पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित


भारत आणि भूतानमध्ये शतकानुशतकांचे अत्यंत दृढ, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंध आहेत आणि म्हणूनच या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होणे ही भारताची आणि माझी वचनबद्धता आहे, परंतु आज मी खूप जड अंतःकरणाने येथे आलो आहे: पंतप्रधान

दिल्लीत काल संध्याकाळी घडलेल्या भयानक घटनेने सर्वांनाच अस्वस्थ केले आहे, आमच्या संस्था या कटाची पाळेमुळे शोधून काढतील, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, यासाठी जबाबदार लोकांना शासन होईल: पंतप्रधान

भारत 'वसुधैव कुटुंबकम', म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, या आपल्या प्राचीन आदर्शा पासून प्रेरणा घेऊन, प्रत्येकासाठी आनंद, या संकल्पनेवर भर देत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

भूतानच्या महाराजांनी मांडलेली "सकल राष्ट्रीय आनंद" ही संकल्पना जगाचा विकास परिभाषित करण्यासाठी महत्त्वाचा निकष बनली आहे: पंतप्रधान

भारत आणि भूतान केवळ सीमांनी जोडलेले नाहीत, तर ते संस्कृतींनी जोडले गेले आहेत, आपले नाते मूल्ये, भावना, शांती आणि प्रगतीचे आहे असे पंतप्रधानांचे प्रतिपादन

आज भूतान हा जगातील पहिला कार्बन-निगेटिव्ह देश बनला असून, ही एक असाधारण कामगिरी असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

दरडोई नवीकरणीय ऊर्जा निर्मितीमध्ये भूतानचे स्थान जगातील आघाडीच्या देशांमध्ये असून, हा देश आपली 100% वीज नूतनीकरणक्षम स्त्रोतांपासून मिळवतो, या क्षमतेचा विस्तार करून आज आणखी एक मोठे पाऊल उचलले जात आहे: पंतप्रधान

कनेक्टिविटी संधी निर्माण करते आणि संधी समृद्धी आणते, भारत आणि भूतान शांतता, समृद्धी आणि सामायिक प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहोत: पंतप्रधान मोदी

Posted On: 11 NOV 2025 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 नोव्हेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमधील थिंपू येथील चांगलीमेथांग सेलिब्रेशन ग्राउंड येथे भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त  आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना शुभेच्छा दिल्या. राजघराण्यातील सन्माननीय सदस्य, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि इतर उपस्थित मान्यवरांना त्यांनी आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आजचा दिवस भूतानसाठी, भूतानच्या राजघराण्यासाठी आणि जागतिक शांततेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचा दिवस आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारत आणि भूतान यांच्यातील शतकानुशतकांच्या भावनिक आणि सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकून, या  महत्त्वाच्या दिवशी सहभागी होण्यासाठी भारत आणि आपण स्वतः वचनबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. तथापि, काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयानक घटनेने सर्वांनाच खूप 

अस्वस्थ केले आहे, त्यामुळे आपण अत्यंत जड अंतःकरणाने भूतानमध्ये पोहोचलो, असे मोदी यांनी नमूद केले. यामधील पीडित कुटुंबांच्या दुःखाची आपल्याला जाणीव असून, संपूर्ण देश त्यांच्याबरोबर आहे, असे ते म्हणाले. या घटनेच्या तपासात सहभागी असलेल्या सर्व यंत्रणांशी आपण रात्रभर सतत संपर्कात होतो, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय संस्था हा संपूर्ण कट उघडकीला आणतील, आणि या कटासाठी  जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.  “सर्व जबाबदार लोकांना शिक्षा होईल,” असे पंतप्रधान म्हणाले.

मोदी यांनी नमूद केले की, गुरु पद्मसंभव, यांच्या आशीर्वादाने आज भूतानमध्ये जागतिक शांती प्रार्थना महोत्सव आयोजित केला जात आहे, आणि त्याचबरोबर भगवान बुद्धांच्या पिपरहवा  अवशेषांचे पवित्र दर्शनदेखील होणार आहे. आज चौथ्या महाराजांचा 70 व्या जन्मदिनाचा उत्सव साजरा होत असून, या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत, यामधून भारत-भूतान संबंधांचे सामर्थ्य दिसून येते, असे ते म्हणाले.

भारत कायमच वसुधैव कुटुंबकम् अर्थात अवघे जग एकच कुटुंब आहे या आपल्या प्राचीन आदर्शापासून प्रेरणा घेत आल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी सर्वे भवन्तु सुखिनः हा मंत्र म्हणत भारताच्या वतीने वैश्विक  आनंदासाठी प्रार्थनाही केली. स्वर्गात, अवकाशात, पृथ्वीवर, पाण्यात, वनस्पती, वनराई, आणि सर्व सजीव प्राणीमात्रांच्या शांततेसाठी प्रार्थना करत, त्यांनी त्यासाठीचे वैदिक श्लोकही म्हणून दाखवले. या भावनांसह, भारत भूतानमधील जागतिक शांती प्रार्थना उत्सवात सहभागी होत आहे, या उत्सवाच्या निमित्ताने जगभरातील संत जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याकरता एकवटले आहेत, 140 कोटी भारतीयांच्या प्रार्थनाही या सामुदायिक भावनेचाच भाग आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गुजरातमधील वडनगर, हे आपले जन्मस्थान आहे, बौद्ध परंपरेशी जोडलेले एक पवित्र स्थळ असल्याची फारच कमी जणांना माहिती असल्याचे ते म्हणाले. यासोबतच उत्तर प्रदेशातील वाराणसी, ही आपली कर्मभूमीदेखील भगवान बौद्धांच्या आदर्शांचे शिखरस्थान असल्याचे ते म्हणाले. यामुळेच या समारंभाला उपस्थित राहता येणे हे व्यक्तिशः आपल्याला अर्थपूर्ण वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. शांततेचा दीप भूतानमधील प्रत्येक घरात आणि जगभर प्रज्ज्वलित व्हावा अशी कामनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी पंतप्रधानांनी भूतानच्या चौथ्या महाराजांच्या कार्याचा गौरवही केला. चौथ्या राजांचे जीवनकार्य हे बुद्धिमत्ता, साधेपणा, शौर्य, आणि राष्ट्रासाठी निःस्वार्थ सेवेचा संगम असल्याचे  ते म्हणाले. चौथ्या महाराजांनी लहान वयातच वयाच्या 16 व्या वर्षी  मोठी जबाबदारी स्वीकारली होती, त्यांनी पितृतुल्य स्नेह आणि दूरदर्शी नेतृत्वाने देशाची जडणघडण केली असे पंतप्रधान म्हणाले.  चौथ्या महाराजांनी आपल्या  34 वर्षांच्या राजवटीत, भूतानचा विकास सुनिश्चित करतानाच, आपल्या वारशाचेही जतन करत प्रगतीमय वाटचाल केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. लोकशाही संस्थांची स्थापना करण्यापासून ते सीमावर्ती भागांमध्ये शांतता राखण्याण्यापर्यंत, चौथ्या महाराजांनी निर्णायक भूमिका बजावल्याचे ते म्हणाले. चौथ्या महाराजांनी सकल राष्ट्रीय आनंदाची संकल्पना मांडली होती. त्यांची ही संकल्पना प्रगतीच्या व्याख्येचा  जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त मापदंड बनली आहे असे ते म्हणाले. राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया ही फक्त सकल राष्ट्रीय उत्पादनाशी जोडलेली नसून, तिला मानवतेच्या कल्याणाचाही जोड आहे, हेच महाराजांनी दाखवून दिले असे ते म्हणाले.

भूतानच्या चौथ्या महाराजांनी भारत आणि भूतानमधील मैत्री दृढ करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यासाठी महाराजांनी रचलेला पाया दोन्ही देशांमधील संबंध उत्तरोत्तर दृढ होण्याची सुनिश्चिती करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी सर्व भारतीयांच्या वतीने, महाराजांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी कामनाही व्यक्त केली.

भारत आणि भूतान केवळ सीमांनी जोडलेले नाहीत, तर ते संस्कृतीने जोडलेले आहेत. दोन्ही देशांमधील संबंध, मूल्ये, भावना, शांतता आणि प्रगतीशी जोडलेले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. वर्ष 2014 मध्ये आपण पदभार स्वीकारल्यानंतर भूतानला दिलेल्या पहिल्या परदेश भेटीचे स्मरणही पंतप्रधानांनी यावेळी केले. या भेटीच्या आठवणी अजूनही आपल्याला भावूक करतात असे ते म्हणाले. भारत आणि भूतानमधील परस्पर संबंधांचे सामर्थ्य आणि समृद्धीही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केली. हे दोन्ही देश आव्हानात्मक काळात एकजुटीने  उभे राहिले, एकत्रितपणे आव्हानांना सामोरे गेले, आणि आताही एकत्रितपणेच प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर  पुढे जात आहेत, असे ते म्हणाले. महाराज भूतानला नवीन उंची गाठून देण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत, अशावेळी भारत आणि भूतानमधील विश्वास आणि प्रगतीची ही भागीदारी या संपूर्ण प्रदेशासाठीचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरले आहे असे ते म्हणाले.

सद्यस्थितीत भारत आणि भूतान वेगाने प्रगती करत असल्यामुळे, दोन्ही देशांमधील  ऊर्जा क्षेत्राअंतर्गतची भागीदारी देखील या प्रगतीला चालना देत असल्याचे ते म्हणाले. भारत आणि भूतानमधील जलविद्युत क्षेत्रासंबंधी परस्पर सहकार्याचा पाया चौथ्या महाराजांच्या नेतृत्वाखाली घातला गेला होता याचे स्मरणही त्यांनी करून दिले. चौथे महाराज आणि पाचवे महाराज या दोघांनीही भूतानमध्ये शाश्वत विकास आणि पर्यावरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनाचे कायमच समर्थन केल्याचे ते म्हणाले. या दूरदर्शीपणामुळेच भूतानला जगातील पहिला कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत धोका नसलेला देश म्हणून ओळख मिळवता आली असल्याचे त्यांनी सांगितले, आणि हे एक अनन्यसाधारण यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरडोई नवकरणीय ऊर्जा निर्मितीमध्ये भूतान जगातील अग्रगण्य देशांपैकी एक आहे आणि सध्या  शंभर टक्के वीज निर्मिती नवीकरणीय ऊर्जेतून करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या क्षमतेचा आणखी विस्तार करत, आज 1,000 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचा एक नवीन जलविद्युत प्रकल्प सुरू होत आहे, ज्यामुळे भूतानची जलविद्युत क्षमता 40% ने वाढणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. याव्यतिरिक्त, आणखी एका दीर्घकाळ प्रलंबित जलविद्युत प्रकल्पावर काम पुन्हा सुरू होत आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी नमूद केले की, ही भागीदारी केवळ जलविद्युत उर्जेपुरती मर्यादित नाही; भारत आणि भूतान आता सौरऊर्जेमध्येही एकत्र महत्त्वपूर्ण पावले उचलत आहेत, आणि यासाठी आज महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.  

ऊर्जा सहकार्याबरोबरच, भारत आणि भूतान संपर्क प्रणाली मजबूत करण्यावरदेखील लक्ष केंद्रित करत आहेत यावर त्यांनी भर दिला. “संपर्क प्रणाली संधी निर्माण करतात आणि संधी समृद्धी निर्माण करते" आणि या दृष्टिकोनातून, गेलेफू आणि समत्से शहरांना भारताच्या विशाल रेल्वे जाळ्याशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, भूतानमधील उद्योगांना आणि शेतकऱ्यांना भारताच्या मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी मदत होईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. रेल्वे आणि रस्ते संपर्काव्यतिरिक्त, दोन्ही देश सीमावर्ती पायाभूत सुविधांच्या विकासावरही जलद गतीने काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले. भूतान नरेशांनी सुरू केलेल्या दूरदर्शी गेलेफू माइंडफुलनेस सिटी उपक्रमाचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी भारत या प्रकल्पाच्या विकासासाठी पूर्ण पाठिंबा देईल असे स्पष्ट केले. भारत सरकार लवकरच गेलेफूजवळ एक इमिग्रेशन चेकपॉईंट स्थापित करेल जेणेकरून पर्यटक आणि गुंतवणूकदारांना अधिक सुविधा मिळतील, असे पंतप्रधानांनी जाहीर केले.

“भारत आणि भूतानची प्रगती आणि समृद्धी एकमेकांशी खोलवर जोडलेली आहे”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले आणि याच भावनेतून, भारत सरकारने गेल्या वर्षी भूतानच्या पंचवार्षिक योजनेसाठी 10,000 कोटी रुपयांचे सहाय्य पॅकेज जाहीर केले, अशी माहिती त्यांनी दिली. हा निधी रस्ते, शेती, वित्तीय सेवा, आरोग्यसेवा या विविध क्षेत्रांमध्ये वापरला जात असून भूतानच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यात मदत करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. भूतानच्या लोकांना आवश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा होत राहील याची खात्री करण्यासाठी भारताने अनेक उपाययोजना केल्या आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भूतानमध्ये UPI पेमेंट प्रणालीचा विस्तार होत आहे, आणि भूतानच्या नागरिकांना भारताला भेट देताना UPI सेवांचा वापर करण्याची सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

 भारत-भूतान यांच्या मजबूत भागीदारीचे सर्वात मोठा लाभार्थी घटक म्हणजे दोन्ही देशांचा युवा वर्ग आहे, यावर भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रसेवा, स्वयंसेवा आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी भूतानच्या राजांच्या  अनुकरणीय कार्याची प्रशंसा केली. तंत्रज्ञानाद्वारे तरुणांना सक्षम बनवण्याच्या भूतान नरेशांच्या  दूरदर्शी प्रयत्नांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. भूतानचे तरुण या दृष्टिकोनातून प्रेरित झालेले आहेत आणि शिक्षण, नवोन्मेष, कौशल्य विकास, क्रीडा, अवकाश आणि संस्कृती यासह अनेक क्षेत्रांमध्ये भारतीय आणि भूतानी तरुणांमधील सहकार्य वाढत आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दोन्ही देशांतील तरुण सध्या उपग्रह तयार करण्यासाठी एकत्र काम करत आहेत, ही भारत आणि भूतानसाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे असे त्यांनी सांगितले.

भारत-भूतान संबंधांची सर्वात मोठी ताकद म्हणजे दोन्ही देशांच्या नागरिकांमधील खोल भावनिक बंध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी भारतातील राजगीर येथील रॉयल भूतान मंदिराच्या अलिकडेच झालेल्या उद्घाटन सोहळ्याची आठवण आणि हा उपक्रम आता देशाच्या इतर भागात विस्तारत असल्याचे नमूद केले. भूतानमधील जनतेच्या आकांक्षांना प्रतिसाद देत, पंतप्रधानांनी घोषणा केली की भारत सरकार वाराणसीमध्ये भूतानी मंदिर आणि अतिथीगृह बांधण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देत आहे. ही मंदिरे भारत आणि भूतानमधील मौल्यवान आणि ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधांना बळकटी देत आहेत यावर त्यांनी भर दिला. दोन्ही देश शांती, समृद्धी आणि सामायिक प्रगतीच्या मार्गावर पुढे जातील, अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या समारोपात व्यक्त केली. तसेच दोन्ही राष्ट्रांवर भगवान बुद्ध आणि गुरु रिनपोछे यांचे आशीर्वाद सतत राहोत, अशी प्रार्थनादेखील केली.

 

 

* * *

सोनाली काकडे/राजश्री आगाशे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2188836) Visitor Counter : 14