पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ मर्यादितचे केले उद्घाटन


सक्षम महिला या विकसित भारताचा पाया आहेत, देशातील महिलांच्या सक्षमीकरणाला आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान

सरकार त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी सतत काम करत आहे आणि करत राहील: पंतप्रधान

आपल्या सरकारसाठी आईची प्रतिष्ठा, तिचा आदर, तिचा स्वाभिमान याला सर्वोच्च प्राथमिकता: पंतप्रधान

Posted On: 02 SEP 2025 2:35PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ मर्यादितचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की या शुभ मंगळवारी एक अत्यंत आशादायक उपक्रम सुरू होत आहे. त्यांनी घोषणा केली की बिहारमधील माता आणि भगिनींना जीविका निधी साख सहकारी संघाच्या माध्यमातून एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या उपक्रमामुळे गावोगावच्या जीविकाशी संबंधित महिलांना आर्थिक मदत अधिक सुलभपणे मिळू शकेल, ज्यामुळे त्यांना आपले काम आणि व्यवसाय पुढे नेण्यास मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी जीविका निधी प्रणाली पूर्णपणे डिजिटल असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यामुळे प्रत्यक्ष भेटींची गरज नाहीशी झाली असून आता सर्व काही मोबाईल फोनद्वारे करता येऊ शकेल. जीविका निधी साख सहकारी संघाच्या आरंभाबद्दल त्यांनी बिहारच्या माता आणि भगिनींचे अभिनंदन केले आणि या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल नितीश कुमार आणि बिहार सरकारची प्रशंसा केली.

“"सक्षम महिला या विकसित भारताचा एक प्रमुख पाया आहेत", असा उल्लेख करून मोदी म्हणाले की महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी अधोरेखित केले की सरकार माता, भगिनी आणि मुलींचे जीवन सुलभ करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेत आहे. महिलांना उघड्यावर शौचास जाण्याच्या सक्तीपासून मुक्त करण्यासाठी कोट्यवधी शौचालये बांधण्यात आली आहेत, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोट्यवधी कायमस्वरूपी घरे बांधण्यात आली आहेत, याकडे विशेष लक्ष वेधून ही घरे महिलांच्या नावावर नोंदणीकृत आहेत, असे त्यांनी नमूद केले. जेव्हा एखादी महिला घराची मालकीण बनते तेव्हा तिच्या आवाजाचे वजन देखील वाढते, असे ते म्हणाले.

स्वच्छ पेयजल उपलब्धतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने हर घर जल उपक्रम सुरू केला आहे, हे अधोरेखित करून मोदी यांनी स्पष्ट केले की माता आणि भगिनींना आरोग्यसेवा मिळविण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली, ज्यामध्ये ₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. पंतप्रधानांनी नमूद केले की केंद्र सरकार मोफत रेशन योजना देखील चालवत आहे, ज्यामुळे प्रत्येक आईला तिच्या मुलांना दररोज कसे खायला द्यावे या चिंतेपासून मुक्तता मिळाली आहे. महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी देशभरातील महिलांना सक्षम बनवणाऱ्या लखपती दीदी, ड्रोन दीदी आणि बँक सखी यासारख्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यांनी या योजना माता आणि भगिनींच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या एका भव्य मोहिमेचा भाग असल्याचे वर्णन केले. येत्या काही महिन्यांत बिहारमधील आपले सरकार या मोहिमेला आणखी गती देईल असे आश्वासन मोदी यांनी उपस्थितांना दिले.

"बिहार ही अशी भूमी आहे जिथे मातृशक्तीचा आदर  आणि मातांचा सन्मान नेहमीच सर्वोच्च स्थानी  राहिला आहे", असे पंतप्रधान म्हणाले. बिहारमध्ये गंगा मैया, कोसी मैया, गंडकी मैया आणि पुनपुन मैया सारख्या देवतांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते असे  त्यांनी अधोरेखित केले. जानकी जी ही बिहारची कन्या आहे, जी या भूमीतील सांस्कृतिक परंपरेत वाढली आहे  - या भूमीची सिया धिया, जी जगभरात सीता माता म्हणून पूजली जाते, असे त्यांनी नमूद केले. छठी मैयाची पूजा-अर्चना  करणे हे सर्वांसाठी आशीर्वाद मानले जाते असे त्यांनी नमूद केले. नवरात्रीचा पवित्र सण जवळ येत आहे, या काळात  देशभरात माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते असे ते म्हणाले.   बिहार आणि पूर्वांचल प्रदेशात सातबहिनी पूजेची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे - ज्यात  सात बहिणींची दैवी आईचे रूप म्हणून पूजा केली जाते. आई प्रति ही गाढ श्रद्धा आणि भक्ती ही बिहारची एक खास ओळख आहे यावर त्यांनी भर दिला. स्थानिक श्लोक उद्धृत करताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की कोणीही, कितीही प्रिय असले तरी, कधीही आईचे स्थान घेऊ शकत नाही.

त्यांच्या सरकारसाठी, मातांचा  सन्मान, आदर आणि अभिमान ही सर्वोच्च  प्राधान्य असलेली बाब आहे यावर भर देऊन, मोदी म्हणाले  की आई ही आपल्या जगाचे मूलभूत तत्व आहे आणि ती आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. बिहारच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा उल्लेख करत, त्यांनी अलिकडच्याच एका घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.  पंतप्रधानांनी सांगितले की बिहारमधील विरोधी पक्षाच्या आघाडीच्या व्यासपीठावरून त्यांच्या आईविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली. हा अपमान केवळ त्यांच्या आईचा अपमान नव्हता तर देशाच्या प्रत्येक माता, भगिनी आणि मुलीचा अपमान होता. अशा टिप्पणी पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर बिहारच्या लोकांना, विशेषतः त्यांच्या मातांना झालेल्या दुःखाची मोदी यांनी दखल घेतली. त्यांच्या हृदयात जे दुःख आहे तसेच ते बिहारच्या लोकांनाही होत आहे आणि हे दुःख ते आज इथल्या लोकांसोबत सामायिक  करत आहेत.

पंतप्रधान म्हणाले की ते सुमारे 55 वर्षांपासून समाजाची आणि देशाची सेवा करत आहेतदररोज, प्रत्येक क्षणी त्यांनी देशासाठी अतिशय समर्पित भावनेने काम  केले आहे यावर भर दिला. या प्रवासात त्यांच्या आईने महत्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले की भारतमातेची सेवा करण्यासाठी, त्यांच्या जन्मदात्या आईने त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून मुक्त केले. ज्या आईने त्यांना राष्ट्रसेवेसाठी आशीर्वाद दिला होता आणि त्यांना जाऊ दिले होते आणि जी आता भौतिकदृष्ट्या या जगात नाही, तिच्याबद्दल विरोधी आघाडीच्या व्यासपीठावरून अपशब्द काढले गेले याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.  हे अत्यंत वेदनादायक, त्रासदायक आणि अत्यंत क्लेशदायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येक आई आपल्या मुलांना जीवाचे रान  करून वाढवते आणि तिच्यासाठी तिच्या मुलांपेक्षा काहीही मोठे नसते यावर भर देऊन मोदी म्हणाले की त्यांनी लहानपणापासूनच आपल्या  आईला याच रूपात पाहिले आहे - दारिद्र्य आणि हलाखीच्या स्थितीत आपल्या कुटुंबाचे आणि मुलांचे पालनपोषण केले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांची आई छत गळू नये याची काळजी घ्यायची, जेणेकरून तिची मुले शांत झोपू शकतील याची आठवण त्यांनी करून दिली. आजारी असतानाही, ती कामावर जायची. तिला माहित होते की  तिने एक दिवस जरी विश्रांती घेतली तर तिच्या मुलांना त्रास सहन करावा लागेल. त्यांनी नमूद केले की तिने कधीही स्वतःसाठी नवीन साडी खरेदी केली नाही, तिच्या मुलांसाठी कपडे शिवण्यासाठी पै न पै वाचवली.  एक गरीब आई आयुष्यभर त्याग करून तिच्या मुलांना शिक्षण आणि उत्तम  मूल्ये यांची शिकवण देते यावर पंतप्रधानांनी भर दिला.  म्हणूनच आईचे स्थान देवांपेक्षाही वरचे मानले जाते, असे त्यांनी नमूद केले.  एका श्लोकाचा उल्लेख करून बिहारच्या सांस्कृतिक मूल्यांसंदर्भात  मोदी म्हणाले की विरोधी पक्षाच्या व्यासपीठावरून करण्यात आलेला  अपमान केवळ त्यांच्या आईचा अपमान नव्हता - हा देशभरातील कोट्यवधी मातांचा अपमान होता.

राजघराण्यात जन्म झालेल्यांना एका गरीब आईचा त्याग आणि तिच्या अपत्याच्या वेदना उमगणार नाहीत असे वैषम्य व्यक्त करताना हे विशेषाधिकारप्राप्त व्यक्ती चांदी आणि सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्माला आले आहेत आणि बिहार आणि देशभरातील सत्ता त्यांना त्यांचा कौटुंबिक वारसा वाटते असा खेद मोदी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की सत्तेचे आसन हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असे ते मानतात. तथापि भारतवासियांनी एका गरीब मातेच्या पुत्राला - एका कष्टाळू व्यक्तीला - आशीर्वाद दिला आणि त्याला पंतप्रधान बनवले याकडे मोदींनी लक्ष वेधले. हे वास्तव विशेषाधिकारप्राप्त वर्गाला स्वीकारणे अवघड असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. विरोधी पक्षाने कधीही समाजातील मागास आणि अति मागास घटकांचा उदय सहन केला नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले. या व्यक्तींना असे वाटते की त्यांना कठोर परिश्रम करणाऱ्यांचा अपमान करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे शिवीगाळ केली जाते असेही मोदींनी नमूद केले. बिहार निवडणुकीदरम्यानही त्यांना अनादराने आणि अपशब्दाने संबोधित केले गेले, ज्यामुळे या व्यक्तींची उच्चभ्रू मानसिकता वारंवार उघड झाली याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. पंतप्रधानांनी सांगितले की याच मानसिकतेमुळे आता ते त्यांच्या राजकीय मंचावरून त्यांच्या दिवंगत आईवर शिवीगाळ करत आहेत.

माता आणि भगिनींना शिवीगाळ करणारी मानसिकता महिलांना कमकुवत ठरवून त्यांना शोषण आणि अत्याचाराचे साधन मानते अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली.  जेव्हा अशी महिलाविरोधी मानसिकता सत्तेत आली आहे तेव्हा महिलांनाच सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला आहे यावर जोर देत ते म्हणाले की बिहारच्या लोकांपेक्षा हे वास्तव चांगले कोणीही समजू शकत नाही. बिहारमधील विरोधी पक्षाच्या कार्यकाळाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की त्या काळात गुन्हेगारी आणि गुन्हेगारांवर नियंत्रण नव्हतेखून, खंडणी आणि अत्याचाराच्या घटना सामान्य झाल्या होत्या. तत्कालीन सरकारने खुनी आणि बलात्काऱ्यांना  संरक्षण दिले आणि त्या राजवटीचा फटका बिहारच्या महिलांना भोगावा लागला असा आरोप त्यांनी केला. महिला घराबाहेर पडण्यास सुरक्षित नव्हत्या आणि कुटुंबात सदैव भीती असायची. आपले पती किंवा मुले संध्याकाळपर्यंत जिवंत घरी परततील की नाही याची शाश्वती नसल्याने कुटुंबे नेहमी भेदरलेली असायची याकडेही मोदींनी लक्ष वेधले. महिला त्यांचे कुटुंब गमावण्याच्या, खंडणीसाठी त्यांचे दागिने विकण्याच्या, माफिया घटकांकडून अपहरण होण्याच्या किंवा त्यांचे वैवाहिक सुख गमावण्याच्या धोक्यात कसे जगत होत्या हे त्यांनी कथन केले. बिहारने त्या गर्द छायेतून बाहेर पडण्यासाठी दीर्घ लढाई लढली असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. विरोधी पक्षांना दूर करण्यात आणि वारंवार पराभूत करण्यात बिहारच्या महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे श्रेय त्यांनी त्या महिलांना दिले. म्हणूनच आज विरोधी पक्ष बिहारच्या महिलांविरुद्ध सर्वात जास्त संतप्त आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हे पक्ष सूडाच्या भावनेने त्यांना शिक्षा करण्याचा मानस बाळगतात, त्यांचा हा हेतू स्पष्टपणे समजून घेण्याचे आवाहन मोदींनी बिहारमधील सर्व महिलांना केले.

काही विरोधी पक्षांनी महिलांच्या प्रगतीला सातत्याने विरोध केला आहे, म्हणूनच ते महिला आरक्षणासारख्या उपक्रमांना तीव्र विरोध करतात, हे निदर्शनास आणून देत मोदी म्हणाले की जेव्हा गरीब घरातील महिला प्रसिद्धी मिळवते तेव्हाही त्यांची निराशा स्पष्ट होते. विरोधकांनी आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील कन्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वारंवार अपमान केल्याचे उदाहरण त्यांनी दिले. महिलांबद्दल द्वेष आणि तिरस्काराचे हे राजकारण रोखले पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. नवरात्र 20 दिवसांत सुरू होईल आणि त्यानंतर 50 दिवसांत छठचा पवित्र सण येईल, जेव्हा छठी मैय्याला प्रार्थना केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. बिहारच्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या आईचा अपमान करणाऱ्यांना ते क्वचित क्षमा करू शकतात, परंतु भारतभूमीने मातेचा अनादर कधीही सहन केलेला नाही. विरोधी पक्षांनी त्यांच्या कृत्यांसाठी सतबहिनी आणि छठी मैय्या यांची माफी मागितली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

पंतप्रधानांनी बिहारच्या लोकांना विशेषतः येथील सुपुत्रांना आपल्या मातेच्या अपमानाला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. जिथे जिथे विरोधी पक्षांचे नेते जातील मग ते कोणतेही रस्ते असोत किंवा शहरे.. आपल्या मातेचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही आणि आत्मसन्मानावर केलेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही हा येथील लोकांचा आवाज  त्यांनी ऐकलाच पाहिजे.   विरोधी पक्षांची  दडपशाही आणि हल्ल्यांना सहन केले जाणार नाही आणि स्वीकारलेही जाणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

भारतातील महिलांना सक्षम करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. आपले सरकार महिलांना भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी सदैव कार्यरत असून यापुढेही पूर्ण बांधिलकीने आपण ते करत राहू, असे ते म्हणाले. आपल्या सरकारला असेच आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले आणि राष्ट्रातील प्रत्येक मातेला आदरपूर्वक अभिवादन केले.

अलीकडेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरात खेडोपाडी आणि प्रत्येक रस्त्यावर निनादणाऱ्या हर घर तिरंगा या घोषणेने राष्ट्रीय भावना जागृत झाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की "हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी" ही आता काळाची गरज आहे. हा नवीन मंत्र माता भगिनींना सक्षम करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्यासाठी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेत यशस्वी होण्यासाठी सर्व महिलांनी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांनी प्रत्येक दुकानदार आणि व्यापाऱ्याला 'हे स्वदेशी आहे' असे फलक गर्वाने लावण्याचा आग्रह केला, तसेच स्थानिक उत्पादनांसाठी आवाज उठवण्याचे आणि 'भारतात  बनवलेल्या' उत्पादनांवर भर  देण्याचे आवाहन केले. भारताने आत्मनिर्भरतेच्या मार्गावर भक्कमपणे वाटचाल केली पाहिजे असे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

या कार्यक्रमाला  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री  सम्राट चौधरी, विजय कुमार सिना इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ लिमिटेडचे उदघाटन झाले. जीविका शी निगडित समुदाय सदस्यांना परवडणाऱ्या व्याजदरात आणि सहजगत्या निधी उपलब्ध करून देणे  हा जीविका निधी उभारणीचा उद्देश आहे. जिविका चे सर्व नोंदणीकृत समूह-स्तरीय महामंडळ संस्थेचे सदस्य बनतील. या संस्थेच्या कार्यान्वयन खर्चासाठी बिहार सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही आर्थिक सहाय्य करणार आहेत.

गेल्या काही वर्षांत जीविका स्वयंसेवी गटांशी संबंधित महिलांमध्ये उद्यमशीलतेचा विकास झाला आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात अनेक लघु उद्योग आणि उत्पादन कंपन्या उभारण्यात आल्या आहेत.  मात्र  महिला उद्योजकांना अनेकदा 18 टक्के - 24 टक्के पर्यंत उच्च व्याज दर वसूल करणाऱ्या सूक्ष्म वित्त संस्थांवर अवलंबून राहावे लागत असे. या सूक्ष्म वित्त संस्थांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जीविका निधी हा एक उत्तम वित्तीय व्यवस्था असलेल्या पर्याय म्हणून उदयाला आला आहे. ज्यामुळे मोठ्या रकमेचे कर्ज कमी व्याज दराने आणि वेळेवर मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे.

ही प्रणाली पूर्णपणे डिजिटल स्वरूपात कार्यरत असेल ज्यामुळे जीविका दीदींच्या बँक खात्यात अधिक पारदर्शक पद्धतीने थेट निधी जमा होईल. यासाठी 12,000 समुदाय कार्यकर्त्यांना टॅबलेट्सचे वाटप करुन सुसज्ज केले जात आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकतेचा विकास होऊन समुदाय प्रेरित उद्योगांच्या वाढीला वेग मिळेल अशी अपेक्षा आहे. बिहार मधील सुमारे 20 लाख महिला या उपक्रमाच्या साक्षीदार होत्या.

***

माधुरी पांगे / नंदिनी मथुरे / सुषमा काणे / वासंती जोशी / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163095) Visitor Counter : 4