पंतप्रधान कार्यालय
भारत - भूतान ऊर्जा भागीदारीवरील संयुक्त भविष्यवेधी निवेदन
Posted On:
22 MAR 2024 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मार्च 2024
भारत आणि भूतान यांच्यातील द्विपक्षीय संबंध आदर्शवत असून ते परस्पर विश्वास, सद्भावना आणि सर्व स्तरांवरील सखोल परस्पर सामंजस्यावर आधारित आहेत. या नात्याला दृढ मैत्रीचे बंध आणि जनतेमधील घनिष्ठ परस्पर संपर्कांची जोड लाभली आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोबगे यांनी थिंफूमध्ये झालेल्या बैठकीत व्यापक आणि फलदायी चर्चा केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी या असामान्य द्विपक्षीय भागीदारीला भविष्यात आणखी उंचीवर नेण्याचा निर्धार पुन्हा अधोरेखित केला.
दोन्ही नेत्यांनी, स्वच्छ (पर्यावरणपूरक) ऊर्जा भागीदारीमुळे भूतानमधील जलविद्युत क्षेत्राच्या विकासाला लागलेला मोलाचा हातभार, तसेच प्रादेशिक ऊर्जा सुरक्षेत दिलेले मोठे योगदान याची नोंद घेतली. पंतप्रधान मोदी यांनी, ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीत भूतानच्या कंपन्या आणि तांत्रिक संस्थांची वाढती क्षमता आणि कौशल्य यांचे कौतुक केले. अलीकडच्या वर्षांत भारताच्या नूतनीकरणक्षम (अपारंपरिक) ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीबद्दल आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तसेच भारताच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन (कार्बन उत्सर्जन न होता निर्माण होणारा हायड्रोजन हा उर्जा स्रोत) मोहिमेसारख्या उपक्रमांना चालना दिल्याबद्दल, पंतप्रधान मोदी यांचे पंतप्रधान तोबगे यांनी अभिनंदन केले.
दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय ऊर्जा सहकार्याच्या सर्व बाबींचा आढावा घेतला आणि संयुक्तरीत्या राबवलेले प्रकल्प यशस्वीपणे सुरू असून भूतानच्या आर्थिक विकासाला हातभार लावत आहेत, याबद्दल समाधान व्यक्त केले. 720 मेगावॅटच्या मंगडेछू जलविद्युत प्रकल्पाच्या यशावर आधारित पुढील पाऊल म्हणून, दोन्ही नेत्यांनी यावर्षी 1020 मेगावॅटच्या पुनात्सांगछू–II जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यास उत्सुकता दर्शवली. तसेच 1200 मेगावॅटच्या पुनात्सांगछू–I जलविद्युत प्रकल्पासाठी (HEP- हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट) तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिक दृष्ट्या वाजवी दरातील मार्ग शोधण्यासाठी झालेल्या तज्ञ-स्तरीय चर्चेचे स्वागत केले.
खालील बाबींवर दोन्ही पंतप्रधान सहमत झाले:
- भारत–भूतान ऊर्जा भागीदारीत दोन्ही देशांना लाभ होण्याची मोठी क्षमता आहे. या सहकार्यामुळे ऊर्जा सुरक्षा बळकट होईल, अर्थव्यवस्था मजबूत होईल, रोजगार निर्मिती होईल, निर्यात उत्पन्न वाढेल तसेच औद्योगिक आणि आर्थिक क्षमतांच्या पुढील विकासाला चालना मिळेल.
- या परस्पर लाभकारक द्विपक्षीय स्वच्छ ऊर्जा भागीदारीला अधिक बळकटी देण्याच्या अभूतपूर्व अशा संधी आहेत, ज्यात नवीन ऊर्जा प्रकल्पांचा विकास आणि वीज व्यापार यांचा समावेश आहे.
- जलविद्युत, सौर आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रातील नवीन ऊर्जा प्रकल्पांचा विकास साधणे, ज्यामध्ये भारतीय संस्थांचा/कंपन्यांचा धोरणात्मक भागीदार म्हणून सहभाग असू शकेल.
- दोन्ही सरकारे या नव्या प्रकल्पांसाठी, विशेषतः जलाशय आधारित जलविद्युत प्रकल्पांसाठी, प्रकल्प-विशिष्ट अंमलबजावणीच्या पद्धतींचा आढावा घेतील आणि अंतिम रूप देतील.
- भारत सरकार, भूतानमधील नवीन आणि आगामी जलविद्युत प्रकल्पांसाठी आवश्यक आर्थिक मदत देणाऱ्या भारतीय वित्तीय संस्था, तसेच वीज विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास मदत करेल.
- दोन देशांमधील वीज देवाणघेवाण, प्रादेशिक ऊर्जा सुरक्षेसाठी, भारत सरकार महत्त्वाची भूमिका बजावत राहील. याबाबत, भूतानी वीज उत्पादकांना बाजारपेठेत प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक तो मार्ग, संबंधित देशांतर्गत नियम आणि प्रक्रियेनुसार, परस्पर सहमतीने ठरवलेल्या अटी आणि वितरण ठिकाणांद्वारे सुनिश्चित केला जाईल.
- बदलत्या ऊर्जा बाजारपेठांचा विचार करून, भूतानमधील ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक सुलभ करण्यासाठी आणि सीमापार वीज व्यापार सुरळीत चालवण्यासाठी नियमित चर्चा आयोजित केल्या जातील.
- प्रादेशिक ऊर्जा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी काम केले जाईल, ज्यामुळे सर्व हितधारकांना परस्पर लाभ साधण्यासाठी दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांमधील परस्पर दृढ संबंध अधिक मजबूत होतील.
- ऊर्जा कार्यक्षमतेसाठी आणि ऊर्जा संवर्धनासाठी सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी क्षमता विकास, धोरणे आणि तंत्रज्ञान याबाबत माहिती विनिमय, तसेच ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानावर संशोधन आणि विकास करणे.
दोन्ही पंतप्रधानांनी परस्पर लाभासाठी, संयुक्त भविष्यवेधी निवेदनाच्या आधारे प्रकल्प आणि उपक्रम जलद गतीने पुढे नेण्यावर सहमती दर्शविली.
* * *
नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175867)
Visitor Counter : 4
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam