पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील सोमनाथ येथे 10-11 जानेवारी रोजी सोमनाथ स्वाभिमान पर्वमध्ये पंतप्रधान होणार सहभागी


शौर्य यात्रेमध्येही पंतप्रधान सहभाग घेणार

शौर्य आणि त्यागाचे दर्शन घडवणारी 108 अश्वांची प्रतीकात्मक मिरवणूक या यात्रेत निघणार

सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित हे पर्व भारताच्या अथक चैतन्याचे आणि संस्कृतीच्या सातत्याचे प्रतीक आहे

पंतप्रधानांचा सहभाग हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे जतन करून त्यांचा गौरव करण्याच्या त्यांच्या बांधिलकीचे द्योतक

सोमनाथ मंदिरात दर्शन घेऊन पंतप्रधान करणार पूजा

सोमनाथ मंदिरात ओंकार मंत्र जपातही पंतप्रधान होणार सहभागी

प्रविष्टि तिथि: 09 JAN 2026 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10-11 जानेवारी 2026 रोजी गुजरातमधील सोमनाथ येथे सोमनाथ स्वाभिमान पर्व मध्ये सहभागी होणार आहेत.10 जानेवारी रोजी म्हणजे उद्या रात्री 8 वाजता ते ओंकार मंत्र जपात सहभागी होतील. त्यानंतर सोमनाथ मंदिरात ड्रोन शो पाहतील.

11 जानेवारी रोजी सकाळी 9:45 वाजता ते शौर्य यात्रे मध्ये सहभागी होणार आहेत. ही यात्रा मंदिराचे रक्षण करताना बलिदान दिलेल्या वीरांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केली आहे. यात्रेत 108 अश्वांची शौर्य आणि त्यागाचे दर्शन घडवणारी प्रतीकात्मक मिरवणूक निघेल.  त्यानंतर सकाळी 10:15 वाजता पंतप्रधान मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील. सकाळी 11 वाजता ते सार्वजनिक कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.

सोमनाथ स्वाभिमान पर्व 8 ते 11 जानेवारी दरम्यान होत आहे. या पर्वाचा उद्देश भावी पिढ्यांना प्रेरणा देणे हा आहे. महमूद गझनीने 1026 या वर्षात या मंदिरावर आक्रमण केले. या  आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा हल्ल्यापासून रक्षण करताना अनेकांना हौतात्म्य आले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या पर्वाचं आयोजन केलं आहे. शतकानुशतके मंदिर उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले असले तरी मंदिर आजही तग धरून राहण्याचे, सामर्थ्याचे  आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक म्हणून उभे आहे.

स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांनी मंदिर पुनर्बांधणीचा संकल्प केला. 1951 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत नव्या मंदिराचे उद्घाटन झाले. 2026 मध्ये त्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने या पर्वाला विशेष महत्त्व आहे.

या उत्सवात देशभरातील शेकडो साधुसंत सहभागी होतील. मंदिरात सलग 72 तास ‘ॐ’ जप होईल.

सोमनाथ स्वाभिमान पर्व मध्ये  पंतप्रधानांचा सहभाग म्हणजे भारताच्या संस्कृतीला सन्मान देणे असून भारताचा  समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करण्याप्रती आणि त्याला प्रोत्साहन देण्याप्रती पंतप्रधानांची कटिबद्धता अधोरेखित करतो.

निलीमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2212930) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam