पंतप्रधान कार्यालय
आसाममध्ये दरांग येथे सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पायाभरणी आणि उद्घाटन
भारत आता जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे आणि आसाम देखील देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या राज्यांपैकी एक म्हणून उदयास आले आहे: पंतप्रधान.
आज संपूर्ण देश विकसित भारत घडवण्यासाठी एकजुटीने पुढे जात आहे; विशेषतः आपल्या तरुण नागरिकांसाठी, विकसित भारत हे एक स्वप्न आणि संकल्प दोन्ही आहे, हा संकल्प पूर्ण करण्यात ईशान्य भारताची महत्त्वाची भूमिका आहे: पंतप्रधान
21 व्या शतकाची 25 वर्षे उलटून गेली आहेत आणि या शतकाचा पुढील अध्याय पूर्व आणि ईशान्य भारताचा आहेः पंतप्रधान
कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी भक्कम संपर्कव्यवस्था गरजेची आहे, त्यामुळे आमच्या सरकारने ईशान्य प्रदेशात संपर्कव्यवस्था वाढवण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला आहेः पंतप्रधान
आम्ही एम्सच्या जाळ्याचा विस्तार केला आहे आणि देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये आहेत, विशेषतः आसाममध्ये पूर्णपणे कर्करोगावर उपचार करणारी रुग्णालये देखील स्थापन करण्यात आली आहेतः पंतप्रधान
सीमावर्ती भागातील लोकसंख्याशास्त्रीय स्वरुप बदलण्यासाठी घुसखोरीची कारस्थाने सुरू आहेत आणि यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्म
Posted On:
14 SEP 2025 1:57PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील दरांग येथे सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी दरांगच्या जनतेला आणि आसामच्या सर्व नागरिकांना आसामच्या विकासाच्या प्रवासातील या ऐतिहासिक दिवसाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, काल त्यांनी पहिल्यांदाच आसामला भेट दिली. त्यांनी या कारवाईच्या घवघवीत यशाचे श्रेय कामाख्या मातेच्या आशीर्वादाला दिले आणि तिच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवल्याबद्दल त्यांना आध्यात्मिक समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी आसाममध्ये सुरू असलेल्या जन्माष्टमीच्या निमित्ताने लोकांना शुभेच्छाही दिल्या. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून त्यांनी जे शब्द उच्चारले त्यांचा पुनरुच्चार करत, मोदी म्हणाले की, त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणात 'सुदर्शन-चक्र'ची संकल्पना मांडली होती. त्यांनी मंगलदोई म्हणजे संस्कृती, ऐतिहासिक अभिमान आणि भविष्यासाठी आशा यांचा जिथे संगम होतो ते ठिकाण असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा प्रदेश आसामच्या ओळखीचे एक मध्यवर्ती प्रतीक आहे. प्रेरणा आणि शौर्याने भरलेल्या या भूमीवर लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे धन्यतेची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली..
काही दिवसांपूर्वीच भारतरत्न आणि महान गायक भूपेन हजारिका यांची जयंती देशभरात साजरी झाली, अशी आठवण करून देत, पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांना काल त्यांच्या सन्मानार्थ आयोजित एका भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. आसामच्या अशा महान सुपुत्रांनी आणि आपल्या पूर्वजांनी पाहिलेली स्वप्ने आता केंद्र आणि राज्य सरकारे अतिशय प्रामाणिकपणाने प्रत्यक्षात आणत आहेत, असे त्यांनी सांगितले.
आसामच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन, तसेच त्याचा जलद विकास, या केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांच्या प्राधान्यक्रमाच्या बाबी राहिल्या आहेत, यावर त्यांनी भर दिला. सरकार आणि आसामच्या लोकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, आज हे राज्य राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर उल्लेखनीय प्रभाव पाडत आहे, असे ते म्हणाले.
“भारत सध्या जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे, आणि आसाम देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या राज्यांपैकी एक म्हणून उदयास आले आहे”, असे पंतप्रधानांनी म्हणाले. त्यांनी जुनी आठवण करून देत सांगितले की एक काळ असा होता जेव्हा आसाम विकासात मागे होता आणि देशाच्या इतर भागांच्या बरोबरीने चालण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत होता. मात्र, आज आसाम जवळजवळ 13 टक्के विकास दराने पुढे जात आहे. ही एक मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याचे श्रेय आसामच्या जनतेच्या कठोर परिश्रमांना तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांना दिले. आसामचे लोक हे सहकार्य अधिक मजबूत करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. म्हणूनच, प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्या टीमला लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळतो, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीतही आसामने ऐतिहासिक विजय मिळवून आपला आशीर्वाद दिला.
आसामला भारताच्या विकासाचे इंजिन बनवण्याच्या दृष्टीकोनातून आपले सरकार काम करत आहे, यांवर भर देत पंतप्रधानांनी आजचा कार्यक्रम हा त्याच वचनबद्धतेचा भाग असल्याचं नमूद केलं. "काही वेळापूर्वी , जवळपास ₹6,500 कोटी रुपये किंमतीच्या विकास प्रकल्पांचे याच मंचावरून उद्घाटन करण्यात आले" असे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार आसामला सर्वांत उत्तम कनेक्टिव्हीटी असलेल्या राज्यांपैकी एक आणि आघाडीचे आरोग्यसेवा केंद्र म्हणून विकसित करत आहे. "या प्रकल्पांमुळे आमचे संकल्प अधिक भक्कम होतील." असे ते पुढे म्हणाले. मोदी यांनी दरांग वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय, महामार्ग आणि रिंगरोड यांसाठी सर्वांचे अभिनंदन केले.
"तरूणांसाठी, विकसित भारत उभारण्यासाठी संपूर्ण देश एकजुटीने पुढे जातो आहे, विकसित भारत हे केवळ स्वप्न नाही तर हा संकल्प आहे आणि हा राष्ट्रीय संकल्प पूर्ण करण्यासाठी ईशान्येकडील राज्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत." हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्यानंतर, प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भारत याठिकाणी मुख्य शहरे, मोठ्या अर्थव्यवस्था आणि औद्योगिक केंद्रे विकसित झाली, तर पूर्व भारतातील सर्वात मोठी लोकसंख्या, विकासाच्या शर्यतीत मागे पडली, असे त्यांनी नमूद केले. त्यांचे सरकार आता या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी काम करत आहे असे मोदी म्हणाले. "21 व्या शतकातील पंचवीस वर्ष उलटून गेली आहेत, शतकाचा पुढचा टप्पा पूर्व आणि ईशान्य भारताचा आहे," असे जाहीर करून मोदी म्हणाले की, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांनी भारताच्या विकासगाथेचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे.
"कोणत्याही प्रदेशाच्या वेगवान विकासासाठी जलद संपर्क जाळे आवश्यक आहे, त्यासाठीच आमच्या सरकारने ईशान्य भारतात संपर्कजाळे वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे," असे उद्गार मोदी यांनी काढले.रस्ते, रेल्वे आणि हवाई पायाभूत सुविधांद्वारे भौतिक संपर्कजाळ्यामध्ये तसंच 5G इंटरनेट आणि ब्रॉडबँडद्वारे डिजीटल कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा झाली आहे यावर त्यांनी भर दिला. या प्रगतीमुळे, लोकांना अधिक सुविधा मिळाल्या, जीवन सुलभ झाले आणि व्यावसायिक कामकाजही सुरळीत झाले,असेही त्यांनी नमूद केले. सुधारित संपर्कजाळ्यामुळे प्रवास अधिक सुलभ झाला आहे, पर्यटनाचा विस्तार झाला आणि नव्या रोजगारसंधी आणि उपजीविकेच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असेही पंतप्रधानांनी पुढे नमूद केले.
संपर्कजाळे भक्कम करण्याच्या देशव्यापी मोहिमेचा आसामला मोठा फायदा होणार आहे, हे अधोरेखित करताना मोदी यांनी उदाहरण देत सांगितले की दिल्लीत सहा दशके आणि आसामध्ये दशकभर राज्य कारभार करूनही गेल्या 60-65 वर्षांत ब्रह्मपुत्रा नदीवर फक्त तीन पूल बांधण्यात आले. याची त्यांच्या सरकारच्या कामगिरीशी तुलना करताना सांगितले की, केवळ एकाच दशकात सहा मोठे पूल बांधण्यात आले . त्यांनी कुरुआ-नारेंगी पुलाची पायाभरणी झाल्याची घोषणा केली. त्यामुळे गुवाहाटी आणि दरंग दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी होऊन काही मिनिटांवर आला आहे. हा पूल सामान्य लोकांचा वेळ आणि पैसा वाचवणार आहे. वाहतूक अधिक परवडणारी होईल,प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतूक कोंडीही कमी होईल.
नव्या रिंगरोडमुळे लोकांना लक्षणीय फायदे होतील असे सांगून पंतप्रधानांनी, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर, अप्पर आसामकडे जाणाऱ्या वाहनांना शहरामध्ये प्रवेश करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वाहातूक कोंडी कमी होईल. रिंगरोड पाच राष्ट्रीय महामार्ग, दोन राज्य महामार्ग, एक विमानतळ, तीन रेल्वे स्थानके आणि एक अंतर्गत वॉटर टर्मिनल यांना जोडणार आहे. त्यामुळे आसामचे पहिले अखंड बहु-आयामी संपर्कजाळे तयार होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अशा प्रकारचा विकास केला जात असल्याची पुष्टी मोदी यांनी यावेळी केली.
सरकार केवळ आजच्या गरजांसाठीच नव्हे तर येत्या -25 ते 30 वर्षांच्या गरजांसाठी देशाला सज्ज करत आहे, यांवर भर देत, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जीएसटीमधील नव्या पिढीतील सुधारणांविषयी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. आणि या सुधारणा अमलात येत आहेत, अशीही आनंदाची बातमी जाहीर केली. आजपासून नऊ दिवस, नवरात्रीच्या शुभ प्रसंगी जीएसटी दरांमध्ये लक्षणीय घट होणार आहे. या निर्णयाचा आसाममधील प्रत्येक घराला फायदा होणार आहे आणि दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तू अधिक परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होतील, असे मोदी यांनी अधोरेखित केले.
त्यांनी माहिती दिली की, सिमेंटवरील कर कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे घर बांधणाऱ्यांचा खर्च कमी होईल. कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी लागणाऱ्या महागड्या औषधांच्या किमती कमी होतील आणि विम्याचे हप्ते देखील स्वस्त होतील. नवीन मोटारसायकल किंवा मोटार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी त्या अधिक परवडणाऱ्या ठरतील, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी नमूद केले की वाहन कंपन्यांनी या फायद्यांची जाहिरात करण्यास सुरुवात केली आहे. माता-भगिनी, तरुणाई, शेतकरी आणि दुकानदार असे समाजातील सर्वच घटकांना या निर्णयाचा लाभ होईल असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी पुढे सांगितले की, या सुधारामुळे लोकांचा सणासुदीचा आनंद अधिक वाढेल.
सणासुदीच्या काळात एक महत्त्वाचा संदेश लक्षात ठेवण्याचे आवाहन करताना पंतप्रधानांनी स्वदेशी उत्पादने निवडण्याची गरज अधोरेखित केली. लोकांनी भारतात निर्मित ‘मेक इन इंडिया’ वस्तू विकत घ्याव्यात, भेटवस्तू म्हणून ‘मेक इन इंडिया’ उत्पादने द्यावीत आणि दुकानदारांनी देखील ‘मेक इन इंडिया’ उत्पादने विकावी, यावर त्यांनी भर दिला. स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरण्याचे आवाहन करून त्यांनी सांगितले की, या दिशेने केलेला प्रत्येक प्रयत्न राष्ट्र अधिक बळकट करेल.
अलीकडच्या वर्षांत आरोग्य क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाल्याचे अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, यापूर्वी मोठ्या शहरांतच रुग्णालये केंद्रित होती आणि तिथे उपचार घेणे महाग पडायचे. हे बदलण्यासाठी सरकारने देशाच्या कानाकोपऱ्यात ‘एआयआयएमएस’ आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे उभारले. आसाममध्ये तर खास कर्करोग रुग्णालये स्थापन करण्यात आली आहेत. मोदी म्हणाले की, गेल्या 11 वर्षांत भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली आहे. जेवढी महाविद्यालये स्वातंत्र्यानंतरच्या 60–65 वर्षांत उभारली गेली होती तेवढीच. आसाममध्ये 2014 पूर्वी फक्त सहा वैद्यकीय महाविद्यालये होती, पण दारंग वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण झाल्यानंतर आता राज्यात 24 महाविद्यालये असतील. वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेमुळे आरोग्य सुविधा उभारल्या जातातच, पण त्याचबरोबर तरुणांना डॉक्टर होण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होतात, हेही पंतप्रधानांनी नमूद केले. पूर्वी वैद्यकीय जागांची कमतरता असल्यामुळे अनेक इच्छुक डॉक्टरांना कारकिर्द करता आली नाही. गेल्या 11 वर्षांत देशातील वैद्यकीय जागांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. पुढील चार ते पाचवर्षांत एक लाख नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याचे सरकारचे नवीन उद्दिष्ट असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.
आसामचे देशभक्तांची भूमी म्हणून वर्णन करताना पंतप्रधानांनी सांगितले की, परकीय आक्रमकांपासून राष्ट्राचे रक्षण करण्यामध्ये व स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानांमध्ये आसामची भूमिका मोठी आहे. त्यांनी पठारूघाटच्या ऐतिहासिक शेतकरी सत्याग्रहाची यावेळी आठवण करून दिली. हे ठिकाण सध्याच्या सभेच्या स्थळाच्या जवळ आहे आणि ज्याचा वारसा आजही जिवंत आहे, असे ते म्हणाले. या शहीदांच्या पवित्र भूमीवर उभे राहून मोदी म्हणाले की, विरोधकांचे आणखी एक कृत्य उघड करणे आवश्यक आहे. राजकीय स्वार्थासाठी विरोधक भारतविरोधी व्यक्ती आणि विचारसरणींशी हातमिळवणी करतात, असा आरोप त्यांनी केला. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्या मोहिमेतही अशा प्रवृत्ती दिसून आल्या होत्या. विरोधक सत्तेत असताना देशाला दहशतवादाचा सामना करावा लागला आणि त्यांची पक्षयंत्रणा गप्प बसली, असे ते म्हणाले. उलट आजच्या सरकारखाली भारतीय सेना ‘सिंदूर’सारख्या कारवाया करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे म्होरके संपवते. भारताऐवजी पाकिस्तानच्या सैन्याशी हातमिळवणी करणे आणि दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यांची उद्दीष्टे पुढे नेणे, असे काम विरोधक करतात, अशी टीका त्यांनी केली. पाकिस्तानचे खोटेच सत्य मानून तेच विरोधकांचे कथानक बनते, असे ते म्हणाले आणि त्यांनी जनतेला विरोधी पक्षांच्या कारवायांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले.
विरोधी पक्षांनी कायमच त्यांच्या मत पेढीचे हित राष्ट्रहितापेक्षा महत्त्वाचे मानले असल्याची टीका पंतप्रधानांनी यावेळी केली. आता विरोधी पक्ष राष्ट्रविरोधी घटक आणि घुसखोरांचा एक प्रमुख संरक्षक बनला असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्तेत असताना विरोधी पक्षाने घुसखोरीला सक्रियपणे प्रोत्साहन दिले आणि आता ते घुसखोरांना भारतात कायमचे स्थायिक करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. मंगलदोईमध्ये एकवेळ आसामचे अस्तित्व जपण्यासाठी आणि अवैध घुसखोरीचा विरोध करण्यासाठी मोठे आंदोलन झाले होते याचे स्मरण पंतप्रधानांनी उपस्थितांना करून दिले. मात्र आता विरोधी पक्षात असलेल्यांच्या त्यावेळच्या सरकारने या आंदोलनासाठी जनतेलाच शिक्षा दिली आणि तिथल्या जमिनींवर अवैध अतिक्रमणाला परवानगी देत, आंदोलनकर्त्यांविरोधा सूड उगवला असे ते म्हणाले. विरोधी पक्षांनी धार्मिक स्थळे, शेतकरी आणि आदिवासी समुदायांच्या जमिनींवर अतिक्रमण करण्याला मदत केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपल्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र आता या परिस्थितीत बदल होऊ लागला असल्याची बाब त्यांनी नमूद केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये, विशेषतः दारंग जिल्ह्यात, घुसखोरांकडून जमीनीचे मोठे क्षेत्र परत मिळवले असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. विरोधी पक्षाच्या राजवटीत घुसखोरांच्या ताब्यात असलेला गोरुखुटी परिसरही आता परत मिळवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. परत मिळवलेली ही जमीन आता गोरुखुटी कृषी प्रकल्पाचे केंद्र बनली आहे, या केंद्रात स्थानिक युवा कृषी सैनिक म्हणून काम करत आहेत, ते मोहरी, मका, उडीद, तीळ आणि भोपळा यांसारखी पिके घेत आहेत. एकेकाळी घुसखोरांनी व्यापलेली ही जमीन आता आसाममधील कृषी विकासाचे एक नवे केंद्र बनली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आपले सरकार घुसखोरांना देशाच्या साधनसंपत्तीवर आणि मालमत्तेवर ताबा मिळवू देणार नाही, असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. भारताच्या शेतकरी, युवा वर्ग आणि आदिवासी समुदायांच्या हक्कांवर कोणत्याही परिस्थितीत गदा येऊ दिली जाणार असेही त्यांनी सांगितले. घुसखोरांकडून माता, भगिनी आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेखही पंतप्रधांनी आपल्या संबोधनात केला. अशी कृत्ये सहन केली जाणार नाहीत असे त्यांनी ठामपणे सांगितले. घुसखोरीच्या माध्यमातून सीमावर्ती भागांची लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलण्याचा कट सुरू असल्याबाबतही त्यांनी उपस्थितांना सावध केले. अशा प्रकारच्या घटना या राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक गंभीर धोका असल्याचे ते म्हणाले. या कटाविरोधात देशव्यापी लोकसंख्याशास्त्रीय अभियान सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. देशाला घुसखोरांपासून वाचवण्याची आणि त्यांना भारतीय भूमीतून पूर्णपणे बाहेर काढण्याची आपली वचनबद्धताही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून पुन्हा व्यक्त केली.
आसामच्या समृद्ध वारशाचे जतन करणे आणि राज्याच्या विकासाला गती देणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याची जाणिव त्यांनी करून दिली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वित प्रयत्नांची आवश्यकताही त्यांनी बोलून दाखवली. आसाम आणि ईशान्य भारताला विकसित भारताची प्रेरक शक्ती बनवण्याचा आपला संकल्पही त्यांनी संबोधनाच्या समारोपात व्यक्त केला.
या कार्यक्रमाला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
दारंगमध्ये, पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये दारंग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, परिचारिका आणि सुईणी विद्यालय (GNM - General Nursing and Midwifery) तसेच बी.एससी पर्यंतच्या अभ्यासक्रम असलेले परिचारिका महाविद्यालय या विकासकामाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे या प्रदेशातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या वितरणाला बळकटी मिळणार आहे. याशिवाय गुवाहाटी रिंग रोड प्रकल्पामुळे शहरातल्या दळणवळणीय व्यवस्थेला नवा आयाम मिळेल, वाहतूक कोंडी कमी होईल तसेच राजधानीच्या शहर आणि आसपासच्या भागातील दळणवळणीय जोडणीत सुधारणा घडून येईल. याचबरोबरीने ब्रह्मपुत्रा नदीवरील कुरुवा - नारेंगी पूलामुळेही या प्रदेशातील दळणवळणीय जोडणीत सुधारणा होऊन इथल्या सामाजिक - आर्थिक विकासाला चालना मिळू शकेल.
***
सुषमा काणे / शैलेश पाटील / विजयालक्ष्मी साळवी-साने / नितीन गायकवाड / तुषार पवार / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166521)
Visitor Counter : 2