पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला केले संबोधित


अभिमानास्पद लोकशाही आणि मैत्रीपूर्ण राष्ट्राचे निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींबरोबर संवाद साधताना, माझाच सन्‍मान होत असल्याची भावना : पंतप्रधान

भारतासाठी लोकशाही ही एक जीवनपद्धती : पंतप्रधान

भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो हे शतकानुशतकांच्या जुन्या बंधांमध्ये रुजलेले नाते : पंतप्रधान

आधुनिक भारताच्या उभारणीसाठी आम्ही महिलांचे हात बळकट करत आहोत: पंतप्रधान

आम्ही आमच्या विकासाला इतरांविषयी असलेली जबाबदारी मानतो; आणि ग्लोबल साऊथ ही आमची प्राथमिकता नेहमीच असेल: पंतप्रधान

ग्लोबल साऊथ उदयास येत आहे; त्यांना एक नवीन आणि अधिक न्याय्य जागतिक व्यवस्था पहायची आहे: पंतप्रधान

‘महासागर’ हा ग्लोबल साऊथसाठी भारताचा मार्गदर्शक दृष्टिकोन आहे: पंतप्रधान

Posted On: 04 JUL 2025 10:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जुलै 2025

 

सिनेटचे अध्यक्ष वेड मार्क आणि सभागृहाचे अध्यक्ष जगदेव सिंह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या [टी आणि टी] संसदेच्या संयुक्त सभेला संबोधित केले. ते टी आणि टी संसदेला संबोधित करणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत आणि हा प्रसंग भारत-त्रिनिदाद आणि टोबॅगो द्विपक्षीय संबंधांमध्ये एक मैलाचा दगड ठरला आहे. 

पंतप्रधानांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सदस्यांना विशेष शुभेच्छा दिल्या. सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान केल्याबद्दल टी आणि टीच्या लोकांचे  त्यांनी आभार मानले. भारतीय लोकशाहीच्या चैतन्यशीलतेबद्दल सांगताना त्यांनी नमूद केले की लोकशाहीची जननी या नात्याने भारताने या प्रथेला आपल्या संस्कृतीचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग बनवले आहे. या दृष्टिकोनामुळे भारताची विविधता भरभराटीला आली आणि समृद्ध झाली तसेच सर्व कल्पना सहअस्तित्वात राहून संसदीय चर्चा आणि सार्वजनिक वादविवाद समृद्ध झाले.

पंतप्रधानांनी टी आणि टी च्या यशस्वी लोकशाही प्रवासाबद्दल अभिनंदन केले. स्वातंत्र्याच्या मार्गावर टी आणि टी च्या लोकांसोबत एकजुटीने उभे राहण्याचे भाग्य भारताला  लाभल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक राष्ट्रे म्हणून दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेले बंध अधिकाधिक मजबूत होत आहेत, यावर त्यांनी भर दिला. भारताने भेट दिलेल्या सभापतींच्या खुर्चीत योग्यरित्या प्रतिबिंबित झालेले दोन्ही लोकशाहींमधील घनिष्ठ संबंध अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी द्विपक्षीय संसदीय देवाणघेवाण आणखी वाढविण्याचे आवाहन केले. 

सभागृहात महिला खासदारांच्या लक्षणीय उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी भारताने संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यासाठी उचललेल्या ऐतिहासिक पावलांवर प्रकाश टाकला. भारतातील महिला नेत्यांनी तळागाळाचे नेतृत्व कसे केले आहे, याबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली आणि या संदर्भात देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांना ऊर्जावान करणाऱ्या १५ लाख निवडून आलेल्या महिलांचा उल्लेख केला.

मानवतेसमोरील आव्हानांबद्दल पंतप्रधानांनी विस्तृत माहिती दिली. शांतताप्रिय समाजासाठी गंभीर धोका असलेल्या दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी जागतिक समुदायाला केले. जागतिक प्रशासनात सुधारणा करण्याचे आणि ग्लोबल साऊथला स्वतःचे हक्क मिळावेत असे आवाहन त्यांनी केले. भारत-कॅरिकॉम संबंध अधिक मजबूत करण्याबाबतची  वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली.

त्रिनिदादमध्ये भारतीयांच्या आगमनाच्या 180 व्या वर्षाच्या उत्सवाबाबत बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की दोन्ही देशांमधील संबंध शतकानुशतके प्राचीन बंधांच्या पायावर आधारित आहेत आणि हे संबंध अधिकाधिक दृढ आणि समृद्ध होत राहतील.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2169087) Visitor Counter : 7