राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुनर्संचयित 'मुरालीवाला' या मूकपटाचा विशेष खेळ
पुनर्संचयित संगिताच्या थेट सादरीकरणाने प्रेक्षकांना दिला 1920 च्या दशकाचा रमणीय अनुभव
राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशन अंतर्गत 18 पुनर्संचयित अभिजात चित्रपट 'इंडियन पॅनोरमा स्पेशल पॅकेज' विभागाअंतर्गत दाखवले जात आहेत
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2025
आज इफ्फीच्या चौथ्या दिवशी 'मुरलीवाला' (Muraliwala) या पुनर्संचयित (Restored) अभिजात मूकपटाचा खेळ झाला. त्यामुळे आजचा दिवस इफ्फी रसिकांसाठी एका मंतरलेल्या दिवसाचा अनुभव देणारा ठरला.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने आपल्या संयुक्तपणे राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशन अंतर्गत 18 अभिजात चित्रपटांचे पुनर्संचयन केले आहे. या सर्व चित्रपटांचे खेळ यंदाच्या इफ्फी मध्ये 'इंडियन पॅनोरमा स्पेशल पॅकेज' या विभागाअंतर्गत दाखवले जात आहे. या अभिजात चित्रपट कलाकृतींच्या संग्रहात हिंदी, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि मराठी चित्रपटांचा समावेश असून, प्रत्येक चित्रपटाची मूळ कलात्मक अभिव्यक्ती कायम राहील अशा तऱ्हेने, संग्रहासाठीच्या मानकांचे कठोरपणे पालन करत या चित्रपटांचे जतन केले आहे.

मूकपटाचा काळ पुन्हा झाला जिवंत
या चित्रपटांच्या खेळांच्या निमित्ताने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आजच्या पिढीला मूकपटांतील जिवंतपणाचा अनुभव घेण्याची संधी मिळावी, संगीतकारांना समोरच्या रांगेत बसवून, प्रेक्षकांकरता ते थेट संगीत सादर करतील अशा स्वरुपातला हा अनुभव त्यांना देता यावा हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिभावान संगितकार राहुल रानडे यांच्या मार्गदर्शनात हे क्षण, त्याच उत्साहपूर्णतेने आणि भव्यतेने जिवंत झाले असल्याची अनुभूती येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संगीतकार राहुल रानडे ही या संवाद सत्राला उपस्थित होते. 98 वर्षांपूर्वी बनवलेल्या चित्रपटासाठी पुन्हा संगीत देणे, त्याचे थेट सादरीकरण, ही आपल्यासाठी आणि आपल्या संपूर्ण चमूसाठी मोठ्या सन्मानाची आणि तितकीच आव्हानात्मक बाब होती असे त्यांनी सांगितले. बाबूरावजी यांनी 1927 मध्ये कसा चित्रपट बनवला, त्यासाठी त्यांनी कशा प्रकारचे संगिताच्या विशेष रचना वापरल्या - तयार केल्या याचा अनुभव प्रेक्षकांना घेता येईल, आपण स्वतः आणि आपला चमू या सादरीकरणाला न्याय देऊ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, चित्रपट दिग्दर्शक आणि कलाकार असलेले दिवंगत बाबूराव पेंटर यांनी बनवलेला 'मुरालीवाला' (1927), हा चित्रपट, आजही अस्तित्वात असलेल्या काही मोजक्या भारतीय मूकपटांपैकी एक आहे, इतकेच नाही तर तो राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशनअंतर्गतच्या सर्वात दुर्मिळ खजिन्यापैकी एक आहे. या चित्रपटाच्या खेळाने प्रेक्षकांना 1920 च्या दशकातील चित्रपट प्रदर्शनाची स्मरण करून देणारा भावनिक अनुभव दिला. विशेष म्हणजे, बाबूराव पेंटर यांच्या दोन मुलींही या चित्रपटाच्या खेळासाठी उपस्थित होत्या.

उत्साहवर्धक सोहळ्यांचे वर्ष
यंदाच्या इफ्फीमध्ये दाखवला जाणाऱ्या चित्रपटांचा संग्रह खरे तर ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचा ठरला आहे. यंदाच्या चित्रपटांच्या खेळांमधून व्ही शांताराम यांच्या 125 वर्षांच्या वारशाचा सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर गुरु दत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, भूपेन हजारिका, पी. भानुमती, सलील चौधरी आणि के. वैकुंठ यांसारख्या महान कलाकारांनाही त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहिली जात आहे. यंदाच्या महोत्सवातून आधुनिक भारतीय सिनेमाच्या स्वरूपाला, आयाम देण्यात महत्वाची भूमिका बजावत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ स्थापनेची 50 वर्षपूर्तीही साजरी केली जात आहे.
याच बरोबरीने श्याम बेनेगल यांच्या Susman या चित्रपटाचा खेळही यंदाच्या महोत्सवात झाला. आणि त्याने सिनेरसिकांसमोर या द्रष्ट्या चित्रपट दिग्दर्शकाचा भारतीय कथात्मक मांडणीवरील चिरस्थायी प्रभावही ठळकपणे अधोरेखित केला.
राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नोव्हेंबर 2016 मध्ये सुरु केलेले राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान म्हणजे भारताच्या सर्वाधिक महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वपूर्ण संवर्धन उपक्रमांपैकी एक मानले जाते. भारताच्या सिनेमॅटिक वारशाचे जतन करणे आणि कॅमेऱ्याच्या निगेटिव्हपासून चित्रपट प्रदर्शनाच्या प्रिंट्स पर्यंत हक्कधारक, संग्राहक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळवलेल्या दुर्मिळ संग्रहातील खजिन्याचे जतन, संवर्धन, डिजिटायझेशन आणि पुनर्संचयन करणे हा यामागील हेतू आहे. यातील एक अत्यंत महत्वाचा वारसा चित्रपट मुरलीवाला – (बाबुराव पेंटर/ मूक/ 45 मिनिटे) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी मध्ये काल प्रदर्शित करण्यात आला.
इफ्फी 2025 या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी केलेले भारतीय चित्रपटांचे पुनर्संचयन हे या प्रयत्नांतील उत्तम उदाहरण असून प्रत्येक फ्रेम अतिशय काळजीपूर्वक पुनर्संचयित केली असून अचूकतेने रंगवली आहे.
इफ्फी 2025 साठी पुनर्संचयित केलेले भारतीय चित्रपट म्हणजे बारकाईने केलेल्या प्रयत्नांचे प्रतीक आहेत, प्रत्येक फ्रेम कष्टाने पुनर्संचयित केली गेली आहे आणि चित्रपट निर्माते, सिनेमॅटोग्राफर किंवा त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यात अचूक रंगसुधारणा करण्यात आली आहे.
या महोत्सवाचे एक आकर्षण म्हणजे ऋत्विक घटक यांनी लिहिलेले पुनर्संचयित केलेले सुवर्णरेखा, जे NFDC-NFAI संग्रहातील 35 मिमी मास्टर पॉझिटिव्हमधून पुनरुज्जीवित केले असून याचे अंतिम रंग श्रेणीकरण छायाचित्रकार अविक मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे.
मुजफ्फर अली यांच्या उमराव जान या कलाकृतीला 35 मिमी रिलिज प्रिंट मधून पुनर्संचयित करण्यात आले आहे, या चित्रपटाची मूळ प्रत अतिशय दुरावस्थेत असल्याने, अली यांच्या वैयक्तिक देखरेखीखाली रंगश्रेणी प्रक्रिया करण्यात आली, मात्र ते करताना चित्रपटाची वैशिष्ट्यपूर्ण रंगसौंदर्य नजाकत तंतोतंत जपली आहे.
ही पुनर्संचय प्रक्रिया भारताच्या अतिशय प्रभावशाली अशा सिनेसृष्टीतील व्यक्तिमत्त्वांच्या वारशाचा सन्मान करते, त्यामुळे आपल्या चित्रपटांचा वारसा जपण्याच्या देशाचा निर्धार दृढ होतो आणि या कलाकृतींच्या माध्यमातून त्यातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कलात्मक कथा नवीन पिढीपर्यंत पोहोचतील याची खात्री होते.
इंडियन पॅनोरमा स्पेशल पॅकेजसाठी तयार केलेल्या पुनर्संचयित चित्रपटांची यादी
1. उमराव जान (मुझफ्फर अली - हिंदी/145 मिनिटे/ 4K DCP)
2. मल्लिसवारी (बी .एन. रेड्डी/तेलुगु/175 मिनिटे/ 4K DCP)
3. रुदाली (कल्पना लाजमी/ हिंदी/128 मिनिटे/ 4K DCP)
4. गमन – (मुझफ्फर अली / हिंदी/119 मिनिटे/ 4K DCP)
5. फिअर (ऋत्विक घटक/हिंदी/18 मिनिटे/4K DCP)
6. सुवर्णरेखा (ऋत्विक घटक/ बंगाली/143 मिनिटे/ 4K DCP)
7. मुरलीवाला – (बाबुराव पेंटर/ मूक/ 45 मिनिटे)
8. पार्टी (गोविंद निहलानी/हिंदी/118 मिनिटे/2K DCP)
9. C.I.D (राज खोसला/हिंदी/146 मिनिटे/4K DCP)
10. प्यासा (गुरु दत्त/हिंदी/146 मिनिटे/4K DCP)
11. एक डॉक्टर की मौत (तपन सिन्हा/हिंदी/122 मिनिटे/4K DCP)
12. एक होता विदुषक (जब्बार पटेल/मराठी/168 मिनिटे/ 4K DCP)
13. किरीडम (सिबी मलयिल/ मल्याळम/ 124 मिनिटे/ 4K DCP)
14. डॉ. कोटणीस की अमर कहानी (व्ही. शांताराम/ हिंदी/ 100 मिनिटे/ 2K DCP)
15. सुस्मन (श्याम बेनेगल/ हिंदी/ 140 मिनिटे/ 2K DCP)
16. मुसाफिर (हृषिकेश मुखर्जी/हिंदी/127 मिनिटे/4K DCP)
17. शहीद (रमेश सैगल/हिंदी/ 1948/ 4K DCP)
18. गीतांजली (मणिरत्नम/तेलुगु/137 मिनिटे/4K DCP)
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Post Link: https://x.com/PIB_Panaji/status/1991438887512850647?s=20
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/तुषार पवार/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2193610
| Visitor Counter:
15