पंतप्रधान कार्यालय
नवा रायपूर येथे छत्तीसगड विधानसभेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
01 NOV 2025 3:22PM by PIB Mumbai
छत्तीसगडचे राज्यपाल रमण डेका जी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी, छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष- माझे मित्र रमण सिंह जी, राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री तोखन साहू, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, अरूण साव, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते चरणदास महंत आणि उपस्थित इतर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित भगिनी आणि सद्गृहस्थ हो!
छत्तीसगडच्या विकास यात्रेतील आजचा दिवस एक स्वर्णिम यात्रेच्या प्रारंभाचा दिन आहे. आणि माझ्यासाठी व्यक्तिगत स्तरावर तर आजचा दिवस खूपच सुखद आणि महत्वपूर्ण आहे. गेल्या अनेक दशकांपासून माझे या भूमीशी खूप आत्मीय, अतिशय जवळचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. एका कार्यकर्ता म्हणून मी छत्तीसगडमध्ये मोठा काळ घालवला आहे. इथे मला खूप शिकायला मिळाले. माझे जीवन घडविण्यामध्ये इथल्या लोकांचे, इथल्या भूमीचे खूप आशीर्वाद मिळाले. छत्तीसगडविषयी मनात असलेल्या कल्पना, याविषयी केलेले निर्मितीचे संकल्प आणि आता त्या संकल्पांना साध्य करणे, या प्रवासातील प्रत्येक क्षणांचा, छत्तीसगडमध्ये घडलेल्या परिवर्तनाच्या प्रत्येक टप्प्याचा, पायरीचा मी साक्षीदार आहे. आणि आज ज्यावेळी छत्तीसगड 25 वर्षाचा प्रवास करून एका महत्वपूर्ण टप्प्यावर पोहोचले आहे, तो क्षणही अनुभवण्याची, या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली आहे. आज या रजत जयंती महोत्सवामध्ये मला राज्यातील लोकांसाठी या नवीन विधानसभेच्या वास्तूचे लोकार्पण करण्याचे सौभाग्य मिळाले आहे. छत्तीसगडच्या सर्व लोकांना, राज्य सरकारला, या शुभप्रसंगी आपल्या खूप शुभेच्छा देतो, सर्वांचे अभिष्टचिंतन करतो.
मित्रांनो,
2025 हे वर्ष भारतीय प्रजासत्ताकाचेही अमृत वर्ष आहे. 75 वर्षांपूर्वी भारताने आपली राज्यघटना देशवासीयांना समर्पित केली होती. अशा वेळी, आजच्या या ऐतिहासिक प्रसंगी मी या प्रदेशातील राज्यघटना सभा समितीमध्ये सदस्य म्हणून जे कार्यरत होते, त्या रविशंकर शुल्क, बॅरिस्टर ठाकूर छेदीलाल, घनःश्याम सिंह गुप्त, किशोरी मोहन त्रिपाठी, रामप्रसाद पोटाई, आणि रघुराज सिंह या महान व्यक्तींचे स्मरण करून त्यांना आपली श्रध्दांजली अर्पण करतो. त्यावेळी खूप मागास असलेल्या या विभागातून दिल्लीला पोहोचून या महान पुरूषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यघटना तयार करण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
मित्रहो ,
आजचा दिवस छत्तीसगडच्या इतिहासाचा सुवर्ण अध्याय बनून चमकत, झळाळत रहाणार आहे. आज ज्यावेळी आपण या भव्य आणि आधुनिक विधानसभा भवनाचे लोकार्पण करीत आहोत, त्यावेळी हा केवळ एका वास्तूचा समारंभ नाही, तर 25 वर्षांपासूनच्या लोकांच्या आकांक्षांचा , लोकांच्या संघर्षाचा आणि लोकांच्या गौरवाचा…अशा सर्व गोष्टींचा उत्सव बनला आहे. आज छत्तीसगडने आपल्या स्वप्नातील एक नवीन शिखर गाठले असून, त्या शिखरावर राज्य उभे आहे. आणि या गौरवशाली क्षणाला, ज्यांनी दूरदृष्टी आणि करूणेच्या भावनेतून या राज्याच्या स्थापनेची पायाभरणी केली, त्या महापुरूषाला मी वंदन करतो. हे महापुरुष आहेत -भारत रत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी जी!
मित्रांनो,
वर्ष 2000 मध्ये ज्यावेळी अटलजींनी या छत्तीसगड राज्याची निर्मिती केली, तो निर्णय काही फक्त प्रशासकीय नव्हता. तो निर्णय होता विकासाचा नवा मार्ग खुला करण्याचा, आणि तो निर्णय होता छत्तीसगडच्या आत्म्याला योग्य ओळख निर्माण करून देण्याचा! म्हणूनच आज, ज्यावेळी या भव्य विधानसभेबरोबरच अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले, त्यावेळी माझे मन असे सांगते, माझ्या मनातून असे भाव व्यक्त होत आहेत की, अटल जी आज जिथे असतील, तिथून ते हा समारंभ पहात असतील, आणि मला त्यांना सांगावेसे वाटते - ‘‘अटल जी, पहा, तुमचे स्वप्न साकार होत आहे. तुम्ही बनविलेला छत्तीसगड आज पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेला दिसून येतो आहे, विकासाचे नवनवीन टप्पे गाठून, नव्या उंचीवर जावून पोहोचत आहे.
मित्रांनो,
छत्तीसगड विधानसभेचा इतिहास एक स्वतःच प्रेरणास्त्रोत आहे. वर्ष 2000 मध्ये ज्यावेळी या सुंदर राज्याची स्थापना झाली होती, त्यावेळी पहिल्या विधानसभेची बैठक रायपूरच्या राजकुमार महाविद्यालयातील जशपूर सभागृहामध्ये झाली होती. त्यावेळी अतिशय कमी साधने उपलब्ध होती. परंतु अनंत स्वप्ने होती. त्यावेळी एकच भावना होती की, आपल्याला आपले भाग्य अधिकाधिक वेगाने उज्ज्वल बनवायचे आहे. त्यानंतर विधानसभेचे जे भवन तयार झाले, ते सुद्धा आधी इतर दुस-या कोणत्यातरी विभागाचा परिसर होता. त्यावेळेपासूनच छत्तीसगडमध्ये लोकशाहीच्या प्रवासाला, नव्या चैतन्याने प्रारंभ झाला. आणि आज, 25 वर्षांनंतर, तीच लोकशाही, तीच जनता, एका आधुनिक, डिजिटल आणि आत्मनिर्भर विधानसभेच्या वास्तूचे उद्घाटन, लोकार्पण करत आहे.
मित्रहो ,
ही वास्तू लोकशाहीचे तीर्थस्थान आहे. या वास्तूचा प्रत्येक स्तंभ पारदर्शकतेचा प्रतीक आहे. या इमारतीच्या मधल्या जागेमध्ये असलेल्या मार्गिका - सर्वांना आपल्या जबाबदारीचे स्मरण करून देणा-या आहे. आणि इथले प्रत्येक दालन जनतेच्या आवाजाचे प्रतिबिंब आहे. इथे घेण्यात येणारे निर्णय आगामी अनेक दशकांपर्यंत छत्तीसगडच्या भाग्याला दिशा देणार आहेत. आणि इथे बोलला जाणारा, प्रत्येक शब्द, छत्तीसगडचा भूतकाळ, राज्याचा वर्तमानकाळ आणि राज्याच्या भविष्यकाळाचा महत्वपूर्ण भाग असणार आहे. मला विश्वास आहे, ही वास्तू आगामी दशकांसाठी छत्तीसगडची नीती, नियती आणि नीतिकार यांचे केंद्र असेल.
मित्रहो ,
आज संपूर्ण देश वारसा आणि विकास यांना बरोबर घेवून पुढे जात आहे. आणि ही भावना, सरकारच्या प्रत्येक नीती, प्रत्येक निणर्यामध्येही दिसून येते. आज देशाच्या संसदेमध्ये आपले पवित्र सेंगोल प्रेरणा देत आहे. नवीन संसदेच्या मार्गिका, संपूर्ण विश्वाला भारतीय लोकशाहीच्या प्राचीनतेशी जोडत आहे. भारतामध्ये लोकशाहीची पाळेमुळे किती खोलवर रूजली आहेत, याची गोष्ट संसद परिसरामध्ये उभारण्यात आलेले पुतळे, संपूर्ण विश्वाला असे सांगत आहेत.
मित्रहो,
भारताच्या याच भावना, छत्तीसगडच्या या नवीन विधानसभेतून दिसून येत आहेत, आणि हे पाहून मला आनंद वाटतो.
मित्रहो ,
छत्तीसगडचा नवीन विधानसभा परिसर राज्याच्या समृद्ध संस्कृतीचा आरसा आहे. या विधानसभेच्या कणा-कणांमध्ये छत्तीसगडच्या भूमीत जन्मलेल्या आपल्या महापुरूषांची प्रेरणा आहे. वंचितांना प्राधान्य, ‘सबका साथ, सबका विकास‘, ही भाजपा सरकारच्या सुशासनची ओळख आहे. देशाच्या राज्यघटनेचे चैतन्य आहे. हेच आपल्या महापुरूषांनी, आपल्या ऋषीं, मुनींनी दिलेले संस्कार आहेत.
मित्रांनो,
मी ज्यावेळी ही वास्तू पहात होतो, त्यावेळी मला बस्तर कलेची सुंदर झलक पहायला मिळाली. मला आठवते, काही महिने आधी थायलंडच्या पंतप्रधानांना मी याच बस्तर कलेच्या अशाच वस्तूची भेट दिली होती. बस्तरची ही कला आपल्याकडील सृजनशीलता आणि सांस्कृतिक शक्तीचे प्रतीक आहे.
मित्रांनो,
या भवनाच्या भिंतीवर बाबा गुरू घासीदास जी यांचा ‘मनखे-मनखे एक समान‘ चा संदेश आहे. हा संदेश आपल्याला ‘सबका साथ, सबका सन्मान‘ शिकवतो. इथल्या भिंतींवर माता शबरीने शिकवलेली आत्मियता आहे. यातून आपल्या प्रत्येक पाहुण्याचे, प्रत्येक नागरिकाचे स्नेहाने, प्रेमाने स्वागत करावे, हे सांगितले जात आहे. याच दालनातील प्रत्येक खुर्ची संत कबीर यांना शिकवलेल्या सत्याचा आणि निडर होण्याचा भाव सांगत आहे. आणि इथला पायामध्ये महाप्रभू वल्लभाचार्य यांनी सांगितलेल्या, नर सेवा, नारायण सेवेचा संकल्प आहे.
मित्रांनो,
भारत लोकशाहीची जननी आहे. ‘मदर ऑफ डेमॉक्रसी‘ आहे. आमचा आदिवासी समाज तर अनेक पिढ्यांपासून लोकशाही परंपरेप्रमाणेच जगत आला आहे. मुरिया दरबार- बस्तरचे आदिम संसद‘ हे याचे जीवंत उदाहरण आहे. आधी तिथे आदिम संसद होती, अनेक वर्षांपासून आपल्याकडे इथला समाज आणि शासन मिळून समस्यांवरील तोडगा काढत असतात. आणि मला या गोष्टीचा आनंद वाटतो की, या विधानसभेमध्येही मुरिया दरबारच्या परंपरेला स्थान मिळाले आहे.
मित्रांनो,
एकीकडे, या सभागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यात, आपल्या महापुरुषांचे आदर्श आहेत, तर दुसरीकडे, रमण सिंह जी यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व अध्यक्षांच्या खुर्चीत आहे. पक्षाचा कार्यकर्ता, आपल्या समर्पित भावनेने लोकशाही व्यवस्थेला किती बळकट करू शकतो याचे रमण जी मोठे उदाहरण आहेत.
मित्रहो,
क्रिकेटमध्ये तर आपण पाहतो की जो कर्णधार असतो , तो कधीकधी संघात खेळाडू म्हणूनही खेळतो, परंतु राजकारणात असे पहायला मिळत नाही.
याचे उदाहरण रमण सिंह जी देऊ शकतात की जो कधी कर्णधार होता तो आज प्रामाणिक भावनेने छत्तीसगडच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान म्हणून काम करत आहेत.
मित्रहो,
राष्ट्र कवी निरालाजींनी त्यांच्या कवितेत सरस्वती मातेला प्रार्थना केली होती - प्रिय स्वतंत्र-रव अमृत-मंत्र नव भारत में भर दे, ही केवळ कविता नव्हती, तर स्वतंत्र भारताच्या नवसृजनाचा मंत्र होता. त्यांनी नवीन गती, नवीन लय आणि नवीन स्वर याबद्दल म्हटले आहे म्हणजेच परंपरेत रुजलेल्या परंतु भविष्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल करणाऱ्या भारताबद्दल म्हटले आहे . आज, आपण छत्तीसगडच्या नवीन विधानसभेत उभे असताना, ही भावना येथेही तितकीच प्रासंगिक आहे. ही इमारत देखील त्या "नव्या स्वराचे " प्रतीक आहे, जिथे जुन्या अनुभवांचा आवाज आणि नवीन स्वप्नांची ऊर्जा आहे. आणि या उर्जेसह आपल्याला अशा एका भारताची निर्मिती करायची आहे ,एका अशा छत्तीसगडचा पाया रचायचा आहे, जो आपल्या वारशाशी जोडलेला राहून विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ शकेल.
मित्रहो,
नागरिक देवो भव:, हा आपल्या सुशासनाचा मार्गदर्शक मंत्र आहे आणि म्हणूनच , आपल्याला विधानसभेच्या प्रत्येक निर्णयात जनतेचे हित लक्षात घेऊन काम करावे लागेल. इथे संमत केलेले कायदे सुधारणांना गती देणारे, नागरिकांचे जीवनमान सुलभ करणारे आणि अनावश्यक सरकारी हस्तक्षेप कमी करणारे असले पाहिजेत . सरकारचा अभाव नसावा तसेच अनावश्यक प्रभाव देखील नसावा हाच वेगवान प्रगतीचा एकमेव मंत्र आहे.
मित्रहो,
हे आपले छत्तीसगड तर प्रभू श्रीरामाचे आजोळ आहे. प्रभू श्रीराम या भूमीचे भाचे आहेत . आज या नवीन संकुलात श्रीरामांच्या आदर्शांचे स्मरण करण्यासारखा यापेक्षा चांगला दिवस आणखी कोणता असू शकतो. भगवान रामांच्या आदर्शांमधून आपल्याला सुशासनाची शिकवण मिळते.
मित्रहो,
अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी, आपण सर्वांनी 'देव से देश' आणि 'राम से राष्ट्र ' या दिशेने जाण्याचा संकल्प केला होता. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की 'राम से राष्ट्र' चा अर्थ आहे - रामराज बैठे त्रैलोका। हरषित भए गए सब सोका। म्हणजेच सुशासन आणि लोककल्याणाचे राज्य. याचा अर्थ आहे, सबका साथ, सबका विकास या भावनेने राज्य करणे. 'राम से राष्ट्र' चा अर्थ आहे , नहिं दरिद्र कोउ, दुखी न दीना। जिथे कोणीही गरीब नसेल , कोणीही दुःखी नसेल , जिथे भारत गरिबीमुक्त होऊन पुढे जाईल, राम से राष्ट्र चा अर्थ आहे - अल्पमृत्यु नहिं कवनिउ पीरा। म्हणजेच आजारांमुळे कोणाचाही अकाली मृत्यू होणार नाही आणि त्याद्वारे आरोग्यदायी आणि सुखी भारताची उभारणी होईल, राम से राष्ट्र चा अर्थ आहे - मानउँ एक भगति कर नाता। म्हणजेच आपला उच्च-नीच भावनेपासून मुक्त होईल आणि प्रत्येक समाजात सामाजिक न्याय स्थापित होईल.
मित्रहो,
राम से राष्ट्र चा एक अर्थ हा देखील आहे की , “निसिचर हीन करउँ महि भुज उठाइ पन कीन्ह”। मानवताविरोधी शक्ती , दहशतवाद नष्ट करण्याची प्रतिज्ञा ! आणि हेच तर आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये पाहिले आहे. दहशतवाद नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेऊन भारत दहशतवादाचा कणा मोडत आहे. भारत आज नक्षलवाद आणि दहशतवादाच्या उच्चाटनाकडे वाटचाल करत आहे . आणि हीच अभिमानाची भावना आज छत्तीसगड विधानसभेच्या या नव्या संकुलात सर्वत्र दिसत आहे.
मित्रहो,
गेल्या 25 वर्षांमध्ये छत्तीसगडने जे परिवर्तन पाहिले , ते अद्भुत आणि प्रेरणादायी आहे. एकेकाळी नक्षलवादासाठी आणि मागासलेले म्हणून ओळखले जाणारे हे राज्य आज समृद्धी, सुरक्षा, आणि स्थिरतेचे प्रतीक बनले आहे. आज बस्तर ऑलिंपिकची चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यात होत आहे. नक्षलग्रस्त प्रदेशांमध्ये आज विकासाची लाट आणि शांतता परतली आहे आणि या परिवर्तनामागे छत्तीसगडच्या जनतेचे परिश्रम आणि भाजपा सरकारांचे दूरदर्शी नेतृत्व आहे.
मित्रहो,
छत्तीसगडच्या रौप्यमहोत्सवाचा उत्सव आता एका मोठ्या ध्येयाची सुरुवात बनणार आहे. 2047 पर्यंत, जेव्हा भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल, तेव्हा विकसित भारताच्या उभारणीसाठी आपण ठरवलेल्या उद्दिष्टांमध्ये छत्तीसगड महत्त्वाची भूमिका बजावेल. आणि म्हणूनच , मी इथे उपस्थित सर्व मित्रांना सांगेन , सर्व लोकप्रतिनिधींना सांगेन की तुम्ही एक अशी व्यवस्था निर्माण करा, एका अशा विधानसभेचे उदाहरण स्थापित करा , जी विकसित भारतातील प्रत्येक राज्याला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देईल. इथे होणाऱ्या संवादांमध्ये , इथे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये , सभागृहात होणाऱ्या कामकाजामध्ये , सगळ्यामध्ये एक श्रेष्ठता आणण्याचा प्रयत्न करा आणि आपण जे काही कराल , ज्याप्रकारे कराल , त्याचे लक्ष्य विकसित छत्तीसगड , विकसित भारताची उभारणी हे असायला हवे.
मित्रहो,
छत्तीसगडच्या या नवीन विधानसभेची श्रेष्ठता या इमारतीच्या भव्यतेपेक्षाही , इथे घेतल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी निर्णयांवरून ठरेल. हे सभागृह छत्तीसगडची स्वप्ने आणि दृष्टिकोन किती खोलवर समजून घेते आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ते किती पुढे जाते यावरून हे ठरेल. आपला प्रत्येक निर्णय असा असावा की तो शेतकऱ्यांच्या कष्टाचा आदर करेल, युवकांच्या स्वप्नांना दिशा देईल, महिलांच्या जीवनात नवीन आशेचा किरण आणेल आणि समाजात अंत्योदयाचे माध्यम बनेल. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ही विधानसभा केवळ कायदे करण्याचे ठिकाण नाही, तर छत्तीसगडच्या भाग्य निर्मितीचे एक चैतन्यशील केंद्र आहे, जिवंत वास्तू आहे. म्हणूनच आपणा सर्वांना हे सुनिश्चित करावे लागेल की येथून येणाऱ्या प्रत्येक विचारात लोकसेवेची भावना असेल , विकासाचा संकल्प असेल आणि भारताला नवीन उंचीवर नेण्याचा विश्वास असेल. हीच आमची इच्छा आहे.
मित्रहो,
लोकशाहीमध्ये कर्तव्याला सर्वोच्च स्थान देऊन, आपण सर्वांनी सार्वजनिक जीवनात आपली भूमिका बजावली पाहिजे, हा संकल्प घेणे हीच नवीन विधानसभा इमारतीच्या उद्घाटनाच्या या प्रसंगाची सर्वात मोठी सार्थकता असेल. चला, या परिसरात आपण सर्वजण , भारतीय प्रजासत्ताकाच्या या अमृत वर्षात जनतेची सेवा हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवण्याचा संकल्प घेऊन जाऊया. लोकशाहीच्या या सुंदर नवीन मंदिराच्या उद्घाटनाबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. हे स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आणि विशेषतः माझे मित्र रमण सिंह यांचे मनापासून अभिनंदन करतो. जय भारत - जय छत्तीसगड. खूप खूप धन्यवाद.
***
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2185471)
Visitor Counter : 4