पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत, भारत मंडपम येथे, वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

Posted On: 25 SEP 2025 8:59PM by PIB Mumbai

 

रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव, केंद्रीय मंत्रिमंडळामधील माझे सहकारी चिराग पासवान, रवनीतजी, प्रतावराव जाधवजी, विविध देशांतून येथे आलेले सर्व मंत्री महोदय, मान्यवर प्रतिनिधी, पाहुणे मंडळी, तसेच उपस्थित सभ्य स्त्री-पुरुष हो!

‘वर्ल्ड फूड इंडिया’ या कार्यक्रमामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन! आजच्या या आयोजनात आपले शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि ग्राहक, हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. ‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा नव्या संपर्कांचा, नव्या संवादांचा आणि सर्जनशीलतेची एक पर्वणी ठरला आहे. मी थोड्याच वेळापूर्वी येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांना भेट देऊन आलो आहे. आनंदाची गोष्ट अशी की या प्रदर्शनात पोषणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, तेलाच्या वापरात बचत करण्यावर भर दिला आहे आणि पॅकबंद उत्पादनांची गुणवत्ता आणि पोषकता वाढवण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण आयोजनासाठी मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

प्रत्येक गुंतवणूकदार, कुठे गुंतवणूक करायची याचा निर्णय घेण्यापूर्वी, जिथे गुंतवणूक करायची त्या ठिकाणच्या नैसर्गिक सामर्थ्याकडे पाहतो. आज भारताकडेही जगभरातील, विशेषतः अन्नप्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणूकदार मोठ्या आशेने पाहत आहेत. कारण भारताकडे विविधता, मागणी आणि व्यापकता ही तिहेरी ताकद आहे. आपल्या देशात प्रत्येक प्रकारचे धान्य, प्रत्येक फळ आणि भाज्या पिकतात. या विविधतेमुळे भारताचे वैशिष्ट्य जगात वेगळे ठरते. अगदी प्रत्येक शंभर किलोमीटरवर आपल्या इथले अन्न आणि त्याची चव बदलते. भारतात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांना प्रचंड मागणी असते. हीच मागणी भारताला एक स्पर्धात्मक वरचष्मा देते आणि गुंतवणूकदारांसाठी भारताला सर्वात पसंतीचे ठिकाण बनवते.

 

मित्रांनो,

भारत आज ज्या व्यापक स्तरावर काम करत आहे, ते अभूतपूर्व आहे, अनपेक्षित आहे. गेल्या दहा वर्षांत भारतातील 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे. ही सर्व मंडळी आता नव-मध्यमवर्गाचा भाग बनले आहेत. हा नव मध्यमवर्ग म्हणजे देशातील सर्वात जोशपूर्ण, सर्वात महत्त्वाकांक्षी वर्ग आहे. या इतक्या लोकांच्या आकांक्षा, आता आपल्या आहाराचा कल-दिशा ठरवणार आहेत. देशातील मागणी सातत्याने वाढवणारा आकांक्षी वर्ग हाच आहे.

 

मित्रांनो,

आज देशाचा प्रतिभावंत युवावर्ग प्रत्येक क्षेत्रात काहीतरी वेगळे करत आहे. आपले अन्नप्रक्रिया क्षेत्रही यात मागे नाही. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी नवंउद्योग परिसंस्था (स्टार्ट-अप इकोसिस्टम) बनला आहे. आणि यातील अनेक स्टार्ट-अप्स, अन्न आणि कृषी क्षेत्रात काम करत आहेत. या क्षेत्रात, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ईलेक्ट्राॅनिक माध्यमातून व्यापार किंवा वाणिज्य(ई कॉमर्स), ड्रोन आणि अ‍ॅप्स यांनाही समाविष्ट केले जात आहे. आपले हे स्टार्ट-अप्स, पुरवठा साखळी, किरकोळ व्यवहार आणि प्रक्रिया उद्योगाच्या पद्धती बदलत आहेत. म्हणजेच भारतात विविधता, मागणी आणि नवोन्मेष सर्व काही उपलब्ध आहे. ही सर्व वैशिष्ट्ये भारताला गुंतवणुकीसाठी सर्वात आकर्षक स्थान बनवतात. म्हणूनच मी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून सांगितलेल्या गोष्टीचा पुनरुच्चार करतो— गुंतवणूक करण्यासाठी, भारतात तिचा विस्तार करण्यासाठी, हीच वेळ आहे…. योग्य वेळ आहे.

 

मित्रांनो,

एकविसाव्या शतकात जगासमोर केवढी आव्हाने उभी ठाकली आहेत, हे आपणा सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. आपण हेही जाणतो की जेव्हा-जेव्हा, जी जी आव्हाने जगासमोर आली, त्यावेळी भारताने पुढे येऊन आपली सकारात्मक भूमिका बजावली आहे. जागतिक अन्न सुरक्षेत देखील, भारत सतत आपले योगदान देत आहे. आपले शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या कष्टांमुळे, तसेच सरकारच्या धोरणांमुळे, भारताची ताकद सतत वाढत आहे. गेल्या एका दशकात आपल्या अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. आज भारत दूधाचा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे, आणि जगातील 25 टक्के दूध पुरवठा फक्त भारतातूनच होत आहे.आपण भरड धान्याचे (मिलेट्स) देखील सर्वात मोठे उत्पादक आहोत. तांदूळ आणि गहू उत्पादनामध्ये आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. फळे, भाज्या आणि मत्स्यपालनामध्ये देखील भारताचे योगदान मोठे आहे.म्हणूनच, जेव्हा-जेव्हा जगात पिकांवर संकट येते, पुरवठा साखळी मध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा भारत ताकदीनिशी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे येतो.

 

मित्रांनो,

जागतिक हितासाठी आपला प्रयत्न असा आहे की भारताची क्षमता, आपल्या देशाचे योगदान आणखी वाढावे. यासाठी आज सरकार, अन्न आणि पोषणाशी संबंधित प्रत्येक हितसंबंधी घटकाला, संपूर्ण परिसंस्थेला अधिक सक्षम करत आहे. आपले सरकार अन्न प्रक्रिया क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. म्हणूनच या क्षेत्रात 100 टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला (एफडीआय) मान्यता दिली आहे. तसेच कामगिरीवर आधारीत प्रोत्साहन (पीएलआय) योजना आणि मेगा फूड पार्क्स या मोठ्या अन्नउद्योग केंद्रांच्या विस्तारामुळे या क्षेत्राला मोठा लाभ मिळाला आहे. भारत आज जगातील सर्वात मोठी साठवण सुविधा योजना देखील राबवत आहे. या प्रयत्नांचा परिणामही स्पष्ट दिसत आहे. गेल्या दहा वर्षांत भारताच्या अन्नप्रक्रिया क्षमतेमध्ये 20 पट वाढ झाली आहे, तर प्रक्रियाकृत खाद्यपदार्थांशी संबंधित निर्यातही दुप्पट किंवा त्याहून अधिक वाढली आहे.

 

मित्रहो,

आपल्या देशातील अन्नपुरवठा आणि मूल्यसाखळीत शेतकरी, पशुपालक, मच्छीमार आणि लहान-लहान प्रक्रिया उद्योग यांची फार मोठी भूमिका आहे. गेल्या एका दशकात या सर्व हितसंबंधी घटकांना सरकारने अधिक पाठबळ पुरवले आहे. आपल्याला माहीत आहेच की भारतातील 85 टक्क्यांहून अधिक शेतकरी हे लहान किंवा अल्पभूधारक आहेत. म्हणूनच आम्ही अशा धोरणांची आखणी केली, असे सहाय्यक तंत्र विकसित केले, की आज हे लहान शेतकरीही बाजारपेठेतील मोठी ताकद ठरत आहेत.

 

मित्रहो,

आता जशी मायक्रो फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत, ती आपले स्वयंसहाय्यता गट चालवतात. या स्वयंसहाय्यता गटांसोबत आपल्या गावांमधील कोट्यवधी लोक जोडले गेलेले आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी आमचे सरकार क्रेडिट-लिंक्ड सबसिडी देत आहे. आजही या सहकाऱ्यांना जवळपास 800 कोटी रुपये अनुदान अगदी आत्ताच तुमच्या समोर हस्तांतरित करण्यात आले आहे.

 

मित्रहो,

अशाच प्रकारे, आमचे सरकार शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच एफपीओचा विस्तार करत आहे. 2014 नंतर देशात 10 हजार एफपीओ बनले आहेत. आपले लाखो छोटे शेतकरी जोडले गेले आहेत. ही छोट्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आपली उत्पादने बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यात मदत करतात. आणि हे एफपीओ केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत. ते अन्न प्रक्रिया क्षेत्रातही मोठी भूमिका बजावत आहेत आणि ब्रँडेड उत्पादने विकसित करत आहेत. तुम्ही आपल्या एफपीओची ताकद पाहाल, तर आश्चर्यचकित व्हाल. आज आपल्या एफपीओची 15 हजारहून जास्त उत्पादने ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध आहेत. काश्मीरचा बासमती तांदूळ, केसर, अक्रोड, हिमाचलचे जॅम आणि सफरचंदाचा रस, राजस्थानच्या मिलेट कुकीज, मध्य प्रदेशचे सोया नगेट्स, बिहारचे सुपरफूड मखाना, महाराष्ट्रचे शेंगदाण्याचे तेल आणि गुळ आणि केरळचे केळीचे वेफर्स तसेच नारळाचे तेल, म्हणजेच, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, भारताची कृषी विविधता आपले हे एफपीओ घरोघरी पोहोचवत आहेत. आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की 1100 हून अधिक एफपीओ करोडपती बनले आहेत, म्हणजेच त्यांची वार्षिक उलाढाल एक कोटींपेक्षा जास्त झाली आहे. एफपीओ आज शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात आणि युवा वर्गाला रोजगार देण्यात, मोठी भूमिका बजावत आहेत.

 

मित्रहो,

एफपीओ व्यतिरिक्त, भारतात सहकारी संस्थांचीही खूप मोठी ताकद आहे, आणि हे वर्ष तर, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. भारतातही सहकारी संस्था, आपल्या दुग्धोत्पादन क्षेत्राला, आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवे बळ देत आहेत. सहकारी संस्थांचे हेच महत्व ओळखून, आम्ही यासाठी एक वेगळे मंत्रालय बनवले आहे, यामुळे आपल्या धोरणांना, या सहकारी संस्थांच्या गरजांनुसार आकार देता येईल. या क्षेत्रासाठी कर आणि पारदर्शकतेसंबंधी सुधारणाही केल्या गेल्या आहेत. धोरण पातळीवर झालेल्या या बदलामुळे सहकार क्षेत्राला नवी मजबूती मिळाली आहे.

 

मित्रहो,

सागरी आणि मत्स्यव्यवसायातही, भारताची प्रगती उत्कृष्ट आहे. गेल्या दशकात, मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांचा आम्ही विस्तार केला. आम्ही मच्छिमारांना पतपुरवठ्याचे पाठबळ दिले, खोल समुद्रातील मासेमारीच्या बोटींसाठी मदत दिली. यामुळे आपले सागरी उत्पादन आणि निर्यात दोन्ही वाढले आहेत. आज हे क्षेत्र सुमारे तीन कोटी लोकांना रोजगार देत आहे. आमचा प्रयत्न सागरी उत्पादनांवरील प्रक्रियेचाही विस्तार करण्याचा आहे. यासाठी आधुनिक प्रक्रिया प्रकल्प, शीतगृह साखळी आणि स्मार्ट बंदरांसारख्या सोयी सुविधांमध्ये गुंतवणूक केली जात आहे.

 

मित्रहो,

पिकं सुरक्षित ठेवण्यासाठीही आम्ही आधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहोत. शेतकऱ्यांना अन्न विकिरणच्या तंत्रज्ञानासोबत जोडले जात आहे. यामुळे आपल्या कृषी उत्पादनांचे आयुष्य वाढले आहे आणि अन्न सुरक्षाही मजबूत झाली आहे. या कामासोबत जोडल्या गेलेल्या केंद्रांना सरकार शक्य ती सर्व मदत करत आहे.

 

मित्रहो,

आजचा भारत नवोन्मेष आणि सुधारणांच्या नव्या मार्गावरून पुढे वाटचाल करतो आहे. अलिकडच्या दिवसांत आपल्याकडे नेक्स्ट जेनरेशन जीएसटी सुधारणांवर खूप चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांना या सुधारणांनी कमी खर्च आणि जास्त लाभाचा विश्वास दिला आहे. लोणी आणि तूपावर आता फक्त 5 % वस्तू आणि सेवाकर असल्याने त्यांना खूप फायदा होईल. दुधाच्या कॅनवरही फक्त 5 टक्केच कर आहे. यामुळे शेतकरी आणि उत्पादकांना आणखी उत्तम भाव मिळेल. यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला कमी किंमतमध्ये जास्त पोषण मिळेल याची सुनिश्चिती झाली आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्रालाही या सुधारणांमुळे मोठा लाभ मिळेल याची सुनिश्चिती झाली आहे. खाण्यासाठी तयार आणि संरक्षितपद्धतीने साठवलेली फळं, भाज्या आणि सुक्या मेव्यावर फक्त 5 टक्के वस्तू आणि सेवा कर आहे. आज 90 टक्क्यापेक्षा जास्त प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादने, शून्य टक्के किंवा 5 टक्क्याच्या कर दराअंतर्गत आली आहेत. जैव कीटकनाशक आणि सूक्ष्म पोषक घटकांवरचा कर कमी झाला आहे. वस्तू आणि सेवा करातील सुधारणांमुळे, जैव घटक स्वस्त झाले आहेत, छोटे सेंद्रिय शेतकरी आणि एफपीओना थेट लाभ मिळेल याची सुनिश्चिती झाली आहे.


मित्रहो,

आज काळाची मागणी, जैवविघटनीय पॅकेजिंगची देखील आहे. आपली उत्पादने ताजी राहतील, उत्तम राहतील, हे गरजेचे आहे, पण यासोबतच निसर्गाप्रतिही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच सरकारने जैवविघटनीय पॅकेजिंगवरील वस्तू आणि सेवा कर देखील 18 टक्के वरून कमी करून 5 टक्के केला आहे. मी उद्योग क्षेत्रातील सर्व सहकाऱ्यांनाही आग्रहाने सांगू इच्छितो की जैवविघटनीय पॅकेजिंगशी जोडलेल्या नवोन्मेषात गुंतवणूक करायला पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या सर्व उत्पादनांना पॅकेजिंगसाठी जैवविघटनीयतेच्या दिशेने वळवले पाहीजे.

 

मित्रहो,

भारताने मोकळ्या मनाने आपल्या देशाचे दरवाजे जगासाठी उघडे ठेवले आहेत. आपण अन्न साखळीशी जोडलेल्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी खुले आहोत. आपण सहकार्यपूर्ण भागिदाऱ्यांसाठी मोकळ्या मनाने तयार आहोत. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भारतात सर्वात जास्त गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतो, या क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत, याचा तुम्ही लाभ घ्या आणि या आयोजनसाठी मी सर्व संबंधित लोकांना खूप खूप शुभेच्छा देतो.

धन्यवाद!

***

शिल्पा पोफळे / आशुतोष सावे / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2171620) Visitor Counter : 11