पंतप्रधान कार्यालय
यूईआर-II आणि द्वारका एक्सप्रेसवेच्या दिल्ली खंडाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
17 AUG 2025 4:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2025
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितीन गडकरी, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अजय टमटा, हर्ष मल्होत्रा, दिल्ली आणि हरियाणाचे खासदार, उपस्थित मंत्री, इतर लोकप्रतिनिधी आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
या द्रुतगती मार्गाचे नाव द्वारका आहे, जिथे हा कार्यक्रम होत आहे त्या ठिकाणाचे नाव रोहिणी आहे, म्हणजे जन्माष्टमीचा आनंद आणि योगायोगाने मी देखील द्वारकाधीशाच्या भूमीतील आहे, संपूर्ण वातावरण खूपच कृष्णमय (कृष्णाने भारलेले) झाले आहे.
मित्रांनो,
हा ऑगस्ट महिना स्वातंत्र्य आणि क्रांतीच्या रंगांनी रंगलेला आहे. स्वातंत्र्याच्या या उत्सवादरम्यान आज देशाची राजधानी दिल्ली इथे होत असलेल्या विकास क्रांतीची साक्षीदार बनत आहे. काही काळापूर्वीच दिल्लीला द्वारका द्रुतगती मार्गाची आणि शहरी विस्तार मार्गाची जोड मिळाली आहे. यामुळे दिल्ली, गुरुग्राम आणि संपूर्ण ‘एनसीआर’ मधील लोकांच्या सुविधेत भर पडेल. कार्यालये आणि कारखान्यात ये-जा करणे सोपे होईल, प्रत्येकाचा वेळ वाचेल. व्यापारी वर्ग आणि आपल्या शेतकऱ्यांना विशेष फायदे मिळणार आहेत. या आधुनिक रस्त्यांसाठी आणि आधुनिक पायाभूत सुविधांसाठी मी दिल्ली-एनसीआरमधील सर्व लोकांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
परवा 15 ऑगस्ट रोजी मी लाल किल्ल्यावरून देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल, देशाच्या आत्मनिर्भरतेबद्दल आणि देशाच्या आत्मविश्वासाबद्दल बोललो. आजचा भारत काय विचार करत आहे, त्याची स्वप्ने काय आहेत, त्याचे संकल्प काय आहेत, हे सर्व आज संपूर्ण जग अनुभवत आहे.
आणि मित्रांनो,
ज्यावेळी जग भारताकडे पाहते, त्याचे मूल्यांकन करते, तेव्हा त्याची पहिली नजर आपल्या राजधानीवर, आपल्या दिल्लीवर पडते. म्हणूनच, आपल्याला दिल्लीला विकासाचे असे प्रारूप बनवावे लागेल, जिथे प्रत्येकाला वाटेल की हो, ही विकसनशील भारताची राजधानी आहे.
मित्रांनो,
यासाठी गेल्या 11 वर्षांपासून केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने वेगवेगळ्या पातळ्यांवर सतत काम केले आहे. आता हा मुद्दा आहे संचारसंपर्काचा. गेल्या दशकात दिल्ली-एनसीआरच्या संचारसंपर्कात अभूतपूर्व सुधारणा झाली आहे. येथे आधुनिक आणि रुंद द्रुतगती मार्ग आहेत. दिल्ली-एनसीआर मेट्रो जाळ्याबाबतीत बोलायचे तर ते जगातील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. येथे नमो भारत सारखी आधुनिक जलद रेल्वे व्यवस्था आहे. म्हणजेच, गेल्या 11 वर्षांत दिल्ली-एनसीआरमध्ये प्रवास करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.
मित्रांनो,
दिल्लीला एक उत्तम शहर बनवण्याचे आपण हाती घेतलेले काम सुरूच आहे. आजही आपण सर्वजण याचे साक्षीदार झालो आहोत. द्वारका द्रुतगती मार्ग असो किंवा शहरी विस्तार मार्ग, दोन्ही रस्ते उत्कृष्टपणे बांधले गेले आहेत. परिघाकृती द्रुतगती मार्गानंतर , आता शहरी विस्तार मार्ग दिल्लीला खूप मदत करणार आहे.
मित्रांनो,
शहरी विस्तार मार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तो दिल्लीला कचऱ्याच्या डोंगरांपासून मुक्त करण्यास देखील मदत करत आहे. शहरी विस्तार रस्त्याच्या बांधकामात लाखो टन कचरा वापरण्यात आला आहे. म्हणजेच, कचऱ्याचे डोंगर कमी करून तो कचरा रस्ता बांधण्यासाठी वापरण्यात आला आहे आणि हे काम वैज्ञानिक पद्धतीने केले गेले आहे. भालस्वा कचराकुंडी जवळच आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की, येथे राहणाऱ्या कुटुंबांसाठी ही किती मोठी समस्या आहे. आमचे सरकार, दिल्लीतील लोकांना अशा प्रत्येक समस्येपासून मुक्त करण्यासाठी काम करत आहे.
मित्रांनो,
मला आनंद वाटतो की, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीचे भाजपा सरकार यमुना स्वच्छ करण्यात सतत गुंतलेले आहे. मला सांगण्यात आले आहे की, इतक्या कमी काळात यमुना नदीतून 16 लाख मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. इतकेच नाही तर अगदी कमी वेळात दिल्लीत 650 देवी इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत आणि इतकेच नाही तर भविष्यात इलेक्ट्रिक बसेस मोठ्या संख्येने येणार आहेत. बस गाड्यांचा आकडा आता जवळजवळ दोन हजारांची संख्या ओलांडणार आहे. यामुळे ग्रीन दिल्ली-क्लीन दिल्लीचा मंत्र आणखी मजबूत होईल.
मित्रांनो,
बऱ्याच वर्षांनी राजधानी दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. आपण फार काळ सत्तेत नव्हतो आणि मागील सरकारांनी दिल्लीला कसे उद्ध्वस्त केले आहे, दिल्लीला कसे खड्ड्यात ढकलले आहे हे आपण पाहत आहोत, त्यामुळे बऱ्याच काळापासून असलेल्या समस्यांमधून दिल्लीला बाहेर काढण्याचे काम नवीन भाजपा सरकारसाठी किती कठीण आहे, हे मला माहीत आहे. प्रथम खड्डा भरण्यासाठी ऊर्जा खर्च केली जाईल आणि नंतर मोठ्या कष्टाने काही काम दिसेल. परंतु मला विश्वास आहे की, तुम्ही दिल्लीसाठी निवडलेला चमू कठोर परिश्रम करेल आणि गेल्या अनेक दशकांपासून दिल्लीला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यातून बाहेर काढेल.
मित्रांनो,
दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये, सर्वत्र भाजपाचे सरकार सध्या आहे. हा योगायोग पहिल्यांदाच घडून आला आहे. यावरून हे दिसून येते की, या संपूर्ण प्रदेशाने आपल्या सर्वांना, भाजपाला मोठा आशीर्वाद दिला आहे. म्हणूनच, आपली जबाबदारी समजून आपण दिल्ली-एनसीआरच्या विकासात गुंतलो आहोत. तथापि, असे काही राजकीय पक्ष आहेत जे अजूनही जनतेचा हा आशीर्वाद पचवू शकत नाहीत.
ते लोकांचा विश्वास आणि जमिनीवरील वास्तव या दोन्हीपासून खूपच तुटलेले आहेत; ते खूप दूर गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी दिल्ली आणि हरियाणाच्या लोकांना एकमेकांविरुद्ध उभे करण्यासाठी, त्यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्यासाठी कट रचण्यात आले होते हे तुम्हाला आठवत असेल. असेही म्हटले गेले होते की, हरियाणाचे लोक दिल्लीचे पाणी विषारी करत आहेत. दिल्ली आणि संपूर्ण एनसीआर अशा नकारात्मक राजकारणापासून मुक्त झाले आहे. आता आपण एनसीआरचा कायापालट करण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहोत. आणि मला विश्वास आहे की आपण ते निश्चित करू.
मित्रांनो,
सुशासन ही भाजपा सरकारची ओळख आहे. भाजपा सरकारसाठी जनता सर्वोच्चस्थानी आहे. तुम्ही आमचे उच्चाधिकारी आहात; लोकांचे जीवन सोपे करण्यासाठी आमचे सतत प्रयत्न असतात. हे आमच्या धोरणांमध्ये दिसून येते, हे आमच्या निर्णयांमध्ये दिसून येते. एक काळ असा होता जेव्हा काँग्रेस हरियाणावर राज्य करत होती, तेव्हा कोणत्याही खर्चाशिवाय (काही पैसे किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत न देता) एकही नियुक्ती मिळणे कठीण होते. परंतु हरियाणात भाजपा सरकारने लाखो तरुणांना पूर्ण पारदर्शकतेने सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. नायब सिंह सैनी जी यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया सुरू आहे.
मित्रांनो,
दिल्लीमध्येही, जे लोक झोपडपट्टीत राहत होते, ज्यांची स्वतःची घरे नव्हती, त्यांना पक्की घरे मिळत आहेत. जिथे वीज, पाणी, गॅस जोडणी नव्हती, तिथे या सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. आणि जर मी देशाबद्दल बोललो तर गेल्या 11 वर्षांत देशात विक्रमी संख्येने रस्ते बांधले गेले आहेत आणि आपल्या रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे. वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्या सुरू झाल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. मध्यम- लहान शहरांमध्ये विमानतळ बांधले जात आहेत. एनसीआरमध्ये किती विमानतळ बांधले गेले आहेत ते पहा. आता हिंडन विमानतळावरूनही अनेक शहरांमध्ये विमाने जाऊ लागली आहेत. नोएडामधील विमानतळ देखील लवकरच तयार होणार आहे.
मित्रांनो,
गेल्या दशकात देशाने आपल्या जुन्या पद्धती बदलल्या तेव्हाच हे शक्य झाले आहे. देशाला ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता होती, ज्या वेगाने त्या बांधायला हव्या होत्या, तसे पूर्वी घडले नव्हते. आता आपल्याकडे पूर्व आणि पश्चिम परिघीय द्रुतगती महामार्ग आहे. दिल्ली-एनसीआरला अनेक दशकांपासून याची गरज भासत होती. यूपीए सरकारच्या काळात यासंदर्भातील फायली फिरू लागल्या. पण जेव्हा तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, जेव्हा केंद्रात आणि हरियाणामध्ये भाजपा सरकारे स्थापन झाली तेव्हा हे काम सुरू झाले. आज हे रस्ते मोठ्या अभिमानाने सेवा देत आहेत.
मित्रांनो,
विकास प्रकल्पांबद्दलच्या उदासीनतेची ही परिस्थिती फक्त दिल्ली-एनसीआरमध्येच नव्हती, तर संपूर्ण देशात होती. पहिले म्हणजे, पूर्वी पायाभूत सुविधांसाठीचे तरतूद खूपच कमी होती, मंजूर झालेले प्रकल्पही वर्षानुवर्षे पूर्ण झाले नाहीत. गेल्या 11 वर्षांत आम्ही पायाभूत सुविधांसाठीचे तरतूद 6 पटीने वाढवली आहे. आता योजना जलद पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. म्हणूनच आज द्वारका द्रुतगती मार्गासारखे प्रकल्प पूर्ण होत आहेत.
आणि बंधू आणि भगिनींनो,
ही सर्व पैशांची गुंतवणूक केल्याने केवळ सुविधाच निर्माण होत नाहीत तर या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होत आहेत. जेव्हा इतके बांधकाम होते तेव्हा मजुरांपासून ते अभियंत्यांपर्यंत लाखो लोकांना रोजगार मिळतो. वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याशी संबंधित कारखाने आणि दुकानांमध्ये नोकऱ्या वाढतात. वाहतूक आणि दळणवळण यातील रोजगार निर्माण होतो.
मित्रांनो,
ज्यांनी दीर्घकाळ सरकार चालवले आहे, त्यांचे सर्वात मोठे ध्येय म्हणजे लोकांवर राज्य करणे. आमचा प्रयत्न म्हणजे सरकारी दबाव आणि लोकांच्या जीवनातील हस्तक्षेप, दोन्ही संपवणे. मी तुम्हाला दिल्लीत पूर्वी परिस्थिती कशी होती, याचे आणखी एक उदाहरण देतो. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. दिल्लीतील आमचे स्वच्छता मित्र, स्वच्छता कामात गुंतलेले सहकारी, हे सर्वजण दिल्लीत खूप मोठी जबाबदारी बजावतात. सकाळी उठताच आपण प्रथम त्यांचे आभार मानले पाहिजेत. पण मागील सरकारांनी या लोकांना आपले गुलाम मानले. मी माझ्या या छोट्या सफाई बंधूंबद्दल बोलत आहे. हे लोक जे संविधान डोक्यावर घेऊन नाचतात, त्यांनी संविधान कसे चिरडले, त्यांनी बाबासाहेबांच्या भावनांना कसा दगा दिला, आज मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे. मी जे बोलणार आहे ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
दिल्लीत स्वच्छता कामगार म्हणून काम करणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींसाठी या देशात, दिल्लीत एक धोकादायक कायदा होता. दिल्ली महानगरपालिका कायद्यात एक गोष्ट लिहिली होती की, जर एखादा स्वच्छता कर्मचारी माहिती न देता कामावर आला नाही तर त्याला एक महिना तुरुंगात टाकता येऊ शकेल. तुम्ही मला सांगा, तुम्हीच विचार करा, या लोकांना सफाई कर्मचाऱ्यांबद्दल काय वाटले? तुम्ही त्यांना एका छोट्या चुकीसाठी तुरुंगात टाकाल का? आज सामाजिक न्यायाबद्दल मोठ्या गप्पा मारणाऱ्यांनी देशात असे अनेक नियम आणि कायदे कायम ठेवले होते. मोदीच असे चुकीचे कायदे शोधून काढत आहेत आणि ते नष्ट करत आहेत. आमच्या सरकारने आधीच असे शेकडो कायदे रद्द केले आहेत आणि ही मोहीम सुरूच आहे.
मित्रांनो,
आमच्यासाठी सुधारणा म्हणजे सुशासनाचा विस्तार. म्हणूनच आम्ही सतत सुधारणांवर भर देत आहोत. येणाऱ्या काळात आम्ही अनेक मोठ्या सुधारणा करणार आहोत जेणेकरून जीवन आणि व्यवसाय दोन्हीही सोपे होतील.
मित्रांनो,
याच क्रमाने, जीएसटीमध्ये पुढील पिढीतील सुधारणा होणार आहेत. या दिवाळीत देशवासीयांना जीएसटी सुधारणांमुळे दुहेरी बोनस मिळणार आहे. आम्ही त्याचे संपूर्ण स्वरूप राज्यांना पाठवले आहे. मला आशा आहे की सर्व राज्ये भारत सरकारच्या या उपक्रमाला सहकार्य करतील. आम्ही ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू जेणेकरून ही दिवाळी अधिक चमकदार होईल. आमचा प्रयत्न जीएसटी अधिक सुलभ करण्याचा आणि कर दरांमध्ये सुधारणा करण्याचा आहे. प्रत्येक कुटुंब- गरीब आणि मध्यमवर्गीय, प्रत्येक लहान-मोठा उद्योजक, प्रत्येक व्यापारी आणि व्यावसायिकाला याचा फायदा होईल.
मित्रांनो,
भारताची सर्वात मोठी शक्ती म्हणजे आपली प्राचीन संस्कृती, आपला प्राचीन वारसा. या सांस्कृतिक वारशात जीवनाचे तत्वज्ञान आहे, एक जिवंत तत्वज्ञान आहे आणि जीवनाच्या या तत्वज्ञानात आपल्याला चक्रधारी मोहन आणि चरखाधारी मोहन या दोघांचाही परिचय होतो. वेळोवेळी आपण चक्रधारी मोहन ते चरखाधारी मोहन या दोघांनाही अनुभवतो. चक्रधारी मोहन म्हणजे भगवान कृष्ण, सुदर्शन चक्राचे वाहक, ज्यांनी लोकांना सुदर्शन चक्राची शक्ती अनुभवायला लावली आणि चरखाधारी मोहन म्हणजे महात्मा गांधी, ज्यांनी चरखा फिरवून लोकांना स्वदेशीची शक्ती अनुभवायला लावली.
मित्रांनो,
भारताला सक्षम बनवण्यासाठी, आपल्याला चक्रधारी मोहन यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढे जावे लागेल आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपल्याला चरखाधारी मोहन यांच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेल. आपल्याला व्होकल फॉर लोकल हा आपला जीवनमंत्र बनवावा लागेल.
मित्रांनो,
हे काम आपल्यासाठी कठीण नाही. आपण जेव्हा जेव्हा प्रतिज्ञा केली आहे, तेव्हा आपण ती पूर्ण केली आहे. मी तुम्हाला खादीचे एक छोटेसे उदाहरण देतो. खादी नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचली होती, त्याबद्दल विचारणारे कोणी नव्हते. जेव्हा तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली तेव्हा मी देशाला आवाहन केले, देशाने प्रतिज्ञा घेतली आणि त्याचे परिणामही दिसले. एका दशकात खादीची विक्री जवळजवळ 7 पट वाढली आहे. देशातील लोकांनी व्होकल फॉर लोकल या मंत्रानुसार खादीचा स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे, देशाने मेड इन इंडिया फोनवरही विश्वास व्यक्त केला आहे. 11 वर्षांपूर्वी, आपल्याला आवश्यक असलेले बहुतेक फोन आपण आयात करायचो. आज, बहुतेक भारतीय मेड इन इंडिया फोन वापरतात. आज आपण दरवर्षी 30-35 कोटी मोबाईल फोन बनवत आहोत, 30-35 कोटी, 30-35 कोटी मोबाईल फोन आणि त्यांची निर्यातही करत आहोत.
मित्रांनो,
आपला मेड इन इंडिया, आपला यूपीआय, आज जगातील सर्वात मोठा रिअल टाइम डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म बनला आहे, जगातील सर्वात मोठा. मग ते रेल्वेचे डबे असोत किंवा भारतात बनवलेली इंजिने असोत, त्यांची मागणी आता जगातील इतर देशांमध्येही वाढत आहे.
मित्रांनो,
पायाभूत सुविधा, रस्ते पायाभूत सुविधांचा विचार केला तर भारताने गतिशक्ती मंच तयार केला आहे, त्यात 1600 थर आहेत, डेटाचे एक हजार सहाशे थर आहेत आणि कोणत्याही प्रकल्पाला कोणत्या प्रकारच्या परिस्थितीतून जावे लागेल, त्याला कोणते नियम पाळावे लागतील, ते वन्यजीव असो की जंगल, नदी असो की नाला, या सर्व गोष्टी काही मिनिटांत सापडतात आणि प्रकल्प जलद गतीने पुढे जातात. आज गतिशक्तीचे एक वेगळे विद्यापीठ तयार झाले आहे आणि गतिशक्ती देशाच्या प्रगतीसाठी एक अतिशय शक्तिशाली मार्ग बनली आहे.
मित्रांनो,
एक दशकापूर्वीपर्यंत, आपण परदेशातून खेळणी आयात करत होतो. पण जेव्हा आपण भारतीयांनी लोकलसाठी व्होकल बनण्याची शपथ घेतली, तेव्हा भारतात मोठ्या प्रमाणात खेळणी तयार होऊ लागली. एवढेच नव्हे तर आज आपण जगातील 100 हून अधिक देशांमध्ये खेळणी निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.
मित्रांनो,
म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना, सर्व देशवासियांना पुन्हा विनंती करेन की आपण भारतात बनवलेल्या उत्पादनांवर विश्वास ठेवला पाहिजे. जर तुम्ही भारतीय असाल तर फक्त भारतात बनलेल्या उत्पादनांची खरेदी करा. सध्या सणांचा हंगाम सुरू आहे. तुमच्या स्थानिक उत्पादनांचा आनंद तुमच्या प्रियजनांसोबत व्दिगुणित करावा, तुम्ही अगदी ठरवून भारतात बनवलेल्या, भारतीयांनी बनवलेल्या भेटवस्तू द्याव्यात.
मित्रांनो,
आज मी व्यापारी समुदायाला आणि दुकानदारांनाही एक गोष्ट सांगू इच्छितो की, कधीतरी तुम्ही परदेशात बनवलेल्या वस्तू याआधी विकल्या असतील तर, तुम्हाला वाटले असेल की तुम्हाला थोडा जास्त नफा मिळतो. आता तुम्ही जे काही केले ते झाले, पण आता तुम्हीही ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्राबाबत मला समर्थन करावे. तुमचे हे एक पाऊल केवळ देशालाच नाही तर तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या मुलांनाही फायदेशीर ठरेल. तुम्ही विकलेल्या प्रत्येक वस्तूचा फायदा देशातील कोणत्या ना कोणत्या कामगाराला किंवा गरीबांना होईल. तुम्ही विकलेल्या प्रत्येक गोष्टीचा पैसा भारतातच राहील आणि तो काही भारतीयांना दिला जाईल. याचा अर्थ असा की, यामुळे भारतीयांची खरेदी शक्ती वाढेल, अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि म्हणूनच तुम्हाला ‘मेड इन इंडिया’ उत्पादने पूर्ण अभिमानाने विकण्याची विनंती करीत आहे.
मित्रांनो,
आज दिल्ली ही अशी राजधानी बनत आहे जी भारताच्या भूतकाळाला त्याच्या भविष्याशी जोडते. काही दिवसांपूर्वीच देशाला एक नवीन केंद्रीय सचिवालय - कर्तव्य भवन मिळाले. एक नवीन संसद बांधण्यात आली आहे. कर्तव्य पथ एका नवीन स्वरूपात आपल्यासमोर आला आहे. भारत मंडपम आणि यशोभूमी सारखी आधुनिक परिषद केंद्रे आज दिल्लीचे वैभव वाढवत आहेत. ही दिल्लीला व्यवसाय आणि व्यापारासाठीचे एक उत्तम ठिकाण बनवत आहेत. मला विश्वास आहे की, या सर्व लोकांच्या शक्ती आणि प्रेरणेमुळे आपली दिल्ली जगातील सर्वोत्तम राजधानी म्हणून उदयास येईल. या इच्छेसह, पुन्हा एकदा, या विकासकामांसाठी, मी तुम्हा सर्वांना, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश यांना माझ्या शुभेच्छा आणि अभिनंदन देतो. हा संपूर्ण प्रदेशसुद्धा लवकरच विकसित होईल. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!
* * *
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168501)
Visitor Counter : 10
Read this release in:
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam