पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे अनेक विकास प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
20 OCT 2024 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2024
नमः पार्वती पताये...
हर हर महादेव!
व्यासपीठावर उपस्थित उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडलेले इतर राज्यांचे माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री. नायडू जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेश सरकारचे इतर मंत्री, संसद सदस्य आणि आमदार आणि बनारसमधील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!
आज पुन्हा एकदा मला बनारसला भेट देण्याची संधी मिळाली आहे... आज चेतगंजमध्ये नक्कटैया मेळा भरत आहे... धनतेरस, दिवाळी आणि छठ सण जवळ येत आहेत... आणि या सणांपूर्वीच आज बनारस विकासाचा उत्सव साजरा करत आहे. आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
मित्रांनो,
आजचा दिवस बनारससाठी अत्यंत शुभ दिवस आहे. मी आत्ताच एका मोठ्या नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले आहे आणि त्यानंतर येथे आलो आहे, म्हणूनच मला थोडा उशीर झाला. शंकरा नेत्र रुग्णालय वृद्ध आणि मुलांसाठी खूप मदत करेल. बाबा विश्वनाथांच्या आशीर्वादाने आज हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे आणि पायाभरणी करण्यात आली आहे. हे प्रकल्प देशाच्या आणि उत्तर प्रदेशच्या विकासाला नवीन उंचीवर नेतील. आज उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विमानतळांचे उद्घाटन झाले आहे. यात केवळ बाबतपूर विमानतळच नाही तर आग्रा आणि सहारनपूरमधील सारसावा येथील विमानतळांचाही समावेश आहे. एकूणच, शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रातील अनेक प्रकल्प बनारससाठी मंजूर करण्यात आले आहेत. हे प्रकल्प केवळ सुविधा निर्माण करणार नाहीत तर आपल्या तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करतील. सारनाथ ही तीच भूमी आहे, जिथे भगवान बुद्धांनी आपले उपदेश दिले. मी काही दिवसांपूर्वीच अभिधम्म महोत्सवात सहभागी झालो होतो. आज, मला सारनाथ संबंधित कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला माहिती आहेच की, आपण अलिकडेच काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यात पाली आणि प्राकृत या भाषांचा देखील समावेश आहे. पाली आणि प्राकृत या दोन्ही भाषांचा सारनाथ आणि काशीशी अतिशय जवळचा संबंध आहे. त्यांना आयुष्यात भाषेचा दर्जा मिळणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या विकास प्रकल्पांबद्दल मी काशीतील आणि देशातील सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
जेव्हा तुम्ही मला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची जबाबदारी सोपवली तेव्हा मी आपल्याला तिप्पट वेगाने काम करण्याचे वचन दिले होते. सरकार स्थापन होऊन अजून 125 दिवसही पूर्ण झाले नाहीत आणि इतक्या कमी कालावधीत देशभरात 15 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे प्रकल्प सुरू झाले आहेत. या अर्थसंकल्पाचा बहुतांश भाग गरीब, शेतकरी आणि युवकांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. जरा विचार करा, 10 वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये लाखो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांच्या बातम्या असायच्या. देशात लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराभोवती नेहमीच चर्चा होत असे. पण आज प्रत्येक घरात चर्चा आहे ती 125 दिवसांत 15 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची! हीच ती बदलाची दिशा आहे, जी देशाला हवी आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी, देशाच्या विकासासाठी आणि प्रामाणिकपणे खर्च व्हावेत याला आमचे प्राधान्य आहे.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षात आपण देशात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. या पायाभूत सुविधा मोहिमेची दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. पहिले म्हणजे गुंतवणुकीद्वारे नागरिकांच्या सोयी वाढवणे आणि दुसरे म्हणजे गुंतवणुकीद्वारे तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणे. आज देशभरात आधुनिक महामार्ग बांधले जात आहेत, नवीन मार्गांवर नवीन रेल्वे ट्रॅक टाकले जात आहेत आणि नवीन विमानतळ बांधले जात आहेत. हे केवळ विटा, दगड, लोखंड आणि पोलादी सळईच्या कामाबद्दल नाही तर ते लोकांच्या सुविधा वाढवत आहे आणि देशातील तरुणांना रोजगार देत आहे.
मित्रांनो,
आपण बांधलेला बाबतपूर विमानतळ महामार्ग आणि विमानतळाशी जोडलेल्या आधुनिक सुविधांकडे पाहा. याचा फायदा केवळ विमानतळावर ये-जा करणाऱ्यांनाच झाला का? नाही, त्यामुळे बनारसमधील अनेक लोकांना नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे शेती, उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळाली. आज बनारसमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. काही जण पर्यटनासाठी येतात, तर काही जण व्यवसायासाठी येतात आणि याचा फायदा तुम्हा सर्वांना होत आहे. म्हणूनच, आता बाबतपूर विमानतळाचा विस्तार सुरू असल्याने तुम्हाला आणखी जास्त फायदा होईल. या विमानतळाचे काम आजपासून सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर, येथे अधिक विमाने उतरू शकतील.
मित्रांनो,
आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या या 'महायज्ञा'त, आपल्या देशातील विमानतळ, त्यांच्या भव्य इमारती आणि अत्याधुनिक सुविधा- यांची चर्चा आज संपूर्ण जगभरात होत आहे. 2014 मध्ये, आपल्या देशात केवळ 70 विमानतळ होते. आणि नायडूजींनी सविस्तर सांगितल्याप्रमाणे, आज आपल्याकडे 150 हून अधिक विमानतळ आहेत. आपण जुन्या विमानतळांचे नूतनीकरण देखील करत आहोत. गेल्या वर्षी, देशभरातील डझनभर विमानतळांवर नवीन सुविधा बांधण्यात आल्या - म्हणजे सरासरी, दरमहा एक विमानतळ. यामध्ये अलीगढ, मुरादाबाद, श्रावस्ती आणि चित्रकूटमधील विमानतळांचा समावेश आहे. अयोध्येत आता एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाले आहे, जे दररोज रामभक्तांचे स्वागत करते. तो काळ आठवा जेव्हा उत्तर प्रदेशाची त्याच्या खराब रस्त्यांमुळे थट्टा केली जात होती. आज, उत्तर प्रदेशाला द्रुतगती मार्गांचे राज्य म्हणून ओळखले जाते. आज, उत्तर प्रदेश हे राज्य सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळांसाठी ओळखले जाते. नोएडाच्या जेवर येथे एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील पूर्णत्वास येत आहे. उत्तर प्रदेशातील या प्रगतीसाठी मी योगी जी, केशव प्रसाद मौर्य जी, ब्रजेश पाठक जी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
बनारसचा खासदार म्हणून, जेव्हा येथे झालेला विकास मी पाहतो, तेव्हा मला अपार आनंद होतो. काशीला एक आदर्श शहर बनवण्याचे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे - जिथे विकासही होईल आणि वारसा देखील जपला जाईल. आज, काशी भव्य आणि दिव्य काशी विश्वनाथ धाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर आणि रिंग रोड आणि गंजारी स्टेडियम सारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ओळखली जाते. काशीमध्ये एक आधुनिक रोपवे प्रणाली देखील उभारली जात आहे. हे रुंद रस्ते, गल्ल्या, गंगेचे सुंदर घाट - हे सर्व काही मन मोहून टाकणारे आहे.
मित्रांनो,
काशी आणि संपूर्ण पूर्वांचल प्रदेशाला एक प्रमुख व्यावसायिक केंद्र बनवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत आहोत. काही दिवसांपूर्वीच सरकारने गंगेवर एक नवीन रेल्वे-रोड पूल बांधण्यास मंजुरी दिली. राजघाट पुलाजवळ, एक भव्य नवीन पूल बांधला जाईल - ज्यात खाली गाड्या धावतील आणि वर सहा पदरी महामार्ग बांधला जाईल. याचा फायदा बनारस आणि चंदौली येथील लाखो लोकांना होईल.
मित्रांनो,
आपली काशी देखील आता क्रीडा क्षेत्राचे एक प्रमुख केंद्र बनत आहे. सिग्रा स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले असून आता ते तुमच्यासमोर एका नवीन स्वरूपात उभे आहे. हे नवीन स्टेडियम राष्ट्रीय स्पर्धांसाठी आणि ऑलिंपिक स्तरावरील प्रशिक्षणासाठी देखील सुसज्ज आहे. येथे आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. संसद खेल स्पर्धेत आपण काशीच्या तरुण खेळाडूंची क्षमता आणि उत्साह पाहीला. आता, आपल्या पूर्वांचलमधील मुलांना आणि मुलींना मोठ्या क्रीडा स्पर्धात सहभागी होण्यासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
मित्रांनो,
जेव्हा महिला आणि तरुण सक्षम होतात तेव्हाच एखाद्या समाजाचा विकास होतो. हे लक्षात घेऊन, सरकारने 'नारी शक्ती' ला नवीन बळ दिले आहे. कोट्यवधी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी मुद्रा कर्ज देण्यात आले आहे. आता आपण देशभरातील गावांमध्ये 'लखपती दीदी' निर्माण करण्याचे काम करत आहोत. आज, आपल्या ग्रामीण भगिनी ड्रोन पायलट बनत आहेत. आणि ही तीच काशी आहे, जिथे भगवान शिव देखील आई अन्नपूर्णे कडून भिक्षा मागतात. काशी आपल्याला शिकवते की, समाजाचा विकास स्त्रियांच्या सशक्तीकरणावर अवलंबून असतो. याच विश्वासाने, आपण 'विकसित भारत' च्या प्रत्येक ध्येयाच्या केंद्रस्थानी 'नारी शक्ती' ठेवली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेने लाखो महिलांना त्यांचे स्वतःचे घर भेट स्वरूपात दिले आहे. बनारसमधील अनेक महिलांनाही या योजनेचा फायदा झाला आहे. तुम्हाला माहिती आहेच की, सरकार आता आणखी 3 कोटी घरे बांधण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्या महिलांना अद्याप घरे मिळाली नाहीत, त्यांना लवकरच ती मिळतील. आपण आधीच प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी, उज्ज्वला गॅस आणि पाईपद्वारे पाणीपुरवठा केला आहे. आता, आपण अशी योजना सुरू करत आहोत जी मोफत वीज देईल आणि विजेपासून उत्पन्नही मिळवून देईल. ही योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त वीज योजना’ जी आमच्या भगिनींचे जीवन आणखी सोपे करेल.
मित्रांनो,
आपली काशी हे एक चैतन्यशील सांस्कृतिक शहर आहे. जिथे भगवान शिवाचे पवित्र ज्योतिर्लिंग, मोक्षाचे पवित्र स्थळ मणिकर्णिका आणि ज्ञानाचे स्थान सारनाथ आहे. इतक्या दशकांनंतर, बनारसमध्ये एकाच वेळी इतकी विकासकामे होत आहेत. अन्यथा, एकेकाळी काशीला विकासापासून जवळजवळ वंचित ठेवण्यात आले होते. म्हणूनच आज मी काशीतील प्रत्येक रहिवाशाला एक प्रश्न विचारतो: काशीला विकासापासून वंचित ठेवणारी मानसिकता कोणती होती? जरा 10 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीचा विचार करा, जेव्हा बनारस विकासासाठी तहानलेला होता. ज्यांनी उत्तर प्रदेशावर दीर्घकाळ राज्य केले आणि ज्यांनी दिल्लीतील सत्तेचा आनंद दशकांवर दशके लुटला त्यांनी कधीही बनारसची पर्वा केली नाही. याचे उत्तर आहे - घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या राजकारणात! काँग्रेस असो वा समाजवादी पक्ष - बनारसचा विकास अशा पक्षांसाठी कधीही प्राधान्याचा विषय नव्हता आणि भविष्यातही कधी राहणार नाही. या पक्षांनी विकासात सुद्धा भेदभाव केला. पण आमचे सरकार 'सबका साथ, सबका विकास' या मंत्राने काम करत आहे. आमचे सरकार कोणत्याही योजनेत भेदभाव करत नाही. आम्ही जे बोलतो ते आम्ही स्पष्टपणे आणि मोठ्या आत्मविश्वासाने करून दाखवतो. आज अयोध्येत भव्य राम मंदिर उभे आहे. लाखो लोक दररोज राम लल्लाचे दर्शन घेतात. वर्षानुवर्षे महिलांना विधानसभा आणि संसदेत आरक्षण देण्याचे काम रखडले होते. हे ऐतिहासिक काम देखील आमच्या सरकारने पूर्ण केले आहे. तिहेरी तलाकच्या कुप्रथेमुळे अनेक कुटुंबे त्रस्त होती. आमच्या सरकारने मुस्लिम भगिनींना ज्या प्रथेतून मुक्त करण्याचे काम केले. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देणे हेही भाजप सरकारनेच केले. आणि एनडीए सरकारने कोणाचेही हक्क हिरावून न घेता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण दिले.
मित्रांनो,
आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे. आम्ही चांगल्या हेतूने धोरणे राबवली आणि देशातील प्रत्येक कुटुंबाचे जीवन बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. म्हणूनच देश आम्हाला सतत आपले आशीर्वाद देत आहे. हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजप सरकार कसे निवडून आले हे आपण पाहिले. जम्मू आणि काश्मीरमध्येही भाजपला विक्रमी मते मिळाली.
मित्रांनो,
आज भारतासमोर घराणेशाहीच्या राजकारणाचे मोठे संकट आहे. हे घराणेशाहीवादी राजकारणी देशातील तरुणांचे सर्वात जास्त नुकसान करतात. ते तरुणांना संधी देण्यावर कधीही विश्वास ठेवत नाहीत. म्हणूनच, मी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला आवाहन केले की, मी अशा 1,00,000 तरुणांना राजकारणात आणेन, ज्यांचा राजकारणाशी कोणतेही कौटुंबिक संबंध नाहीत. ही एक अशी मोहीम आहे, जी भारतीय राजकारणाची दिशा बदलून टाकेल. हे भ्रष्टाचार आणि घराणेशाही मानसिकता नष्ट करण्याचे एक अभियान आहे. मी काशी आणि उत्तर प्रदेशातील तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी या नव्या राजकीय चळवळीचे मजबूत आधारस्तंभ बनावे. काशीचा खासदार म्हणून, मी या प्रदेशातील तरुणांना शक्य तितके पुढे आणण्यासाठी वचनबद्ध आहे.
मित्रांनो,
आज पुन्हा एकदा, काशी संपूर्ण देशातील विकासाच्या नवीन मापदंडांचे केंद्र बनली आहे. काशीने पुन्हा एकदा देशासाठी ऊर्जेची एक नवीन लाट अनुभवली आहे. आजच्या या विकास कार्यक्रमाची जोडलेल्या सर्व राज्यांना, माननीय राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना, काशीच्या जनतेला आणि देशातील नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
माझ्यासोबत असे म्हणा:
नमः पार्वती पतये...
हर हर महादेव!
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178589)
Visitor Counter : 18
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam