शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'परीक्षा पे चर्चा' ची 9 वी आवृत्ती येत्या 6 फेब्रुवारी, 2026 रोजी


‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये प्रथमच देशभरातील विविध ठिकाणी साधण्यात आला संवाद

Posted On: 05 FEB 2026 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांसोबतचा अनोखा संवादात्मक कार्यक्रम, 'परीक्षा पे चर्चा' - (पीपीसी), आपल्या 9 व्या आवृत्तीसह शुक्रवारी, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता भेटीला येत आहे. या कार्यक्रमामध्ये परीक्षेच्या ताणावर चर्चा केली जाईल आणि परीक्षा हा उत्सव आणि जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून साजरा केला जाईल.

हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यूट्यूब चॅनल, दूरदर्शन (डीडी) आणि शिक्षण मंत्रालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाईल. याव्यतिरिक्त, WAVES OTT, Amazon Prime Video, Jio, ZEE5, Sony LIV आणि Spotify (ऑडिओ प्लॅटफॉर्म) सारखे  OTT प्लॅटफॉर्म परीक्षा पे चर्चा चे लाईव्ह स्ट्रीमिंग करतील.

राष्ट्रीय शिक्षण धोरण  2020 ला अनुरूप , पीपीसी संकल्पनेचा उद्देश आत्मविश्वास, सकारात्मकता आणि समग्र कल्याणाला चालना देऊन आणि परीक्षेचा हंगाम उत्सव म्हणून साजरा करून विद्यार्थ्यांचा परीक्षेचा अनुभव समृद्ध करणे  हा आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या "एक्झाम वॉरियर्स" या पुस्तकात आपले विचार मांडले आहेत, हे पुस्तक अनेक भाषांमध्ये तसेच ब्रेल लिपीत उपलब्ध आहे. यात त्यांनी स्वतःवरील विश्वासावर भर दिला आहे आणि या मुद्द्यांवर बोलण्याची गरज अधोरेखित केली आहे जेणेकरून आपल्या मुलांचे  बालपण मजेत आणि आनंदात जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘परीक्षा पे चर्चा’  या उत्साही आणि नवोन्मेषी कार्यक्रमात यावर्षी अनेक नवीन घटक समाविष्ट केले आहेत. परीक्षा पे चर्चा 2026 पहिल्यांदाच देशातील सर्व भागांचा समावेश असलेल्या अनेक ठिकाणी सादर करण्यात आले. दिल्ली व्यतिरिक्त परीक्षा पे चर्चा 2026  देशाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य भागांना व्यापणाऱ्या चार वेगवेगळ्या ठिकाणी  केले आहेत. यामध्‍ये  तामिळनाडूतील कोईम्बतूर, छत्तीसगडमधील रायपूर, गुजरातमधील देव मोगरा आणि आसाममधील गुवाहाटी, येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .

परीक्षा पे चर्चा 2026 या मूळ कार्यक्रमापूर्वी देशभरातील सर्व शाळांमध्ये विविध विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम आयोजित करण्यात आले.  ज्यामध्ये स्वदेशी संकल्प दौड, पराक्रम दिनानिमित्त निवडक केंद्रीय विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली आत्मनिर्भरतेची भावना वाढवणारी धावण्याची /चालण्याची  स्पर्धा, तसेच प्रश्नमंजूषा आणि लेखन स्पर्धा यांचा समावेश होता. या स्पर्धांमध्‍ये सुमारे 2.26 कोटी विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

गेल्या काही  वर्षांमध्ये या कार्यक्रमाने एका राष्ट्रीय जनआंदोलनाचे स्वरुप प्राप्त केले असून यात देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा अभूतपूर्व सहभाग दिसून येतो आहे. यावर्षी परीक्षा पे चर्चा च्या नवव्या आवृत्तीसाठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येने गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत काढला असून,  ‘माय जीओव्ही’ या  पोर्टलच्या माध्यमातून 4.50 कोटी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी नोंदणी केली आहे. हा उदंड प्रतिसाद सर्व राज्ये आणि  केंद्रशासित प्रदेश तसेच शिक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थांचा, शिक्षण मंत्रालयाच्या भागीदारीत या उपक्रमाची उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी असलेला सातत्यपूर्ण पाठिंबा आणि सामायिक बांधिलकी दर्शवितो. कालपरत्वे ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये अधिकाधिक भागधारकांचा उत्स्फूर्तपणे समावेश होणे, हे या कार्यक्रमामुळे सर्वांच्या जीवनात  निर्माण होत  असलेल्या मूल्याचे एक निश्चित द्योतक आहे.


सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2223971) अभ्यागत कक्ष : 42