पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मणिपूरमधील इंफाळ इथे 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन
मणिपूर म्हणजे भारतमातेच्या शिरपेचातला मुकुटमणी : पंतप्रधान
आपण मणिपूरला शाश्वत शांतता आणि विकासाच्या मार्गावर पुढे नेले पाहिजे : पंतप्रधान
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूरला भारताच्या स्वातंत्र्याचे प्रवेशद्वार म्हटले होते, या भूमीने अनेक शूरवीर दिले, अशा प्रत्येक महान व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेऊनच केंद्र सरकार वाटचाल करत आहे : पंतप्रधान
मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्याची सुनिश्चिती करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे : पंतप्रधान
नेपाळमध्ये आज अंतरिम सरकारचे पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल मी सुशीला जी यांचे 140 कोटी भारतीयांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करतो, नेपाळमध्ये शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा मार्ग त्या प्रशस्त करतील असा मला विश्वास आहे : पंतप्रधान
मणिपूरमध्ये प्रचंड क्षमता असून, इथल्या डोंगराळ आणि खोऱ्याच्या प्रदेशात सलोख्याचा एक मजबूत दुवा साधण्यासाठी आपण सातत्यपूर्ण संवाद राखला पाहिजे : पंतप्रधान
Posted On:
13 SEP 2025 5:04PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरमधील इंफाळ इथे 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. मणिपूरच्या विकासासाठी आज हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि प्रारंभ करण्यात आल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. या प्रकल्पांमुळे इथल्या जनतेच्या जीवनमानात अधिक सुलभता येईल तसेच या प्रदेशातील पायाभूत सुविधांही अधिक बळकट होतील असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे मणिपूरमधल्या युवा वर्गासाठी तसेच राज्याच्या मुला - मुलींसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज सुरू केलेल्या प्रकल्पांपैकी 3,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचा मणिपूर अर्बन रोड्स प्रोजेक्ट (मणीपूर शहरी रस्ते मार्ग प्रकल्प) आणि 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचा मणिपूर इन्फोटेक डेव्हलपमेंट प्रोजेक्ट (मणीपूर माहिती तंत्रज्ञान विकास प्रकल्प) हे दोन प्रकल्प विशेष महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे इंफाळमधील रस्ते विषयक पायाभूत सुविधांना बळकटी मिळेल, तसेच मणिपूरच्या उज्ज्वल भविष्यालाही नवी ऊर्जा मिळेल असे त्यांनी सांगितले. आज सुरू झालेल्या सर्व नवीन प्रकल्पांसाठी त्यांनी मणिपूरच्या जनतेचे अभिनंदन केले तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या पश्चिम आणि दक्षिणेकडेच्या भागीतल प्रमुख शहरांचा विकास झाला आणि त्यानंतर ती शहरे आकांक्षांची केंद्रे बनली असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यामुळेच त्या त्या प्रदेशातील युवा वर्गासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले. आता 21 वे शतक हे पूर्व आणि ईशान्य भारताचे असेल असे ते म्हणाले. केंद्र सरकारने कायमच मणिपूरच्या विकासाला प्राधान्य दिले आहे, त्यामुळेच आता मणिपूरचा विकास दर सातत्याने चढा राहिला आहे, ही बाब त्यांनी नमूद केली. 2014 पूर्वी मणिपूरचा विकास दर एक टक्क्यापेक्षा कमी होता, मात्र आज मणिपूर पूर्वीच्या तुलनेत अनेक पट वेगाने प्रगती करू लागला असल्याचे ते म्हणाले. मणिपूरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आता राज्यात रस्ते बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाचा वेगही अनेक पटींनी वाढला असल्याचे सांगून, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रस्ते जोडणीचा विस्तार प्रत्येक गावापर्यंत नेण्याचे काम वेगाने सुरू असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.
इम्फाळ हे संधींचे शहर असल्याचे अधोरेखित करत, मोदी म्हणाले की, आपण इम्फाळकडे युवकांची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या आणि राष्ट्राच्या प्रगतीला गती देणाऱ्या भारतातील विकसित शहरांपैकी एक म्हणून पाहतो. या दृष्टिकोनानुसार, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत इम्फाळमध्ये अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत असे त्यांनी सांगितले. शेकडो कोटी रुपयांच्या इतर अनेक प्रकल्पांचे कामही वेगाने प्रगतीपथावर आहे असेही ते म्हणाले.
इम्फाळ असो की मणिपूरचे इतर भाग, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान-आधारित उद्योगांसाठी नवीन संधी उभ्या राहत आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. माहिती तंत्रज्ञान विशेष आर्थिक क्षेत्र या शक्यता आणखी मजबूत करेल, तसेच या क्षेत्रातील पहिली इमारत आधीच पूर्ण झाली आहे असेही त्यांनी सांगितले. मणिपूरमध्ये नवीन नागरी सचिवालय इमारतीची मागणी दीर्घकाळापासून होती असे मोदी यांनी नमूद केले. ही इमारत आता तयार आहे आणि ही नवीन सुविधा प्रशासनात ‘नागरिक देवोभव’ या भावनेला मजबुती देईल असे त्यांनी सांगितले.
मणिपूरमधील अनेक लोक कोलकाता आणि दिल्लीला वारंवार प्रवास करतात असा उल्लेख करत, मोदी यांनी सांगितले की, या शहरांमध्ये परवडणाऱ्या निवासाची व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही ठिकाणी मणिपूर भवन बांधण्यात आली आहेत. या सुविधा मणिपूरच्या मुलींना मोठा आधार देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेव्हा मुले सुरक्षित आणि संरक्षित असतील, तेव्हा घरी असलेल्या पालकांच्या चिंता कमी होतील असे ते म्हणाले.
लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी सरकार पूर्ण संवेदनशीलतेने कार्यरत असल्याचे अधोरेखित करत, मणिपूरच्या अनेक भागांना पुराच्या गंभीर आव्हानांचा सामना करावा लागतो असेही पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, ही समस्या कमी करण्यासाठी सरकार अनेक प्रकल्पांवर काम करत आहे.
मणिपूर हे जिथे माता आणि भगिनी अर्थव्यवस्थेच्या अग्रभागी आहेत असे राज्य आहे, असा उल्लेख करत, पंतप्रधानांनी इमा केठेलची परंपरा हे याचे शक्तिशाली उदाहरण असल्याचे सांगितले. आपण महिला सशक्तीकरणाला भारताच्या विकासाचा आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचा मुख्य आधारस्तंभ मानतो असे ते म्हणाले. ही प्रेरणा मणिपूरमध्ये स्पष्टपणे दिसते असे त्यांनी सांगितले. सध्याच्या सरकारच्या स्थापनेनंतर, महिलांसाठी इमा मार्केट म्हणून ओळखले जाणारे विशेष हाट बाजार सुरू करण्यात आले, असे पंतप्रधानांनी सांगितले. आज चार नवीन इमा मार्केटचे उद्घाटन करण्यात आले असून हे बाजार मणिपूरच्या महिलांना मोठा आधार देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक नागरिकाचे जीवन सुगम करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे अधोरेखित करत, या भागात वस्तूंची वाहतूक करणे हे मोठे आव्हान होते, असा बिकट काळही मणिपूरने पाहिला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधानांनी नमूद केले की पूर्वी साध्या कुटुंबांसाठी दैनंदिन वापरातील वस्तूदेखील परवडण्यासारख्या नव्हत्या. त्यांनी स्पष्ट केले की अलीकडच्या वर्षांत केंद्र सरकारने मणिपूरला त्या जुन्या अडचणींवर मात करण्यात मदत केली आहे. त्यांनी जाहीर केले की सरकार बचत वाढविण्यास आणि जनतेचे जीवन अधिक सोयीचे करण्यास कटिबद्ध आहे.पंतप्रधानांनी अधोरेखित केले की सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) मोठ्या प्रमाणात कमी केला आहे आणि यामुळे मणिपूरच्या जनतेला दुहेरी लाभ मिळणार आहे. त्यांनी स्पष्ट केले की साबण, शॅम्पू, केसांचे तेल, कपडे, पादत्राणे यांसारख्या दैनंदिन वस्तू आता अधिक स्वस्त होतील. सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्यांच्या किमतीही कमी होतील. तसेच हॉटेल्स व खाद्यसेवा क्षेत्रातील जीएसटी देखील लक्षणीयरीत्या कमी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे गेस्ट हाऊस मालक, टॅक्सीचालक, रस्त्याच्या कडेला असलेल्या खानावळी यांना मोठा फायदा होईल आणि या प्रदेशातील पर्यटनालाही चालना मिळेल.
पंतप्रधानांनी नमूद केले की मणिपूरकडे हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा आहे. त्यांनी मणिपूरला “भारत मातेच्या शिरपेचातला मुकुटमणी” असे संबोधले. त्यांनी स्पष्ट केले की मणिपूरच्या विकासात्मक प्रतिमेला सातत्याने बळकटी देणे गरजेचे आहे. मणिपूरमध्ये घडणारे कोणतेही हिंसाचाराचे प्रकार हे दुर्दैवी असून ते आपल्या पूर्वजांप्रती तसेच भावी पिढ्यांप्रती मोठा अन्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. मणिपूरला शांतता आणि विकासाच्या मार्गावर सातत्याने पुढे नेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.पंतप्रधानांनी मणिपूरच्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तसेच राष्ट्रीय सुरक्षेतील प्रेरणादायी योगदानाची आठवण करून दिली. त्यांनी स्मरण करून दिले की मणिपूरच्या भूमीतच भारतीय राष्ट्रीय सेनेने प्रथम भारताचा ध्वज फडकावला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूरला भारताच्या स्वातंत्र्याचे प्रवेशद्वार असे संबोधले होते, याची आठवण त्यांनी करून दिली आणि या भूमीवर जन्मलेल्या असंख्य शूर शहीदांना अभिवादन केले. मणिपूरमधील प्रत्येक महान व्यक्तिमत्त्वापासून सरकारला प्रेरणा मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.सरकारने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे अंदमान-निकोबार बेटांवरील माउंट हॅरिएटचे नाव बदलून माउंट मणिपूर असे करण्यात आले आहे, हे मणिपूरच्या स्वातंत्र्यसैनिकांना दिलेले राष्ट्रीय अभिवादन असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी असेही सांगितले की आजही मणिपूरमधील अनेक सुपुत्र-सुकन्या भारताच्या विविध भागांत भारत मातेच्या रक्षणाच्या कार्यात तैनात आहेत. त्यांनी अधोरेखित केले की ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने भारतीय सशस्त्र दलाची ताकद पाहिली.भारतीय सैनिकांनी केलेल्या निर्णायक हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्य हतबल झाल्याचे त्यांनी सांगितले. या कामगिरीत मणिपूरच्या शूर मुला-मुलींनी भारताच्या या यशात महत्त्वाची भूमिका बजावली ही बाबही पंतप्रधानांनी अधोरेखित केली. अशाच शूर जवानांपैकी एक असलेल्या शहीद दीपक चिंगखाम यांनाही पंतप्रधानांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या शौर्याला सलाम केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये दीपक चिंगखाम यांनी दिलेले बलिदानाचे देश कायम स्मरण करत राहील असे ते म्हणाले.
आपल्या संबोधनात प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या 2014 मधील मणिपूर दौऱ्याचे आणि त्यावेळी केलेल्या एका विधानाचे स्मरण केले. मणिपुरी संस्कृतीशिवाय भारतीय संस्कृती अपूर्ण आहे आणि मणिपूरच्या खेळाडूंशिवाय भारतीय क्रीडा क्षेत्रही अपूर्ण असल्याचे आपण त्यावेळी म्हणालो असल्याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. मणिपूरचा युवा वर्ग राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखण्यासाठी स्वतःला पूर्णतः समर्पित करतो अशा शब्दांत त्यांनी इथल्या युवा वर्गाची प्रशंसा केली. मणीपूरची ही ओळख हिंसेच्या गडद सावटाखाली झाकली जाता कामा नये यावर त्यांनी भर दिला.
आता भारत एक जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून उदयाला येऊ लागला आहे. अशावेळी मणिपूरच्या युवावर्गावरची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे ते म्हणाले. याअनुषंगाने केंद्र सरकारने मणिपूरमध्ये देशातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारल्याची बाब त्यांनी नमूद केली. खेलो इंडिया योजना आणि ऑलिंपिक पोडियम योजनेच्या अंतर्गत मणिपूरमधील अनेक खेळाडूंना प्रोत्साहनासह पाठबळ पुरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच युवा वर्गासाठी मणिपूरमध्ये आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा विकसित केल्या जात असल्याचे ते म्हणाले. पोलो या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी मार्जिंग पोलो संकुल स्थापन केले असून, इथे पोलीशी संबंधित जगातील सर्वात उंच पुतळा उभारला असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रदेशातल्या ऑलिम्पिकपटूंच्या गौरवार्थ ऑलिंपियन पार्क उभारले असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने नुकतेच खेलो इंडिया नीती हे राष्ट्रीय क्रीडा धोरण जाहीर केले असून, आगामी काळात या धोरणाचा मणिपूरच्या युवा वर्गाला मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या नेतृत्वातले केंद्र सरकार मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्याची सुनिश्चिती करण्यासाठी सातत्यपूर्णतेने काम करत असल्याची बाब त्यांनी आपल्या संबोधनात ठळकपणे नमूद केली. जनतेच्या हिताचे संरक्षण केले पाहिजे आणि ज्यांना छावण्यांमध्ये राहणे भाग पडले आहे, अशांना सामान्य जीवन जगता आले पाहीजे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. विस्थापित कुटुंबांसाठी 7,000 नवीन घरांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारने अलिकडेच मणिपूरसाठी सुमारे 3,000 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे, यापैकी 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा विशेषत्वाने केवळ विस्थापित व्यक्तींना मदत करण्यासाठी आहे ही बाबही त्यांनी नमूद केली. हिंसेमुळे बाधित झालेल्या लोकांना पूर्वपदावर आणण्यात मदत करण्याला आपल्या नेतृत्वातील केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्यक्रमावर ठेवले असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. नव्याने उभारलेले मणिपूरचे पोलीस मुख्यालयही या प्रयत्नांमध्ये सहकार्यपूर्ण मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी सांगितले की, मणिपूरच्या भूमीमधून ते नेपाळमधील त्यांच्या मित्रांना संबोधित करू इच्छितात. हिमालयाच्या कुशीत वसलेले नेपाळ हा भारताचा जवळचा मित्र आणि विश्वासू भागीदार आहे, असे त्यांनी नमूद केले. दोन्ही देश सामायिक इतिहास, श्रद्धा आणि विकासाच्या सामूहिक प्रवासाने बांधलेले आहेत यावर भर देऊन, पंतप्रधानांनी 140 कोटी भारतीयांच्या वतीने श्रीमती सुशीलाजी यांचे नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.
त्यांच्या येण्याने नेपाळमध्ये शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सुशीला जी यांची नियुक्ती ही महिला सक्षमीकरणाचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे यावर मोदी यांनी भर दिला. अस्थिरतेच्या वातावरणातही लोकशाही मूल्यांचे पालन करणाऱ्या नेपाळमधील प्रत्येक व्यक्तीचे त्यांनी कौतुक केले.
नेपाळमधील अलिकडच्या घडामोडींपैकी ज्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही, त्यातील एका उल्लेखनीय पैलूवर प्रकाश टाकत, मोदी म्हणाले की गेल्या दोन ते तीन दिवसांत, नेपाळमधील तरुण पुरुष आणि महिला समर्पण आणि पवित्र भावनेने रस्ते स्वच्छ करताना आणि रंगरंगोटी करताना दिसत आहेत.त्यांनी सांगितले की त्यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पाहिले आहेत. पंतप्रधानांनी त्यांची सकारात्मक मानसिकता आणि रचनात्मक कृती केवळ प्रेरणादायीच नाही तर नेपाळच्या पुनरुत्थानाचे स्पष्ट संकेत असल्याचे सांगितले. त्यांनी नेपाळला उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
"21 व्या शतकात, भारत एकमेव ध्येयासह पुढे जात आहे - विकसित भारताचे ध्येय आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी मणिपूरचा विकास आवश्यक आहे", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि मणिपूरमध्ये अमर्याद संधी आहेत हे देखील अधोरेखित केले. विकासाच्या मार्गावर दृढ राहणे हे सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले.मणिपूरमध्ये क्षमतेची कमतरता नसल्याचे सांगून पंतप्रधानांनी, संवादाचा मार्ग सतत मजबूत करण्याची आणि डोंगर आणि खोऱ्यांमध्ये सुसंवादाचा मजबूत पूल बांधण्याची गरज यावर भर दिला. मणिपूर भारताच्या विकासाचे एक शक्तिशाली केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला. विकास प्रकल्पांसाठी त्यांनी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी इम्फाळ येथे 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यामध्ये मंत्रीपुखरी येथील नागरी सचिवालय; मंत्रीपुखरी येथील आयटी सेझ इमारत आणि नवीन पोलिस मुख्यालय; दिल्ली आणि कोलकाता येथील मणिपूर भवन; आणि 4 जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी अद्वितीय इमा मार्केट यांचा समावेश आहे.
***
निलिमा चितळे / तुषार पवार / निखिलेश चित्रे / गजेंद्र देवडा / हेमांगी कुलकर्णी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166413)
Visitor Counter : 2