पंतप्रधान कार्यालय
भारत आणि जपान यांच्यामधला सुरक्षा सहकार्याविषयक संयुक्त जाहीरनामा
Posted On:
29 AUG 2025 7:43PM by PIB Mumbai
भारत आणि जपान सरकार (यानंतर यांचा उल्लेख ‘दोन/दोन्ही पक्ष’ असा केला जाईल )
भारत आणि जपान यांच्यातल्या सामायिक मुल्ये आणि समान हित यावर आधारलेल्या भारत–जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीची उद्दिष्टे आणि राजकीय दृष्टीकोन लक्षात घेत,
मुक्त,खुले,शांततापूर्ण,समृद्ध, दबावमुक्त आणि आंतरराष्ट्रीय नियमाधारित हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी दोन्ही देशांच्या अत्यावश्यक भूमिका अधोरेखित करत,
दोन्ही देशांच्या द्विपक्षीय सुरक्षा सहकार्यातल्या लक्षणीय प्रगतीची आणि गेल्या काही वर्षातल्या धोरणात्मक परीदृष्य आणि धोरणात्मक प्राधान्य यांच्यातल्या विकासाची दखल घेत,
संसाधन संपत्ती आणि तंत्रज्ञानविषयक क्षमतांच्या दृष्टीने त्यांचे परस्परपूरक सामर्थ्य ओळखत,
राष्ट्रीय हित आणि सातत्यपूर्ण आर्थिक गतिशीलतेच्या दृष्टीने राष्ट्र सुरक्षा हितासाठी व्यावहारिक सहकार्य वाढविण्याची कटिबद्धता दर्शवत,
हिंद-प्रशांत क्षेत्र आणि त्यापलीकडे सामायिक चिंतेच्या सुरक्षा मुद्य्यांवर सहकार्याच्या सखोल संधींचा शोध घेत,
आंतरराष्ट्रीय नियमाधारित व्यवस्था जारी राखण्यासाठी वचनबद्धता राखत,
सुरक्षा सहकार्यविषयक हा संयुक्त जाहीरनामा स्वीकारत आहेत जो
त्यांच्या भागीदारीचा नवा टप्पा प्रतिबिंबित करतो त्याबरोबरच त्यांनी याविषयी सहमती दर्शवली आहे की-
1 . दोन्ही पक्षांच्या संरक्षण दलांमध्ये आंतर संचालनता आणि ताळमेळ यांना प्रोत्साहन देऊन परस्परांच्या संरक्षण क्षमता आणि सज्जता यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न, यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे मात्र तो इतक्याच क्षेत्रांपुरता मर्यादित नाही-
(1) वाढती जटीलता असलेल्या व्यापक क्षेत्रात आपल्या सैन्यांमध्ये द्विपक्षीय सराव आयोजित करणे आणि परस्परांनी आयोजित केलेल्या बहुपक्षीय सरावात परस्परांचा सहभाग
(2) संयुक्त कर्मचारी स्तरावर व्यापक संवादासाठी नवा बैठक ढाचा उभारणीसाठी शोध
(3) हिंद – प्रशांत क्षेत्रात मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती सहाय्य अभियानासाठी सज्जतेच्या दृष्टीने तीनही सैन्यदलांच्या सरावाच्या शक्यता आजमावणे
(4) विशेष मोहीम युनिट्समध्ये समन्वय
(5) जपान आत्मसंरक्षण दले आणि भारतीय सशस्त्र दले यांच्यात लॉजिस्टिक सामायिक करण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी पुरवठा आणि सेवांच्या परस्परसंबंधी तरतुदीसंदर्भात भारत-जपान कराराचा उपयोग वाढविणे
(6) दहशतवादाला आळा घालणे,शांतता मोहिमा आणि सायबर संरक्षण यासारख्या परस्परांच्या प्राधान्य क्षेत्रात विशिष्ट विभागात सहकार्याच्या संधींचा शोध घेणे.
(7) नव्याने निर्माण होणाऱ्या धोक्यांच्या संदर्भात आकलनासह माहितीचे आदान-प्रदान करणे.
(8) संरक्षण मंचांची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी परस्परांच्या सुविधांच्या वापराला प्रोत्साहन देणे
(9) रासायनिक,जैविक आणि रेडीओलॉजिकल धोक्यांपासून सैन्यदले आणि जनतेचे संरक्षण करण्यासाठी,याचा शोध, निर्जंतुकीकरण, वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाय,बचावात्मक साहित्य आणि प्रतिसादात्मक धोरणे यांच्यासह समन्वयाच्या संधी शोधणे.
2. सामायिक सागरी सुरक्षा उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात शांततामय सागरी वातावरणासाठी नौदल आणि तटरक्षक दल सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी खालील बाबींचा समावेश मात्र तो यापुरताच मर्यादित नाही:
(1) जपान स्वसंरक्षण दले, भारतीय सशस्त्र दले आणि त्यांच्या तटरक्षक दलाच्या जहाजांच्या वारंवार बंदर भेटी
(2) सामायिक सागरी परीदृश्यासाठी,माहिती संयोग केंद्र- हिंद महासागर क्षेत्र (आयएफसी – आयओआर ) आणि सागरी क्षेत्र जागृतीसाठी हिंद- प्रशांत भागीदारी ( आयपीएमडीए) द्वारा,परिस्थितीजन्य दक्षता आणि प्रदेश निहाय सहकार्य व्यापक करणे
(3) सागरी क्षेत्रात चाचेगिरी,सशस्त्र दरोडे आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांविरोधात, आशियातील जहाजांविरुद्ध चाचेगिरी आणि सशस्त्र दरोड्याना आळा घालणाऱ्या प्रादेशिक सहकार्य करारासह (आरईसीएएपी )द्विपक्षीय आणि प्रादेशिक उपक्रम आणि मंचाद्वारे कायदा अंमलबजावणी सहकार्य वाढविणे,
(4) हिंद-प्रशांत क्षेत्रात माहितीचे आदान-प्रदान आणि क्षमता वृद्धीद्वारे आपत्तीविषयक धोके कमी करण्यासाठी आणि या धोक्याकरिता सज्जतेसाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य (आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी आणि आपत्ती कमी करण्यासाठीचे आशियाई केंद्र यांसह )
(5) हिद-प्रशांत क्षेत्र आणि त्यापलीकडे तिसऱ्या देशांना त्यांच्याशी संबंधित सागरी सुरक्षा आणि सागरी कायदा अंमलबजावणी सहाय्याबाबत समन्वय
3. राष्ट्रीय सुरक्षे संदर्भात महत्वाच्या क्षेत्रात लवचिकतेसाठी सरकारी आस्थापने आणि खाजगी क्षेत्र संबंधीतांमध्ये तंत्रज्ञानविषयक आणि औद्योगिक सहकार्याला प्रोत्साहन आणि सुलभता, यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे -
(1) दोन्ही पक्षांच्या सध्याच्या आणि भविष्यातल्या सुरक्षा आवश्यकता लक्षात घेऊन उपकरणे आणि तंत्रज्ञान सह-विकास आणि सह उत्पादन यासाठी संरक्षण साहित्य आणि तंत्रज्ञान सहकार्य यंत्रणेअंतर्गत परस्पर लाभ आणि उपयोगाकरिता सहकार्याच्या संधींचा शोध घेणे
(2) दोन्ही पक्षांच्या सद्य आणि भविष्यातल्या सुरक्षा गरजांप्रती, विशिष्ट क्षमता,स्टार्ट अप्स आणि सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांवर लक्ष केंद्रित करत संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात नियमित औद्योगिक भेटी,
(3) नव्या क्षेत्रात दोन्ही पक्षांच्या परिचालन दृष्टीकोनाला प्रभावी साहाय्यकारक ठरणारे तंत्रज्ञान आदानप्रदान
(4) अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे आणि पुरवठा साखळी यामधल्या सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संबंधित निर्यात नियंत्रण धोरण आणि पद्धतींचे परस्परांकडून आकलन
(5) धोरणात्मक क्षेत्रात दुर्बलता शमन करण्यासह आर्थिक दबावाला, बिगर बाजार धोरणे आणि त्यातून उद्भवणाऱ्या प्रथा आणि अतिरिक्त क्षमता यांना तोंड देण्यासह आर्थिक सुरक्षेशी सबंधित महत्वाच्या मुद्य्यांवर सहकार्य.,
(6) विविध धोक्यांचा सामना करण्यासाठीची सज्जता आणि लवचिकता वाढविण्यासाठी लष्करी वैद्यकशास्त्र आणि आरोग्य सुरक्षा क्षेत्रात सहकार्याच्या संधींचा शोध घेणे
(7) भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि जपानची अधिग्रहण तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक एजन्सी (एटीएलए) यांच्यात संरक्षण संशोधन आणि विकास सहकार्य वृद्धिंगत करणे
(8) महत्वाची खनिजे क्षेत्रात, शोध,प्रक्रिया आणि शुद्धीकरण तंत्रज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण यासह सहकार्य
4.. पारंपारिक आणि अपारंपारिक धोक्यांविरोधात सुरक्षा सहकार्य समकालीन करण्यासह नव्या,महत्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हाने आणि संधींना प्रतिसाद देण्यासाठी खालील मार्गांसह आणखी संधीचा शोध घेणे -
(1) दहशतवाद,कट्टरतावाद आणि संघटीत आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना गुप्तचर आणि माहितीची देवाणघेवाण याद्वारे आळा घालणे यामध्ये डिजिटल क्षेत्र आणि मानवरहित प्रणालीसह आधुनिक माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाचाही समावेश आहे.
(2) सुरक्षा आणि अखंडता यांची सुनिश्चिती करत कृत्रिम प्रज्ञा,रोबोटिक्स, क्वांटम, सेमीकंडक्टर, स्वयंचलित तंत्रज्ञान, भविष्यातील नेटवर्क,जैवतंत्रज्ञान,सायबर सुरक्षा यासारख्या तंत्रज्ञानातील प्रगतीसह संयुक्त संशोधन आणि विकास,शिक्षण आणि औद्योगिक सहकार्याला प्रोत्साहन
(3) माहितीच्या देवाणघेवाणीद्वारे महत्वाची माहिती पायाभूत संरचना बळकट करण्यासह सायबर लवचिकता उभारणे
(4) राष्ट्रीय सुरक्षा,उपग्रह आधारित नेव्हिगेशन,पृथ्वी निरीक्षण आणि अंतराळ क्षेत्रातील परस्पर संमत इतर विभागात संबंधित अंतराळ प्रणालीचा वापर विस्तारणे
(5) अंतराळ पारिस्थितीक जाणीवेसंदर्भात अंतराळ कचऱ्याचा मागोवा,देखरेख आणि व्यवस्थापन यासह सहकार्यासाठी सल्लामसलत आयोजित करणे
5. सामायिक प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा उद्दिष्टे आणि संबंधित बहुपक्षीय गटांमध्ये धोरणे आणि स्थिती याबाबत समन्वयाला खालील मार्गांसह प्रोत्साहन देणे :
(1) आसियानची केंद्रीयता आणि एकतेला पाठींबा देणे, आसियानच्या नेतृत्वाखालील चौकटीला आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात आसियानच्या दृष्टीकोनाला पाठींबा देणे, त्याचबरोबर हिंद-प्रशांत महासागर उपक्रम आणि मुक्त आणि खुले हिंद-प्रशांत (एफओआयपी) साठी परस्परांच्या धोरणात्मक प्राधान्यांमध्ये योगदान देणे.
(2) राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करत हिंद-प्रशांत क्षेत्रात विश्वासार्ह ,शाश्वत,लवचिक आणि दर्जेदार पायाभूत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे
(3) बळ अथवा जबरदस्तीने परिस्थितीमध्ये बदल करणाऱ्या कोणत्याही अस्थिरताकारक किंवा एकतर्फी कारवाईला विरोध करणे आणि विवादांचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण करणे, नेव्हिगेशन आणि उड्डाण स्वातंत्र्य तसेच संयुक्त राष्ट्रांच्या समुद्राशी संबंधित कराराला अनुसरून आंतरराष्ट्रीय करारानुसार समुद्राच्या वैध उपयोगांना प्रोत्साहन देणे
(4) क्वाडमध्ये सहकार्य अधिक दृढ करणे आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि प्रगतीसाठी क्वाडची सकारात्मक आणि व्यावहारिक कार्यसूची पुढे नेणे
(5) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील (युएनएससी) स्थायी आणि अस्थायी वर्गाच्या विस्तारासह सुधारणांना प्रोत्साहन देणे आणि विस्तारित युएनएससीमध्ये स्थायी सदस्य म्हणून परस्परांच्या उमेदवारीला पाठींबा देणे
(6) सीमापार दहशतवादासह कोणत्याही स्वरूपातील आणि आविष्कारातील दहशतवादाचा निषेध करणे, दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक आणि भौतिक सहाय्य तातडीने बंद करण्यासाठी एकत्रित काम करणे, दहशतवादाला आळा घालण्याकरिता बहुपक्षीय मंचांवर एकत्रित काम करणे आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या समावेशक कराराच्या स्वीकारासाठी प्रयत्न करणे
(7) अण्वस्त्रांच्या संपूर्ण निरस्त्रीकरणासाठी आणि अण्वस्त्र प्रसारबंदीसाठी आणि आण्विक दहशतवाद समाप्त करण्याकरिता सामायिक कटिबद्धतेची पुन्हा पुष्टी त्याच बरोबर शॅनेन नियमाला अनुसरून निरस्त्रीकरणावरच्या परिषदेत भेदभावविरहीत,बहुमंचीय आणि आंतरराष्ट्रीय आणि प्रभावीपणे पडताळणी योग्य, विभाज्य साहित्य नियंत्रण कराराच्या वाटाघाटींवर तातडीने सुरवात आणि त्याचे समापन
(8) जागतिक अण्वस्त्र निरस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना बळकटी देण्याच्या उद्देशाने अणूपुरवठादार गटामध्ये भारताच्या सदस्यत्वासाठी कार्य जारी राखणे
6.दोन्ही बाजूंच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय 2 + 2 बैठका आणि विविध अधिकृत सुरक्षा संवादाद्वारे सध्याच्या द्विपक्षीय चर्चा आणि आदान-प्रदान रचनेला खालीलप्रमाणे संमिश्र यंत्रणेसह पूरकता आणि बळकटी:
(1) भारत आणि जपान यांच्यासमोरच्या सुरक्षा स्थितीचा समग्र आढावा घेण्यासाठी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा वार्षिक राष्ट्रीय संवाद
(2) धोरणात्मक व्यापार आणि तंत्रज्ञानासह भारताचे परराष्ट्र सचिव आणि जपानचे परराष्ट्र उप मंत्री यांच्यातला आर्थिक सुरक्षाविषयक संवाद आणि परस्पर आर्थिक सुरक्षा वृद्धिंगत करणे आणि सामरिक उद्योग आणि तंत्रज्ञान यावरच्या सहकार्याला प्रोत्साहन
(3) भारतीय सशस्त्र दले आणि जपानची आत्म संरक्षण दले यांच्यातल्या संयुक्त आणि आंतर सेवा सहकार्याच्या उद्देशाने उच्च स्तरीय संवाद
(4) भारतीय तटरक्षक दल आणि जपान तटरक्षक दल यांच्यात सहकार्य करारावर आधारित तटरक्षक दल कमाडंट स्तरीय बैठक
(5) व्यापार सहकार्यासाठीच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी नवचैतन्यमय भारत-जपान संरक्षण उद्योग मंच
(6) सुरक्षाविषयक आव्हानांच्या व्यापक आकलनासाठी आणि सहकार्याच्या नव्या कल्पना शोधण्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत-जपान विचारमंथन ‘ट्रॅक 1.5 संवाद’
***
यश राणे / निलिमा चितळे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2162576)
Visitor Counter : 4
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam