पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्ली-देहरादून आर्थिक कॉरिडॉरच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ मजकूर

Posted On: 14 APR 2026 4:23PM by PIB Mumbai

 

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह जी, येथील लोकप्रिय आणि कष्टाळू युवा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितीन गडकरी जी, अजय टमटा जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, राज्यपाल आनंदीबेन, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता जी, मंचावर उपस्थित प्रदेश भाजपा अध्यक्ष महेंद्र भट्ट जी, माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी, माजी मुख्यमंत्री भाई रमेश पोखरियाल जी, विजय बहुगुणा जी, तीरथ सिंह रावत जी, त्रिवेंद्र सिंह रावत जी, उत्तराखंड सरकारचे सर्व मंत्रीगण, खासदार आणि आमदार आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझे प्रिय बंधू-भगिनींनो..

देवभूमी उत्तराखंडच्या या पवित्र भूमीवर आपणा सर्वांना माझा नमस्कार. खूप मोठ्या संख्येने उपस्थित पूज्य संतगणांना देखील माझा प्रणाम. उत्तराखंडच्या का प्यारा भुलों-भैबंदों, बौड़ी-भूलियों, स्याणा-बुजुर्गों, आप सबु तैं नमस्कार! मेरो प्यारो दाजी भाई, दीदी-बैनी, आमा-बाबा सबई लाई मेरो तरफ़ देखी ढोग दिनछू।

या कार्यक्रमाशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिल्ली आणि उत्तरप्रदेशमधील अनेक लोक जोडले गेले आहेत, त्यांचे ही मनःपूर्वक अभिनंदन करतो. सर्वप्रथम, मी आपणा सर्वांची क्षमा मागतो- उत्तरप्रदेश आणि दिल्लीतील या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या लोकांची सुद्धा क्षमा मागतो, कारण येथे पोहचण्यासाठी मला एक तासापेक्षा जास्त उशीर झाला. या सर्व ठिकाणी आपणा सर्वांना दीर्घकाळ वाट पाहावी लागली. आणि कारण हेच होते, मी निघालो तर वेळेवर होतो, पण जवळजवळ 12 किलोमीटरचा रोड शो, काली मंदिरापासून ते इथपर्यंत, इतका उत्साह एवढा जोश, की माझ्यासाठी वेगाने गाडी चालवणे खूप कठीण झाले. तर हळूहळू लोकांना प्रणाम करत-करत, जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेत-घेत येथे पोहोचायला मला एक तासापेक्षा जास्त उशीर झाला, आणि यासाठी मी आपली क्षमा मागतो. या उन्हात 12 किलोमीटरपर्यंत जमलेला हा जनसागर, हे उत्तराखंडचे प्रेम, माता-बहिणींचे आशीर्वाद,- मी आज उत्तराखंडमधून एक नवीन ऊर्जा घेऊन जाईन, नवीन प्रेरणा घेऊन जाईन आणि मी यासाठी प्रत्येकाचे मनापासून आभार व्यक्त करतो.

मित्रांनो, 

आज देशात सण-उत्सवाचे वातावरण आहे. विविध भागांत नवीन वर्षाचे आगमन झाले आहे. मी देशवासियांना बैसाखी, बोहाग बिहू आणि पुथांडूच्या हार्दिक शुभेच्छा देतो!

मित्रांनो, 

येणाऱ्या काही दिवसांतच, यमुनोत्री, गंगोत्री, बाबा केदारनाथ, आणि बद्रीनाथ धाम यांच्या यात्रांना सुरूवात होणार आहे. या पवित्र काळाची, देशातील कोट्यवधी श्रद्धाळू भक्त आतुरतेने प्रतिक्षा करत असतात. मी पंच बद्री, पंच केदार, पंच प्रयाग आणि येथील आराध्य देवतांना नम्र अभिवादन करतो. मी संतला मातेला देखील नमन करतो. येथे येण्यापूर्वी मला, माता दाट कालीचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले आहे. देहरादून शहरावर, माता दाट कालीची विशेष कृपा आहे. दिल्ली-देहरादून आर्थिक कॉरिडॉरसारख्या इतक्या मोठ्या प्रकल्पाला पूर्ण करण्यामध्ये, माता दाट कालीच्या आशीर्वाद खूप मोठी शक्ती लाभली आहे.

मित्रांनो, 

उत्तराखंड राज्य आपल्या स्थापनेची 25 वर्षे पूर्ण करण्यासोबतच 26व्या वर्षात प्रवेश करत आहे. आज दिल्ली–देहरादून एक्सप्रेस-वे च्या उद्घाटनासोबत या प्रगतीत आणखी एक मोठी भर पडली आहे. तुम्हाला आठवत असेल, बाबा केदारच्या दर्शनानंतर माझ्या तोंडून सहज निघाले होते, की या शतकातील तिसरे दशक उत्तराखंडचे दशक असेल. मला खूप आनंद आहे की डबल इंजिन सरकारच्या धोरणांमुळे, आणि उत्तराखंडच्या जनतेच्या परिश्रमामुळे, हे युवा राज्य, विकासाची नवी उंची गाठत आहे. हा प्रकल्पही, उत्तराखंडच्या विकासाला नवीन गती देईल. या एक्सप्रेस-वे चा खूप मोठा भाग उत्तर प्रदेशमधून जातो. यामुळे गाझियाबाद, बागपत, बडौत, शामली आणि सहारनपूर सारख्या अनेक शहरांना सुद्धा खूप फायदा होईल. पर्यटनाच्या दृष्टीने हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. मी संपूर्ण देशवासियांना या प्रकल्पाबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो.

मित्रांनो, 

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील आहे. मी बाबासाहेबांना देशातील कोट्यवधी नागरिकांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. गेल्या दशकात आमच्या सरकारने जी धोरणे आखली, जे निर्णय घेतले, त्यांनी संविधानाची प्रतिष्ठा पुन्हा दृढ केली आहे. कलम 370 हटवल्यानंतर आज पूर्ण देशात भारतीय संविधान पूर्णपणे लागू झाले आहे. ज्या अनेक जिल्ह्यांमध्ये माओवाद-नक्षलवाद संपुष्टात आला आहे, तिथेही आता संविधानाच्या भावनेनुसार कार्य होत आहे. देशात समान नागरी कायदा लागू व्हावा, ही आपल्या संविधानाची अपेक्षा आहे. उत्तराखंडने संविधानाच्या या भावनेला पुढे नेऊन आणि त्या भावनेला पुढे वाढवून पूर्ण देशाला मार्ग दाखवला आहे.

मित्रांनो, 

बाबासाहेबांचे जीवन गरीब, वंचित आणि शोषितांना न्याय्य व्यवस्था देण्यासाठी समर्पित होते. आमचे सरकारही आज त्याच भावनेने प्रत्येक गरिबाला, प्रत्येक वंचिताला खरा सामाजिक न्याय देण्यात गुंतले आहे. सामाजिक न्यायाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे देशाचा संतुलित विकास आहे, ज्यात सर्वांना सुविधा आहे, सर्वांची समृद्धी समाविष्ट आहे. म्हणूनच बाबासाहेब आधुनिक पायाभूत सुविधा आणि, औद्योगिकीकरणाचे जोरदार समर्थन करत होते. 

मित्रांनो, 

भविष्यात काय होणार, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण हस्तरेषांकडे पाहतात. भविष्यवेत्ते हातातील रेषा पाहून व्यक्तीच्या भविष्याबाबत सांगतात. मी हे शास्त्र तर जाणत नाही, पण असे म्हणतात की हे सुद्धा एक शास्त्र आहे. आता ही तर झाली व्यक्तीच्या भाग्याची गोष्ट जी त्याच्या हाताची रेष आहे त्याबद्दल. पण जर आपण हा विचार राष्ट्राच्या संदर्भात केला, तर राष्ट्राच्या भाग्यरेषा कोणत्या असतात? राष्ट्राच्या भाग्यरेषा हे आपले रस्ते असतात, आपले महामार्ग असतात, आपले एक्सप्रेसवे असतात, हवाईमार्ग, रेल्वे, जलमार्ग, या आपल्या राष्ट्राच्या भाग्यरेषा असतात. गेल्या एका दशकभरात आपला देश, विकसित भारत बनण्यासाठी विकासाच्या अशाच भाग्यरेषा उभारण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. या विकासरेषा केवळ आजच्या सुविधा नाहीत, तर या येणाऱ्या पिढ्यांच्या समृद्धीची हमी आहेत आणि ही ‘मोदींची हमी’ सुद्धा आहे. गेल्या दशकात आमच्या सरकारने राष्ट्राच्या या विकास-रेषांवर अभूतपूर्व गुंतवणूक केली आहे. मी तुम्हाला एक आकडा देतो. आता नितीनजींनी खूप सारे आकडे फक्त उत्तराखंडशी संबंधित तुम्हाला सांगितले आहेत. पहा, वर्ष 2014 पर्यंत अशा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वर्षाला, पूर्ण देशात, 2 लाख कोटी रुपये सुद्धा खर्च होत नसत. हे मी पूर्ण हिंदुस्ताबाद्दल सांगतोय, 2 लाख कोटी सुद्धा होत नसत, आज हे सहा पटीने अधिक, 12 लाख कोटी रुपयांपेक्षा सुद्धा जास्त झाले आहे. येथे उत्तराखंडमध्येच, सव्वा दोन लाख कोटी रुपयांहून अधिकच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. 2014 च्या आधी पूर्ण देशासाठी 2 लाख कोटी, आज एकट्या उत्तराखंडसाठी सव्वा दोन लाख कोटी रुपये. कधी उत्तराखंडच्या गावांमध्ये रस्त्याच्या प्रतीक्षेत पिढ्या बदलून जात असत. आज डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे, आता रस्ते गावापर्यंत पोहोचत आहेत, जी गावे आधी ओसाड पडली होती, ती पुन्हा जिवंत होत आहेत. चारधाम महामार्ग परियोजना असो, रेल्वे परियोजनांचा विस्तार असो, केदारनाथ आणि हेमकुंड साहिब रोप-वे असो, विकासाच्या या रेषा या क्षेत्राच्या कानाकोपऱ्यात जीवनाच्या सुद्धा भाग्यरेषा बनत आहेत.

मित्रांनो,

21व्या शतकातील भारत आज ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात काम करत आहे, त्याची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. मी तुम्हाला उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीचेच उदाहरण देतो. काही आठवड्यांपूर्वीच, दिल्ली मेट्रोचा विस्तार झाला, मेरठमध्ये मेट्रो-सेवेची सुरुवात झाली, दिल्ली-मेरठ नमो-भारत रेल्वे देशाला समर्पित केली गेली, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात झाली, विमानांसाठी देखभाल, दुरुस्ती आणि ऑपरेशन्स सुविधा उभारण्याचे काम सुरु झाले आहे. आणि आज, देहरादून-दिल्ली एक्सप्रेस-वे सुरू होत आहे.

मित्रांनो,

एवढ्या छोट्या प्रदेशात हे सर्व इतक्या कमी वेळात घडत आहे. यावरून कल्पना करा, देशभरात किती मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहे. म्हणूनच मी म्हणतो - 21व्या शतकातील भारत, आधुनिक पायाभूत सुविधांच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. आणि हे सर्व अभूतपूर्व आणि अकल्पनीय आहे.

मित्रांनो,

आज भारताच्या वेगवेगळ्या भागांना जोडणारे अनेक आर्थिक कॉरिडोर उभारले जात आहेत. जसे की दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, बंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, ईस्ट कोस्ट आर्थिक कॉरिडॉर, अमृतसर-कोलकाता औद्योगिक कॉरिडॉर, असे अनेक आर्थिक कॉरिडॉर देशात निर्माण केले जात आहेत. हे आर्थिक कॉरिडॉर प्रगतीची नवीन दारे आहेत, प्रवेशद्वार आहेत. आणि यांच्याशी आशेचा धागाही जोडलेला आहे. हे आर्थिक कॉरिडॉर, केवळ रस्तेच नव्हे तर व्यापार-उद्योगासाठी नवे मार्ग तयार करतात. कारखाने, गोदामे आणि संपूर्ण लॉजिस्टिक्स नेटवर्कसाठी मजबूत पायाभूत सुविधा तयार करतात.

मित्रांनो,

देहरादून-दिल्ली आर्थिक कॉरिडॉरमुळे या संपूर्ण प्रदेशाचा कायापालट होणार आहे. यामुळे पहिला फायदा हा आहे की प्रवासाचा वेळ कमी होईल, वाहतूक अधिक वेगवान आणि स्वस्त होईल, लोकांचा पेट्रोल-डिझेल वरचा खर्च कमी होईल, भाडे कमी होईल, आणि याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे रोजगारनिर्मिती. या प्रकल्पावर सुमारे 12 हजार कोटी रुपये खर्च असून, हजारो कामगारांना रोजगार मिळाला आहे. तसेच, अभियंते, कुशल कामगार, वाहतूक क्षेत्राशी संबंधित अनेकांना कामाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शेतकरी आणि पशुपालकांची उत्पादने सुद्धा आता जलद गतीने मोठ्या मंडई आणि बाजारपेठांपर्यंत पोहचू शकतील.

मित्रांनो,

या उत्कृष्ट एक्सप्रेस-वे मुळे उत्तराखंडच्या पर्यटनाला खूप मोठा फायदा होईल. देहरादून, हरिद्वार, ऋषिकेश, मसुरी आणि चारधाम यात्रेसाठी हा सर्वात प्रमुख मार्ग ठरणार आहे. आणि आपण सर्व जाणतो, जेव्हा पर्यटनाचा विकास होतो, तेव्हा प्रत्येकाला त्याचा काही ना काही फायदा होतो-. हॉटेल असो, ढाबे असोत, टॅक्सी असो, ऑटो असो, होमस्टे असो, सर्वांना याचा फायदा होतो.

मित्रांनो,

मला आनंद आहे की आज उत्तराखंड, हिवाळी पर्यटन, हिवाळी क्रीडा आणि ‘वेड इन इंडिया’ (लग्नासाठीचे ठिकाण) म्हणूनही एक उत्कृष्ट केंद्र बनत आहे. 

मित्रांनो, 

उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेसाठी बारामाही पर्यटन अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच हिवाळ्यात होणाऱ्या धार्मिक यात्रांवर मी विशेष भर देत आलो आहे. आणि मला आनंद आहे की दरवर्षी या यात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. तुम्हाला आठवत असेल, मी 2023 मध्ये आदि कैलाश आणि ओम पर्वतच्या यात्रेला गेलो होतो. आधी खूप जायचो, मध्ये अजिबात जाऊ शकलो नाही, अनेक वर्षांनंतर मला तेथे जाण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री मला सांगत होते, राज्यपाल साहेब मध्ये आले होते, ते सुद्धा सांगत होते की 2023 मध्ये तिथे गेलो आणि त्यानंतर, खूप मोठ्या संख्येने भाविक तिथे जात आहेत. पूर्वी हिवाळ्यात येथे केवळ काहीशे लोक येत असत. पण 2025 मध्ये, जवळजवळ 40 हजार पेक्षा अधिक श्रद्धाळूंनी या पवित्र स्थळांना भेट दिली आहे. जिथे कधी एक हजार लोकही जात नव्हते, आता जर 40 हजार पोहोचत असतील तर, हा आकडा स्थानिक लोकांच्या उपजीविकेसाठी मोठी ताकद आहे. याचप्रमाणे 2024 मध्ये हिवाळी चारधाम यात्रेसाठी, सुमारे 80 हजार भाविक आले होते. 2025 मध्ये ही संख्या दीड लाखांहून अधिक झाली आहे.

मित्रांनो, 

आपण असा विकसित भारत घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. जिथे प्रगती सुद्धा असेल, प्रकृती सुद्धा असेल आणि संस्कृती सुद्धा असेल. आणि म्हणूनच, आज होणाऱ्या प्रत्येक निर्माणाला, प्रगती, प्रकृती आणि संस्कृती या त्रिसूत्रीच्या आधारावरच राबवले जात आहे, याच मूल्यांच्या आधारावर विकसित केले जात आहे. पायाभूत सुविधांमुळे मानवांना सुद्धा सुविधा मिळावी, आणि तिथे राहणाऱ्या वन्यजीवांना सुद्धा त्रास होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. याच दृष्टीने या एक्सप्रेसवेवर, सुमारे 12 किलोमीटर लांब उन्नत्त वन्यजीव कॉरिडॉर सुद्धा तयार करण्यात आला आहे. हत्तींना सुद्धा अडचण येऊ नये, हत्तींसह इतर वन्यजीवांना कोणतीही अडचण होऊ नये, याची सुद्धा काळजी घेतली गेली आहे.

तसेच मित्रांनो, 

मी आज देशभरातील सर्व पर्यटकांना आणि तीर्थयात्रेकरूंना एक विनंती करतो. आपले डोंगर, हे वन क्षेत्र, हे देवभूमीची अमूल्य धरोहर, ही अतिशय पवित्र स्थळे आहेत. अशा स्थळांची स्वच्छता राखणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. येथील रहिवाशांचेही आणि येथे येणाऱ्या पर्यटकांचेही. या भागांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, कचऱ्याचे ढिग, हे देवभूमीच्या पवित्रतेला तडा पोहोचवतात. म्हणून हे खूप आवश्यक आहे की आपण देवभूमीच्या या स्थळांना, स्वच्छ आणि सुंदर ठेवावे.

मित्रांनो, 

पुढील वर्षी हरिद्वारमध्ये कुंभामेळ्याचे सुद्धा आयोजन होणार आहे. या श्रद्धेच्या महासंगमाला दिव्य, भव्य आणि स्वच्छ बनवण्यासाठी आपण कोणतीही कमी ठेवू नये.

मित्रांनो, 

उत्तराखंडमध्ये नंदा देवी राजजात यात्रा देखील आयोजित केली जाते. हा केवळ श्रद्धेचा उत्सव नसून आपल्या सांस्कृतिक चेतनेचे जिवंत उदाहरण आहे. या यात्रेत माता नंदा यांना कन्येसारखे मानून सन्मानाने निरोप दिला जातो. या यात्रेत बहिणी आणि मुलींचा सहभाग याला विशेष बनवतो. मी माता नंदा यांना वंदन करून देशभरातील बहिणी आणि मुलींना एक विशेष संदेश देऊ इच्छितो- विकसित भारताच्या निर्मितीत तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या मुली, माता आणि भगिनी यांचा वाटा अत्यंत मोठा आहे. बहिणी-मुलींची सुविधा, सुरक्षा आणि लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग, हे डबल इंजिन सरकारचे प्रमुख प्राधान्य आहे. तुम्ही सध्या पाहत आहात की जगभरात मोठे संकट निर्माण झाले आहे. यामुळे जगातील विकसित देशांमध्ये सुद्धा किती हाहाकार माजला आहे. अशा कठीण परिस्थितीत सुद्धा, सरकारचा निरंतर प्रयत्न आहे की आमच्या बहिणींना कमीत कमी त्रास व्हावा.

मित्रांनो, 

बहिणी-मुलींच्या भागीदारीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आता देशासमोर आहे. 4 दशकांच्या प्रतीक्षेनंतर संसदेने, नारीशक्ती वंदन अधिनियम पारित केला होता. यामुळे विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण निश्चित झाले. सर्व पक्षांनी पुढे येऊन या महत्त्वाच्या कायद्याला समर्थन दिले. आता महिलांना हा जो हक्क मिळाला आहे, या हक्काची अंमलबजावणी करण्यास उशीर व्हायला नको. आता याची अंमलबजावणी व्हायला हवी. आता 2029 च्या लोकसभा निवडणुकांपासून तसेच त्यानंतरच्या सर्व विधानसभा निवडणुकांपासून हे आरक्षण लागू व्हावे, ही देशाची भावना आहे आणि प्रत्येक बहिणी-मुलीची अपेक्षा आहे. मातृशक्तीच्या याच इच्छेला मान देत, 16 एप्रिलपासून संसदेत विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे. देशातील बहिणी-मुलींच्या हक्काशी जोडलेल्या या कामाला, सर्व राजकीय पक्षांनी मिळून सर्वसंमतीने पुढे न्यावे, ते पूर्णत्वास न्यावे. आणि मी आज देशातील सर्व महिलांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले आहे, सोशल मीडियाद्वारे कदाचित हे माझे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचले असेल, कदाचित टीव्ही आणि वर्तमानपत्र देखील या पत्राचा उल्लेख करत असतील. मी मोठ्या आग्रहाने देशातील माता-भगिनींना या कार्यात भागीदार होण्यासाठी निमंत्रित केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की पत्र माझ्या देशातील माता-भगिनी नक्कीच वाचतील. प्रत्येक शब्दावर विचार करतील आणि इतके मोठे पवित्र कार्य करण्यासाठी 16-17-18 ला संसदेत येणाऱ्या सर्व खासदारांना त्यांचे आशीर्वाद सुद्धा देतील. मी आज देवभूमीतून देशातील सर्व पक्षांना पुन्हा आवाहन करेन की नारीशक्ती वंदन अधिनियमातील दुरुस्तीला नक्कीच पाठिंबा द्यावा. 2029 मध्ये आमच्या देशाची 50 टक्के लोकसंख्या असलेल्या आपल्या माता-भगिनी, आमच्या मुली, त्यांना त्यांचा हक्क आपण नक्कीच देऊया.

मित्रांनो,

मी उत्तराखंडला आलो आणि सैन्याचा उल्लेख केला नाही तर बोलणे अपूर्णच राहते. हा गढी  कँट परिसर, हे सभा स्थळ, हे उत्तराखंडच्या महान सैनिकी परंपरेचे प्रतीक आहे. येथे जवळच देशाच्या संरक्षणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या संस्था आहेत, 1962 च्या युद्धात, शहीद जसवंत सिंह रावत जींचे शौर्य देश कधीही विसरू शकत नाही.

मित्रांनो,

सैन्याचे सामर्थ्याला वाढवणे असो, किंवा आमच्या सैनिक कुटुंबांची सुविधा आणि सन्मान असो, आमचे सरकार यासाठी निरंतर प्रयत्नशील आहे. ‘वन रँक वन पेन्शन’च्या माध्यमातून आमच्या सरकारने, आतापर्यंत सुमारे सव्वा लाख कोटी रुपये माजी सैनिकांच्या त्यांच्या खात्यात जमा केले आहेत. उत्तराखंडमधील हजारो कुटुंबांनाही याचा लाभ मिळाला आहे. याशिवाय, यावर्षी माजी सैनिकांसाठी आरोग्य योजनेचा अर्थसंकल्प सुद्धा 36 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या माजी सैनिकांसाठी औषधांची घरपोच सेवा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. माजी सैनिकांच्या मुलांचे एज्युकेशन ग्रांट सुद्धा डबल करण्यात आली आहे. आणि मुलींच्या विवाहासाठी जी मदत मिळते, तिला सुद्धा 50 हजारांवरून वाढवून 1 लाख रुपये करण्यात आले आहे.

 

मित्रांनो,

देशभक्ती, देवभक्ती आणि प्रगती, असे प्रत्येक आयाम जोडत, आपल्याला देशाला विकसित बनवायचे आहे. पुन्हा एकदा दिल्ली-वासियांना, उत्तर प्रदेश वासियांना, आणि एक प्रकारे देशवासियांना, या शानदार एक्सप्रेसवेच्या मी खूप-खूप शुभेच्छा देतो.

माझ्यासोबत बोला-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

खूप-खूप धन्यवाद !

**** 

नितीन फुल्लुके / नेहा कुलकर्णी /परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2252941) अभ्यागत कक्ष : 9