पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आगामी दशकासाठी भारत-जपान संयुक्त दृष्टिकोन: विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीसाठी आठ दिशानिर्देश

Posted On: 29 AUG 2025 7:10PM by PIB Mumbai

 

भारत आणि जपान; मुक्त, खुला, शांत, समृद्ध आणि दडपशाहीमुक्त हिंद-प्रशांत प्रदेशाचा कायद्याच्या नियमांवर आधारित समान दृष्टिकोन असलेले दोन देश, पूरक संसाधन देणग्या, तांत्रिक क्षमता आणि किफायतशीर स्पर्धात्मकता असलेल्या दोन अर्थव्यवस्था तसेच मैत्री आणि परस्पर सद्भावनेची दीर्घ परंपरा असलेली दोन राष्ट्रे म्हणून पुढील दशकात आपल्या देशांमध्ये आणि जगात मोठ्या प्रमाणात बदल आणि संधी एकत्रितपणे वहन करण्याचा, आपली संबंधित देशांतर्गत उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्याचा तसेच आपल्या देशांना आणि पुढच्या पिढीतील लोकांना पूर्वीपेक्षा जास्त जवळ आणण्याचा आपला हेतू याद्वारे व्यक्त करीत आहेत.

यासाठी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीची उभारणी करून‌ आम्ही पुढील दशकातील लक्ष्य आणि उद्दिष्टांची मांडणी आणि त्यांच्या पूर्ततेसाठीची उपाययोजना यासाठी सर्व-राष्ट्र प्रयत्नांच्या आठ रूपरेषा आखत आहोत;

(I) पुढच्या पिढीतील आर्थिक भागीदारी

जगातील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणून आम्ही आमच्या परस्पर आर्थिक आणि वित्तीय सामर्थ्याचा वापर करण्याचे तसेच आमची पूरक संसाधने आणि बाजारपेठांच्या क्षमतेला उत्प्रेरित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो:

• 2022-2026 दरम्यान जपानकडून भारतात 5 ट्रिलियन जपानी येनची सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक आणि वित्तपुरवठा करण्याच्या उद्दिष्टात प्रगती घडवून आणणे आणि 10 ट्रिलियन येन खाजगी गुंतवणुकीचे नवीन लक्ष्य निश्चित करणे;

भारत-जपान व्यापक आर्थिक सहकार्य करार (सीईपीए) च्या अंमलबजावणीच्या पुढील पुनरावलोकनाला गती देऊन द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवणे तसेच वैविध्यकरण करणे;

जपानी कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या उत्पादनांचा वापर करून भारतातील उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करण्यासाठी भारत-जपान औद्योगिक स्पर्धात्मकता भागीदारी (आयजेआयसीपी) द्वारे "मेक इन इंडिया" उपक्रमासाठी भारत-जपान औद्योगिक सहकार्य मजबूत करणे;

भारत-जपान निधी अंतर्गत नवीन प्रकल्पांचा शोध घेणे, भारतातील गिफ्ट सिटीच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात जपानी कंपन्यांना प्रोत्साहन देणे तसेच जपानमधील प्रमुख भारतीय उद्योग संघटना, व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सींची उपस्थिती वाढवणे;

जपान आणि भारत यांच्यात स्थानिक चलन व्यवहारांचा समावेश असलेल्या पेमेंट यंत्रणेमध्ये सहकार्य वाढवणे;

जपानी एसएमईंना भारतात भेटी देऊन, डाउनस्ट्रीम उद्योगांचा विस्तार करून आणि भारत-जपान एसएमई फोरम सुरू करून लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये (एसएमई) सहकार्याला प्रोत्साहन देणे;

धोरणात्मक संवाद आणि व्यवसाय आदानप्रदानाद्वारे अन्नसुरक्षा आणि कृषी-व्यवसाय सहकार्याला प्रोत्साहन देणे, तसेच प्रारूप शेतांमधील प्रात्यक्षिकांवर आधारित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि भारतीय आणि जपानी पाककृतींसाठी स्वयंपाक व्यावसायिकांचा विकास करणे; आणि

खाजगी क्षेत्रातील संस्थांमध्ये आयसीटी सहकार्य आणि व्यवसाय संधींचा शोध घेणे.

ग्लोबल साउथशी आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या विकास क्षमतेचा वापर करण्यासाठी आमचे द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने आम्ही आफ्रिकेतील शाश्वत आर्थिक विकासासाठी भारत-जपान सहकार्य उपक्रमाच्या आरंभाचे स्वागत करतो. यादृष्टीने आम्ही भारताच्या सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि समग्र प्रगती (महासागर) आणि जपानच्या हिंद महासागर-आफ्रिकेच्या आर्थिक क्षेत्र उपक्रमाच्या भारताच्या दृष्टिकोनानुरूप दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील इतर देशांसोबत व्यावसायिक सहकार्य वाढविण्यासाठी एक केंद्र म्हणून खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील व्यवसाय आणि गुंतवणूक तसेच भारतात जपानी कंपन्यांच्या मजबूत एकतानतेला प्रोत्साहन देऊ.

(II) पुढच्या पिढीतील आर्थिक सुरक्षा भागीदारी

आपल्या द्विपक्षीय भागीदारीला नवीन उंचीवर नेत असताना, आम्ही भारत-जपान आर्थिक सुरक्षा उपक्रम सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवतो जो प्रमुख वस्तू आणि सामग्रीच्या पुरवठा साखळ्या बळकट करण्यासाठी संपूर्ण राष्ट्राच्या प्रयत्नांद्वारे धोरणात्मक सहकार्याला गती प्रदान करतो, ज्यामुळे बाजारपेठेतील विविधता वाढते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात सहकार्य वाढते, ज्यामध्ये खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील सहकार्याचा समावेश आहे:

धोरणात्मक व्यापार आणि तंत्रज्ञानासह आर्थिक सुरक्षेवरील संवादाच्या सरकार आणि व्यवसायाच्या पाऊलखुणांद्वारे सेमीकंडक्टर्स, अत्यावश्यक खनिजे, औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान, दूरसंचार, स्वच्छ ऊर्जा आणि नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ठोस प्रकल्पांचा वेध घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे;

वरील क्षेत्रातील नवीनतम घडामोडींवरील सर्वोत्तम पद्धतींबद्दल धोरणात्मक दृष्टिकोन, बुद्धिमत्ता आणि माहिती सामायिक करणे;

खनिज संसाधनांच्या क्षेत्रातील सहकार्य करार, भारत-जपान डिजिटल भागीदारी 2.0, सेमीकंडक्टर पुरवठा साखळी भागीदारीबाबतच्या सहकार्य कराराद्वारे लवचिक पुरवठा साखळी आणि बाजार विविधीकरण सहकार्याला प्रोत्साहन देणे.

खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील सहकार्याला प्रोत्साहन देणे, ज्यामध्ये JETRO, CII आणि JCCII द्वारे आर्थिक सुरक्षा सहकार्यावरील संयुक्त कृती आराखड्याला पाठिंबा देणे समाविष्ट आहे;

भारत-जपान आर्थिक सुरक्षेवरील संवादांतर्गत, भारत-जपान खाजगी-क्षेत्र संवाद, या व्यवसाय स्तंभाच्या आरंभाचे स्वागत करणे, ज्यामध्ये संयुक्त कृती आराखड्यापेक्षा वरचढ होण्यासाठी धोरणात्मक व्यापार आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे;

एआयवरील द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच एक नाविन्यपूर्ण आणि विश्वासार्ह एआय परिसंस्था वाढवण्यासाठी जपान-भारत एआय सहकार्य उपक्रम (JAI) अंमलात आणणे; आणि

निरोगी बॅटरी बाजार आणि परिसंस्था वाढवण्यासाठी भारत-जपान बॅटरी पुरवठा साखळी सहकार्याला प्रोत्साहन देणे.

(III) पुढच्या पिढीतील गतिशीलता

जपानी प्रगत तंत्रज्ञान आणि भारतीय प्रतिभेच्या ताकदीचा वापर करून आम्ही पायाभूत सुविधा, दळणवळण आणि गतिशीलतेमधील व्यापक सहकार्यासाठी एक चौकट म्हणून पुढील पिढी गतिशीलता भागीदारी (एन जी एमपी) स्थापन करू. या भागीदारीद्वारे, आम्ही असे उपाय सह-निर्मित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो जे भारतात जास्त मागणी असलेल्या मोबिलिटी क्षेत्रातील आव्हानांना तोंड देतील आणि मेक इन इंडिया फॉर द वर्ल्डच्या दृष्टिकोनाला सेवा देणाऱ्या मजबूत पुढच्या पिढीच्या गतिशीलता आणि संबंधित उद्योगांच्या विकासाला चालना देतील. डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून, शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर लक्ष केंद्रित करून तसेच सुरक्षितता आणि आपत्ती लवचिकतेला प्राधान्य देऊन, आम्ही सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांचा शोध घेऊ, ज्यामध्ये खालील उदाहरणे समाविष्ट आहेत परंतु त्यापुरते मर्यादित नाही:

रेल्वेमधील आतापर्यंतच्या सहकार्यावर आधारित, "मेक इन इंडिया" नेक्स्ट जनरेशन रोलिंग स्टॉक, फंक्शनल सिग्नलिंग आणि ऑपरेशनल कंट्रोल सिस्टम, भूकंप-प्रतिरोधक, एआय-आधारित देखभाल आणि देखरेख, रेल्वे क्षेत्रातील ऊर्जा संक्रमण, प्रगत मेट्रो रेल सिस्टम आणि मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टमसह हाय-स्पीड रेल्वे सिस्टम;

एकात्मिक स्थानक क्षेत्र विकास, सेवा म्हणून गतिशीलता मंच, शहरांतर्गत रस्ते नेटवर्क आणि एंड-टू-एंड कनेक्टिव्हिटीद्वारे ट्रान्झिट-केंद्रित विकास, ज्यामध्ये पर्सनल रॅपिड ट्रान्झिट (PRT) सारख्या लघु-स्तरीय स्वयंचलित शहरी वाहतूक प्रणालींचा समावेश आहे;

वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण यासारख्या आव्हानांना तोंड देणाऱ्या प्रगत मॉडेलिंगद्वारे स्मार्ट शहरे आणि शहरांचे निष्कार्बनीकरण यांचे नियोजन केले जाईल;

सॉफ्टवेअर डिफाईन्ड व्हेईकलद्वारे चालविल्या जाणाऱ्या कनेक्टेड तंत्रज्ञानाद्वारे गतिशीलता क्षेत्रात डेटा वापर, गतिशीलता क्षेत्रात सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवते;

मोटारगाड्या, विमाने आणि जहाजांचे‌ उत्पादन, शाश्वत इंधनाचा वापर करणे आणि पर्यावरणपूरक इंधन साठवणुकीचा वापर करणे आणि वाहतूक पायाभूत सुविधांचा विस्तार करणे;

अन्न आणि औषध वाहतुकीसाठी कोल्ड-चेन लॉजिस्टिक सेवा; आणि

आपत्ती सिम्युलेशन आणि आपत्तीच्या प्रसंगी निर्वासन मार्गदर्शन योजना तयार करणे यासारख्या शहरी नियोजन आणि विकासात 3 डी शहर प्रारूपाचा वापर.

वरील उत्पादने भारतात तयार करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी आम्ही भारतीय आणि जपानी कंपन्यांमधील सहकार्याला सक्रियपणे प्रोत्साहन देऊ. या गतिशीलता उपायांचे आरेखन, कार्यान्वयन आणि देखभालीसाठी कुशल कर्मचाऱ्यांचे तांत्रिक प्रशिक्षण आणि मानव संसाधन देवाणघेवाणीद्वारे आम्ही भारतात क्षमता बांधणीला प्राधान्य देऊ.

त्याच वेळी आम्ही लवचिक पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी सेंडाई फ्रेमवर्क यासारख्या बहुपक्षीय यंत्रणांमधील सहकार्य मजबूत करून आपत्ती जोखीम कमी करण्याच्या कार्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत.

(IV) भावी पिढीसाठी पर्यावरणीय वारसा

भावी पिढ्यांसाठी शाश्वत विकास उद्दिष्टांना (SDGs) चालना देऊन तसेच परस्परांची हवामान बदलाशी जुळवून घेण्याबद्दल, ऊर्जा संक्रमणाबद्दल, कचऱ्यात घट साधण्याबद्दल आणि शून्य कार्बन उत्सर्जनाची स्थिती गाठण्याशी संबंधित लक्ष्ये साध्य करण्यासाठीच्या सहकार्याच्या माध्यमातून, आम्ही एक पृथ्वी, एक भविष्य या तत्त्वाप्रती असलेला आमचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे खाली नमूद माध्यमातून साध्य केले जाईल:

​मिशन LiFE च्या माध्यमातून ऊर्जा सुरक्षा, कमी-कार्बन आर्थिक वाढ, शाश्वत समुदाय आणि जीवनशैली सुनिश्चित करणे.

​प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय परिस्थितीनुसार कार्बन-मुक्त अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब.

​भारत-जपान ऊर्जा संवादाच्या माध्यमातून भारत-जपान स्वच्छ ऊर्जा भागीदारी अंतर्गत ऊर्जा सहकार्य मजबूत करणे.

​कचरा-ते-ऊर्जा तंत्रज्ञान, कचरा विलगीकरण आणि पुनर्वापर पद्धतींवर परस्पर सहकार्याद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणे.

​शाश्वत शेती पद्धतीला प्रोत्साहन देणे, कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी हवामान बदलाचे परिणाम कमी करणारे तंत्रज्ञान, सागरी आणि किनारी परिसंस्थेचे संरक्षण करणे, शाश्वत वन व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन, कृषिवनीकरण आणि बांबू (bamboo) सारख्या नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर.

​संयुक्त ऋण निर्धारण यंत्रणा (JCM), भावी पिढीसाठी स्वच्छ ऊर्जा गतिशीलता आणि पायाभूत सुविधांविषयक उपक्रम, हरित हायड्रोजन मूल्यसाखळी आणि उत्सर्जनाच्या अंदाजांसाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या उपक्रमांद्वारे स्वच्छ ऊर्जा आणि उत्सर्जन तसेच प्रदूषण कमी करण्याच्या बाबतीत सहकार्य.

​उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गट (LeadIT) समूहासारख्या बहुपक्षीय पर्यावरणीय संस्थांच्या प्रयत्नांना अधिक बळकटी देणे.

​(V) पुढच्या पिढीचे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारी

​मूलभूत विज्ञानातील नव्या दिशादर्शक आघाडीच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणाला पुढे नेण्यासाठी आंतर-क्षेत्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही परस्परांच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक क्षमता, संस्था आणि मनुष्यबळाचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे खाली नमूद माध्यमातून साध्य केले जाईल:

​केईके, त्सुकुबा (KEK, Tsukuba) मधील भारतीय किरणमार्ग प्रकल्प (Indian Beamline), क्वांटम तंत्रज्ञान आणि पुढच्या पिढीच्या संशोधन साधनांसाठी उच्च-कार्यक्षम संगणनाच्या माध्यमातून मूलभूत संशोधनामध्ये सहकार्य.

​जपानने सुरू केलेल्या जपान-भारत स्टार्टअप पाठबळ उपक्रमाच्या (Japan-India Startup Support Initiative) माध्यमातून मुक्त-नवोन्मेष, सामाजिक समस्यांचे निराकरण, प्रगत-तंत्रज्ञान, माहितीसाठ्याचा वापर, इनक्युबेशन अर्थात स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यावरील प्रगतीसाठी सहकार्यपूर्ण पाठबळ (incubation) आणि पतपुरवठा, तसेच नवोन्मेष परिसंस्थांना परस्परांशी जोडणे आणि स्टार्टअप्सना दोन्ही देशांमध्ये त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी देणे.

​भारत-जपान निधी समूहाच्या (Fund of Funds) माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांसह स्टार्टअप कंपन्यांसाठी निधी उपलब्ध करून देणे.

​भारत-जपान माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (ICT) सहकार्य आराखड्या अंतर्गत संयुक्त कार्यगटाद्वारे माहिती आणि संवाद तंत्रज्ञानविषयक सहकार्याला प्रोत्साहन देणे.

​लुनार ध्रुवीय अन्वेषण (Lunar Polar Exploration-LUPEX) अभियानासह अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विस्तारित सहकार्य आणि अंतराळ क्षेत्रातील खाजगी व्यावसायिक संस्था तसेच स्टार्टअप्समध्ये दुवा निर्माण करणे.

​आंतरराष्ट्रीय ऊर्जानिर्मिती प्रकल्प (ITER) आणि लहान मॉड्यूलर तसेच प्रगत भट्टींशी संबंधित संयुक्त संशोधनासह विभाजन आणि संयोग (Fission and Fusion) तंत्रज्ञानावर संवाद.

​जी-20 समूहाच्या नवी दिल्ली जाहिरनाम्यानुसार (G20 New Delhi Declaration) तसेच पुढच्या पिढीतील कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी प्रगत नवोन्मेषासोबत (Advancing Innovations for Empowering Next Generation Agriculture -AI-ENGAGE) सुसंगत राहात, भरड धान्यांसह अन्न तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञानमध्ये संयुक्त संशोधन.

​(VI) पुढच्या पिढीच्या आरोग्यामध्ये गुंतवणूक

संयुक्तपणे वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय संशोधन सहकार्याला प्रोत्साहन देऊन, साथीच्या रोगांचा आणि आरोग्यविषयक उदयोन्मुख कलांचा सामना करून, जीवन वाचवणाऱ्या औषधे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील याची सुनिश्चित करून तसेच पारंपरिक आणि पर्यायी औषधांच्या उपयुक्ततेचा उपयोग करून घेत, आम्ही आरोग्य सुविधांची सार्वत्रिक उपलब्धता (UHC) साध्य करण्याच्या उद्दिष्टासह, आमच्या नागरिकांच्या आरोग्यामध्ये आणि कल्याणामध्ये गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे खाली नमूद माध्यमांतून साध्य केले जाईल:

​भारताचा आयुष्मान भारत उपक्रम आणि जपानच्या आशिया आरोग्य आणि कल्याण उपक्रम (Asia Health and Wellbeing Initiative) यांमधील सहकार्य अधिक दृढ करणे तसेच जागतिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे.

​नियमितपणे संयुक्त समिती बैठका घेऊन सहकार्याची पुढची क्षेत्रे निश्चित करणे.

​वृद्धापकाळातील औषधोपचार, मूलपेशी उपचार (stem cell therapy), पुनरुत्पादक औषधे, जनुकीय उपचार, संश्लेषित जैवशास्त्र (synthetic biology), कर्करोग उपचार, डिजिटल आरोग्य आणि स्वयंचलित निदान उपाययोजना यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन.

​आरोग्य सुविधांच्या सार्वत्रिक उपलब्धतेला गती देण्यासाठी सार्वत्रिक आरोग्य उपलब्धता ज्ञानकेंद्रांसोबत (UHC Knowledge Hub) सहकार्याच्या शक्यतांचा शोध घेणे.

​वैद्यकीय संस्थांमधील मोठ्या व्याप्तीच्या सहकार्याच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे आणि वैद्यकीय व्यावसायिक तज्ञांसाठी पाठ्यवृत्ती (Fellowship) सुरू करणे.

​या दोन्ही देशांमध्ये अत्यावश्यक औषधे, सक्रिय औषधी घटक (APIs) आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याची सोय करणे, आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट करणे.

​भारतातील आयुष मंत्रालयाच्या मदतीने जपानमध्ये योग, ध्यान, आयुर्वेद आणि सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देणाऱ्या उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करणे.

​(VII) पुढच्या पिढीतील लोकांमध्ये थेट परस्पर भागीदारी

दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध आणि सांस्कृतिक जवळीकीची दखल घेत आणि आपल्या संबंधित आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या मानवी संसाधनांच्या क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी, आम्ही आपल्या लोकांमधील थेट परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे खाली नमूद माध्यमातून साध्य केले जाईल:

​भारत-जपान मनुष्यबळ विनिमय आणि सहकार्यासाठी कृती आराखडा (Action Plan for India-Japan Human Resource Exchange and Cooperation) सुरू करणे, याअंतर्गत पुढील 5 वर्षांत जपानमध्ये भारतातून 50,000 कुशल कर्मचारी आणि संभाव्य प्रतिभावान व्यक्तींना पाठवण्यासह दोन्ही देशांमध्ये परस्परांत 500,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण करण्याचे लक्ष्य असेल.

​जपान-भारत उत्पादन संस्था आणि जपानी अनुदानित अभ्यासक्रमाच्या (Japanese Endowed Courses - JEC) कामगिरीवर आधारित भारत-निप्पॉन अनुप्रयुक्त कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत (India-Nippon Programme for Applied Competency Training - INPACT) भारतातील अभ्यासक्रम आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांचा विस्तार करणे आणि जपानमधील भारतीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे.

​जपानच्या अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाद्वारे (METI) भारत-जपान प्रतिभा दूवा (India-Japan Talent Bridge - IJTB) अंतर्गत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, आंतरवासिता कार्यक्रम, रोजगार सर्वेक्षण आणि माहितीचे प्रसारण, तसेच दोन्ही देशांमध्ये प्रतिभेच्या गतिशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित संकेतस्थळ सुरू करणे.

​जपानच्या शिक्षण, संस्कृती, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे (MEXT) सकुरा विज्ञान विनिमय कार्यक्रम (Sakura Science Exchange Program), कमळ कार्यक्रम (LOTUS Programme), होप बैठका (HOPE meetings) आणि आंतर-विद्यापीठ विनिमय प्रकल्पाच्या माध्यमातून (Inter-University Exchange Project) संशोधक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण दृढ करणे तसेच एज्यू-पोर्ट जपान (EDU-Port Japan) या उपक्रमाद्वारे शैक्षणिक सहकार्याला पाठबळ पुरवणे.

​भारतातील e-Migrate portal आणि जागतिक क्षमता केंद्रांद्वारे संघटनात्मक सहकार्य आणि कार्यस्थळांचा विस्तार करणे.

​द्विपक्षीय पर्यटनाचा ओघ वाढवण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन घडवणे, पर्यटकांचा ओघ वाढवणे.

​जपानी भाषा शिक्षकांसाठी प्रशिक्षण संधींचा विस्तार करणे, तसेच जपानी भाषा शिक्षणाचे विशेषज्ञ पाठवून कार्यक्षम अभ्यासक्रम आणि साहित्य तयार करण्यासाठी समर्थन देणे.

​भारतीय जपानी भाषा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी निहोंगो भागिदार (NIHONGO Partners) या जपानी भाषा शिकवणाऱ्या सहाय्यकांची भारतात नियुक्ती करणे.

​(VIII) पुढच्या पिढीची राज्य-प्रीफेक्चर (भारतीय राज्ये आणि जपानी प्रांत) भागीदारी

वर नमूद अनेक प्रयत्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी भारतीय राज्ये आणि जपानच्या प्रांतांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करून, भारत-जपान भागीदारीविषयी अधिक व्यापक दृष्टिकोन तयार करण्यासाठी आम्ही त्यांच्या ऊर्जेचा उपयोग घेता येईल असे योग्य व्यासपीठ तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे खाली नमूद माध्यमातून साध्य केले जाईल:

​पूरक संसाधने आणि ऐतिहासिक संबंधांवर आधारित नवीन सिस्टर सिटी अर्थात पूरक शहरे तसेच राज्य आणि प्रांतांमधील भागीदारीला प्रोत्साहन देणे.

​भारतीय आणि जपानी शहरांमधील थेट विमान वाहतूक जोडणीला चालना देणे.

​भारत-कान्साई व्यापारी मंचाच्या माध्यमातून लघु आणि मध्यम उद्योगांसह व्यावसायिक भागीदारी मजबूत करणे, स्थानिक उद्योग व्यवसाय पुनरुज्जीवित करणे आणि प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देणे, तसेच भारत आणि क्युशू (Kyushu) दरम्यान अशाच प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठीच्या शक्यता तपासणे.

​भारत आणि जपानमधील प्रादेशिक संधींशी संबंधित मोठ्या प्रमाणातील माहितीच्या देवाणघेवाणीची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच सामायिक आव्हानांवरील उपाययोजना विकसित करण्यासाठी राज्ये आणि प्रांतांमधील सर्वोत्तम कार्यपद्धतींविषयीच्या माहिती परस्परांसोबत सामायिक करणे.

​भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी प्रत्येकी 3 भेटी आयोजित करून राज्य-प्रांत स्तरावरील प्रतिनिधींच्या भेटींना प्रोत्साहन देणे.

वर नमूद आठ प्रयत्नांच्या माध्यमातून, आम्ही परस्परांमधील द्विपक्षीय संबंधांच्या स्थापनेच्या आठव्या दशकात भारत-जपान लोक-केंद्रित भागीदारीच्या परिवर्तनात्मक टप्प्याची सुरुवात करण्याची आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी मूर्त स्वरूपातील लाभ आणि सहकार्याच्या संधी निर्माण करण्याची आशा बाळगत आहोत.

जपानचे पंतप्रधान इशिबा शिगेरू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियोमध्ये 29-30 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित वार्षिक शिखर परिषद 2025 निमित्त दिलेल्या जपान भेटीदरम्यानचा, आगामी दशकासाठीचा परस्पर सामायिक दृष्टिकोन दर्शवणाऱ्या या दस्तऐवजाला आम्ही मान्यता देतो.

***

यश राणे / नंदिनी मथुरे / तुषार पवार / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2162584) Visitor Counter : 6