पंतप्रधान कार्यालय
हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2025 8:14PM by PIB Mumbai
आपणा सर्वांना नमस्कार,
येथे हिंदुस्तान टाइम्स शिखर परिषदेत देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आयोजकांचे आणि ज्यांनी आपले विचार मांडले त्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. थोड्याच वेळापूर्वी शोभना जींनी दोन मुद्दे मांडले, जे मी विशेष लक्षात घेतले आहेत. एक म्हणजे त्यांनी सांगितले की मागच्या वेळी मोदीजी आले होते, तेव्हा त्यांनी एक सूचना दिली होती. या देशात माध्यम संस्थांनी काय काम करावे, हे सांगण्याचे धैर्य कोणीही करू शकत नाही. पण मी ते केले होते, आणि मला आनंद आहे की शोभनाजी आणि त्यांच्या टीमने ते काम मोठ्या आवडीने केले. आणि देशाला – मी आत्ताच प्रदर्शन पाहून आलो – मी सर्वांना विनंती करतो की प्रदर्शन नक्की पाहा. या छायाचित्रकार सहकाऱ्यांनी त्या क्षणांना असे टिपले आहे की ते क्षण अमर झाले आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आणि तीही मी ज्या शब्दांत समजलो, त्यांनी म्हटले की तुम्ही पुढेही… त्या असेही म्हणू शकल्या असत्या की तुम्ही पुढेही देशाची सेवा करत राहा, पण हिंदुस्तान टाइम्सने असे म्हटले की तुम्ही पुढेही अशीच सेवा करत राहा, यासाठी मी विशेष आभार व्यक्त करतो.
मित्रांनो,
या वेळी परिषदेची संकल्पना आहे – “Transforming Tomorrow”. मला वाटते की ज्या हिंदुस्तान वृत्तपत्राला 101 वर्षांचा इतिहास आहे आणि ज्याला महात्मा गांधीजी, मदन मोहन मालवीयजी, घनश्यामदास बिर्लाजी यांसारख्या असंख्य थोर व्यक्तींचे आशीर्वाद लाभले आहेत, ते वृत्तपत्र जेव्हा “Transforming Tomorrow” यावर चर्चा करते, तेव्हा देशाला विश्वास वाटतो की भारतात घडत असलेला बदल हा केवळ शक्यतांचा विषय नाही, तर तो बदलत्या जीवनाचा, बदलत्या विचारांचा आणि बदलत्या दिशेचा खरा इतिहास आहे.
मित्रांनो,
आज आपल्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवसही आहे. सर्व भारतीयांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
मित्रांनो,
आज आपण त्या टप्प्यावर उभे आहोत जिथे 21व्या शतकाचा एक चतुर्थांश भाग पूर्ण झाला आहे. या 25 वर्षांत जगाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आर्थिक संकटे आली, जागतिक महामारी आली, तंत्रज्ञानाशी संबंधित मोठे बदल पाहिले, विखुरलेले जग पाहिले, युद्धसुद्धा पाहतो आहोत. या सगळ्या परिस्थिती विविध प्रकारे जगाला आव्हान देत आहेत. आज जग अनिश्चिततेने भरलेले आहे. पण अशा अनिश्चिततेच्या काळात भारत एका वेगळ्याच स्तरावर दिसत आहे. भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. जेव्हा जगात मंदीची चर्चा होते, तेव्हा भारत विकासाची कथा लिहितो. जेव्हा जगात विश्वासाचा अभाव दिसतो, तेव्हा भारत विश्वासाचा आधारस्तंभ बनत आहे. जेव्हा जग विघटनाच्या दिशेने जात आहे, तेव्हा भारत सेतू निर्माण करणारा बनत आहे.
मित्रांनो,
अलीकडेच भारतात दुसऱ्या तिमाहीचे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. 8 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीचा दर आपल्या प्रगतीच्या नव्या गतीचे प्रतिबिंब आहे.
मित्रांनो,
हे केवळ एक आकडेवारी नाही, तर हे एक मजबूत व्यापक आर्थिक संकेत आहे. हा संदेश आहे की भारत आज जागतिक अर्थव्यवस्थेचा “ग्रोथ ड्रायव्हर” बनत आहे. आणि ही आकडेवारी अशा काळात आहेत, जेव्हा जागतिक वाढ सुमारे 3 टक्क्यांच्या आसपास आहे. G-7 सदस्य देशांच्या अर्थव्यवस्था सरासरी 1.5 टक्क्यांच्या आसपास आहेत. अशा परिस्थितीत भारत “उच्च वाढ आणि कमी महागाई” प्रारुप बनला आहे. एक काळ असा होता, जेव्हा आपल्या देशात अर्थतज्ञ विशेष करून उच्च महागाईबद्दल चिंता व्यक्त करत होते. आज तेच तज्ञ घटलेल्या महागाईबद्दल बोलत आहेत.
मित्रांनो,
भारताची ही यशस्वी उपलब्धी साधी नाही. ही केवळ आकडेवारीची गोष्ट नाही, तर गेल्या दशकात भारताने घडवून आणलेला हा एक मूलभूत बदल आहे. हा बदल मजबूत बनण्याबाबत आहे, समस्यांचे उपाय शोधण्याच्या वृत्तीचा आहे, शंका-आशंका दूर करून आकांक्षांचा विस्तार करण्याचा आहे. आणि म्हणूनच आजचा भारत स्वतःही बदलत आहे सोबतच येणाऱ्या उद्यालाही बदलत आहे.
मित्रांनो,
आज आपण येथे “Transforming Tomorrow” यावर चर्चा करत असताना, आपल्याला हेही समजून घ्यावे लागेल की परिवर्तनाबद्दल जो विश्वास निर्माण झाला आहे, त्याचा पाया आज सुरू असलेल्या कामांची भक्कम पायाभरणी आहे. आजच्या सुधारणा आणि आजची कामगिरी आपल्या उद्याच्या परिवर्तनाचा मार्ग मोकळा करत आहेत. आपण कोणत्या विचारांनी काम करतो याचे एक उदाहरण मी देतो.
मित्रांनो,
आपणही जाणता की भारताच्या क्षमतेचा एक मोठा भाग दिर्घ काळपर्यंत अजूनही वापरात आलेला नव्हता. जेव्हा या “अस्पर्शित संभावनांना” जास्तीत जास्त संधी मिळतील, जेव्हा ते पूर्ण ऊर्जेसह, कोणत्याही अडथळ्याशिवाय देशाच्या विकासात सहभागी होतील, तेव्हा देशाचा कायापालट होणे निश्चित आहे. जरा विचार करा – आपला पूर्व भारत, आपला ईशान्य भारत, आपली गावे, श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरे, आपल्या देशाची नारीशक्ती, भारताची नवोन्मेषी युवा शक्ती, भारताची सागरी शक्ती, नील अर्थव्यवस्था, भारताचे अंतराळ क्षेत्र – किती तरी बाबी आहेत, ज्याची पूर्ण क्षमता मागील दशकांत वापरलीच गेली नाही.
आज भारत या “अस्पर्शित संभावनांना” वापरण्याच्या दृष्टीकोनातून पुढे जात आहे. आज पूर्व भारतात आधुनिक पायाभूत सुविधा, संपर्क प्रणाली आणि उद्योगांवर अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. आज आपली गावे, आपली छोटी शहरेही आधुनिक सुविधांनी सुसज्ज होत आहेत. आपली छोटी शहरे स्टार्टअप्स तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नवी केंद्रे बनत आहेत. आपल्या गावांमध्ये शेतकरी उत्पादक संघ तयार करून शेतकरी थेट बाजाराशी जोडले जात आहेत, आणि काही शेतकरी उत्पादक संघ तर जागतिक बाजाराशीही जोडले जात आहेत.
मित्रांनो,
भारताची नारीशक्ती आज कमाल करत आहे. आपल्या मुली आज प्रत्येक क्षेत्रात झळकत आहेत. हे परिवर्तन आता केवळ महिला सशक्तीकरणापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर समाजाची विचारसरणी आणि क्षमता – दोन्ही बदलत आहे.
मित्रांनो,
जेव्हा नवी संधी निर्माण होतात, जेव्हा अडथळे दूर होतात, तेव्हा आकाशात भरारी घेण्यासाठी नवे पंखही मिळतात. याचे एक उदाहरण म्हणजे भारताचे अंतराळ क्षेत्र. पूर्वी अंतराळ क्षेत्र पूर्णपणे सरकारी नियंत्रणातच होते. पण आम्ही या क्षेत्रात सुधारणा केल्या, ते खासगी क्षेत्रासाठी खुले केले, आणि त्याचे परिणाम आज देश पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच मी हैदराबादमध्ये स्कायरुट च्या “इनफिनीटी कॅम्पस” चे उद्घाटन केले. स्कायरुट ही भारताची खासगी अंतराळ कंपनी आहे. ही कंपनी दर महिन्याला एक रॉकेट तयार करण्याच्या क्षमतेवर काम करत आहे. ही कंपनी “Flight-Ready Vikram-1” तयार करत आहे. सरकारने व्यासपीठ दिले आणि भारताचा तरुण त्या व्यासपीठावर नवे भविष्य घडवत आहे – आणि हीच खरी बदलाची प्रक्रिया आहे.
भारतामध्ये होत असलेल्या आणखी एका बदलाची चर्चा करणे मला महत्त्वाचे वाटते. एक काळ असा होता जेव्हा भारतातील सुधारणा प्रतिगामी होत्या. राजकीय हेतू किंवा संकट व्यवस्थापनाच्या गरजेमुळे मोठे निर्णय घेतले जात होते. पण आज केल्या जाणाऱ्या सुधारणा राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार निश्चित लक्ष्यांसह अंमलात आणल्या जातात. तुम्ही पाहिले असेल देशाच्या प्रत्येक क्षेत्रात काहीतरी सुधारणा होत आहे. आपली गती स्थिर आहे. आपली दिशा सुसंगत आहे आणि आपला हेतू राष्ट्राला प्रथम स्थान देण्याचा आहे.
2025 हे संपूर्ण वर्ष अशा सुधारणांचेच वर्ष होते. सर्वात मोठी सुधारणा म्हणजे ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी’ मध्ये केलेले परिवर्तन आहे. संपूर्ण देशाने या सुधारणांचा परिणाम पाहिला आहे. यावर्षी प्रत्यक्ष कर प्रणालीमध्येही एक मोठी सुधारणा लागू करण्यात आली. 12लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर हे सर्वात महत्वाचे आणि मोठे एक पाऊल आहे. एक दशकापूर्वीही गोष्ट अकल्पनीय होती.
मित्रांनो,
ही सुधारणा सुरू ठेवण्यात आली असून अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वीच आता लहान कंपनीची व्याख्या-परिभाषा बदलण्यात आली. यामुळे हजारो कंपन्या सरलीकृत नियम जलद प्रक्रिया आणि सुधारित सुविधांखाली समाविष्ट होवू शकत आहेत. आम्ही अनिवार्य गुणवत्ता नियंत्रण आदेशांमधून जवळजवळ 200 उत्पादन श्रेणी देखील काढून टाकल्या आहेत.
मित्रांनो,
आजच्या भारताचा प्रवास केवळ विकासाचा नाही. तो विचारसरणीतील बदलाचा, मानसिक पुनर्जागरणाचा देखील आहे. कोणताही देश आत्मविश्वासाशिवाय प्रगती करू शकत नाही, ही गोष्ट तुम्हा सर्वांनाही चांगली माहिती आहे. दुर्दैवाने, भारताने प्रदीर्घ काळ गुलामगिरी अनुभवली, त्यामुळे या आत्मविश्वासाला धक्का दिला. अशी गुलामगिरीची मानसिकता विकसित होणे म्हणजे भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी एक मोठा अडथळा ठरणारे आहे. आणि म्हणूनच, आजचा भारत गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी काम करत आहे.
मित्रांनो,
ब्रिटिशांना हे चांगलेच माहित होते की, जर त्यांना भारतावर दीर्घकाळ राज्य करायचे असेल तर त्यांना भारतीयांचा आत्मविश्वास हिरावून घ्यावा लागेल आणि त्यांच्यात कनिष्ठतेची भावना निर्माण करावी लागेल. आणि त्या काळात ब्रिटीशांनी नेमके तेच केले. म्हणूनच, भारतीय कुटुंब रचनेला ‘जुनी’ –‘प्राचीन’ म्हणून लेबल लावले गेले, भारतीय कपडे अव्यावसायिक म्हणून लेबल लावले गेले, भारतीय सण आणि संस्कृतीला अविवेकी म्हणून लेबल लावले गेले, योग आणि आयुर्वेदाला अवैज्ञानिक, अशास्त्रीय म्हणून लेबल लावले गेले आणि भारतीय शोधांची थट्टा, टिंगल केली गेली. अशा प्रकारच्या विधानांची अनेक दशके, पिढ्यानपिढ्या पुनरावृत्ती होत राहिली आणि त्याच गोष्टींचा अभ्यास आणि शिकवला गेला. आणि त्यामुळे, भारतीयांचा आत्मविश्वास डळमळीत झाला.
मित्रांनो,
या गुलामगिरीच्या मानसिकतेच्या व्यापक परिणामाची काही उदाहरणे मी तुम्हाला देऊ इच्छितो. आज, भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. काही जण भारताला जागतिक विकास इंजिन म्हणतात, तर काही जण त्याला जागतिक पॉवरहाऊस अर्थात ‘उर्जागृह’ म्हणतात. आज अनेक अद्भुत गोष्टी घडत आहेत.
परंतु मित्रांनो,
भारत आज ज्या वेगवान वृध्दीचा, विकासाचा अनुभव घेत आहे त्याबद्दल तुम्ही कुठेही वाचले आहे का? तुम्ही कुठेही ऐकले आहे का? कोणी याला हिंदू विकास दर म्हणतो का? कोणी त्याला जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणतो का? त्याला हिंदू विकास दर कधी म्हटले गेले? ज्यावेळी भारताला दोन ते तीन टक्के विकासाची आकांक्षा होती, त्यावेळी तुम्हाला वाटते का की, एखाद्या देशाच्या आर्थिक वाढीला त्याच्या लोकांच्या श्रद्धा आणि ओळखीशी जोडणे अपघाताने घडले? नाही, ते गुलाम मानसिकतेचे प्रतिबिंब होते.
संपूर्ण समाज, संपूर्ण परंपरा, अनुत्पादकता आणि गरीबीचे समानार्थी बनवले गेले. याचा अर्थ असा की, भारताच्या मंद विकास दराचे कारण आपली हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृती होती; हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला. आता जरा कल्पना करा, आज जे तथाकथित बुद्धिजीवी सतत प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक पैलूत सांप्रदायिकता शोधतात, त्यांना हिंदूंच्या विकास दरात सांप्रदायिकता दिसली नाही. त्यांच्या काळात हा शब्द पुस्तकांचा आणि संशोधन पत्रांचा भाग बनवण्यात आला होता.
मित्रांनो,
गुलामगिरीच्या मानसिकतेने भारताची उत्पादन परिसंस्था कशी नष्ट, उद्ध्वस्त केली आणि आपण ती कशी पुनरुज्जीवित करत आहोत याची काही उदाहरणे मी इथे देईन. गुलामगिरीच्या काळातही भारत हा एक प्रमुख शस्त्रास्त्र उत्पादक देश होता. आपल्याकडे शस्त्रास्त्र कारखान्यांचे एक मजबूत जाळे होते. भारतातून शस्त्रे निर्यात केली जात होती. महायुद्धांमध्येही भारतीय बनावटीची शस्त्रे सक्षम होती. पण स्वातंत्र्यानंतर, आपली संरक्षण निर्मिती व्यवस्था नष्ट झाली. गुलामगिरीची मानसिकता इतकी प्रबळ झाली की, सरकारमधील लोकांनी भारतीय बनावटीची शस्त्रे कमी लेखण्यास सुरुवात केली आणि या मानसिकतेमुळे भारत जगातील सर्वात मोठ्या संरक्षण आयातदारांपैकी एक बनला.
मित्रांनो,
गुलामगिरीच्या मानसिकतेने जहाजबांधणी उद्योगाचेही असेच केले. शतकानुशतके भारत एक प्रमुख जहाजबांधणी केंद्र होते. 5-6 दशकांपूर्वी म्हणजेच 50-60 वर्षांपूर्वी, भारताचा चाळीस टक्के व्यापार भारतीय जहाजांव्दारे होत असे. परंतु गुलामगिरीच्या मानसिकतेने परदेशी जहाजांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. परिणाम सर्वांना स्पष्ट आहे. एकेकाळी सागरी शक्ती असलेला देश आता 95% व्यापारासाठी परदेशी जहाजांवर अवलंबून आहे. आणि यामुळेच, आज भारत दरवर्षी परदेशी शिपिंग कंपन्यांना अंदाजे 75 अब्ज डॉलर किंवा अंदाजे 6 लाख कोटी रुपये देत आहे.
मित्रांनो,
जहाजबांधणी असो किंवा संरक्षण उत्पादन असो, प्रत्येक क्षेत्र गुलामगिरीची मानसिकता सोडून, नवीन वैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे.
मित्रांनो,
गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे भारतामधील प्रशासनाच्या दृष्टिकोनाचेही मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच काळापासून, सरकारी यंत्रणेने स्वतःच्या नागरिकांवर अविश्वास दाखवला होता. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी, एखाद्या व्यक्तीला स्वतःचे कागदपत्रे सरकारी अधिकाऱ्याकडून प्रमाणित करावी लागत होती. जोपर्यंत त्या व्यक्तीने त्यावर शिक्का मारला नाही तोपर्यंत सर्व काही खोटे मानले जात असे. प्रमाणपत्र हा तुमचा कष्टाने मिळवलेला पुरावा आहे. आम्ही अविश्वासाची ही भावना मोडून काढली आणि स्वतःला प्रमाणित करणे पुरेसे मानले. माझ्या देशातील नागरिक म्हणतात, "भाऊ, मी हे म्हणत आहे; माझा त्यावर विश्वास आहे."
मित्रांनो,
आपल्या देशात अशा तरतुदी होत्या, जिथे किरकोळ चुका देखील गंभीर गुन्हे मानल्या जात होत्या. आम्ही सार्वजनिक विश्वास कायदा लागू केला आणि अशा शेकडो तरतुदींना गुन्हेगारी ठरविण्याच्या भयातून मुक्त केले.
मित्रांनो,
पूर्वी, बँकेकडून एक हजार रुपयांचे कर्ज घेतले तरी बँक हमी मागत असे, कारण अविश्वासाचे प्रमाण जास्त होते. मुद्रा योजनेद्वारे आम्ही अविश्वासाचे हे दुष्टचक्र तोडले. या योजनेअंतर्गत, आम्ही आमच्या देशवासियांना आधीच 37 लाख कोटी रुपयांचे हमीमुक्त कर्ज दिले आहे. या पैशाने त्या कुटुंबातील तरुणांना उद्योजक बनण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. आज, रस्त्यावरील विक्रेते आणि हातगाडी चालकांनाही बँकांकडून कोणत्याही हमीशिवाय पैसे दिले जात आहेत.
मित्रांनो,
आपल्या देशात नेहमीच असे मानले जाते, की जर सरकारला आपण काही दिले तर ते एकतर्फीच असते. एकदा दिले की ते गेले आणि ते परत येत नाही. ते गेले, म्हणजे गेलेच कायमचे!हा प्रत्येकाचा अनुभव आहे. पण जेव्हा सरकार आणि जनता यांच्यात विश्वासाचे मजबूत नातेसंबंध असतात, तेव्हा हे कार्य कसे घडते?
जर आपल्याला उद्या काहीतरी चांगले करायचे असेल ना,तर आपण आज मनात चांगला हेतू बाळगायला हवा. जर मन चांगले असेल तर आपला उद्या देखील चांगलाच असेल़ आणि म्हणूनच आपण आणखी एक मोहीम घेऊन येत आहोत,तुम्हाला त्याची माहिती ऐकून आश्चर्य वाटेल की अद्याप वर्तमानपत्रांत ती आलेली नाही किंबहुना वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतलीच गेली नाही. पुढे देखील त्यांच्या नजरेस पडेल का नाही सांगू शकत नाही. मला माहित नाही होईल की नाही, परंतु आता कदाचित त्यांच्या नजरेस पडेल.
आज देशभरातील बँकांमध्ये आपल्याच देशातील काही नागरिकांचे 78000 कोटी बेहिशेबी रुपये पडून आहेत,हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल.अक्षरशः ते 78000 कोटी कोणाचे आहे, कोणाच्या मालकीचे आहे किंवा ते कुठे आहेत, हे कोणालाही माहिती नाही.या पैशांबद्दल विचारणारे कोणीही नाही. त्याचप्रमाणे, विमा कंपन्यांकडे अंदाजे 14,000 कोटी रुपये पडून आहेत. म्युच्युअल फंड कंपन्यांकडे अंदाजे 3,000 कोटी रुपये आहेत.9,000 कोटी रुपये लाभांशाचे म्हणून पडून आहेत. आणि हे सर्व बेवारशी पैसे आहेत, ज्याचा कोणीही मालक नाही.
हे पैसे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आहेत आणि म्हणूनच, ज्यांचे आहेत ते विसरून गेले आहेत. आमचे सरकार आता त्यांच्या दावेदारांचा देशभर शोध घेत आहे. "मला सांगा, ते पैसे तुमचे नव्हेत का? ते तुमच्या पालकांचे होते का? कोणी ते मागे टाकून गेले होते का? आम्ही त्याचाच शोध घेत आहोत." आमचे सरकार योग्य मालकांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे. आणि यासाठी, सरकारने विशेष शिबिरे घेण्यास सुरुवात केली आहे, जे लोकांना समजावत आहेत,सांगा कुणाला माहीत आहे का? की कोणी शोधू शकेल का. तुमचे पैसे कुठेतरी हरवले आहेत का? ते गायब झाले आहेत का? आतापर्यंत, आम्ही जवळजवळ 500 जिल्ह्यांमध्ये अशी शिबिरे आयोजित केली आहेत आणि हजारो कोटी रुपये योग्य लाभार्थ्यांना दिले आहेत. पैसे तिथेच पडले होते, ते मागण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते, पण हे मोदी आहेत, ते शोधत आहेत, अरे मित्रांनो, ते तुमचे आहेत ना,मग या ते घेऊन जा.
मित्रांनो,
हे फक्त मालमत्तेच्या परतफेडीविषयी नाही; हे विश्वासाबद्दल आहे. ते जनतेचा कायमस्वरूपी विश्वास मिळवण्याच्या वचनबद्धतेविषयी आहे आणि जनतेचा विश्वास हीच आमच्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. जर गुलामगिरीची मानसिकता असती तर सरकारची मानसिकता साहेबी वृत्तीची असती आणि अशा मोहिमा कधीही राबवल्या गेल्या नसत्या.
मित्रांनो,
आपल्या देशाला आपण प्रत्येक क्षेत्रातील गुलामगिरीच्या मानसिकतेपासून पूर्णपणे मुक्त केले पाहिजे. काही दिवसांपूर्वीच मी राष्ट्राला आवाहन केले होते. मी प्रेमाने हात जोडून विनंती करतो, की देशवासीयांनो, येत्या 10 वर्षांच्या कालावधीत,तुम्ही हे करण्यासाठी माझ्यासोबत सामील व्हा. 140 कोटी नागरिकांच्या पाठिंब्याशिवाय मी हे करू शकणार नाही. आणि म्हणूनच मी माझ्या देशवासियांना वारंवार हात जोडून सांगतो आहे, आणि या 10 वर्षांच्या कालावधीत मी काय मागतो आहे? भारतात मानसिक गुलामगिरीची बीजे पेरणाऱ्या मॅकॉलेच्या धोरणाला 2035 मध्ये 200 वर्षे उलटतील. म्हणजे 10 वर्षे शिल्लक आहेत. आणि म्हणूनच, या दहा वर्षांत, आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्त करण्यासाठी काम केले पाहिजे.
मित्रांनो,
मी अनेकदा म्हणतो, आपण चुकीच्या मार्गावरून वाटचाल करणारे लोक नाही. चांगल्या उद्यासाठी, आपण आपले क्षितिज विस्तृत केले पाहिजे. देशाच्या भविष्यातील गरजा समजून घेतल्या पाहिजेत आणि वर्तमानात उपाय शोधले पाहिजेत. आजकाल, तुम्ही मला मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमांवर सतत चर्चा करताना पाहता. शोभनाजींनीही त्यांच्या भाषणात त्यांचा उल्लेख केला. जर अशा मोहिमा चार-पाच दशकांपूर्वी सुरू झाल्या असत्या तर आज भारताची छबी काही वेगळी दिसली असती. पण त्या काळातील सरकारांचे प्राधान्यक्रम वेगळे होते. तुम्हाला सेमीकंडक्टरची कहाणी देखील माहिती आहे. सुमारे 50-60 वर्षांपूर्वी, पाच-सहा दशकांपूर्वी, एक कंपनी सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी भारतात आली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि देश सेमीकंडक्टर उत्पादनात खूपच मागे पडला.
मित्रांनो,
हीच परिस्थिती ऊर्जा क्षेत्राची देखील आहे. आज भारत दरवर्षी सुमारे 125 लाख कोटी रुपयांचे पेट्रोल, डिझेल आणि गॅस आयात करतो.अक्षरश: 125 लाख कोटी रुपयांचे.आपल्या देशाला सूर्यदेवाचे वरदान लाभले आहे, तरीही 2014 पर्यंत भारताची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता फक्त 3 गिगावॅट होती. तुम्ही मला या पदावर आणून बसवले नव्हते तोपर्यंतची म्हणजे मी 2014 पर्यंतच्या स्थितीचे वर्णन करतोय. 3 गिगावॅट,गेल्या 10 वर्षांत हे वाढत गेले असून ते आता सुमारे 130 गिगावॅटपर्यंत वाढले आहे. आणि यापैकी, भारताने केवळ रूफटॉप सोलरमधून 22 गिगावॅट पर्यंत क्षमता मिळवली आहे. फक्त छतावरील सौर ऊर्जेतून( रूफटॉप सोलरमधून) २२ गिगावॅट ऊर्जा.
मित्रांनो,
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेमुळे देशातील जनतेला ऊर्जा सुरक्षेच्या या मोहिमेत थेट सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मी काशीचा खासदार आहे. पंतप्रधान म्हणून माझी कर्तव्ये आहेत, पण खासदार म्हणूनही मला काही काम करायचे आहे. काशीचा खासदार म्हणून मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. आणि तुमच्या हिंदी वृत्तपत्रात सामर्थ्य आहे, त्यामुळे ती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. काशीतील 26,000 हून अधिक घरांमध्ये पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प बसवले गेले आहेत. यामुळे दररोज तीन लाख युनिटपेक्षा जास्त वीज निर्माण होत आहे आणि लोकांची दरमहा अंदाजे 5 कोटी रुपयांची बचत होत आहे.म्हणजे दरवर्षी 60 कोटी रुपयांची बचत होते आहे.
मित्रांनो,
एवढ्या मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा निर्माण झाल्यामुळे दरवर्षी अंदाजे 90,000 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी होत आहे. एवढे कार्बन उत्सर्जन भरून काढण्यासाठी आपल्याला 40 लाखांहून अधिक झाडे लावावी लागतील. आणि मी पुन्हा सांगतो की, मी दिलेले हे आकडे फक्त काशी आणि बनारससाठी आहेत; मी संपूर्ण देशाबद्दल बोलत नाहीये. यावरून पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा देशाला किती भरघोस लाभ होत आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. आजच्या एका योजनेत भविष्य बदलण्याचे केवढे मोठे सामर्थ्य असते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
मित्रांनो,
तुम्ही मोबाईल उत्पादनाची आकडेवारी पाहिली असेल. 2014 सालापूर्वी, आम्ही आमच्या मोबाईल फोनच्या गरजेच्या 75% इतके फोन आयात करत होतो. आता, भारताची मोबाईल फोन आयात जवळजवळ शून्यावर आली आहे. आतातर, आपण एक प्रमुख मोबाईल फोन निर्यातदार बनत आहोत. 2014 नंतर, आम्ही एक रीफॉर्म केला (सुधारणा अंमलात आणली), देशाने परफॉर्म केला (कामगिरी करून दाखवली) आणि आज जग त्याचे परिवर्तनकारी परिणाम पाहत आहे.
मित्रांनो,
Transforming tomorrow, उद्याच्या परिवर्तनाचा हा प्रवास अशा अनेक योजना, अनेक धोरणे, अनेक निर्णय, जनतेच्या आकांक्षा आणि सार्वजनिक सहभागाचा प्रवास आहे. हा प्रवास निरंतर सुरू असणार आहे. हा केवळ एकाच शिखर परिषदेच्या चर्चेपुरता मर्यादित नाही; तर तो भारतासाठी एक राष्ट्रीय संकल्प आहे. या संकल्पासाठी सर्वांचा पाठिंबा, सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. सामूहिक प्रयत्नांमुळेच आपल्याला परिवर्तनाच्या या उंचीवर पोहोचण्याची संधी नक्की मिळेल.
मित्रांनो,
पुन्हा एकदा, तुमच्यासोबत राहण्याची आणि तुम्ही कधीकधी सुचवलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी दिल्याबद्दल मी शोभनाजी आणि हिंदुस्तान टाईम्सचा मनापासून आभारी आहे. मला विश्वास आहे की हे कदाचित देशातील छायाचित्रकारांसाठी एक नवीन शक्ती बनेल. भविष्यात तुम्ही अशा अनेक नवीन कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार देखील करू शकता. जर तुम्हाला माझी मदत हवी असेल तर कृपया मला कळवा. मी माझ्या संकल्पनांसाठी कोणतेही मानधन घेत नाही. हा एक विनामूल्य करायचा व्यवसाय आहे आणि आम्ही मारवाडी कुटुंबातील आहोत, म्हणून आम्ही ही संधी गमावणार नाही. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. नमस्कार.
***
हर्षल अकुडे/श्रद्धा मुखेडकर/सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2199985)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Bengali-TR
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada