पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील धार येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
17 SEP 2025 11:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2025
भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!
नर्मदा मैया की जय! नर्मदा मैया की जय! नर्मदा मैया की जय!
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव जी, केंद्रातील माझ्या सहकारी सावित्री ठाकुर जी, देशातील कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व केंद्रीय मंत्री, राज्यांचे राज्यपाल, राज्यांचे मुख्यमंत्री, मंचावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि देशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!
मी ज्ञानाची देवी आणि धार भोजशालाच्या वाग्देवी मातेच्या चरणी वंदन करतो. आज कौशल्य आणि निर्मितीची देवता भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे. मी भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन करतो. आपल्या कौशल्याद्वारे राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देणाऱ्या कोट्यवधी बंधू-भगिनींना देखील मी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त आदरपूर्वक वंदन करतो.
मित्रहो,
धारची ही भूमी नेहमीच पराक्रमाची भूमी राहिली आहे. प्रेरणेची भूमी राहिली आहे. महाराजा भोज यांचे शौर्य आपल्याला… बहुधा तिथे एकतर ऐकू येत नाही किंवा दिसत नाही. अरे तुम्ही कितीही दूर असेनात का, तुमच्या मनातील गोष्ट मला तर समजते. इथले जे तंत्रज्ञ आहेत, ते जर त्यांना काही मदत करू शकत असतील तर करा, तसेही हे मध्य प्रदेशचे लोक आहेत, अतिशय शिस्तबद्ध असतात. गैरसोय असेल तरीही सहन करण्याचा स्वभाव मध्य प्रदेशचा आहे आणि इथेही मला त्याचे दर्शन होत आहे.
मित्रहो,
महाराजा भोज यांचे शौर्य आपल्याला देशाच्या गौरवाच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहण्याची शिकवण देते. महर्षी दधीची यांचे बलिदान आपल्याला मानवतेची सेवा करण्याचा संकल्प देते. या वारशापासून प्रेरणा घेत, आज देश भारतमातेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या भगिनी आणि मुलींचे कुंकू पुसले होते, आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून त्यांचे दहशतवादी अड्डे नष्ट केले. आपल्या वीर जवानांनी पाकिस्तानला क्षणार्धात गुडघे टेकायला भाग पाडले. आता कालच देशाने आणि जगाने पाहिले की आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याने रडत रडत आपली कथा सांगितली.
मित्रहो,
हा नवा भारत आहे, जो कोणाच्याही अणु युद्धाच्या धमक्यांना घाबरत नाही, हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो.
मित्रहो,
आज 17 सप्टेंबर हा एक ऐतिहासिक दिवस आहे, आजच्याच दिवशी देश सरदार पटेल यांच्या पोलादी दृढनिश्चयाचा साक्षीदार बनला होता. आजच्या दिवशी भारतीय लष्कराने हैदराबादला अनन्वित अत्याचारांपासून मुक्त केले, त्यांच्या अधिकारांचे रक्षण करून भारताचा गौरव पुन: प्रस्थापित केला होता. देशाच्या या अभूतपूर्व कामगिरीचा आणि सशस्त्र दलांच्या शौर्याचा, अनेक दशके लोटली, कुणी आठवण काढणारे नव्हते, मात्र तुम्ही मला संधी दिली, आमच्या सरकारने 17 सप्टेंबर, सरदार पटेल, हैदराबादची घटना, यांना अमर केले आहे. आम्ही भारताच्या एकतेचे प्रतीक असलेला हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे; आणि आज हैदराबादमध्ये मोठ्या उत्साहात मुक्ती दिनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जात आहे. हैदराबाद मुक्ती दिन आपल्याला प्रेरणा देतो, भारतमातेचा सन्मान, अभिमान आणि गौरवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही, आपण जगायचे देशासाठी, आपला प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित असायला हवा.
मित्रहो,
राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची शपथ घेऊन आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले होते. त्या सर्वांचे स्वप्न होते- ‘विकसित भारत’, त्यांची इच्छा होती भारताने गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होऊन वेगाने पुढे जावे. आज, यापासून प्रेरित होऊन, आपण भारतातील 140 कोटी लोकांनी, विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे; आणि विकसित भारताच्या या प्रवासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत- भारताची नारीशक्ती, युवाशक्ती, गरीब आणि शेतकरी. आज, या कार्यक्रमात विकसित भारताच्या या चारही स्तंभांना नवी बळकटी देण्याचे काम झाले आहे. इथे मोठ्या संख्येने माझ्या माता, बहिणी आणि मुली आल्या आहेत. आजच्या कार्यक्रमात नारीशक्तीकडे खूप लक्ष देण्यात आले आहे. हा कार्यक्रम धार येथे होत आहे, मात्र हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी होत आहे, देशभरात होत आहे, संपूर्ण देशातील माता-भगिनींसाठी होत आहे. या व्यासपीठावरून 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' या महा अभियानाचा परत होत आहे. देवी वाग्देवीच्या आशीर्वादाने याहून मोठे काम काय असू शकते.
मित्रहो,
देशभरात विविध टप्प्यांमध्ये ‘आदि सेवा पर्व’चे पडसाद ऐकू येत आहेत. आजपासून याचे मध्य प्रदेश पर्व देखील सुरु होत आहे. हे अभियान धारमधील आदिवासी समुदायांसह मध्य प्रदेशातील आदिवासी समुदायांना विविध सरकारी योजनांशी थेट जोडण्याचा एक सेतू बनेल.
मित्रहो,
आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त एक मोठा औद्योगिक उपक्रमही सुरु होत आहे. देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक वस्त्रोद्योग पार्कची पायाभरणी येथे करण्यात आली. हे पार्क देशातील वस्त्रोद्योगाला नवीन उभारी देईल. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळेल आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की केवळ धारमध्येच नाही तर देशभरातील लाखो शेतकरी आता या कार्यक्रमात आपल्याबरोबर जोडले गेले आहेत.
मित्रहो,
या पीएम मित्र पार्क, या टेक्सटाईल पार्कचा सर्वात मोठा लाभ म्हणजे युवक आणि युवतींना खूप मोठ्या संख्येने रोजगार मिळेल. या प्रकल्पांसाठी आणि अभियानांसाठी मी माझ्या सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. मध्य प्रदेशचे मी विशेष अभिनंदन करतो.
मित्रहो,
आपल्या माता आणि भगिनी, आपली नारी शक्ती देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार आहेत. आपण सगळे पाहतो, घरात जर माता निरोगी असेल तर संपूर्ण घर आनंदी राहते, परंतु मित्रांनो, जर ती आजारी पडली तर संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटते. म्हणूनच ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ हे अभियान माता-भगिनींसाठी समर्पित आहे, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आहे. माहिती किंवा संसाधनांच्या अभावी एकही महिला गंभीर आजाराला बळी पडू नये हे आमचे ध्येय आहे. असे अनेक आजार आहेत जे गुपचूप येतात आणि निदान न झाल्यामुळे ते हळूहळू खूप गंभीर बनतात, जीवन आणि मृत्यूचा खेळ सुरू होतो. महिलांसाठी सर्वात धोकादायक असलेल्या अशा आजारांना त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच या अभियानाअंतर्गत रक्तदाब आणि मधुमेहापासून ते अशक्तपणा, क्षयरोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांची शक्यता असेल तर तपासणी केली जाईल.
आणि देशभरातील माझ्या माता आणि भगिनींनो, तुम्ही नेहमीच मला खूप काही दिले आहे. तुमचे आशीर्वाद माझे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. देशभरातील कोट्यवधी माता-भगिनी मला नेहमीच भरघोस आशीर्वाद देत आल्या आहेत. मात्र माता-भगिनींनो, आज 17 सप्टेंबर विश्वकर्मा जयंती दिनी मी तुमच्याकडे काही मागायला आलो आहे, देशभरातील माता-भगिनींकडे आज काही मागायला आलो आहे. मातांनो आणि भगिनींनो, जरा मला सांगा, तुम्ही मला देणार की नाही? जरा हात वर उंचावून सांगा, वाह, सर्वांचे हात उंचावले जात आहेत, मी तुमच्याकडे हेच मागतो की तुम्ही संकोच न बाळगता या शिबिरांमध्ये जाऊन अवश्य तपासणी करून घ्या. एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, मी तुमच्याकडे एवढं तर मागू शकतो ना? माझे तुम्हाला फक्त एवढेच सांगणे आहे की, या आरोग्य शिबिरांमध्ये, या सर्व चाचण्या कितीही महागड्या असल्या तरी, तुम्हाला एक पैसाही द्यावा लागणार नाही. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
तपासणी मोफत असेल, आणि एवढेच नाही तर औषधही मोफत असेल. सरकारी तिजोरीपेक्षा तुमच्या चांगल्या आरोग्याचे मोल अधिक आहे. ही तिजोरी तुमच्यासाठी, माता आणि भगिनींसाठी आहे. आणि आयुष्मान कार्डचे सुरक्षा कवच तुमच्या पुढील उपचारांसाठी खूप उपयुक्त ठरेल.
या मोहिमेचा प्रारंभ आज होत असून ती विजयी होण्याच्या संकल्पाने 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीपर्यंत म्हणजे दोन आठवडे चालेल. मी पुन्हा एकदा देशभरातील माता, भगिनी आणि मुलींना आवाहन करतो: तुम्ही नेहमीच तुमच्या कुटुंबाची काळजी करत असता. कृपया तुमच्या आरोग्यासाठी देखील थोडा वेळ काढा. शक्य तितक्या संख्येने या शिबिरांना भेट द्या; लाखो शिबिरे भरवण्यात येणार आहेत. आजही, काही शिबिरांमध्ये, लोकांनी स्वतःची तपासणी करून घेण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या परिसरातील इतर महिलांसोबत ही माहिती नक्की सामायिक करा. आणि प्रत्येक माता, भगिनींना सांगा की आमचे मोदीजी धार येथे आले होते, आपला पुत्र, आपला बंधू धार येथे आला होता आणि त्याने आम्हाला चाचणी करण्यास सांगितले. सर्वांना नक्की सांगा. कोणतीही माता, लेक या तपासणीपासून वंचित राहणार नाही असा आपण संकल्प केला पाहिजे.
मित्रहो,
माता, भगिनी आणि मुलींचे आरोग्य हे आमचे प्राधान्य आहे. गर्भवती महिला आणि मुलींना योग्य पोषण मिळावे यासाठी आमचे सरकार मिशन मोडमध्ये काम करत आहे. आज आपण आठवा राष्ट्रीय पोषण महिना सुरू करत आहोत. विकसनशील भारतात, आपण माता आणि बालमृत्यू दर शक्य तितका कमी केला पाहिजे. यासाठी, आम्ही 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर बँक खात्यात थेट पाच हजार रुपये आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर सहा हजार रुपये बँक खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत, साडे चार कोटी गर्भवती मातांना मातृवंदना योजनेचा लाभ मिळाला आहे. आणि आतापर्यंत, 19 हजार कोटींहून अधिक रुपये - काही लोकांना कदाचित या आकड्याचा अर्थ काय हे देखील समजणार नाही - माझ्या माता आणि भगिनींच्या बँक खात्यात वर्ग झाले आहेत. आज, फक्त एका क्लिकवर, जे आत्ता मी येथे क्लिक केल्यावर 15 लाखांहून अधिक गर्भवती मातांना मदत पाठवण्यात आली आहे. आज, याच धार भूमीतून त्यांच्या खात्यात 450 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत.
मित्रहो,
आज, मी मध्य प्रदेशमधून आणखी एका मोहिमेवर चर्चा करू इच्छितो. तुम्हाला माहिती आहे, सिकलसेल अॅनिमिया हे आपल्या आदिवासी भागात एक मोठे संकट आहे. आमचे सरकार आपल्या आदिवासी बंधू-भगिनींना या आजारापासून वाचवण्यासाठी एक राष्ट्रीय अभियान राबवत आहे. आम्ही 2023 मध्ये मध्य प्रदेशातील शहडोल मधून या अभियानाचा प्रारंभ केला होता. आणि शहडोलमध्येच आम्ही पहिले सिकलसेल स्क्रीनिंग कार्ड वाटप केले होते. आणि आज मध्य प्रदेशात 1 कोटी वे सिकलसेल स्क्रीनिंग कार्ड वाटप करण्यात आले. नुकतेच मंचावर आलेल्या या कन्येला दिलेले कार्ड हे 1 कोटी वे कार्ड होते आणि मी मध्य प्रदेशबद्दल बोलत आहे. आतापर्यंत, या मोहिमेअंतर्गत देशभरात 5 कोटींहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे. सिकलसेल स्क्रीनिंगमुळे आपल्या आदिवासी समुदायातील लाखो लोकांचे जीव वाचले आहेत आणि अनेकांना कदाचित याची माहिती नसेल.
मित्रहो,
आपण ज्या कामाचा पाठपुरावा करत आहोत ते भावी पिढ्यांसाठी एक मोठे वरदान ठरेल. ज्यांनी अद्याप जन्म घेतला नाही त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत, कारण जर सध्याची पिढी निरोगी झाली तर त्यांच्या भावी मुलांच्या आरोग्याची हमी मिळेल. मी विशेषतः आपल्या आदिवासी माता आणि भगिनींना सिकलसेल अॅनिमियाची चाचणी करून घेण्याचे आवाहन करतो.
मित्रहो,
माता आणि भगिनींचे जीवन सुलभ करून त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी माझा सतत प्रयत्न राहिला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेली कोट्यवधी शौचालये, उज्ज्वला योजनेद्वारे कोट्यवधी मोफत गॅस कनेक्शन, प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशन आणि 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्मान योजना या सर्वांमुळे माता आणि भगिनींच्या जीवनातील अडचणी कमी झाल्या आहेत आणि त्यांचे आरोग्य सुधारले आहे. आणि इथे इतक्या मोठ्या संख्येने पुरुषवर्ग आहे, तुमच्या कुटुंबातही एक आई, एक बहीण आणि एक मुलगी आहे. मी माझ्या या बंधूंनाही मला सहकार्य करून माता, भगिनी आणि मुलींची आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन करतो.
मित्रहो,
जगभरातील लोक जेव्हा पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची इतकी मोठी आकडेवारी ऐकतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. मित्रहो, कोरोनाच्या कठीण काळात मोफत रेशन योजनेने गरीब मातांच्या चुलीची धग कायम राहिली. या योजनेअंतर्गत अजूनही मोफत धान्य वाटप केले जात आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतही, लाखो घरे देण्यात आली आहेत त्यापैकी बहुतेक घरे महिलांच्या नावे आहेत.
मित्रहो,
आपले सरकार आपल्या भगिनी आणि लेकींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावरही भर देते. आपल्या लाखो भगिनी नवीन व्यवसाय, नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेत आहेत.
मित्रहो,
आमचे सरकार गावांमध्ये राहणाऱ्या 3 कोटी ग्रामीण महिला, माता आणि भगिनींना लखपती दीदी बनवण्याच्या मोहिमेत गुंतले आहे. आणि मी अभिमानाने सांगू शकतो की या मोहिमेला इतके यश मिळाले आहे की इतक्या कमी वेळात जवळजवळ 2 कोटी भगिनी लखपती दीदी बनल्या आहेत. बँक सखी आणि ड्रोन दीदींद्वारे महिलांना सक्षम करून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणत आहोत. बचत गटांच्या माध्यमातून महिला नवीन क्रांती घडवत आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
गेल्या 11 वर्षांपासून गरिबांचे कल्याण, गरिबांची सेवा आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जेव्हा गरीब गरिबीमुक्त होऊन वेगाने प्रगती करतील तेव्हाच देशाची प्रगती होईल असा आमचा विश्वास आहे. आणि गरिबांची सेवा करणे कधीही व्यर्थ जात नाही हे आम्ही अनुभवले आहे. फक्त थोड्याशा पाठिंब्याने आणि मदतीमुळे गरिबांना त्यांच्या कठोर परिश्रमातून समुद्र पार करण्याचे धाडस मिळते. मी गरिबांच्या या भावना वैयक्तिकरित्या अनुभवल्या आहेत. म्हणून, गरिबांचे दुःख हे माझे स्वतःचे दुःख आहे. गरिबांची सेवा करणे हे माझ्या जीवनाचे प्रमुख ध्येय आहे. म्हणूनच आपले सरकार गरिबांना केंद्रस्थानी ठेवून सतत योजना आखत आहे आणि त्या अंमलात आणत आहे.
मित्रहो,
सातत्यपूर्ण, समर्पित वृत्तीने आणि शुद्ध अंतःकरणाने काम केल्यामुळे, आपल्या धोरणांचे फलित आज जगासमोर आहे. येथे बसलेल्या प्रत्येकाला अभिमान असेल की गेल्या 11 वर्षांच्या अथक आणि कठोर परिश्रमांमुळे देशातील 25 कोटी लोक दारिद्र्यमुक्त झाले आहेत. आपल्या संपूर्ण समाजाला एक नवीन आत्मविश्वास मिळाला आहे.
मित्रहो,
आपल्या सरकारचे हे प्रयत्न केवळ योजना नाहीत; तर गरीब माता, भगिनी आणि लेकींचे जीवन बदलण्याची मोदींची हमी आहे. गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, माता आणि भगिनींच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे, ही माझी पूजा आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे.
मित्रहो,
मध्य प्रदेशात माहेश्वरी वस्त्रांची दीर्घ परंपरा आहे. देवी अहिल्याबाई होळकर यांनी माहेश्वरी साडीला नवा आयाम दिला. अलीकडेच आपण अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती साजरी केली. आता धार येथील ‘पीएम मित्र पार्क’च्या माध्यमातून आपण एकप्रकारे देवी अहिल्याबाईंचा वारसा पुढे नेत आहोत. पीएम मित्र पार्कमध्ये विणकामासाठी आवश्यक सामान, जसे की कापूस आणि रेशीम, सहज उपलब्ध होईल. गुणवत्ता तपासणी सुलभ होईल. बाजारापर्यंतची पोहोच वाढेल. येथे सूत कताई होईल, इथेच डिझाइनिंग होईल, इथेच प्रक्रिया होईल आणि इथूनच निर्यात होईल. याचा अर्थ जगाच्या बाजारातही माझ्या धारचे नाव पोहोचणार आहे. याचा अर्थ आता कापड उद्योगाची संपूर्ण मूल्यसाखळी एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. वस्त्रोद्योगासाठी आमचे सरकार ‘5 एफ व्हिजन’वर काम करत आहे, 5 एफ म्हणजे पहिले फार्म (शेत), दुसरे फायबर (सूत), तिसरे फॅक्टरी (कारखाना), चौथे फॅशन, आणि म्हणूनच फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेनपर्यंत (परदेश) हा प्रवास जलद आणि सहजपणे पूर्ण होईल.
मित्रहो,
मला सांगण्यात आले आहे की, धारमधल्या या पीएम मित्र पार्कमध्ये सुमारे 1,300 एकर जमीन, 80 हून अधिक युनिट्सना वितरितदेखील करण्यात आली आहे. म्हणजे येथे आवश्यक पायाभूत सुविधा आणि कारखान्याचे बांधकाम दोन्ही एकाच वेळी होतील. या पार्कमध्ये रोजगाराच्या 3 लाख नवीन संधी देखील निर्माण होतील, आणि याचा लॉजिस्टिक्स खर्चावर मोठा परिणाम होईल. पीएम मित्र पार्कमुळे सामान इकडून तिकडे नेण्याचा खर्च कमी होईल, निर्मिती खर्च कमी होईल आणि आमची उत्पादने स्वस्त आणि जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक होतील. म्हणूनच, मी मध्य प्रदेशातील जनतेचे, विशेषतः माझ्या शेतकरी बंधू-भगिनींचे आणि तरुणतरुणींचे पीएम मित्र पार्कसाठी खूप खूप अभिनंदन करतो. आमचे सरकार देशात असे आणखी 6 पीएम मित्र पार्क बांधणार आहे.
मित्रहो,
आज देशभरात विश्वकर्मा पूजेचा उत्सवही साजरा होत आहे. त्याचसोबत ही पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशाचा आनंद साजरा करण्याची वेळ आहे.
देशभरातील माझ्या विश्वकर्मा बंधू आणि भगिनींचे, ज्यात सुतार, लोहार, सोनार, कुंभार, काष्ठकार, गवंडी, कांस्यकार, ताम्रकार आणि हस्तकौशल्यातून अद्भुत कारागिरी करणारे, असे अनेक लोक समाविष्ट आहेत, त्यांचे मी विशेष अभिनंदन करू इच्छितो. ‘मेक इन इंडिया’ची सर्वात मोठी ताकद तुम्हीच आहात. गाव असो वा शहर, तुम्ही निर्माण केलेल्या उत्पादनांद्वारे आणि तुमच्या कलेद्वारे दैनंदिन गरजा पूर्ण होतात. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेने इतक्या कमी वेळात 30 लाखांहून अधिक कारागिरांना मदत केली आहे, याबद्दल मला समाधान आहे. या योजनेद्वारे त्यांना कौशल्य प्रशिक्षण मिळाले आणि ते डिजिटल मार्केटिंग आणि आधुनिक साधनांशी जोडले गेले. 6 लाखांहून अधिक विश्वकर्मा मित्रांना नवीन उपकरणे देण्यात आली. आतापर्यंत विश्वकर्मा बंधू आणि भगिनींपर्यंत 4 हजार कोटींहून अधिक कर्ज पोहोचले आहे.
मित्रहो,
पीएम विश्वकर्मा योजनेचा सर्वात मोठा लाभ, दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या समाजातल्या घटकांना झाला आहे. आपल्या गरीब विश्वकर्मा बंधू-भगिनींकडे कौशल्य तर होते, परंतु मागील सरकारांकडे त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीही योजना नव्हती, त्यांचे जीवन सुधारण्यासाठी कोणतीही योजना नव्हती. आम्ही त्यांच्या प्रतिभेला त्यांच्या प्रगतीचे माध्यम बनवण्यासाठीचे मार्ग खुले केले. म्हणूनच मी म्हणतो- जे मागास आहेत त्यांना आमचे प्राधान्य आहे.
मित्रहो,
आपले धार हे पूज्य कुशाभाऊ ठाकरे यांची जन्मभूमी आहे. त्यांनी राष्ट्र प्रथम या भावनेने आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केले. मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. राष्ट्र प्रथम ही भावना देशाला नव्या उंचीवर नेण्याची प्रेरणा आहे.
मित्रहो,
हा सणांचा काळ आहे, आणि या काळात तुम्हाला स्वदेशीचा मंत्र जागर सातत्याने करायचा आहे, तो तुमच्या जीवनात अंगीकारायचा आहे. तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे, 140 कोटी देशवासियांना माझी विनंती आहे, तुम्ही जे काही खरेदी कराल ते देशातच तयार केलेले असावे. तुम्ही जे काही खरेदी कराल त्यात कुठल्या ना कुठल्या भारतीयाचे कष्ट असावेत. तुम्ही जे काही खरेदी कराल त्यात मातीचा सुगंध माझ्या हिंदुस्थानच्या मातीचा असावा आणि आज मी माझ्या व्यापारी बांधवांना आग्रह करू इच्छितो की, तुम्हीही देशासाठी मला मदत करा, देशासाठी मला साथ द्या आणि मला तुमची मदत देशासाठी हवी आहे, कारण मला 2047 पर्यंत विकसित भारत घडवायचाच आहे; आणि त्याचा मार्ग आत्मनिर्भर भारताद्वारे आहे. म्हणून, माझ्या सर्व लहानमोठ्या, सर्व व्यापारी बंधू-भगिनींनो, तुम्ही जे काही विकता ते आपल्या देशातच तयार झालेले असायला हवे. महात्मा गांधींनी स्वदेशीला स्वातंत्र्याचे माध्यम बनवले होते. आता आपल्याला स्वदेशीला विकसित भारताचा पाया बनवायचे आहे. आणि हे कसे घडेल? हे तेव्हा होईल जेव्हा आपण आपल्या देशात बनवलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान बाळगू. आपण खरेदी करणार असलेली कुठलीही वस्तू, अगदी लहान वस्तूदेखील, मुलांसाठी खेळणी, दिवाळीच्या मूर्ती, घर सजवण्यासाठीच्या वस्तू किंवा मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटरसारखी कोणतीही मोठी वस्तू, आपण प्रथम ती आपल्या देशात बनवली आहे का ते तपासले पाहिजे. त्यात माझ्या देशबांधवांच्या कष्टाचा सुगंध आहे का? कारण, जेव्हा आपण स्वदेशी गोष्ट खरेदी करतो तेव्हा आपले पैसे देशातच राहतात. आपले पैसे परदेशात जाण्यापासून वाचतात. तेच पैसे पुन्हा देशाच्या विकासासाठी वापरले जातात. त्या पैशातून रस्ते बांधले जातात, गावातील शाळा बांधल्या जातात, गरीब विधवा मातांना मदत मिळते, प्राथमिक आरोग्य केंद्रे बांधली जातात, तेच पैसे गरीब कल्याण योजनांसाठी वापरले जातात आणि तुमच्यापर्यंत पोहोचतात. माझ्या मध्यमवर्गीय बंधू-भगिनींची स्वप्ने, माझ्या मध्यमवर्गीय तरुणांची स्वप्ने, ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप धनाची आवश्यकता आहे आणि या छोट्याछोट्या गोष्टी करून आपण हे साध्य करू शकतो. जेव्हा आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी देशातच तयार होतात, तेव्हा त्यातून निर्माण होणारा रोजगार देखील आपल्या देशवासियांना मिळतो.
म्हणूनच, आता जेव्हा 22 सप्टेंबरपासून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, जीएसटीचे कमी दरही लागू होत असताना आपल्याला स्वदेशी उत्पादनेच खरेदी करून त्याचा लाभ घ्यायचा आहे. आपल्याला एक मंत्र लक्षात ठेवायाचा आहे आणि माझी तर अशी इच्छा आहे की प्रत्येक दुकानावर तो लिहून ठेवलेला असावा. मी राज्य सरकारलाही सांगेन, मोहीम चालवा. प्रत्येक दुकानावर एक फलक असावा, गर्व से कहो- ये स्वदेशी है! (अभिमानाने सांगा-हे स्वदेशी आहे). माझ्यासोबत नारा द्याल? तुम्ही सर्व माझ्यासोबत म्हणाल? मी म्हणेन, "गर्व से कहो, तुम्ही म्हणाल, "ये स्वदेशी है." गर्व से कहो- ये स्वदेशी है, गर्व से कहो- ये स्वदेशी है, गर्व से कहो- ये स्वदेशी है, गर्व से कहो- ये स्वदेशी है, गर्व से कहो- ये स्वदेशी है।
मित्रहो,
याच भावनेसह, तुम्हाला पुन्हा एकदा अनेकानेक शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाचा समारोप करतो. म्हणा- भारतमाता की जय. भारतमाता की जय. भारतमाता की जय. खूप खूप धन्यवाद.
शिल्पा पोफाळे/सोनल तुपे/सुषमा काणे/वासंती जोशी/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168067)