पंतप्रधान कार्यालय
कच्छ आणि सौराष्ट्र विभागांसाठी व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
11 JAN 2026 6:00PM by PIB Mumbai
केम छो ! गुजरातचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, गुजरात सरकारचे इतर मंत्री, खासदार आणि आमदार, महामहिम, उद्योग विश्वातील प्रतिनिधी, इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुषहो.
2026 च्या प्रारंभानंतरचा माझा हा पहिला गुजरात दौरा आहे. आणि तो सुखद यासाठी आहे कारण 2026 ची माझी ही यात्रा सोमनाथ दादाच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू झाली आहे. आणि आता मी राजकोटमध्ये या शानदार कार्यक्रमात सहभागी होत आहे. म्हणजेच 'विकासही आणि वारसाही', हा मंत्र चहूकडे घुमत आहे. मी देश आणि जगभरातून येथे आलेल्या तुम्हा सर्व सहकाऱ्यांचे 'व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक शिखर परिषदे'त स्वागत करतो, अभिनंदन करतो.
मित्रांनो,
ज्या ज्या वेळी 'व्हायब्रंट गुजरात समिट'चे व्यासपीठ सजते, त्यावेळी मला फक्त एक परिषद दिसत नाही, तर मला 21 व्या शतकातील आधुनिक भारताचा तो प्रवास दिसतो, जो एका स्वप्नापासून सुरू झाला होता आणि आज एका अढळ विश्वासापर्यंत पोहोचला आहे. दोन दशकांत व्हायब्रंट गुजरातचा हा प्रवास एक जागतिक मापदंड बनला आहे. आतापर्यंत याच्या 10 आवृत्यांचे आयोजन झाले आहे आणि प्रत्येक आवृत्तीसोबत या समिटची ओळख आणि भूमिका दोन्ही मजबूत होत गेल्या आहेत.
मित्रांनो,
मी व्हायब्रंट गुजरात समिटच्या व्हिजनशी पहिल्या दिवसापासून जोडला गेलो आहे. सुरुवातीच्या काळात आमचा उद्देश होता की जगाला गुजरातच्या सामर्थ्याची ओळख व्हावी, लोकांनी येथे यावे आणि गुंतवणूक करावी, ज्याचा फायदा भारताला आणि जगभरातील गुंतवणूकदारांनाही व्हावा. परंतु आज ही परिषद गुंतवणुकीच्याही पुढे जाऊन जागतिक वृद्धी, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भागीदारीचे एक मजबूत व्यासपीठ बनली आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक भागीदारांची संख्या सतत वाढत आहे आणि काळासोबत ही समिट 'समावेशकतेचे' एक मोठे उदाहरण बनली आहे. येथे कॉर्पोरेट ग्रुप्ससोबतच सहकारी संस्था, एमएसएमई, स्टार्टअप्स, बहुपक्षीय आणि द्विपक्षीय संस्था, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, हे सर्व एकत्र येऊन संवाद साधतात, चर्चा करतात आणि गुजरातच्या विकासासोबत खांद्याला खांदा लावून चालतात.
मित्रांनो,
गेल्या दोन दशकांत व्हायब्रंट गुजरात परिषदेने सातत्याने काहीतरी नवीन, काहीतरी विशेष केले आहे. व्हायब्रंट गुजरातची ही प्रादेशिक परिषद देखील याचेच एक उदाहरण आहे. गुजरातच्या विविध भागांतील 'न वापरलेल्या क्षमतेचे' 'कामगिरीत' रूपांतर करण्यावर याचा भर आहे. उदाहरणार्थ, एखाद्या क्षेत्रात किनारपट्टीची ताकद आहे, तर कुठे एक मोठी आदिवासी पट्टा आहे, कुठे औद्योगिक क्लस्टर्सची मोठी परिसंस्था आहे, तर कुठे शेती आणि पशुपालनाची समृद्ध परंपरा आहे. म्हणजेच गुजरातच्या विविध विभागांची आपली स्वतःची ताकद आहे. व्हायब्रंट गुजरातची प्रादेशिक समिट गुजरातच्या याच प्रादेशिक शक्यतांवर लक्ष केंद्रित करत पुढे जात आहे.
मित्रांनो,
21 व्या शतकाचा एक चतुर्थांश भाग उलटून गेला आहे. गेल्या काही वर्षांत भारताने खूप वेगवान प्रगती केली आहे आणि यामध्ये गुजरातची, तुम्हा सर्वांची खूप मोठी भूमिका राहिली आहे. भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. आणि जी आकडेवारी येत आहे, त्यावरून हे स्पष्ट आहे की भारताकडून जगाच्या अपेक्षा सतत वाढत आहेत. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, महागाई नियंत्रणात आहे, कृषी उत्पादनात भारत नवे विक्रम प्रस्थापित करत आहे, भारत दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे, जेनेरिक औषध निर्मितीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे, जगात जो देश सर्वाधिक लसी तयार करतो, त्या देशाचे नाव भारत आहे.
मित्रांनो,
भारताच्या वाढीशी संबंधित ही फॅक्ट शीट म्हणजे ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ या मंत्राच्या यशोगाथेचे प्रतिक आहे. गेल्या 11 वर्षांत भारत जगातील सर्वात मोठा मोबाईल डेटा ग्राहक बनला आहे, आमचे युपीआय जगातील नंबर वन रिअल-टाइम डिजिटल व्यवहार मंच बनले आहे. पूर्वी आपण 10 पैकी 9 मोबाईल बाहेरून मागवायचो. आज भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक आहे. आज भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे. सौर ऊर्जा निर्मितीच्या बाबतीतही भारत अव्वल तीन देशांपैकी एक आहे. आपण तिसरी मोठी विमान वाहतूक बाजारपेठ आहोत आणि मेट्रोच्या बाबतीतही आपण जगातील आघाडीच्या 3 नेटवर्कमध्ये सामील झालो आहोत.
मित्रांनो,
आज प्रत्येक जागतिक तज्ज्ञ आणि जागतिक संस्था भारताबाबत आशावादी आहेत. आयएमएफ भारताला जागतिक वृद्धीचे इंजिन म्हणते. एस अँड पी ने 18 वर्षांनंतर भारताच्या मानांकनात सुधारणा केली आहे. फिच रेटिंग्स भारताच्या बृहद स्थैर्याची आणि वित्तीय विश्वासार्हतेची प्रशंसा करत आहे. भारतावर जगाचा हा विश्वास यासाठी आहे कारण जागतिक अनिश्चिततेच्या काळातही, भारतात आपण एक अभूतपूर्व निश्चिततेचा काळ पाहत आहोत. आज भारतात राजकीय स्थैर्य आहे, धोरणांमध्ये सातत्य आहे. भारतात नव-मध्यम वर्गाची व्याप्ती वाढत आहे, त्यांची क्रयशक्ती वाढत आहे आणि या घटकांनी भारताला असीम शक्यतांचा देश बनवले आहे. मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते - 'यही समय है, सही समय है' (हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे). देश आणि जगातील प्रत्येक गुंतवणूकदारासाठी या संधींचा लाभ घेण्याची हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे.
मित्रहो,
तुम्हा सर्वांना माहिती आहे की सौराष्ट्र आणि कच्छ हे गुजरातचे असे प्रदेश आहेत जे आपल्याला शिकवतात की आव्हान कितीही मोठे असले तरी आपण प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रमाने टिकून राहिलो तर यश निश्चित आहे. कच्छला या शतकाच्या सुरुवातीला विनाशकारी भूकंपाचा सामना करावा लागला होता, सौराष्ट्रमध्ये वर्षानुवर्षे दुष्काळ पडला होता. माता आणि बहिणींना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी अनेक किलोमीटर चालावे लागत होते. वीज नव्हती आणि सर्वत्र अडचणी होत्या.
मित्रहो,
आज २०-२५ वर्षे वयोगटातील तरुणांनी त्या काळातील फक्त कथा ऐकल्या आहेत. सत्य हे होते की लोक कच्छ किंवा सौराष्ट्रात जास्त काळ राहण्यास कचरत होते. त्यावेळी असे वाटत होते की ही परिस्थिती कधीही बदलणार नाही. पण इतिहास साक्षीदार आहे: काळ बदलतो आणि निश्चितच बदलतो. सौराष्ट्र आणि कच्छच्या लोकांनी आपल्या कठोर परिश्रमाने आपले नशीब बदलले आहे.
मित्रहो,
आज, सौराष्ट्र आणि कच्छ ही केवळ संधींची भूमी नाही तर भारताच्या विकासासाठी महत्त्वाचे केंद्र बनले आहेत. हा प्रदेश आत्मनिर्भर भारत अभियानाचे मुख्य केंद्र बनत आहे. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात सौराष्ट्र आणि कच्छची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आणि ही भूमिका बाजारपेठेवर आधारित आहे. आणि गुंतवणूकदारांसाठी हे सर्वात मोठे आश्वासन आहे. राजकोटमध्ये, विविध औद्योगिक समुहांमध्ये 2,50,000 पेक्षा जास्त एमएसएमई आहेत. स्क्रूड्रायव्हर्सपासून ते ऑटो पार्ट्स, मशीन टूल्स, लक्झरी कार लाइनर्स, विमान, लढाऊ विमान आणि रॉकेट पार्ट्सपर्यंत सर्व काही आपल्या राजकोटमध्ये तयार केले जाते. याचा अर्थ असा की हा प्रदेश कमी किमतीच्या उत्पादनापासून ते उत्कृष्ट गुणवत्ता असणाऱ्या, उच्च-तंत्रज्ञान उत्पादनापर्यंत संपूर्ण मूल्य साखळीला सहाय्य करतो. आणि येथील दागिने उद्योग तर जगप्रसिद्ध आहेच. हे क्षेत्र प्रमाण, कौशल्य आणि जागतिक दुवा अशा तिन्हींचे उदाहरण आहे.
मित्रहो,
अलंग हे जगातील सर्वात मोठे जहाज मोडीत काढण्याचे यार्ड आहे आणि जगातील एक तृतीयांश जहाजांचा येथे पुनर्वापर केला जातो. हे चक्राकार अर्थव्यवस्थेत भारताच्या नेतृत्वाचे देखील एक उदाहरण आहे. भारत टाइल्सच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे आणि मोरबी जिल्हा देखील यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. येथे उत्पादन खर्च स्पर्धात्मक आहे, आणि हे ठिकाण जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले आहे. आणि मला आठवते, सौराष्ट्रातील वृत्तपत्रांचे लोक येथे उपस्थित असले पाहिजेत; त्यांनी तर माझे केसच ओढले असते. मी एकदा सौराष्ट्रात एका भाषणात म्हटले होते की एक काळ असा येईल, जेव्हा मोरबी, जामनगर आणि राजकोटचा हा त्रिकोण एक मिनी-जपान बनेल. तेव्हा माझी थट्टा केली गेली होती, परंतु आज मी माझ्या डोळ्यांसमोर वास्तव पाहतो आहे. आम्हाला धोलेरा या विशेष गुंतवणूक क्षेत्राचा देखील खूप अभिमान आहे. आज हे शहर आधुनिक उत्पादनाचे एक मुख्य केंद्र बनत आहे. धोलेरा येथे भारतातील पहिली सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात आहे. हा प्रदेश भविष्यातील तंत्रज्ञानासाठी उपयुक्त लाभ प्रदान करत आहे. याचा अर्थ या प्रदेशात तुमच्या गुंतवणूक वाढीसाठी पाया तयार आहे. पायाभूत सुविधा तयार आहेत, धोरणे योग्य अंदाज वर्तवणारी आहेत आणि दृष्टीकोन दीर्घकालीन आहे.
मित्रहो,
सौराष्ट्र आणि कच्छ हे भारताची हरित वाढ, हरित गतिशीलता आणि ऊर्जा सुरक्षेचे मुख्य केंद्र बनत आहेत. कच्छमध्ये 30 गिगावॅट क्षमतेचे अक्षय ऊर्जा पार्क उभारले जाते आहे; हे जगातील सर्वात मोठे हायब्रिड ऊर्जा पार्क असेल. तुम्ही कल्पना करू शकता की हे पार्क पॅरिस शहरापेक्षा पाचपट मोठे आहे. याचा अर्थ असा की या प्रदेशात स्वच्छ ऊर्जा ही केवळ एक वचनबद्धता नाही तर व्यावसायिक स्तरावरील वास्तव देखील आहे. तुम्ही सर्वजण हरित हायड्रोजनच्या क्षमतेशी परिचित आहात; भारतात या दिशेने अभूतपूर्व वेगाने आणि मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. कच्छ आणि जामनगर हरित हायड्रोजन उत्पादनाची प्रमुख केंद्रे बनत आहेत. कच्छमध्ये एक प्रचंड बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (बीईएसएस) देखील स्थापित केली जात आहे. याचा अर्थ असा की अक्षय ऊर्जेसह ग्रिड स्थिरता आणि विश्वासार्हता सुनिश्चित केली जात आहे.
मित्रहो,
कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये आणखी एक मोठी क्षमता आहे. या प्रदेशात जागतिक दर्जाची बंदरे आहेत. भारताच्या निर्यातीचा एक महत्त्वाचा भाग येथून जातो. पिपावाव आणि मुंद्रा सारखी बंदरे भारताच्या ऑटोमोबाईल निर्यातीचे मुख्य केंद्र बनली आहेत. गेल्या वर्षी गुजरातच्या बंदरांमधून सुमारे 1,50,000 वाहने निर्यात करण्यात आली. केवळ लॉजिस्टिक्सच नाही तर येथील बंदर-नेतृत्वाखालील विकासाच्या प्रत्येक पैलूमध्ये अमर्याद गुंतवणूक क्षमता आहे. गुजरात सरकार मत्स्यपालन क्षेत्राला देखील विशेष प्राधान्य देते आहे. येथे मत्स्यपालन संबंधित पायाभूत सुविधांवर व्यापक काम करण्यात आले आहे. सी-फूड प्रक्रियेत सहभागी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी येथे एक सक्षम परिसंस्था अस्तित्वात आहे.
मित्रहो,
पायाभूत सुविधांबरोबरच उद्योगासाठी सज्ज कार्यबल ही आजची एक महत्त्वाची आवश्यकता आहे. आणि गुजरात गुंतवणूकदारांना या आघाडीवर पूर्ण खात्री देते. शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी आंतरराष्ट्रीय परिसंस्था येथे अस्तित्वात आहे. गुजरात सरकारचे कौशल विद्यापीठ युवा पिढीला भविष्यासाठी उपयुक्त कौशल्ये प्रदान करत आहे. ते ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमधील विद्यापीठांच्या सहकार्याने काम करत आहे. राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ हे भारतातील पहिले राष्ट्रीय स्तरावरील संरक्षण विद्यापीठ आहे. गतिशक्ती विद्यापीठ रस्ते, रेल्वे, हवाईमार्ग, जलमार्ग आणि लॉजिस्टिक या प्रत्येक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करत आहे. म्हणजेच इथे गुंतवणुकीबरोबरच टॅलेंट पाईपलाईनही निश्चित आहे. आज अनेक परदेशी विद्यापीठे भारतात नवीन संधी शोधत आहेत. आणि गुजरात हे त्यांच्या पसंतीचे ठिकाण बनत आहे. ऑस्ट्रेलियातील दोन मोठ्या विद्यापीठांनी गुजरातमध्ये आपले कॅम्पस सुरू केले आहेत. येत्या काळात ही संख्या आणखी वाढणार आहे.
मित्रहो,
गुजरातकडे निसर्गही आहे, साहसाही आहे, संस्कृतीही आहे आणि वारसा तर आहेच. म्हणजेच पर्यटनासाठी तुम्हाला जो काही अनुभव हवा असेल तो इथे मिळेल. लोथल हे भारताच्या साडेचार हजार वर्षांच्या सागरी वारशाचे प्रतीक आहे. जगातील सर्वात जुना मानव निर्मित डॉकयार्ड येथे सापडला आहे. येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल उभारले जात आहे. कच्छमध्ये आता रण महोत्सवाचे आयोजन केले जाते. येथील टेंट सिटीमध्ये राहणे हा एक अनोखा अनुभव आहे.
मित्रहो,
ज्यांना जंगले आणि वन्य जीवांची आवड आहे, त्यांच्यासाठी गीरच्या जंगलात आशियाई सिंहाला पाहण्यापेक्षा अधिक चांगला कोणता अनुभव असेल? दरवर्षी नऊ लाखांहून अधिक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. ज्यांना समुद्राचा सहवास आवडतो त्यांच्यासाठी शिवराजपूर समुद्रकिनारा आहे, जो ब्लू फ्लॅग प्रमाणित आहे. याशिवाय मांडवी, सोमनाथ आणि द्वारका येथे समुद्रकिनारा पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. इथे जवळच दीव देखील आहे, दीव हे जलक्रीडा आणि समुद्रकिनाऱ्यावरील खेळांसाठी एक उत्तम ठिकाण बनत आहे. म्हणजेच, हे संपूर्ण क्षेत्र तुम्हा गुंतवणूकदारांसाठी अनेक शक्यता आणि संधींनी परिपूर्ण असे क्षेत्र आहे. तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या. आणि मी पूर्वीपासूनच सांगत आलो आहे, की तुम्ही उशीर केलात, तर नंतर मला दोष देऊ नका. सौराष्ट्र-कच्छमधील तुमची प्रत्येक गुंतवणूक गुजरातच्या विकासाला, देशाच्या विकासाला गती देईल. आणि सौराष्ट्राची ताकद, नुकतेच रवांडाचे उच्चायुक्त सांगत होते की जेव्हा मी रवांडाला गेलो होतो तेव्हा मी तिथे 200 गायी भेट म्हणून दिल्या होत्या. या 200 गायी आमच्या गीर गायी होत्या. पण त्याचे एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा आम्ही तिथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी 200 गायी दिल्या, तेव्हा त्यांचा एक नियम आहे, की आम्ही तुम्हाला गाय देऊ, पण तुम्हाला तिचे पहिले वासरू परत द्यावे लागेल, आणि आम्ही ते दुसऱ्या कुटुंबाला देऊ. म्हणजे 200 गायींपासून याची सुरुवात झाली होती, आज हजारो कुटुंबांपर्यंत ही गाय पोहोचली आहे. रवांडाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठे बळ देत आहे, प्रत्येक घरात गीर गाय दिसत आहे, हे माझे सौराष्ट्र आहे.
मित्रहो,
आजचा भारत विकसित बनण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे. आणि आमचे हे ध्येय साध्य करण्यात रिफॉर्म एक्सप्रेसची खूप मोठी भूमिका आहे. रिफॉर्म एक्सप्रेस म्हणजे प्रत्येक क्षेत्रात पुढच्या पिढीतील सुधारणा, जसे काही काळापूर्वी देशाने पुढच्या पिढीतील जीएसटी सुधारणा लागू केल्या. याचा प्रत्येक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम दिसून आला, विशेषतः आपल्या एमएसएमईंना याचा मोठा लाभ मिळत आहे. रिफॉर्म एक्सप्रेसवर स्वार झालेल्या भारताने विमा क्षेत्रात मोठी सुधारणा केली आहे. भारताने विमा क्षेत्रात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. यामुळे देशवासियांना 100% विमा संरक्षण देण्याच्या मोहिमेला गती मिळेल. त्याचप्रमाणे, जवळजवळ सहा दशकांनंतर प्राप्तिकर कायद्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. याचा लाखो करदात्यांना लाभ मिळेल. भारताने कामगार कायद्यात देखील ऐतिहासिक सुधारणा लागू केल्या आहेत. यामुळे वेतन, सामाजिक सुरक्षा आणि उद्योग, यांना एक समान चौकट मिळाली आहे. म्हणजेच कामगार असो, अथवा उद्योग, प्रत्येकाला त्याचा लाभ मिळेल.
मित्रहो,
आज भारत डेटा-प्रणित नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि सेमीकंडक्टर उत्पादनाचे जागतिक केंद्र बनत आहे. म्हणजेच भारताची विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. भारताला खात्रीशीर ऊर्जेची मोठी गरज आहे आणि याचा खूप मोठा स्त्रोत म्हणजे अणुऊर्जा. हे लक्षात घेऊन आम्ही अणुऊर्जा क्षेत्रातही पुढल्या पिढीच्या सुधारणा हाती घेतल्या आहेत. संसदेच्या गेल्या अधिवेशनात शांतता कायद्याद्वारे भारताने नागरी अणुऊर्जा खासगी भागीदारीसाठी खुली केली आहे. गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे.
मित्रहो,
मी येथे उपस्थित सर्व गुंतवणूकदारांना आश्वासन देतो की आमची रिफॉर्म्स एक्सप्रेस आता थांबणार नाही. भारताचा सुधारणा प्रवास संस्थात्मक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
मित्रहो,
तुम्ही सर्वजण येथे केवळ सामंजस्य करार करून आला नाहीत, तर सौराष्ट्र - कच्छचा विकास आणि वारसा यांच्याशी जोडले जाण्यासाठी तुम्ही आले आहात. मी तुम्हाला खात्री देतो की, तुमच्या गुंतवणुकीचा प्रत्येक पैसा येथे उत्कृष्ट परतावा देईल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मी गुजरात सरकारची, गुजरातच्या टीमची त्यांच्या प्रयत्नांसाठी प्रशंसा करतो, अभिनंदन करतो. 2027 मध्ये कदाचित त्यांची व्हायब्रंट शिखर परिषद होईल, पण त्यापूर्वी, ही प्रादेशिक परिषद हा एक चांगला प्रयोग आहे. आणि मला आनंद आहे की, जे काम सुरू करताना मला काम करण्याची संधी मिळाली, त्याचा माझे सहकारी विस्तार करत आहेत, त्याला नवी ऊर्जा मिळत आहे, ही गोष्ट आणखी आनंद दायक आहे. मी आपल्याला शुभेच्छा देतो, धन्यवाद!
***
NehaKulkarni/ShaileshPatil/MadhuriPange/RajashreeAgashe
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2217183)
अभ्यागत कक्ष : 23
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam