेच्या शाखा किंवा टपाल कार्यालयाला  भेट न देता सुलभपणे नावनोंदणी करणे शक्य झाले आहे. दावा प्रक्रियेच्या डिजिटायझेशनमुळे जलद निपटारा सुनिश्चित झाला आहे, ज्यामुळे शोकाकुल कुटुंबांना अत्यंत निकड असताना वेळेवर मदत मिळणे शक्य झाले आहे.”

प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना , प्रधानमंत्री सुरक्षा बिमा  योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन सामाजिक सुरक्षा (जन सुरक्षा) योजनांचा  11 वा वर्धापनदिन साजरा करत असताना, या योजनांनी लोकांना परवडणारा विमा आणि सुरक्षा  कशी उपलब्ध करून दिली, त्यांचे यश  आणि प्रमुख वैशिष्ट्ये यांचा आढावा घेऊया.

1. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा  योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा  योजना (पीएमजेजेबीवाय) कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या  मृत्यूसाठी प्रतिदिन  2/- रुपयांहून  कमी प्रीमियमवर  जीवन विमा संरक्षण प्रदान करण्यासाठी करण्यात आली आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये : पीएमजेजेबीवाय ही एक वर्षाची विमा योजना असून, तिचे दरवर्षी नूतनीकरण करता येते. ही योजना, एलआयसी आणि इतर जीवन विमा कंपन्या  ज्या आवश्यक मंजुऱ्या  मिळाल्यानंतर आणि बँका/टपाल कार्यालयासोबत करार केल्यानंतर समान अटींवर हे उत्पादन देण्यास इच्छुक आहेत त्यांच्यामार्फत संचालित केली जाते. सहभागी बँका/टपाल कार्यालय त्यांच्या ग्राहकांसाठी ही योजना राबवण्यासाठी कोणत्याही आयुर्विमा कंपनीला नियुक्त करण्यास स्वतंत्र आहेत.

पात्रतेच्या अटी: या योजनेतील सर्व सहभागी बँका किंवा टपाल कार्यालयांमधील 18 ते 50 या वयोगटातील सर्व वैयक्तिक खातेदार या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. यासाठी खातेदाराने योजनेत सामील होण्याकरता आपली संमती देणे आणि ऑटो डेबिट अर्थात खात्यातून स्वयंचलितरित्या पैसे कापून घेण्याच्या सुविधा सुरू करणे आवश्यक असणार आहे. एखाद्या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये किंवा टपाल कार्यालयात खाते असले, तरी ती व्यक्ती केवळ एकाच खात्याच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊ शकते.
नोंदणीचा कालावधी: या योजनेचा विमा संरक्षण कालावधी 1 जून ते 31 मे असा एक वर्षाचा असेल. यासाठी विहित नमुन्यात अर्ज करून संबंधित बँक किंवा टपाल कार्यालयातील खात्यातून ऑटो-डेबिटद्वारे पैसे भरण्याचा पर्याय निवडावा लागतो.
विमा हप्ता : प्रति सदस्य वार्षिक 436 रुपये विमा हप्ता असेल. नोंदणीच्या वेळी दिलेल्या पर्यायानुसार हा हप्ता खातेदाराच्या बँक किंवा टपाल खात्यातून एकाच टप्प्यात ऑटो डेबिट सुविधेद्वारे वळता केला जातो. विलंबाने नोंदणी करणाऱ्या नवीन सदस्यांना या योजनेअंतर्गत संभाव्य विमा संरक्षण कवचाचा लाभ घेण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे प्रमाणबद्ध (Pro-rata) स्वरुपात विमा हप्ता भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे :

अ) जून, जुलै आणि ऑगस्टमधील नोंदणीसाठी,  436 रुपयांचा पूर्ण वार्षिक हप्ता भरावा लागेल.
ब) सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील नोंदणीसाठी : प्रमाणबद्ध स्वरुपाअंतर्गत 342 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
क) डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमधील नोंदणीसाठी : प्रमाणबद्ध स्वरुपाअंतर्गत 228 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
ड) मार्च, एप्रिल आणि मे मधील नोंदणीसाठी:  प्रमाणबद्ध स्वरुपाअंतर्गत 114 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

मिळणारे लाभ: विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये दिले जातात. यासाठी नोंदणीच्या तारखेपासून 30 दिवसांचा लियन पिरियड अर्थात प्रतिक्षा कालावधी लागू असेल.
योजनेचे यश: प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 29 एप्रिल 2026 पर्यंतची एकूण नोंदणीची संख्या 27.43 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. या योजनेअंतर्गत केल्या गेलेल्या 10,75,625 दाव्यांपोटी 21,512.50 कोटी रुपये दिले गेले आहेत.
यासोबतच 29 एप्रिल 2026 पर्यंत या योजनेअंतर्गत 12.72 कोटी इतल्या महिलांची नोंदणी, तर 8.09 कोटी इतक्या प्रधानमंत्री जन धन योजनेच्या खातेदारांची नोंदणी झाली आहे.

स्रोत: एकूण नोंदणीसाठी बँका आणि विमा कंपन्या
महिला लाभार्थी आणि प्रधानमंत्री जन धन योजना खातेदारांसाठी: बँका

स्रोत: विमा कंपन्या

2. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)
अपघाती मृत्यू आणि अपघातामुळे येणाऱ्या दिव्यंगत्वाच्या परिस्थितीत विमा संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची आखणी केली गेली आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 70 वयोगटातील व्यक्तींना दरमहा 2 रुपयांपेक्षा कमी म्हणजे अत्यंत अल्प विमा हप्ता भरून, अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातात दिव्यंगत्व आल्यास 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये : ही योजने अंतर्गत एका वर्षाचे विमा संरक्षण दिले जाते. त्यानंतर दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण केले जाऊ शकते. ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील सर्वसाधारण विमा कंपन्या आणि इतर सर्वसाधारण विमा कंपन्यांमार्फत राबवली आणि व्यवस्थापित केली जाते. याअंतर्गत ज्या कंपन्या यासाठी आवश्यक मान्यता घेऊन, योजनेत नमूद अटींवर या उत्पादनाची सेवा देण्यासाठी तयार आहेत, आणि ज्या कंपन्यांनी अशा हेतूने बँका किंवा टपाल कार्यालयांसोबत करार केला आहे, अशा कंपन्यांद्वारे ही योजना राबवली आणि व्यवस्थापित केली जाते. या योजनेतील सहभागी बँका किंवा टपाल कार्यालये त्यांच्या खातेदारांसाठी ही योजना लागू करण्यासाठी अशा कोणत्याही विमा कंपनीची नियुक्ती करण्यासाठी स्वतंत्र आहेत.

पात्रतेच्या अटी: या योजनेतील सर्व सहभागी बँका किंवा टपाल कार्यालयांमधील 18 ते 50 या वयोगटातील सर्व वैयक्तिक खातेदार या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. यासाठी खातेदाराने योजनेत सामील होण्याकरता आपली संमती देणे आणि ऑटो डेबिट अर्थात खात्यातून स्वयंचलितरित्या पैसे कापून घेण्याच्या सुविधा सुरू करणे आवश्यक असणार आहे. एखाद्या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये किंवा टपाल कार्यालयात खाते असले, तरी ती व्यक्ती केवळ एकाच खात्याच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊ शकते.

नावनोंदणी कालावधी: हे संरक्षण 1 जून ते 31 मे या एक वर्षाच्या कालावधीसाठी असेल. यासाठी विहित नमुन्यात अर्ज करून, संबंधित वैयक्तिक बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यातून ऑटो-डेबिटद्वारे  योजनेत सहभागी होण्याचा किंवा पैसे भरण्याचा पर्याय देणे आवश्यक असेल.

हप्ता : प्रति सदस्य वार्षिक 20 रुपये. योजनेअंतर्गत नावनोंदणी करताना दिलेल्या पर्यायानुसार, खातेदाराच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यातून 'ऑटो डेबिट' सुविधेद्वारे एकाच हप्त्यात ही रक्कम जमा केली जाईल.

फायदेः खालील सारणीनुसार:

 

लाभांची सारणी

विमा संरक्षित रक्कम

मृत्यू

रु. 2 लाख

दोन्ही डोळ्यांचे कायमचे आणि भरून न येणारे नुकसान किंवा दोन्ही हात किंवा पाय निकामी होणे किंवा एका डोळ्याची दृष्टी जाणे आणि एक हात किंवा पाय निकामी होणे

रु. 2 लाख

एका डोळ्याची दृष्टी कायमची जाणे आणि किंवा भरून न येणारी हानी किंवा एक हात किंवा पाय निकामी होणे

रु. 1 लाख

 

यशस्वी कामगिरीः 29-04-2026 पर्यंत प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना(PMSBY) अंतर्गत 58.09 कोटींपेक्षा जास्त संचित नोंदणी आणि 1,84,662 दाव्यांपोटी रु. 3667.52 कोटी चुकते केले.

स्रोतः संचित नोंदणीसाठी बँका आणि विमा कंपन्या, महिला लाभार्थी आणि पीएमजेडीवाय खातेदारांसाठी बँका

स्रोतः विमा कंपन्या

3. अटल पेन्शन योजना (APY)

अटल पेन्शन योजना (APY) सर्व भारतीयांसाठी, विशेषतः गरीब, वंचित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा प्रणाली तयार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि भविष्यातील गरजा पूर्ण करणे हा सरकारचा एक उपक्रम आहे. अटल पेन्शन योजना (APY) नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) च्या एकूण प्रशासकीय आणि संस्थात्मक रचनेअंतर्गत 'पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी' (PFRDA) द्वारे चालवली जाते.

पात्रताः अटल पेन्शन योजना (APY) 18 ते 40 वर्षे वयोगटातील अशा सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे जे प्राप्तिकर दाते नाहीत. निवडलेल्या पेन्शनच्या रकमेनुसार या योजनेतील योगदानाची रक्कम वेगवेगळी असते.

फायदे : योजनेत सहभागी झाल्यानंतर सभासदाने दिलेल्या योगदानाच्या आधारावर, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहा 1000, 2000, 3000, 4000 किंवा 5000 रुपये यांपैकी निश्चित केलेली किमान मासिक पेन्शन मिळेल.

योजनेच्या फायद्यांचे वितरण: मासिक पेन्शनचा लाभ सभासदाला मिळेल आणि त्याच्या पश्चात त्याच्या जोडीदाराला मिळेल. दोघांच्या मृत्यूनंतर, सभासदाच्या वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत जमा झालेला पेन्शनचा निधी सभासदाच्या वारसदाराला परत केला जाईल.

सभासदाचा अकाली मृत्यू झाल्यास (60 वर्षांपूर्वी मृत्यू): सभासदाचा मृत्यू 60 वर्षांच्या आधी झाल्यास, त्याचा जोडीदार उर्वरित कालावधीसाठी (मूळ सभासदाचे वय 60 वर्षे होईपर्यंत) या खात्यात योगदान सुरू ठेवू शकतो.

हप्ता भरण्याची वारंवारता (frequency): सभासद या योजनेत मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही तत्वावर योगदान देऊ शकतात.

योजनेतून बाहेर पडणे : काही विशिष्ट अटींच्या अधीन राहून सभासद या योजनेतून स्वेच्छेने बाहेर पडू शकतात. अशा स्थितीत, सरकारी सह-योगदान आणि त्यावरील परतावा/व्याज वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाते.

योजनेची प्रगती - एकूण नोंदणी लाखांमध्ये:

या योजनेअंतर्गत एकूण नोंदणीमध्ये महिलांचे प्रमाण सुमारे 49% आहे.

यशस्वी कामगिरी: 30.04.2026 पर्यंत, 9.04 कोटींहून अधिक व्यक्तींनी या योजनेमध्ये नोंदणी केली आहे.

***

माधुरी पांगे/सुषमा काणे/तुषार पवार/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259392) अभ्यागत कक्ष : 7