गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज राज्यसभेत विशेष चर्चेला सुरुवात केली


वंदे मातरम् हे राष्ट्राप्रती समर्पणाचे माध्यम स्वातंत्र्य चळवळीदरम्यान होते, आजही आहे आणि 2047 मध्ये विकसित भारताच्या निर्मितीच्या वेळीही राहील

वंदे मातरम् ही भारतमातेप्रति समर्पण, भक्ती आणि कर्तव्याची भावना जागृत करणारी एक अमर कृती आहे

'वंदे मातरम्' वरील चर्चेमुळे भावी पिढ्यांना त्याचे महत्त्व समजेल आणि ते राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा आधारही बनेल

जर तत्कालीन प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याने वंदे मातरमचे दोन तुकडे करून तुष्टीकरणाची सुरुवात केली नसती तर देशाचे विभाजन झाले नसते

ज्या वंदे मातरम् ला गांधीजींनी 'शुद्ध आत्म्यापासून निघालेले गीत ' म्हटले त्याच गीताला त्या काळातील प्रमुख राजकीय पक्षाने दोन भागात विभागले .

वंदे मातरम् ला 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांनी 'वंदे मातरम' म्हणणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकले आणि आणीबाणी लादली

ज्या प्रमुख राजकीय पक्षाच्या अधिवेशनांची सुरुवात गुरुदेव टागोर वंदे मातरम गाऊन करायचे, त्यावर लोकसभेत जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्या पक्षाशी संबंधित प्रमुख कुटुंबांचे सदस्य अनुपस्थित होते

स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आजपर्यंत, वंदे मातरमचा अपमान करणे हे प्रमुख विरोधी पक्षाच्या नेतृत्वाच्या रक्तातच आहे

इस्लामिक आणि ब्रिटिश आक्रमणांमुळे आपली संस्कृती आणि इतिहास क्षीण -विस्कळीत झाला, त्यावेळी बंकिम बाबूंनी वंदे मातरम् ची रचना करून सांस्कृतिक राष्ट्रवाद पुनर्स्थापित केला

'वंदे मातरम्' आजही स्वातंत्र्य, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा सर्वात शक्तिशाली जयघोष आहे.

'वंदे मातरम्' स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्याचा नारा बनले आणि आता विकसित आणि महान भारताच्या निर्मितीचा देखील प्रेरणादायी मंत्र बनेल

प्रत्येक बालक, युवा आणि किशोरवयीन मुलामुलीच्या मनात वंदे मातरमच्या जयघोषासह राष्ट्राप्रति समर्पण आणि बलिदानाची मूल्ये जागृत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे

प्रविष्टि तिथि: 09 DEC 2025 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज राज्यसभेत विशेष चर्चेला सुरुवात केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, वंदे मातरम् वर चर्चा आणि त्याप्रति समर्पणाची गरज वंदे मातरम् च्या निर्मितीवेळी देखील होती, स्वातंत्र्य चळवळीदरम्यान देखील होती, आजही आहे आणि 2047 मध्ये जेव्हा महान भारत बनेल तेव्हाही राहील. वंदे मातरम् ही भारतमातेप्रति समर्पण, भक्ती आणि कर्तव्याची भावना जागृत करणारी एक अमर कृती आहे. ते म्हणाले की काही लोक वंदे मातरमचा गौरव पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकांशी जोडून त्याचे महत्त्व कमी करू इच्छितात. शाह म्हणाले की वंदे मातरम् केवळ पश्चिम बंगाल आणि भारतापुरते सीमित राहिले नाही , तर जगभरात जिथे जिथे स्वातंत्र्यप्रेमी होते, तिथे ते त्यांच्या गुप्त बैठकांमध्येही वंदे मातरम् गीत म्हणत असत. गृहमंत्री म्हणाले की, आजही जेव्हा सीमेवर आपले सैनिक आणि अंतर्गत सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी आपले सर्वोच्च बलिदान देतात तेव्हा त्यांच्या तोंडी वंदे मातरमचाच मंत्र असतो.

अमित शाह म्हणले की वंदे मातरम गीत भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी, स्वातंत्र्याच्या उद्घोषासाठी आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरणास्रोत बनले. भारताच्या शहीदांना आपले सर्वोच्च बलिदान देताना पुढील जन्मी पुन्हा भारतमातेसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा वंदे मातरममधूनच मिळत असते . ते म्हणाले की, अनेक ज्ञानी व्यक्तींना आपल्या प्राचीन देशाला शतकानुशतके संस्कृतीच्या मार्गावर पुढे नेण्याची प्रेरणा वंदे मातरममधूनच मिळाली. शाह म्हणाले की संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वंदे मातरमवर होत असलेली चर्चा, गौरव आणि स्तुती यातून आपली मुले, किशोरवयीन, युवा आणि आगामी अनेक पिढ्यांना वंदे मातरमचे महत्त्व समजेल आणि राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा आधारही बनवतील.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय द्वारा रचित वंदे मातरम गीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी सार्वजनिक करण्यात आले होते .ते म्हणाले की त्याच्या रचनेनंतर पाहता-पाहता वंदे मातरम देशभक्ती, बलिदान आणि राष्ट्रीय चेतनेचे प्रतीक बनले, ज्याने आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा मार्ग प्रशस्त केला. आपण सर्वांनी वंदे मातरमच्या रचनेची पार्श्वभूमी अवश्य लक्षात ठेवली पाहिजे. ते म्हणाले की शतकानुशतके इस्लामिक आक्रमणांना तोंड दिल्यानंतर देशाच्या संस्कृती आणि इतिहासाचा नाश ही वंदे मातरम या गीताच्या रचनेची पार्श्वभूमी होती. त्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत, आपल्यावर एक नवीन सभ्यता आणि संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी बंकिम बाबूंनी वंदे मातरमची रचना केली. शाह म्हणाले की वंदे मातरमच्या रचनेत, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपली मूळ संस्कृती, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि आपली आई अशी देशाची कल्पना करून त्याची पूजा करण्याची आपली परंपरा अतिशय बारकाईने पुनर्स्थापित करण्याचे काम केले होते. ते म्हणाले की, त्यावेळच्या सरकारला ते थांबवायचे होते, त्यांनी त्या गाण्यावर बंदी घातली. वंदे मातरम म्हणणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जायची आणि त्यांना तुरुंगात डांबले जायचे. मात्र तरीही ती सर्व बंधने झुगारून हे गीत कोणत्याही प्रचाराशिवाय प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला भिडले आणि या गीताचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रसार झाला. ते म्हणाले की वंदे मातरम एक प्रकारे भारताच्या संस्कृतीबद्दल आदर असलेल्या सर्वांसाठी पुनर्जागरणाचा मंत्र बनला आहे.

अमित शाह म्हणाले की, गुलामगिरीच्या काळात आपली अनेक मंदिरे, विद्यापीठे, कला केंद्रे, शेती आणि शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली, मात्र आपल्या लोकांच्या मनातील आपल्या संस्कृतीचा अभिमान कोणीही नष्ट करू शकले नाही. त्या वेळी ही भावना जागवण्याची गरज होती आणि त्या वेळी बंकिमबाबूंनी वंदे मातरम् हे काव्य रचले. त्याला ना इंग्रज रोखू शकले, ना इंग्रजी संस्कृतीचा स्वीकार करणारे थांबवू शकले, असे ते म्हणाले. वंदे मातरम ने, आपल्या दिव्य शक्तीचा विसर पडलेल्या देशाला जागृत केले. महर्षी अरबिंदो म्हणाले होते की, वंदे मातरम् हा भारताच्या पुनर्जन्माचा मंत्र आहे आणि हे वाक्य वंदे मातरम् चे महत्त्व सांगते. शाह म्हणाले की, वंदे मातरम् बद्दल अरबिंदो यांची ही भावना देशातील प्रत्येक मुलासाठी प्रेरणास्थान बनली आणि आपल्या स्वातंत्र्याचा नारा बनली.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, आपला देश संपूर्ण जगात अद्वितीय आहे आणि भारत हा एकमेव देश आहे ज्याच्या सीमा आपल्या संस्कृतीने निश्चित केल्या आहेत आणि यामुळेच भारत एकसंध राहिला आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी गुलामगिरीच्या काळात सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार जागवण्याचे काम केले. ते म्हणाले की, देशाला जोडणारा मंत्र हीच आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच वंदे मातरमच्या उद्घोषाने प्रथमच सांस्कृतिक राष्ट्रवादाचे तत्त्व स्थापित करण्याचे काम केले.

शाह म्हणाले की, आज संपूर्ण देश सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना स्वीकारून पुढे जात आहे. गृहमंत्री म्हणाले की, भारत हा जमिनीचा तुकडा नाही, तर आपल्या आईचे रूप आहे, आपण तिच्या भक्तीची गीते गातो, त्याची अभिव्यक्ती वंदे मातरम, आहे. वंदे मातरम् च्या रचनेत भारतमातेचे आपल्या जीवनात किती योगदान आहे, याचे भावपूर्ण वर्णन केले आहे. यामध्ये भारतमातेचे वर्णन पाणी, फळे आणि समृद्धीची दात्री म्हणून केले आहे, भारतमातेचे वर्णन फुलांनी सजवलेली, मनाला आनंद देणारी आणि सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गेचे रूप असे केले आहे. ते म्हणाले की, एक प्रकारे आपली समृद्धी, सुरक्षितता, ज्ञान आणि विज्ञान केवळ भारतमातेच्या कृपेने आणि उपासनेनेच प्राप्त होऊ शकते. दुर्गेचे शौर्य, लक्ष्मीची समृद्धी आणि सरस्वतीची बुद्धी आपल्याला भारतमातेची कृपा आणि देशाची भूमी देऊ शकते आणि म्हणूनच आपण पुन्हा पुन्हा तिला नमन करायला हवे.

मातृभूमी आपल्याला ओळख, भाषा देते, सुसंस्कृत जीवनशैलीच्या संस्कृतीचा आधार बनवते आणि आपले जीवन उंचावण्याची संधी देते, असे अमित शाह म्हणाले. ते म्हणाले की, मातृभूमीपेक्षा मोठे दुसरे काहीही असू शकत नाही आणि बंकिम बाबूंनी या प्राचीन भावनेला पुनरुज्जीवित केले. वंदे मातरम् ने गुलामगिरीच्या अंधाऱ्या रात्री विजेच्या तेजाप्रमाणे गुलामगिरीची मानसिकता सोडून लोकांच्या मनात स्वराज्य मिळवण्याचा उत्साह जागृत करण्याचे काम केले. शाह म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीतील आपल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे शहीद होतानाचे शेवटचे शब्द, वंदे मातरम् हेच होते. ते म्हणाले की, 1907 मध्ये कलकत्त्यात वंदे मातरम् नावाचे इंग्रजी वृत्तपत्र सुरू झाले, आणि त्याचे संपादक महर्षी अरविंद होते. ब्रिटीश सरकारने ते सर्वात धोकादायक राष्ट्रवादी वृत्तपत्र मानले आणि अरविंद यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना शिक्षा सुनावली. गृहमंत्री म्हणाले की, 1896 मध्ये गुरुदेव टागोर यांनी काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या वंदे मातरम चे गायन केले, 1905 मध्ये, वाराणसी अधिवेशनात, महान कवयित्री सरलादेवी चौधरी यांनी वंदे मातरम् हे संपूर्ण गीत गायले, आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा सकाळी साडेसहा वाजता सरदार पटेल यांच्या आग्रहाखातर पंडित ओंकारनाथ ठाकूरजी यांनी आकाशवाणीवरून आपल्या सुरेल आवाजात वंदे मातरम् गाऊन देशाला सद्गदित केले. ते म्हणाले की, 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत वंदे मातरम् ला राष्ट्रगीताएवढाच मान देऊन, राष्ट्रीय गीत म्हणून घोषित करण्यात आले.

अमित शाह म्हणाले की, वंदे मातरमवरील चर्चा टाळण्याची मानसिकता नवी नाही. 1925 मध्ये वंदे मातरमच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित समारंभात तत्कालीन प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याने वंदे मातरमचे दोन भाग करून तुष्टीकरण सुरू केले नसते, तर देशाची फाळणी झाली नसती. ते म्हणाले की, 50 व्या टप्प्यात वंदे मातरम् ला सीमित करण्यात आले, आणि तेथून तुष्टीकरणाला सुरुवात झाली, आणि पुढे त्याचे पर्यवसान देशाच्या फाळणीत झाले. तुष्टीकरणाच्या धोरणाअंतर्गत वंदे मातरमचे दोन तुकडे झाले नसते तर देशाचे विभाजन झाले नसते, असे शाह म्हणाले. ते म्हणाले की, वंदे मातरमच्या 100 व्या वर्षी वंदे मातरम म्हणणाऱ्या सर्वांना तत्कालीन पंतप्रधानांनी तुरुंगात टाकले होते. ते म्हणाले की, या देशात आणीबाणी लागू करण्यात आली, विरोधी पक्षाचे लाखो लोक, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संघटनांच्या लोकांना तुरुंगात टाकण्यात आले. गृहमंत्र्यांनी सांगितले की, आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांच्या कार्यालयांना कोणतेही कारण नसताना टाळे ठोकण्यात आले. किशोर कुमार यांची गाणी आकाशवाणीवर प्रसारित केली जात नव्हती आणि युगलगीतेही केवळ लताजी यांच्या आवाजातील वाजवली जात होती. वंदे मातरम हे गीत 100 वर्षांचे झाले, तेव्हा संपूर्ण देशाला बंदिवान बनवण्यात आले होते. शाह म्हणाले की, ज्या प्रमुख राजकीय पक्षाच्या अधिवेशनांची सुरुवात गुरुदेव टागोर वंदे मातरम् या गीताच्या गायनाने करायचे, त्यावरील लोकसभेतील चर्चेला त्या पक्षाशी संबंधित मुख्य कुटुंबातील सदस्य अनुपस्थित होते. ते म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वीपासून, ते आजपर्यंत वंदे मातरमचा अपमान करणे, हे प्रमुख विरोधी पक्ष नेतृत्वाच्या रक्तात भिनले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले की, विरोधी पक्षातील एका नेत्यांनी लोकसभेत असे सांगितले की आज वंदे मातरम वर चर्चा करण्याची काहीच आवश्यकता नाही. ज्या गीताला महात्मा गांधींनी राष्ट्राच्या अत्यंत शुद्ध आत्म्याशी जोडलेले गाणे अशी उपमा दिली होती, बिपीनचंद्र पाल यांनी ज्या गीताला राष्ट्रभक्ती आणि कर्तव्याने ओतप्रोत अभिव्यक्ती समान मानले होते, त्याच गीताचे तुकडे करण्याचे काम विरोधी पक्षांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील वंदे मातरम ने आपल्या स्वातंत्र्य लढ्याला गती देण्याचे कार्य केले आहे, असे अमित शाह म्हणाले. गुलामीच्या कालखंडात देखील बर्लिन येथे 1936 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या संघाने अत्यंत भावपूर्ण पद्धतीने वंदे मातरम गीत गायले होते आणि आपण सुवर्ण पदक जिंकले होते, याचे स्मरण शाह यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या पायावर उभा आहे. हा देश पाश्चात्य संस्कृतीच्या आधारावर नव्हे तर स्वतःच्या मूळ संस्कृती आणि मूळ विचारांच्या आधारावर चालेल त्यादृष्टीनेच आपल्या पक्षाची स्थापना करण्यात आली होती.

या संसदेत वंदे मातरम च्या गायनावर बंदी घालण्यात आल्याची नोंद आहे, असे ते म्हणाले. 1992 मध्ये खासदार राम नाईक यांनी अल्पकालीन चर्चेद्वारे संसदेत वंदे मातरम पुन्हा एकदा गायले जावे, हा मुद्दा उपस्थित केला होता. या महान सभागृहात वंदे मातरम गीताचे गायन होणे आवश्यक आहे कारण संविधान सभेने त्याचा स्वीकार केला आहे, असे तत्कालीन विरोधी पक्ष नेते लालकृष्ण आडवाणी यांनी लोकसभा अध्यक्षांना अत्यंत तळमळीने सांगितले होते. तेव्हा कुठे 1992 मध्ये लोकसभेत सर्वांनुमतीने वंदे मातरम गीताचे गायन सुरु झाले, असे शाह म्हणाले.

ज्यावेळी आम्ही वंदे मातरम च्या गायनाने प्रारंभ करत असू तेव्हा देखील विरोधी पक्षांच्या घटक पक्षातील अनेक सदस्यांनी वंदे मातरम गीत गायला नकार दिला होता. वंदे मातरम च्या आधी सभागृहात स्थानापन्न झालेले लोक वंदे मातरम सुरु झाल्यावर सभागृहाबाहेर जात असत, हे आपण पहिले आहे, असे शाह म्हणाले. आपल्या पक्षाचा एकही सदस्य असा नाही जो वंदे मातरम सुरु असताना उठून उभा राहत नाही, असे ते म्हणाले. गृहमंत्र्यांनी अध्यक्षांना विनंती केली की अशा सदस्यांची नावे या चर्चेच्या रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत.

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 130 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या सरकारने टपाल विभागाच्या द्वारे एक टपाल तिकीट जारी केले होते आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान सुरु केले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले होते की, तिरंगा फडकवताना वंदे मातरम गीताचे गायन अवश्य करावे, असे शाह यांनी सांगितले.

भारत सरकारने वंदे मातरम च्या दीडशे वर्षपूर्तीचा सोहळा खूप चांगल्या प्रकारे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे शाह म्हणाले. येणारे संपूर्ण वर्ष वंदे मातरम च्या यशोगाथेच्या स्वरूपात साजरे करण्याचा निर्णय 1 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता, याचे त्यांनी स्मरण केले. यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वय कार्यक्रमांच्या रुपरेषेला 24ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम स्वरूप देण्यात आले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारतमातेला पुष्पांजली अर्पण करून या मोहिमेचे उद्घाटन केले, असे शाह म्हणाले. या अभियानाचा पहिला टप्पा नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला आहे, दुसरा टप्पा जानेवारी 2026, तिसरा टप्पा ऑगस्ट 2026 आणि चौथा टप्पा नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे. यानिमित्त स्मारक टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण देखील करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

'वंदे मातरम् - नाद एकम रूप अनेकम्' हे विशेष सांस्कृतिक सादरीकरण 75 संगीतकारांनी सादर केले असून भारत सरकारच्या आवाहनानुसार, 7 नोव्हेंबर रोजी देशभरातील लोकांनी एकत्रितपणे वंदे मातरम् गीता गायले, असे शाह म्हणाले. वंदे मातरम च्या दीडशे वर्षपूर्तीनिमित्त एका लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात वंदे मातरम विषयी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. त्यासोबतच डिजिटल माध्यमातून हे प्रदर्शन हजारो लोकांपर्यंत पोहोचेल, असे शाह म्हणाले.

गृहमंत्र्यांनी सांगितले की, सरकारने आकाशवाणी, दूरदर्शन आणि एफएम रेडिओ चॅनेलवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा कोरोना काळ असूनही 2 वर्षे देशातील खेड्यापाड्यांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव (आझादी का अमृत महोत्सव) साजरा केला गेला असे अमित शाह यांनी सांगितले. अमृत महोत्सवाच्या माध्यमातून देशाच्या युवा पिढीला 1857 पासून ते 1947 पर्यंतच्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संपूर्ण संघर्षाची ओळख करून देण्यात आली. ज्यांची नावे कधीही इतिहासात नोंदवली गेली नाहीत अशा स्वातंत्र्य लढ्यातील अनेक अज्ञात नायकांचे तपशील शोधून त्यांचे स्मारक उभारण्यात आले, देशभरात अनेक कार्यक्रम राबवले गेले, आणि त्याद्वारे देशभक्तीची एक नवी लाट उभी करण्याचा प्रयत्न केला गेला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले ही बाब त्यांनी नमूद केली.

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या 75 वर्षांमध्ये आलेल्या सर्वच सरकारांनी देशाला खूप पुढे नेले आहे. आम्ही आपल्या लोकशाहीची संरचना मजबूत केली आहे आणि आज आपल्या लोकशाहीची मुळेही खूप मजबूत झाली आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांपासून ते 100 वर्षांपर्यंतच्या कालखंडाला अमृत काल असे नाव दिले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ते स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंतचा हा कालखंड एक आव्हान म्हणून स्वीकारण्याचा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी देशातील युवा वर्गापुढे ठेवला आहे असे त्यांनी सांगितले. जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी केली जाईल, त्यावेळी आपला देश जगात प्रत्येक क्षेत्रात पहिल्या स्थानावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा संकल्प नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. काही लोक या संकल्पाला एक राजकीय घोषणा मानतात, मात्र हा 140 कोटी भारतीयांचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होईलच असे त्यांनी ठामपणे सांगितले. आज आपण अमृत काल साजरा करत असतानाच, वंदे मातरम् चे 150 वे वर्ष आले, हा एक दैवी योयायोग असल्याचे ते म्हणाले. या माध्यमातून आपण राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे काम करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

वंदे मातरम् ची प्रासंगिकता कधीही संपुष्टात येणार नाही, ज्यावेळी वंदे मातरम् रचले गेले होते, त्यावेळी त्याची जितकी गरज होती, तितकीच गरज आजही असल्याचे त्यांनी नमूद केले. त्या काळात वंदे मातरम् हे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कारण बनले होते, आणि आता अमृत काळात वंदे मातरम् हे देशाला विकसित आणि महान बनवण्याची घोषणा बनेल असे ते म्हणाले.

प्रत्येक मुलाच्या मनात वंदे मातरम् चे संस्कार पुन्हा जागृत करणे, प्रत्येक किशोरवयीन मुलाच्या मनात वंदे मातरम् या घोषणेला स्थान मिळवून देणे, आणि प्रत्येक तरुणाला वंदे मातरम् च्या परिभाषेच्या मार्गावरूनच आपले जीवन समर्पित करण्यासाठी प्रेरित करणे ही सभागृहातील सर्व सदस्यांची परस्पर सामायिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. वंदे मातरम् चा उद्घोष हे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या भारताची कल्पना केली होती, त्या भारताच्या निर्मितीचे कारण बनेल, असे त्यांनी सांगितले.

आपल्या पक्षाची रचनाच सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आधारावर झाली आहे. हा देश पाश्चात्त्य संस्कृतीच्या आधारावर नव्हे, तर आपल्या मूळ संस्कृती आणि मूळ विचारांच्या आधारावर चालावा, यासाठीच आमच्या पक्षाची स्थापना झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

या संसदेत वंदे मातरम् चे गायन बंद करण्यात आले होते, हे इतिवृत्तात नोंदवले गेले आहे. 1992 मध्ये खासदार राम नाईक यांनी अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून संसदेत वंदे मातरम् चे गायन पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले लालकृष्ण अडवाणी यांनी, वंदे मातरम् हे गीत संविधान सभेने स्वीकारले आहे आणि म्हणूनच या महान सभागृहात वंदे मातरम् चे गायन झाले पाहिजे, असे लोकसभा अध्यक्षांना ठामपणे सांगितले होते, त्यानंतर 1992 मध्ये लोकसभेने सर्वानुमते वंदे मातरम् च्या गायनाची सुरुवात केली या घडामोडींना त्यांनी उजाळा दिला.

जेव्हा आपण वंदे मातरम् च्या गायनाची सुरुवात करत होतो, तेव्हादेखील विरोधी आघाडीतील अनेक सदस्यांनी वंदे मातरम् गाणार नसल्याचे म्हटले होते असे ते म्हणाले. वंदे मातरम् चे गायन सुरू होताच सभागृहात बसलेले लोक उठून बाहेर जातात, हे मी पाहिले आहे, असे गृहमंत्री म्हणाले. वंदे मातरम् च्या गायनाच्या वेळी उभे न राहणारा एकहीजण आमच्या पक्षाचा सदस्य नाही, असेही शाह यांनी स्पष्ट केले.

बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या 130 व्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या सरकारने टपाल विभागाच्या वतीने एक टपाल तिकीट प्रकाशित केले, आणि स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानही सुरू केले असे त्यांनी सांगितले. तिरंगा फडकवताना कोणीही वंदे मातरम् म्हणायला विसरू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी केले होते, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

भारत सरकारने वंदे मातरम् ची 150 वी जयंतीदेखील उत्तम तऱ्हेने साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. यादृष्टीनेच 1 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रिमंडळाने एक प्रस्ताव संमत करून, पुढचे संपूर्ण वर्ष वंदे मातरम् च्या यशोगानाच्या रूपात साजरे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. 24 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली. 7 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीत भारत मातेला पुष्पांजली अर्पण करून या अभियानाचा शुभारंभ केला. याचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये झाला आहे, दुसरा टप्पा जानेवारी 2026, तिसरा टप्पा ऑगस्ट 2026 आणि चौथा टप्पा नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे. याशिवाय स्मरणिकास्वरुप टपाल तिकीट आणि नाणे देखील प्रकाशित केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘वंदे मातरम - नाद एकम रूप अनेकम’ या शीर्षकाखाली 75 वादकांनी विशेष सांस्कृतिक सादरीकरणाची रचना केली आहे. तसेच, भारत सरकारच्या आवाहनानुसार, देशातील नागरिकांनी नुकत्याच गेलेल्या 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता देशभरात 'वंदे मातरम'चे सामूहिक गायन केले, असे अमित शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, 'वंदे मातरम'च्या 150 वर्षांच्या पूर्तीनिमित्त एक माहितीपट बनवण्यात आला आहे. देशभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात जनतेला पाहण्यासाठी, 'वंदे मातरम' वर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल. त्याचबरोबर, हे प्रदर्शन डिजिटल माध्यमातूनही कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवले जाईल.

सरकारने आकाशवाणी, दूरदर्शन आणि एफ एम रेडिओ वाहिन्यांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) माध्यमातून श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरांमध्ये चर्चा आणि सभांचे आयोजन केले जाईल. सर्व भारतीय दूतावासांमध्ये 'वंदे मातरम' वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. 'वंदे मातरम - सॅल्यूट टू मदर अर्थ(धरणीमातेला वंदन)' या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण सुरू आहे. महामार्गांवर देशभक्तीपर आणि 'वंदे मातरम' चा इतिहास दर्शवणारी भित्तिचित्रे देखील लावण्यात येतील. रेल्वे स्थानके आणि विमानतळांवर एलईडी फलकांद्वारे सार्वजनिक घोषणा केली जाईल. तसेच, 'वंदे मातरम' आणि बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या जीवनावर आधारित 25 लघुपट बनवण्याचे कामही सुरू झाले आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

अमित शाह म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा कोरोनाचा काळ असूनही देशाच्या कानाकोपऱ्यात दोन वर्षे, 'आझादी का अमृत महोत्सव' उपक्रम साजरा करण्यात आला. अमृत महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही देशातील युवा पिढीला 1857 ते 1947 पर्यंतच्या संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याची ओळख करून दिली. त्यांनी पुढे सांगितले की, स्वातंत्र्यलढ्यातील, इतिहासात कधीही नोंद झाली नाही अशा अनेक अनामवीरांची माहिती शोधून त्यांची स्मारके उभारण्यात आली, देशभरात अनेक कार्यक्रम झाले आणि देशभक्तीची एक नवी लाट उसळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या 75 वर्षांमध्ये आलेल्या सर्व सरकारांनी देशाला पुढे नेण्याचे मोठे काम केले आहे. आपण आपल्या लोकशाहीला खूप मजबूत केले आहे आणि आज आपल्या लोकशाहीची मुळे खूप बळकट झाली आहेत, असे त्यांनी सांगितले. शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यापासून ते 100 वर्षांपर्यंतच्या कालखंडाला ‘अमृत काळ’ असे नाव दिले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ते स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंतचा हा काळ आपण एक आव्हान म्हणून स्वीकारू असा संकल्प, पंतप्रधान मोदी यांनी देशातील युवावर्गापुढे ठेवला आहे. जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी केली जाईल, तेव्हा आपला देश जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी असेल. हा केवळ मोदीजींचा किंवा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा संकल्प नाही असे सांगत ते म्हणाले की, काही लोक याला राजकीय घोषणा मानतात, पण हा 140 कोटी भारतीयांचा संकल्प आहे आणि तो नक्कीच पूर्ण होईल. आपण अमृत काळ साजरा करत असतानाच 'वंदे मातरम'चे 150 वे वर्ष आले आहे, हा एक चांगला दैवीयोगच आहे. या माध्यमातून आपण राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे काम करू.

अमित शाह म्हणाले की, 'वंदे मातरम' कधीही अप्रासंगिक ठरणार नाही. ज्या काळात 'वंदे मातरम'ची रचना झाली, तेव्हा त्याची जितकी गरज होती, तितकीच ती आजही आहे. त्यांनी सांगितले की, त्या काळात 'वंदे मातरम' हे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कारण ठरले, तर अमृत काळात 'वंदे मातरम' ही देशाला विकसित आणि महान बनवण्याची घोषणा ठरेल.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, 'वंदे मातरम'चे संस्कार प्रत्येक मुलाच्या मनात पुन्हा जागृत करणे, प्रत्येक किशोरवयीन मुलाच्या मनात 'वंदे मातरम'चा घोष निर्माण करणे आणि प्रत्येक तरुण-तरुणीला 'वंदे मातरम' च्या भावार्थानुसार आपले जीवन समर्पित करण्यासाठी प्रेरित करणे, ही सभागृहातील सर्व सदस्यांची संयुक्त जबाबदारी आहे. त्यांनी सांगितले की, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या भारताची कल्पना केली होती, 'वंदे मातरम'चा जयघोष त्या भारताच्या निर्मितीचे कारण ठरावे.

सोनाली काकडे/नितीन फुल्लुके/सोनल तुपे/नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/राजश्री आगाशे/भक्ती सोनटक्के/तुषार पवार/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2201181) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Odia , Kannada , Malayalam