पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी भूषवले भारतीय एआय स्टार्टअप्ससोबतच्या गोलमेज बैठकीचे अध्यक्षपद


इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मधील 'एआय फॉर ऑल: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज' साठी पात्र ठरलेल्या 12 भारतीय एआय स्टार्टअप्सनी त्यांच्या कल्पना आणि कार्याचे सादरीकरण केले

हे स्टार्टअप्स आरोग्यसेवा, बहुभाषिक एलएलएम, मटेरियल रिसर्च, डेटा ॲनालिटिक्स, इंजिनिअरिंग सिम्युलेशन यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत

या स्टार्टअप्सनी एआय क्षेत्राची झपाट्याने होणारी वाढ आणि भविष्यातील प्रचंड क्षमता अधोरेखित केल्या; तसेच एआय मधील नवोन्मेष आणि वापराचा गुरुत्वमध्य आता भारताकडे सरकू लागल्याचे निरीक्षण नोंदवले

स्टार्टअप्सनी कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेला प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या ठाम वचनबद्धतेचे कौतुक केले

स्टार्टअप्स आणि एआय उद्योजक हे भारताच्या भविष्याचे सह-शिल्पकार आहेत,यावर पंतप्रधानांनी भर दिला

भारतीय एआय मॉडेल्सनी स्थानिक आणि स्वदेशी आशयाला तसेच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याची पंतप्रधानांची सूचना

भारतीय एआय मॉडेल्स ही नैतिक, पूर्वग्रहमुक्त, पारदर्शक आणि डेटा गोपनीयतेच्या तत्त्वांवर आधारित असावीत, याची खातरजमा करणे आवश्यक आहे, यावर पंतप्रधानांनी दिला भर

एआय मॉडेल्सच्या यशासाठी सरकारकडून पूर्ण सहकार्य आणि पाठबळ देण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन

प्रविष्टि तिथि: 08 JAN 2026 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 7, लोक कल्याण मार्ग या आपल्या निवासस्थानी भारतीय एआय स्टार्टअप्ससोबत एका गोलमेज बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026'  च्या पार्श्वभूमीवर, या शिखर परिषदेमधील 'एआय फॉर ऑल: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज'साठी पात्र ठरलेले 12 भारतीय एआय स्टार्टअप्स या बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या कल्पना आणि कार्याचे सादरीकरण केले.

भारतीय भाषांची फाउंडेशन मॉडेल्स, बहुभाषिक एलएलएम, स्पीच-टू-टेक्स्ट, टेक्स्ट-टू-ऑडिओ आणि टेक्स्ट-टू-व्हिडिओ, ई-कॉमर्स, मार्केटिंग आणि वैयक्तिक आशय निर्मितीसाठी जनरेटिव्ह एआय 3D आशय तयार करणे; अभियांत्रिकी सिम्युलेशन, साहित्य संशोधन आणि विविध उद्योगांमध्ये डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेसाठी प्रगत विश्लेषण; आरोग्य सेवा निदान आणि वैद्यकीय संशोधन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये हे स्टार्टअप्स कार्यरत आहेत.

या एआय  स्टार्टअप्सनी देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेला प्रगत करण्याच्या भारताच्या खंबीर वचनबद्धतेचे कौतुक केले. त्यांनी एआय क्षेत्राची झपाट्याने होणारी वाढ आणि भविष्यातील प्रचंड संधी अधोरेखित केल्या, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवोन्मेष आणि उपयोगाचा  गुरुत्वमध्य आता भारताकडे सरकू लागल्याचे निरीक्षण नोंदवले. भारत आता एआय विकासासाठी एक भक्कम आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे जागतिक एआय नकाशावर देशाचे स्थान भक्कम झाले आहे, अशी भावना या उद्योजकांनी व्यक्त केली.

बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी समाजात परिवर्तन घडवून आणण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचे असलेले महत्त्व विशद केले. पुढील महिन्यात भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता यासंदर्भातली एआय इम्पॅक्ट समिट परिषद आयोजित करण्यात येणार असून त्या माध्यमातून देश तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ  घेऊन  परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.

स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील उद्योजक  हे भारताच्या भविष्याचे सह शिल्पकार असून नवोन्मेष आणि मोठ्या प्रमाणावरील अंमलबजावणीसाठी देशाकडे विपुल क्षमता आहे. भारताने सर्व विश्वाला एक असे वैशिष्ट्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारुप सादर करावे ज्यातून मेक इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड ही भावना प्रतिबिंबित होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

जगाचा भारतावर असलेला विश्वास हे देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. भारताचे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स नैतिक, पक्षपातरहित, पारदर्शक असावीत आणि डेटा गोपनीयतेच्या तत्त्वांवर आधारित असावीत यावर त्यांनी भर दिला. भारतातील स्टार्टअप्सनी जागतिक नेतृत्त्व म्हणून कार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच भारत परवडणारी कृत्रिम बुद्धिमत्ता, सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आणि जागतिक स्तरावर किफायतशीर नवोन्मेष बहाल करु शकतो असे ते म्हणाले. भारताची कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स इ तरांपेक्षा वेगळी असावीत आणि त्यातून स्थानिक आणि स्वदेशी आशय तसेच स्थानिक भाषांना प्रोत्साहन मिळावे, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला अवतार, भारतजेन, फ्रॅक्टल, गॅन, जेन लूप, ज्ञानी, इंटेलिहेल्थ, सर्वम, शोध एआय, सोकेट एआय, टेक महिंद्रा आणि झेंटेक यासह भारतीय एआय स्टार्टअप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री  जितिन प्रसाद हे देखील या बैठकीला उपस्थित होते.


निलीमा चितळे/शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2212556) आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada