पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत-फिजी संयुक्त निवेदन: अतिशय जिव्हाळ्याच्या 'वेइलोमनी दोस्ती' या भावनेतून भागीदारी

प्रविष्टि तिथि: 25 AUG 2025 1:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, फिजीचे पंतप्रधान  सितिवेनी राबुका, यांनी 24 ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत भारताला अधिकृत भेट दिली. पंतप्रधान राबुका, त्यांच्या सध्याच्या पदानुसार पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यात नवी दिल्लीला भेट देत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, आरोग्य आणि वैद्यकीय सेवा मंत्री  अँटोनियो लालाबालावू, तसेच फिजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ आहे.

पंतप्रधान मोदींनी फिजीचे पंतप्रधान राबुका आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बाबी, तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर सर्वसमावेशक आणि दूरगामी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी संबंधांच्या वाढीबद्दल समाधान व्यक्त केले आणि संरक्षण, आरोग्य, कृषी, कृषी-प्रक्रिया, व्यापार आणि गुंतवणूक, लघु आणि मध्यम उद्योगांचा विकास, सहकार, संस्कृती, क्रीडा, शिक्षण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये व्यापक, सर्वसमावेशक आणि दूरगामी भागीदारी निर्माण करण्याचा आपल्या निर्धाराची पुष्टी केली.

उभय नेत्यांनी अलिकडच्या वर्षांत द्विपक्षीय देवाणघेवाणीला मिळालेल्या गतीबद्दल समाधान व्यक्त केले, ज्यामध्ये भारताच्या राष्ट्रपती,  द्रौपदी मुर्मू यांनी ऑगस्ट 2024 मध्ये फिजीला दिलेल्या ऐतिहासिक पहिल्यावहिल्या भेटीचा समावेश आहे. त्यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये फिजीतील नाडी येथे 12 व्या जागतिक हिंदी परिषदेच्या यशस्वी आयोजनाची आठवण करून दिली, ज्यामध्ये भारत आणि फिजी यांच्यातील सामायिक भाषिक आणि सांस्कृतिक वारसा साजरा झाला.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि फिजी यांच्यातील खोलवर रुजलेल्या आणि दीर्घकाळापासून असलेल्या संबंधांना आणि  दोन्ही देशांच्या जनतेमधील परस्परसंबंधांना पुन्हा अधोरेखित केले. त्यांनी 1879 ते 1916 दरम्यान फिजीमध्ये आलेल्या गिरमिटिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 60,000 हून अधिक भारतीय कंत्राटी मजुरांनी, फिजीची बहुसांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात, वैविध्यपूर्ण समाज आणि अर्थव्यवस्था घडवण्यात दिलेल्या योगदानाची दखल घेतली. पंतप्रधान राबुका यांनी परराष्ट्र व्यवहार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री,  पबित्रा मार्गारेटा यांच्या मे 2025 मध्ये 146 व्या गिरमिट दिवस  समारंभात सहभागी होण्यासाठी फिजीला दिलेल्या भेटीची प्रशंसा केली.

उभय नेत्यांनी जुलै 2025 मध्ये परराष्ट्र कार्यालय सल्लामसलतीच्या 6 व्या फेरीच्या यशस्वी आयोजनाची दखल घेतली, ज्याने प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्याची नवीन क्षेत्रे ओळखण्यासाठी एक महत्त्वाचा मंच प्रदान केला.

दोन्ही नेत्यांनी दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याबाबत सहमती दर्शविली आणि दहशतवादाच्या सर्व रूपांचा आणि विचारसरणीचा निषेध केला. दोन्ही नेत्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला, ज्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला; त्यांनी दहशतवादासाठी शून्य सहिष्णुतेचा पुनरुच्चार केला आणि दहशतवादावर दुटप्पी भूमिका फेटाळली. दोन्ही देशांनी मूलतत्ववादीकरणाचा सामना करण्याची; दहशतवादाच्या अर्थपुरवठ्याविरोधात लढा देण्याची; दहशतवादी कारणांसाठी नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर थांबवण्याची आणि संयुक्त प्रयत्नांद्वारे आणि क्षमता उभारणीद्वारे दहशतवादी सदस्यभरती आणि अनेक देशांमध्ये पसरलेल्या संघटित गुन्हेगारीचा सामना करण्याची गरज लक्षात घेतली. दोन्ही बाजूंनी संयुक्त राष्ट्रांच्या आणि इतर बहुपक्षीय मंचांवर दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करण्यास सहमती दर्शविली.

नेत्यांनी भारताच्या मिशन LiFE आणि  नील प्रशांत खंडासाठी 2050 धोरणाच्या भावनेमध्ये हवामानविषयक उपाययोजना , प्रतिरोधकक्षमता निर्मिती आणि शाश्वत विकासाप्रति आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी  आपत्ती प्रतिरोधकक्षम पायाभूत सुविधांसाठी आघाडी [Coalition for Disaster Resilient Infrastructure (CDRI)] आणि जागतिक जैवइंधन आघाडीत (GBA) फिजीच्या सदस्यत्वाची प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मधील वाढत्या सहकार्याचे स्वागत केले, ज्यात ISA, आणि फिजी नॅशनल युनिव्हर्सिटीसोबतच्या त्रिपक्षीय सामंजस्य कराराद्वारे फिजी नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये भावी काळात स्थापन होणार असलेले स्टार सेंटर आणि फिजीमधील प्राधान्याच्या क्षेत्रांमध्ये सौर उपकरणांचा वापर वाढवण्यासाठी संरचना स्थापन  भागीदारी चौकटीवर स्वाक्षरी  यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी CDRI चौकटी अंतर्गत तांत्रिक सहाय्य, क्षमता उभारणी आणि जागतिक मंचांवर आग्रही राहून फिजीच्या राष्ट्रीय प्रतिरोधकक्षमतेच्या उद्दिष्टांना समर्थन देण्याप्रति भारताची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली.

नेत्यांनी जागतिक जैवइंधन आघाडीच्या चौकटीत जैव-इंधनांना शाश्वत ऊर्जा उपाय म्हणून प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या सामायिक वचनबद्धतेला दुजोरा दिला. आघाडीचे संस्थापक आणि सक्रीय सदस्य म्हणून, दोन्ही बाजूंनी ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी जैवइंधनाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. त्यांनी फिजीमध्ये शाश्वत जैवइंधन उत्पादन आणि वापर वाढवण्यासाठी क्षमता उभारणी, तांत्रिक सहाय्य आणि धोरणांच्या चौकटीवर सहकार्य मजबूत करण्याबाबतही सहमती दर्शविली.

नेत्यांनी द्विपक्षीय व्यापारातील निश्चित गतीने होणाऱ्या वृद्धीची नोंद घेतली आणि भारत आणि फिजी यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी भरीव परंतु अद्याप विचारात न घेतलेल्या क्षमतांची दखल घेतली. त्यांनी आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी, व्यापाराच्या प्रकारांमध्ये विविधता आणण्यासाठी आणि पुरवठा साखळ्यांची लवचिकता  वाढवण्यासाठी परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये क्षेत्रीय सहकार्य  वाढवण्याची इच्छा  व्यक्त केली . पंतप्रधान मोदींनी फिजी सरकारने भारतीय तुपाला (Indian ghee) बाजारपेठ प्रवेश (market access) दिल्याचे स्वागत केले.

मजबूत, सर्वसमावेशक, आणि शाश्वत इंडो-पॅसिफिक आर्थिक संरचनेसाठी त्यांच्या सामायिक दृष्टीकोनाचा  पुनरुच्चार करताना, दोन्ही नेत्यांनी परस्पर समृद्धीला चालना देण्यासाठी एकत्र  काम करण्याबाबत वचनबद्धता दर्शविली. दोन्ही नेत्यांनी फिजीचा समावेश असलेल्या पॅसिफिक द्वीप देशांसोबत,  भारताच्या वाढत्या संबंधांची दखल घेतली.  पूर्वाभिमुख कृती धोरणांतर्गत कृती आधारित मंच (FIPIC) आणि पॅसिफिक आयलंड मंचा(PIF) मध्ये  संवाद भागीदार म्हणून भारताच्या सहभागाद्वारे या संबंधामध्ये वाढ झाली आहे.  मे 2023 मध्ये आयोजित तिसऱ्या FIPIC शिखर परिषदेच्या फलनिष्पत्तींची आठवण करून, पंतप्रधान मोदींनी फिजीच्या प्राधान्यांना केंद्रस्थानी  ठेवून व्यापक उपक्रमांद्वारे या प्रदेशात विकास भागीदारीप्रति भारताची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. आरोग्यसेवेला एक प्रमुख प्राधान्य क्षेत्र म्हणून पुन्हा अधोरेखित करताना, दोन्ही नेत्यांनी सुवा (Suva) मध्ये 100 खाटांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची रचना, बांधकाम, तैनाती, परिचालन आणि देखभालविषयक सामंजस्य करारावर  स्वाक्षरी करण्याचे स्वागत केले, जो पॅसिफिक प्रदेशात भारताच्या अनुदान सहाय्य  कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेला सर्वात मोठा प्रकल्प आहे.

पंतप्रधान मोदींनी मे 2025 मध्ये भारतीय औषधकोषाच्या मान्यतेवरील सामंजस्य करारावर  स्वाक्षरी करण्याचे स्वागत केले, जे औषधनिर्मिती क्षेत्रात सहकार्य बळकट करेल आणि  फिजीमध्ये गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उत्पादनांपर्यंत आणि सेवांपर्यंत पोहोच सुनिश्चित करेल.

फिजीमध्ये कमी किमतीची जेनेरिक औषधे पुरवण्यासाठी  जन औषधी केंद्रे (पीपल्स फार्मसी) स्थापन करण्यासाठी भारताने केलेल्या सहाय्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.  13 ऑगस्ट 2025 रोजी भारत आणि फिजी यांच्यात आयोजित आरोग्यावरील तिसऱ्या संयुक्त कार्यगटाच्या बैठकीचे उभय नेत्यांनी स्वागत केले. या बैठकीदरम्यान भारताचा प्रमुख टेलिमेडिसिन उपक्रम, ई-संजीवनी अंतर्गत  दूरस्थ आरोग्य सेवा सुलभ बनवणे  आणि भारत आणि फिजी यांच्यातील डिजिटल आरोग्य कनेक्टिव्हिटी वाढवण्याबाबत सहकार्यावर चर्चा करण्यात आली. आरोग्य सहकार्य अधिक मजबूत करत, पंतप्रधान मोदी यांनी  फिजीमध्ये दुसऱ्या जयपूर फूट शिबिराचे आयोजन करण्याची घोषणा केली. फिजीच्या ओव्हरसीज मेडिकल रेफरल कार्यक्रमाला पूरक म्हणून भारत 'हील इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत 10 फिजीवासीयांसाठी भारतीय रुग्णालयांमध्ये विशेष/तृतीयक  वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून देईल.

भारत-फिजी सहकार्याचा आधारस्तंभ म्हणून विकास भागीदारीला दुजोरा देत उभय नेत्यांनी फिजी मध्ये  पहिल्या त्वरित प्रभाव प्रकल्प  (QIP) अंतर्गत  तुबालेवु गाव भूजल पुरवठा प्रकल्पासाठी सामंजस्य करारावरील  स्वाक्षरीचे स्वागत केले, ज्यामुळे स्थानिक समुदायांना स्वच्छ पेयजल उपलब्ध होऊ शकेल. 2024 मध्ये टोंगा येथे आयोजित   53 व्या पॅसिफिक आयलंड फोरम लीडर्स बैठकीत भारताने याची  घोषणा केली होती.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंधांमधील वाढत्या गतीची दखल घेतली.  प्रादेशिक शांतता, स्थैर्य  आणि समृद्धीला चालना देण्यासाठी त्यांच्या सामायिक हितांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी यांनी 2017 मध्ये स्वाक्षरी केलेल्या संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करारात नमूद केलेल्या सहकार्याच्या प्राधान्य क्षेत्रांना पुढे नेण्याची आणि या क्षेत्रातील फिजीच्या धोरणात्मक प्राधान्यांना पाठिंबा देण्याप्रति भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. संयुक्त राष्ट्र शांतता अभियान (UNPKO), लष्कराला औषधे पुरवणे , व्हाईट शिपिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंज (WSIE) आणि फिजीच्या  लष्करी दलांसाठी क्षमता निर्मिती  यासारख्या क्षेत्रात वर्धित  सहकार्यासह संरक्षणावरील पहिल्या संयुक्त कार्यगटाच्या निकालांचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

उभय नेत्यांनी विद्यमान  संरक्षण सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि संरक्षण आणि सागरी सुरक्षा सहकार्य वाढवण्याच्या गरजेवर भर देत हे संबंध आणखी मजबूत करण्याप्रति  वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान राबुका यांनी फिजीच्या विशेष आर्थिक क्षेत्राची (EEZ) सुरक्षा सुनिश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि फिजीच्या सुरक्षा विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या भारताच्या आश्वासनाचे स्वागत केले. पंतप्रधान राबुका यांनी भारतीय नौदलाच्या जहाजाच्या फिजीमधील नियोजित पोर्ट कॉलचे स्वागत केले ज्यामुळे सागरी सहकार्य आणि आंतरकार्यक्षमता वाढेल.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि प्रदेशात परस्पर हितांना  प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रदेशात शांतता, स्थैर्य  आणि समृद्धी वाढविण्याच्या उद्देशाने  नवीन उपक्रमांद्वारे संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याप्रति त्यांच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. पंतप्रधान मोदी यांनी  फिजीच्या लष्करी दलांना दोन रुग्णवाहिका भेट देण्याची आणि सुवा येथील भारतीय उच्चायुक्तालयात संरक्षण विभागाची स्थापना करण्याची घोषणा केली. सायबर सुरक्षा हे दोन्ही देशांमधील सहकार्याचे उदयोन्मुख क्षेत्र आहे हे लक्षात घेत, उभय नेत्यांनी फिजीमध्ये सायबर सुरक्षा प्रशिक्षण कक्ष (CSTC) स्थापनेचे स्वागत केले. त्यांनी विदयमान तसेच उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी, विशेषतः सागरी, मानवतावादी सहाय्य  आणि आपत्ती निवारण (HADR) आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याच्या महत्त्वपूर्ण संधींवर भर दिला.

दोन्ही नेत्यांनी मुक्त, खुले, सुरक्षित आणि समावेशक हिंद -प्रशांत क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रादेशिक सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि हिंद -प्रशांत क्षेत्रामध्ये शांतता आणि स्थैर्य स्थापित करण्यात योगदान देण्यासाठी   सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. 

उभय नेत्यांनी लोकांमधील संबंधांना भारत-फिजी संबंधांचा नैसर्गिक आधार मानत विशेषतः आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. भारत आणि फिजी दरम्यान  स्थलांतर आणि गतिशीलतेवरील इरादा पत्रावर स्वाक्षरी करण्याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. यामुळे दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचे येणे-जाणे  सुलभ होईल.

भाषिक आणि सांस्कृतिक संबंधांना आणखी चालना देण्याच्या उद्देशाने  हिंदी अध्ययन  केंद्राच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी फिजी विद्यापीठात हिंदी-आणि -संस्कृत शिक्षकाच्या प्रतिनियुक्तीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी भारतात फिजी मधील पंडितांच्या गटाला प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्याची घोषणा केली, जे या वर्षाच्या अखेरीस भारतात आयोजित 'आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव' मध्ये देखील सहभागी होतील. भारतातील आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025 सोबतच फिजीमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कार्यक्रम देखील आयोजित केला जाईल.

दोन्ही नेत्यांनी फिजी सोबतच्या भारताच्या भागीदारीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून क्षमता निर्मितीला स्वीकृती दिली. पंतप्रधान मोदींनी भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) कार्यक्रमाद्वारे भारत फिजीच्या सरकारी व्यावसायिकांना क्षमता निर्मितीच्या  संधी  प्रदान करत राहील यावर भर दिला.

द्विपक्षीय सहकार्यासाठी प्रमुख क्षेत्र म्हणून कृषी आणि अन्न सुरक्षेचे महत्त्व उभय नेत्यांनी मेनी केले. फिजीमध्ये अन्न सुरक्षा आणि कृषी लवचिकता वाढविण्यासाठी जुलै 2025  मध्ये भारताने पाठवलेल्या 5 मेट्रिक टन उच्च दर्जाच्या चवळीच्या बियाण्यांच्या मदतीबद्दल पंतप्रधान राबुका यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

पंतप्रधान मोदी यांनी  भारताच्या अनुदान सहाय्य कार्यक्रमांतर्गत 12 कृषी ड्रोन आणि  2 फिरत्या मृदा  चाचणी प्रयोगशाळा भेट देण्याची घोषणा केली, ज्यामुळे फिजीच्या साखर उत्पादनात नवोन्मेषाला चालना मिळेल आणि उत्पादकता वाढेल. या क्षेत्राला अधिक पाठिंबा देण्यासाठी, पंतप्रधान मोदी यांनी  फिजी साखर महामंडळात  एक आयटीईसी तज्ञ पाठविण्याची तसेच फिजीच्या साखर क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी विशेष आयटीईसी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली.

दोन्ही देशांमधील वाढत्या क्रीडा संबंधांवर, विशेषतः फिजीमध्ये क्रिकेट आणि भारतातील रग्बीप्रति  वाढत्या उत्साहावर उभय नेत्यांनी भर दिला. फिजीच्या विनंतीनुसार, स्थानिक प्रतिभावंत खेळाडूंच्या  विकासासाठी एक भारतीय क्रिकेट प्रशिक्षक फिजी क्रिकेट संघांना प्रशिक्षण देईल, ज्यामुळे खेळांमध्ये युवकांच्या सहभागाला प्रोत्साहन  मिळेल.

पंतप्रधान मोदी यांनी फिजी प्रजासत्ताक सरकारने सुवा येथे भारताच्या उच्चायुक्तालयासाठी चान्सरी-कम-संस्कृती केंद्र उभारण्यासाठी दिलेल्या जमिनीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्या जमिनीच्या पट्ट्याचा हक्कपत्र (Lease Title) सुपूर्द केल्या बद्दल स्वागत केले. फिजी प्रजासत्ताक सरकारला नवी दिल्ली येथे त्यांचे उच्चायुक्तालय (Chancery) बांधण्यासाठी 2015 सालीच जमीन देण्यात आली आहे.

नेत्यांनी महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी झालेल्या खालील करारांचे स्वागत केले: (i) फिजी डेव्हलपमेंट बँक (FDB) आणि भारताची नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) यांच्यातील सामंजस्य करार – ग्रामीण विकास, शेतीसाठी कर्जपुरवठा आणि सर्वांसाठी आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य वाढविण्यासाठी. (ii) भारतीय मानक ब्युरो (BIS) आणि फिजी प्रजासत्ताकच्या नॅशनल ट्रेड मेझरमेंट अँड स्टँडर्ड्स विभाग (DNTMS) यांच्यातील सामंजस्य करार – मानकीकरणाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी. (iii) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत (भारत) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) आणि पॅसिफिक पॉलिटेक्निक, फिजी यांच्यातील सामंजस्य करार – मनुष्यबळ विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि प्रगत कौशल्यवृद्धीच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी. (iv) काॅन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आणि फिजी कॉमर्स अँड एम्प्लॉयर्स फेडरेशन (FCEF) यांच्यातील सामंजस्य करार – आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक बळकट करण्यासाठी. (iv) HLL लाइफकेअर लिमिटेड (भारत) आणि फिजी प्रजासत्ताकचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा मंत्रालय यांच्यातील करार – भारतातील जनऔषधी योजनेअंतर्गत औषधे पुरविण्यासाठी.

दोन्ही नेत्यांनी लोकशाही आणि विधीमंडळाशी संबंधित संवाद बळकट करण्यासाठी संसदीय आदान–प्रदान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी यांनी फिजीच्या खासदारांच्या प्रतिनिधीमंडळाचा 2026 मध्ये भारत दौऱ्याचा प्रस्ताव स्वागतार्ह असल्याचे म्हटले.पंतप्रधान राबुका यांनी फिजीमध्ये सामाजिक ऐक्य आणि समाजविकास घडवण्यात ‘ग्रेट कौन्सिल ऑफ चीफ्स’ (GCC) या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी यांनी भारत-फिजी यांच्या जनतेमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी GCC च्या प्रतिनिधीमंडळाच्या भारत भेटीच्या प्रस्तावाचे स्वागत केले.

नेत्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली आणि शांतता, हवामान न्याय, सर्वसमावेशक विकास आणि ‘ग्लोबल साउथ’चा आवाज अधिक बळकट करण्याच्या त्यांच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान राबुका यांनी ग्लोबल साउथमध्ये भारताने घेतलेल्या नेतृत्व भूमिकेचे कौतुक केले. तसेच, बहुपक्षीय मंचांवर (multilateral forums) एकमेकांना दिलेल्या मौल्यवान सहकार्याबद्दल त्यांनी  कृतज्ञता व्यक्त केली.

दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये  सर्वंकष सुधारणा करण्याची तातडीची गरज आहे, यावर सहमती दर्शवली. यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये दोन्ही प्रकारच्या सदस्यत्वाचा (स्थायी आणि अस्थायी) विस्तार करून आजच्या जागतिक राजकीय वास्तवाचे अधिक चांगले प्रतिबिंब उमटेल, असे त्यांनी नमूद केले. फिजीने सुधारित आणि विस्तारलेल्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्य म्हणून पाठिंबा देण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. तसेच, 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अस्थायी सदस्यत्वाच्या उमेदवारीलाही पाठिंबा दिला.

नेत्यांनी सध्याच्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी "साउथ-साउथ कोऑपरेशन" (दक्षिण-दक्षिण सहकार्य) अधिक बळकट करणे आवश्यक आहे, याची पुन्हा पुष्टी केली. तसेच, ग्लोबल साउथमधील (विकसनशील देशांमधील) समान चिंतेच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याचे ठरवले, ज्यामध्ये जागतिक शासन संस्थांमध्ये (institutions of global governance) जास्तीत जास्त आणि न्याय्य प्रतिनिधित्व मिळवण्याचाही समावेश आहे.

पंतप्रधान राबुका यांनी ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ’ परिषदांचे आयोजन करण्यामध्ये भारताने घेतलेल्या पुढाकाराचे आणि नेतृत्वाचे कौतुक केले. या परिषदा विकसनशील देशांच्या सामायिक चिंता, आव्हाने आणि विकासाच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरतात, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ’ परिषदांमध्ये फिजीच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले आणि या परिषदेतील नेत्यांच्या सत्रात (Leaders’ Session) सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधान राबुका यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी ग्लोबल साउथ देशांच्या सामायिक अनुभवांवर आधारित विशेष विकास उपाय शोधण्यासाठी स्थापन केलेल्या “ग्लोबल साउथ सेंटर ऑफ एक्सलन्स – दक्षिण (DAKSHIN)” सोबत फिजीचा सुरू असलेला सहभाग स्वागतार्ह असल्याचे नमूद केले.

दोन्ही पंतप्रधानांनी, हिंद-प्रशांत प्रदेश खुला, सर्वसमावेशक, स्थिर आणि समृद्ध राहावा तसेच या क्षेत्रात सार्वभौमत्व आणि भौगोलिक अखंडत्वाचा सन्मान व्हावा, यासाठी आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. पंतप्रधान राबुका यांनी ‘इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह’ (IPOI) मध्ये सहभागी होण्याची फिजीची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी सागरी क्षेत्राचे व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वतता यासाठी प्रयत्न करणाऱ्या समविचारी देशांच्या भागीदारीत फिजीचे स्वागत केले. पंतप्रधान राबुका यांनी ‘ओशन ऑफ पीस’ (Ocean of Peace) अर्थात  सागरी शांती या संकल्पनेवर भर दिला, जी आपल्या प्रदेशासाठी शांततापूर्ण, स्थिर, सुरक्षित आणि शाश्वत भविष्य तसेच कल्याण घडविण्यावर लक्ष केंद्रित करते.

पंतप्रधान राबुका यांनी भारत सरकार आणि भारतीय जनतेने त्यांच्यासह त्यांच्या प्रतिनिधीमंडळाच्या आपुलकीने केलेल्या आदरातिथ्या बद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींना फिजी भेटीचे आमंत्रण दिले.

 

* * *

सुषमा काणे/सोनल तुपे/शैलेश पाटील/सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2168093) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam