पंतप्रधान कार्यालय
25 व्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
Posted On:
01 SEP 2025 10:14AM by PIB Mumbai
25 व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होताना मला आनंद होत आहे. शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी राष्ट्रपती शी यांचे मनापासून आभार मानतो.
आज उझबेकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे आणि काल किर्गिजस्तानचा राष्ट्रीय दिन होता. यानिमित्ताने , मी दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
महामहीम,
गेल्या चोवीस वर्षांमध्ये एससीओने संपूर्ण युरेशिया प्रदेशातील विस्तारित कुटुंबाला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक सक्रिय सदस्य म्हणून, भारताने नेहमीच विधायक आणि सकारात्मक पद्धतीने योगदान दिले आहे.
एससीओ संदर्भात भारताचा दृष्टिकोन आणि धोरण तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे:
S – सिक्युरिटी
C –कनेक्टिव्हिटी
O – ऑपॉर्च्युनिटी
पहिला स्तंभ , "S” - म्हणजेच सुरक्षा '(सिक्युरिटी) यासंदर्भात मी सांगू इच्छितो की सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया आहे. परंतु , या मार्गात दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीवाद सारखी प्रमुख आव्हाने आहेत.
दहशतवाद हा केवळ एखाद्या देशाच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक सामायिक आव्हान आहे. कोणताही देश, कोणताही समाज, कोणताही नागरिक स्वतःला त्यापासून पूर्णपणे सुरक्षित समजू शकत नाही. म्हणूनच भारताने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकजुटतेच्या महत्वावर सातत्याने भर दिला आहे.
एससीओ-आरएटीएस ने या संदर्भात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या वर्षी, संयुक्त माहिती मोहिमेचे नेतृत्व करताना, भारताने "अल-कायदा" आणि त्याच्याशी संलग्न दहशतवादी संघटनांविरुद्ध लढण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. आम्ही कट्टरतावाद विरोधात वाढीव समन्वय आणि संयुक्त उपाययोजनांचा प्रस्ताव देखील मांडला आहे.
दहशतवादाला होत असलेल्या वित्तपुरवठ्याविरुद्ध आम्ही ठामपणे आवाज उठवला आहे आणि या प्रयत्नात दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.
महामहिम,
गेल्या चार दशकांपासून, भारत क्रूर दहशतवादाच्या खोल जखमा सहन करत आहे. असंख्य मातांनी आपली मुले गमावली आहेत आणि असंख्य मुले अनाथ झाली आहेत.
अलीकडेच, पहलगाममध्ये आपण दहशतवादाचा सर्वात घृणास्पद चेहरा पाहिला. या दुःखद क्षणी आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्व मित्र राष्ट्रांचे मी मनापासून आभार मानतो. हा हल्ला केवळ भारताच्या अंतरात्मावरील हल्ला नव्हता तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशाला आणि प्रत्येक व्यक्तीला दिलेले एक खुले आव्हान होते.
अशा परिस्थितीत, असे विचारले जाणे स्वाभाविक आहे की: काही देशांकडून दहशतवादाचे उघड समर्थन आपल्याला स्वीकार्य असू शकते का?
महामहिम,
आपण हे स्पष्टपणे आणि एका सुरात सांगितले पाहिजे: दहशतवादाबद्दल दुहेरी निकष अस्वीकार्य आहेत. एकत्रितपणे, आपण प्रत्येक स्वरूपात आणि प्रकटीकरणात दहशतवादाचा विरोध केला पाहिजे. मानवतेप्रती ही आपली जबाबदारी आहे.
महामहिम,
आता मी दुसरा स्तंभ "C” - म्हणजेच कनेक्टिव्हिटीबद्दल माझे विचार मांडू इच्छितो. भारताचे नेहमीच असे मत राहिले आहे की मजबूत कनेक्टिव्हिटीमुळे केवळ व्यापार सुलभ होत नाही तर विश्वास आणि विकासाचे दरवाजे देखील उघडतात .
याच दृष्टिकोनातून आपण चाबहार बंदर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर सारख्या उपक्रमांवर काम करत आहोत. याद्वारे आपण अफगाणिस्तान आणि मध्य आशियाबरोबर आपले संबंध वाढवू शकतो.
कनेक्टिव्हिटीच्या प्रत्येक प्रयत्नात सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेची तत्त्वे पाळली गेली पाहिजेत असे आम्हाला वाटते. एससीओ चार्टरच्या मुख्य तत्त्वांमध्ये देखील हे निहित आहे.
सार्वभौमत्वाला झुगारून पुढे जाणारी कनेक्टिव्हिटी अखेर विश्वास आणि अर्थ दोन्ही गमावते.
महामहिम,
तिसरा स्तंभ आहे: "O" - म्हणजे संधी (ऑपॉर्च्युनिटी ). सहकार्य आणि सुधारणांसाठी संधी.
2023 मध्ये, भारताच्या अध्यक्षतेखाली, एससीओमध्ये नवीन ऊर्जा आणि कल्पना पहायला मिळाल्या. स्टार्ट-अप्स आणि नवोन्मेष, पारंपारिक औषध, युवा सक्षमीकरण, डिजिटल समावेशन आणि आपला सामायिक बौद्ध वारसा सारखी सहकार्याची नवीन क्षेत्रे सुरू केली.
आमचा प्रयत्न एससीओ ला सरकारांपुरते मर्यादित न ठेवता पुढे नेण्याचा होता. लोकांना, युवा शास्त्रज्ञांना, विद्वानांना आणि स्टार्ट-अप्सना देखील एकमेकांशी जोडण्याचा होता .
आज,आपल्या लोकांमधील संबंध मजबूत करण्यासाठी आणखी एक प्रस्ताव मांडू इच्छितो - एससीओ अंतर्गत एक सांस्कृतिक संवाद मंच स्थापन करणे. अशा व्यासपीठामुळे आपण आपल्या प्राचीन संस्कृती, कला, साहित्य आणि परंपरांची समृद्धता जागतिक स्तरावर सामायिक करू शकू.
महामहिम,
आज, भारत सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या मूलमंत्रासह पुढे जात आहे. कोविड संकटापासून ते जागतिक आर्थिक अनिश्चिततेपर्यंत, आम्ही आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आम्ही सातत्याने व्यापक सुधारणांचा पाठपुरावा करत आहोत, ज्यामुळे राष्ट्रीय विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. मी तुम्हाला सर्वांना भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो.
महामहिम,
काळानुरुप एससीओ विकसित होत आहे ही खूप समाधानाची बाब आहे. संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर सुरक्षा यासारख्या समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी चार नवीन केंद्रे स्थापन केली जात आहेत. आम्ही या सुधारणाभिमुख दृष्टिकोनाचे स्वागत करतो.
जागतिक संस्थांमध्ये सुधारणांसाठी एससीओ सदस्य परस्पर सहकार्य वाढवू शकतात. संयुक्त राष्ट्रांच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त, आपण एकमताने संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांसाठी आवाहन करू शकतो.
ग्लोबल साउथच्या आकांक्षा कालबाह्य चौकटींपुरत्या मर्यादित ठेवणे म्हणजे भावी पिढ्यांप्रति घोर अन्याय आहे. नवीन पिढीची रंगीत स्वप्ने आपण जुन्या काळातील कृष्णधवल पडद्यावर दाखवू शकत नाही. पडदा बदलण्याची वेळ आली आहे.
बहुपक्षीयता आणि समावेशक जागतिक व्यवस्थेला चालना देण्यासाठी एससीओ मार्गदर्शक भूमिका बजावू शकते. आज या महत्त्वाच्या विषयावर निवेदन जारी केले जात आहे याचे मी स्वागत करतो.
महामहिम,
आम्ही सर्व भागीदारांसोबत समन्वय आणि सहकार्याने पुढे जात आहोत. एससीओचे पुढील अध्यक्ष, किर्गिजस्तानचे राष्ट्रपती आणि माझे मित्र अध्यक्ष जपारोव्ह यांना मी शुभेच्छा देतो
खूप खूप धन्यवाद.
***
सोनल तुपे / सुषमा काणे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163072)
Visitor Counter : 2
Read this release in:
Hindi
,
Manipuri
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Nepali
,
Assamese
,
Bengali
,
Odia
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu